प्रवासवर्णन – पंचमढी – भेडाघाट – इंदौर : इंदौरची खादाडी (भाग ५ अंतिम)

गेले तीन दिवस इंदौर मध्ये राहून सुद्धा खादाडीला मुहूर्त सापडत नव्हता म्हणून बेचैन होतो. शेवटच्या दिवशी मात्र व्यवस्थित ठरवून इंदौर स्थलदर्शन आणि खादाडी साधायचे पक्के केले. इंदौरमध्ये प्रेक्षणीय काय हा मोठा प्रश्न होता. (टीप: मी प्रेक्षणीय “स्थळांबद्दल” बोलत आहे ह्याची तरुण वाचकांनी नोंद घ्यावी!) शेवटी लालबाग पॅलेस पहायचे ठरले.

महेंद्र कुलकर्णींनी नीलकंठ भोजनालयाबाद्द्ल लिहिलेले वाचले होतेच. तेव्हा पहिल्यांदा ते शोधून दुपारच्या जेवणाची सोय करून घेतली. इतके साधे सात्विक मराठमोळे जेवण की दिल खूश हो गया. जेवण झाल्या बरोब्बर महेंद्रना एसमेस ने आभार कळवले. नीलकंठ भोजनालय हे अगदी सामान्य दिसणारे होटेल आहे. थाळी सिस्टीम. ह्यात स्वीट नाही. ती वेगळी. पुण्यात जसे उद्धट पणे सांगतात “थाळीत स्वीट येत नाही!” तसे न सांगता अगदी आपुलकीने “कुछ स्वीट लेंगे?” म्हणून आग्रह होता. पण पानातले जेवणच इतके चविष्ट होते की मिठाईची गरजच भासली नाही. मला गवार आजिबात आवडत नाही तरी पानातली गवारीची भाजी सुद्धा मिटक्या मारत खाल्ली.

पुणेरी पाटी

नीलकंठ भोजनालयातून तृप्त झाल्यावर लालबाग पॅलेस पहायला गेलो. हा राजवाडा पाश्चिमात्य स्थापत्यकला वापरून बनवलेला आहे. आत मध्ये गेल्यावर सुद्धा सर्वत्र पाश्चात्य संस्कृतीचा अंमल दिसत होता. आतल्या वस्तूंची मात्र पार वाट लागलेली होती. आतून अगदीच रया गेलेला हा राजवाडा पाहून निराशाच झाली. खरं तर मला हे संस्थानिकांचे राजवाडे पहाताना चीडच येते. जेव्हा सामान्य जनता इंग्रजांच्या जाचात भरडून निघत होती तेव्हा बरेचसे संस्थानिक स्वतःला किती जास्त तोफांच्या सलामी मिळतील ह्या विवंचनेत होते (सयाजीराव गायकवाड, शाहू महाराज ह्यांसारखे काही सन्माननीय अपवाद वगळता येतील).  स्वातंत्र्यवीर सावरकरांचे १८५७ च्या लढयावरचे पुस्तक वाचले की ह्या राजांच्या निष्क्रियतेची  जाणीव होते. कुठे युद्धात तोफांचा वापर करणारे छत्रपति शिवाजी महाराज आणि कुठे स्वतःला सलामी घेण्यासाठी तोफांचा वापर करणारे हे भातुकलीतले राजे. असो!

पॅलेस पाहून झाल्यानंतर जैन काच मंदिर. पूर्ण काचांचे बनलेले देऊळ. मला तरी विशेष काही वाटले नाही. ह्या दोन गोष्टी पाहिल्यावर इंदौर मध्ये पहाण्यापेक्षा खाण्यासच जास्त महत्त्व दिले पाहिजे असे ठरवून आम्ही होटेलच्या रूम वर गेलो.

५६ दुकान

संध्याकाळी पुरेपूर खादाडी करायला म्हणून व्यवस्थित बेत तयार केला. पहिल्यांदा छावणी भागात पाणी पुरी (माहिती सौजन्य कै. अभिनय कुलकर्णी) खायला गेलो. मुंबई पुण्यापेक्षा खचितच वेगळी चव आहे. आणि हो! ही फक्त तिखट पाणी आणि बुंदी घालूनच खातात. पाण्यात हिंगाचा वेगळाच स्वाद होता. खाऊन झाल्यावर सुद्धा त्याची मंद जाणीव होत होती. पाणी पुरी खाल्ल्यावर मोर्चा वळवला ५६ दुकान कडे. इकडे खाण्यापिण्याची लाईनीत ५६ दुकाने आहेत. इकडे चिकन हॉटडॉग छान मिळतात म्हणून ऐकले होते पण अपेक्षाभंग झाला. चिकन कटलेट बनपावात घालून दिले. मग प्रकाश स्वीट मध्ये रबडी खाल्ली आणि घरी घेऊन जायला वेगवेगळे फरसाण बांधून घेतले. इकडे घेतलेला चहाचा मसाला एकदम स्वादिष्ट.

आता वेळ झाली होती ती बहुचर्चित सराफावरचे रस्त्यावरचे पदार्थ चाखायची. महेंद्रच्या ब्लॉग वर वाचले होते तेव्हापासून भुट्टे का कीस खायचाच हे ठरवले होते. तेव्हा ते फेमस जोशींचे दुकान शोधून भुट्टे का कीस आणि दहीवडा मागवला. दोन्ही पदार्थ लाजवाब! मग पुन्हा रबडी आणि गुलाबजाम! गुलाबजाम नुसता तोंडात टाकल्यावर विरघळेल असा! आता शिकंजी खाऊन खादाडीचा समारोप करायची वेळ आली होती. पण गोडावर गोड कसे खायचे म्हणून सामोसा घेतला. समोसा ओके होता. मात्र शिकांजी जबरदस्त. आपल्याकडे मिळणाऱ्या पियुषची आठवण करून देणारी चव. पण बरीच दाट.

इंग्लंड मध्ये असताना पब हॉपिंग (म्हणजे एकाच दिवसात अनेक बार मध्ये जाऊन तिकडली स्पेशल बीअर पिणे) अनुभवले होते. इंदौरमध्ये “फूड स्टॉल हॉपिंग” झाले. अगदी पोट  फुटेस्तोवर खाऊन झाल्यावर रात्री जुन्या राजवाड्यावरची रोषणाई पाहून परतलो.

आता घरी जायचे वेध लागले होते. … आणि इंदौरची प्रसिद्ध घमंडी लस्सी खायची राहिल्याबद्दल हळहळ 🙂

जुना राजवाडा

आमचा थोडक्यात सफरनामा

दिवस १ – पुणे – मुंबई टॅक्सी. मुंबई – पिपरिया प्रवास कोलकाता मेलने (रात्री ९:४० ला प्रयाण)
दिवस २ – सकाळी १०:३० ला पिपारीयाला आगमन. पिपरिया – पंचमढी प्रायव्हेट कार, पंचमढी दर्शन
दिवस ३ – पंचमढी दर्शन
दिवस ४ – पंचमढी दर्शन, संध्याकाळी पिपारीयाला प्रयाण. रात्री ८:४० ची जबलपूरला जाणारी भोपाल जबलपूर जनशताब्दी. जबलपूरच्या  हॉटेलमध्ये एक रात्र.
दिवस ५ –  भेडाघाट दर्शन, रात्री ११ वाजता जबलपूर इंदौर ओव्हर नाईट ट्रेन.
दिवस ६ – सकाळी ११ वाजता इंदौरला आगमन. हॉटेल मध्ये चेक इन. जमेल तेव्हढे  इंदौर दर्शन.
दिवस 7 – ओमकारेश्वर महेश्वर दर्शन
दिवस ८ – मांडू दर्शन
दिवस ९ – इंदौर खादाडी
दिवस १० – पुण्यास परत.


(समाप्त)

Advertisements

प्रवासवर्णन – पंचमढी – भेडाघाट – इंदौर : ओंकारेश्वर, महेश्वर,मांडू (भाग ४)

इंदौर हा आमच्या सहलीतल्या मुक्कामाचा शेवटचा टप्पा होता. इकडे तळ ठोकून ओमकारेश्वर-महेश्वर आणि मांडवगड एक एक दिवस पाहून यायचे असा बेत. ट्रेन मध्ये सकाळी सकाळी वरून कांदा आणि शेव घालून गरम गरम स्वादिष्ट पोहे खायला मिळाले. तेव्हाच इंदौरच्या मुक्कामात होऊ घातलेल्या खादाडीचे वेध लागू लागले होते. 

स्टेशनवरून हॉटेल वर जातानाचा रस्ता भर बाजारपेठेतूनच होता. अगदी पुण्याच्या तुळशीबाजारामधून जातोय की काय असेच वाटेल. आमचे हॉटेल असलेला भाग मात्र अलीकडेच विकसित झाल्या सारखा दिसत होता. मोठे रस्ते, चकचकीत मॉल्स होते.  रात्रीच्या रेल्वे प्रवासात घुसळून निघाल्यामूळे पहिल्या दिवशी आरामात जमेल तेवढेच इंदौर दर्शन करायचे ठरले. लाल बाग पॅलेसला जायला म्हणून निघालो. पण पॅलेस ५:३० वाजताच बंद. मग बडा गणपंती मंदिर पाहून परत आलो. गणपतीची २५ फूट भव्य मूर्ती आहे. ह्या मूर्तीची खासियत म्हणजे ह्याचा सांगाडा तांबे, सोने आणि चांदीचा बनला आहे. मूर्ती बनवण्यात विविध तीर्थस्थानातील माती, चुनखडी, गूळ (!) आणि हत्ती घोडे तबल्यातील चिखल अशा गोष्टी वापरण्यात आल्या आहेत. (संदर्भासाठी येथे पहा).

दुसरा दिवस ओमकारेश्वर आणि महेश्वर. ओमकारेश्वर हे १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक. ह्या स्थळाच्या भोवती नर्मदेचा ॐ आकाराचा वेढा पडलाय म्हणून ओमकारेश्वर. नुकत्याच झालेल्या धरणामुळे इकडे नर्मदेचे पात्र रोडावल्या सारखे वाटते. ओमकारेश्वरमध्ये शिरताच बडवे मागे लागतात. सुरवातीला १०० रुपये दक्षिणा मागणारे बडवे मंदिर जवळ येताच २० रुपयापर्यंत खाली येतात. हे म्हणे पूजा सांगणार आणि पिंडीवर जलाभिषेक करणार. ह्या बडव्यांमूळे की कशा मूळे माहित नाही. पण पंचमढीच्या शंकराच्या मंदिरात मिळणारं देवदर्शनाचं समाधान इकडे मिळालं नाही. ह्या मंदिराचं एक वैशिष्ट्य हे जाणवलं की एका वर एक अशी तीन मंदिरं आहेत.

सकाळी ओमकारेश्वर करून दुपारी जेवायच्या सुमाराला महेश्वर मध्ये. इकडे परत MPTDC च्या हॉटेलात जेवलो. जेवण ठीकठाक. मग इकडूनच होडीने होळकर घाटावर गेलो. घाट बांधायला वापरलेल्या दगडावर जागोजागी नाजूक कोरीव काम केलेले. इकडेच अहिल्याबाई होळकरांचा वाडा पण आहे. घाटाच्या भव्यतेच्या मानाने वाडा अगदीच साधा होता. अगदी पुण्यातल्या एखाद्या वाड्या सारखा. इकडे जवळच हातमागाचे कारखाने आहेत. प्रसिद्ध माहेश्वरी साड्या विणण्याचे काम चालू होते. बायकोचे इकडे रेंगाळणे खिसा हलका होण्याची सूचना देऊ लागले म्हणून घाई करू लागलो, पण पडायचा खड्डा तो पडलाच. स्वतःसाठी आणि कुणाला द्यायला म्हणून खरेदी झाल्यावर दुकानदाराने नुकतीच हातमागावरून आलेली साडी बाहेर काढली म्हणून त्याची पण खरेदी! असो!

होळकर घाटापासून मोटारबोटीने १५ – २० मिनिटांवर सहस्रधारा म्हणून भाग आहे. इकडे नर्मदेच्या पात्राची खोली कमी आहे. आणि प्रवाह असंख्य खडकांवर आपटून पुढे जातो त्यामुळे होणारया सहस्रधारा. आम्ही सोडलो तर हा परिसर पूर्ण निर्मनुष्य होता. फक्त नर्मदेचा खळखळाट ऐकत किनाऱ्यावर बसून राहायला आवडले असते. पण दुपारचे तीनचे उन आणि मुलांना आलेला कंटाळा ह्या दोन गोष्टींमुळे काढता पाय घेतला. हॉटेलात लिंबू सरबत घेऊन परतीच्या वाटेला लागलो.

होळकर घाट

होळकर घाट

सह्स्र्धारा

परताना अंधार होऊ लागला होता आणि रस्त्या च्या दोन्ही बाजूला असलेल्या घरा दारांतून पणत्या लावून दिवाळी साजरी होत होती. कोठेही विजेचा मागमूस दिसला नाही. त्यामुळे अंधारात पणत्या छान दिसत होत्या. काय गंमत आहे आपल्या शहरी मानसिकतेची! आपल्या घरात वीज नसेल तर जीव खालीवर होतो. पण ह्या गावात पणत्यांचे दिसणारे विलोभनीय दृश्य पहाताना वीज नाही म्हणून असे दृश्य पहायला मिळाल्याचा आनंद होतो. पण ते बिचारे गावकरी रोजच अंधारात असतात ह्याची जाणीव होत नाही!

दुसऱ्या दिवशी मांडवगड उर्फ मांडू! पूर्वी ,१३व्या शतकातील माळवा  प्रांतातील परमार राजांची राजधानी. पुढे मुघलांच्या ताब्यात गेलेली. बऱ्याच जुन्या इमारतींचे अवशेष सुस्थितीत असलेली ही जागा. जुन्या काळातल्या स्थापत्यशास्त्राचे नमुने छान जतन करून ठेवले आहेत. शासकीय दप्तरी ह्या इमारती मुघलांनी बांधल्या असा उल्लेख असला तरी इकडचे स्थानिक गाईड मात्र ही परमार काळातील ह्या वास्तु असल्याचे दडपून सांगतात. खरे खोटे ते परमार, मुघल आणि देवच जाणे. पण ह्या वास्तू खरंच पहाण्या सारख्या आहेत.

मांडवगड परिसर हा डोंगरावर वसलेला असल्याने पाण्याचा तसं म्हटलं तर तुटवडाच. ह्या प्रश्नावर मात करायला ठिकठिकाणी तलाव बांधले गेले होते. जहाज महालात तर चक्क रेन वॉटर हार्वेस्टिंग केल्याचे पाहिले. शिवाय उन्हाळ्यात तलावा वरून वाहाणाऱ्या वाऱ्यांपासून नैसर्गिक थंडावा मिळावा अशा रीतीने महालाची जागा निश्चित केली गेली होती. पुढे आहे राणी रूपमतीचा महाल. राणी रूपमतीचे माहेर नर्मदेच्या तटावर. लहानपणा पासुनचा रोज सकाळी नर्मदा दर्शनाचा तिचा नेम होता. तेव्हा तिला मांडवगडावरून सुद्धा नर्मदादर्शन व्हावे म्हणून तिचा प्रियकर बाज बाहादूरने हा महाल मांडवगडाच्या उंच भागावर बांधला. इकडून ७-८ किमी वर नर्मदा नदी दिसते.

आता आम्हाला असा प्रश्न पडला की पावसाळ्यात ढगाळ हवा असेल तेव्हा ही रूपमती बाई काय करत असावी? तर त्याचा उपाय खुद्द नर्मदामैय्यानेच  केला असल्याचे आमचा गाईड म्हणाला. नर्मदेने रूपमतीला दृष्टांत दिला की बाजबहादुराच्या महाला समोर तिचे अस्तित्व आहे. म्हणून खोदले ते रेवाकुंड. नर्मदेच्या अस्तित्वाचे परिमाण म्हणून येथे तिची प्रतिमा व नर्मदेच्या पात्रात सापडते तशी वाळू सापडली. हे रेवाकुंड नर्मदा परिक्रमावासीयांच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहे. तसेच इकडे चतुर्भुज रामाचे एकमेव असे प्राचीन देऊळ आहे. तेही परिक्रमावासीयांच्या दृष्टीने महत्त्वाचे.

इकडे एक खास प्रकारचा एको पॉईंट आहे. ह्याची खासियत म्हणजे आपण बोललेल्या वाक्यातला शेवटचाच शब्द परत ऐकू येतो. दंतकथा अशी आहे की इकडे पूर्वीच्या एका दाईचे भूत रहाते आणि ते विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देते. उदाहरणार्थ जर एखाद्या विद्यार्थ्याने विचारले की “दाई मा मी पास होणार की फेल?” तर उत्तर येईल, “फेल”.  असे म्हणतात की स्वातंत्र्य प्राप्तीनंतर लगेचच पंडित नेहरू इकडे आले असता त्यांना ह्या एको पॉईंटबद्दल सांगितले गेले. तेव्हा त्यांच्या बरोबर फारूक अब्दुल्ला होते. तेव्हा अब्दुल्लांची गंमत करण्याच्या उद्देशाने नेहेरुंनी आवाज दिला “दाई मा, काश्मीर पाकिस्तान का है या भारतका?” तर उत्तर आले “भारतका” ह्यावर अब्दुल्लांनी विचारले “दाई मा पंडितजी सच बोल रहे है या झूट” उत्तर काय आले ते सुज्ञांस सांगणे न लगे. असो. आमच्या अखिल वेगळेची खास बातमी अशी  की कलमाडी साहेबानी सुद्धा इकडे विचारले की “दाई मा राष्ट्रकुल स्पर्धेत घोटाळा  झाला की नाही?” आणि दाई मा चे उत्तर रेकोर्ड करून पुरावा म्हणून कोर्टात वापरणार आहेत म्हणे.

बाकी इकडे दुपारच्या जेवणात मस्त पैकी दाल बाफला आणि लाडू चे जेवण लोकल हॉटेलात मिळाले. कणकेचे ओवा घालून केलेले गोळे भरपूर तुपात परतून कडक करायचे खाताना ते कुस्कारायचे आणि त्यावर फोडणीचे वरण घालून खायचे.  एकदम चविष्ट पदार्थ आहे हा.

एकूण आमची मांडूची सहल उत्तम झाली. पण इंदौरला येऊन ३ दिवस होऊनसुद्धा अजून म्हणावी तशी खादाडी झाली नाही म्हणून जीव तळमळत होता. इंदौरच्या खादाडीबद्दल पुढच्या लेखात!

प्रवासवर्णन – पंचमढी – भेडाघाट – इंदौर : भेडाघाट (भाग ३)

रात्री ११ वाजता जबलपूरला पोचलो. हॉटेलची गाडी स्टेशनावर आलीच होती. रूमवर गेल्यावर मस्त कढी खिचडी मागवून खाल्ली. झकास चव होती त्यामुळे इकडच्या जेवणा बद्दल जे उच्च मत झाले, ते दुसरऱ्या दिवशीच्या ब्रेकफास्टने पार बदलले. ब्रेकफास्ट फुकट होता म्हणून की काय कोण जाणे.हॉटेलवरूनच भेडाघाटला जायला गाडी बुक केली.

भेडाघाट जबलपूर वरून २५ किमी आहे.  रस्ता त्यातल्या त्यात बरा पण अगदीच कंटाळवाणा! भेडाघाटमध्ये नर्मदेच्या दोन्ही तटांवर मोठे मोठे संगमरवरी खडक आहेत. नर्मदेच्या प्रवाहाने तासले जाऊन छान नैसर्गिक शिल्प्च तयार झाले आहे. दुपारी बाराचे रणरणते उन होते. दिवाळीमुळे की काय, आमच्या शिवाय दुसरे कोणी पर्यटकच नव्हते. एकूण उदासीनता पाहून मनात क्षणभर आले की खरंच इकडे काही प्रेक्षणीय आहे का. घाटावर बरेचसे नावाडी बकऱ्याच्या शोधात उभे होते ते मागे लागले. उगाच व्यवहारी पणाचा आव आणून थोडीशी घासाघीस करून एक नाव ठरवली. वास्तविक आम्हाला अजिबात घासाघीस जमत नाही. पण उगाच आपण “बावळट” वाटायला नको म्हणून घासाघीसीचा आव आणतो. नंतर कळते की चांगलेच कापले गेलो. असो!

नावेबरोबर एक गाईड पण होता. नाव सुरु झाल्या बरोबर ह्याची जी पोपटपंची सुरु झाली ती काही संपेना. उगाच आपले काहीतरी पांचट विनोद आणि कुणी कुणी येथे शूटिंग केले आहे ह्याची यादी ह्या पलीकडे काही नाही. मनात आले की त्याला गप्प बसायला आता पैसे द्यावे. असो.

ह्या परिसरात नर्मदा जवळपास ७०० फूट खोल आहे. तिचा संथ प्रवाह पाहून “संथ वाहते कृष्णामाई” ह्या गाण्याची आठवण झाली. ५-१० मिनिटात मार्बल रॉक्स दिसू लागले. दोन्ही तटांवर उत्तुंग असे हे संगमरवरी खडक आणि त्यातून विस्तीर्ण पात्रातून आपण होडीतून जात आहोत. हा अनुभव शब्दात बांधणे कठीण. तेव्हा वानगी दाखल काही फोटो टाकत आहे.

 

 

 

जलसफर झाल्यावर आम्ही जवळच्याच चौसष्ठ योगिनी मंदिरात गेलो. शंभर एक पायऱ्या चढून एका टेकडीवर वसलेले हे देऊळ. १००० साली बांधलेले. मध्ये शंकर पार्वतीचे देऊळ आणि देवळाभोवती वर्तुळाकारात ६४ योगिनींच्या मूर्त्या. दुर्दैवाने बऱ्याचश्या योगिनींच्या मुर्त्या भग्न झालेल्या आहेत. गाभाऱ्यात नंदि बैलावर विराजमान झालेल्या शंकर पार्वतीच्या मुर्त्या. आजवर शंकराच्या देवळात फक्त शिवलिंग पाहिलेले. येथे प्रथमच शिव पार्वती एकत्र गाभाऱ्यात पाहिले. फारच सुंदर देऊळ आहे हे.

पुढे आहे धूआधार धबधबा. सध्या इकडे उत्तर आणि दक्षिण तटांना जोडून केबल कारची सोय केली आहे. त्यामुळे धबधब्याचे विहंगम दर्शन होते. पण गाडीने सुद्धा आपण उत्तर तटावर अगदी जवळून धबधबा पाहू शकतो. अंगावर तुषार झेलत जर धबधब्याची मजा पहायची असेल तर केबल कारचा काही उपयोग नाही.

भेडाघाटला MPTDC चे सुरेख मॉटेल मार्बल रॉक्स नावाचे होटेल आहे. नर्मदेच्या काठावर. इकडे स्वस्तात राहण्याची उत्तम सोय आहे. रूम्स मधून नदीचे विस्तीर्ण पात्र दिसते.  जेवणही अप्रतिम. नर्मदेतील ताज्या माशांचा फिश फ्राय एकदम चविष्ट. सरकारी असून बरेच आदरातिथ्य होते. जबलपूरला न रहाता इकडेच रहायला हवे होते असे वाटले.

जेवण झाल्यावर जबलपूरला परतलो. ड्रायव्हरला विचारले, जबलपूरला पहाण्यासारखे काय आहे? तर म्हणे, मॉल्स देखिये! शेवटी काहीच पहाण्यासारखे नव्हते आणि आमची इंदौरची गाडी रात्री ११ वाजता होती म्हणून संध्याकाळी जवळच्याच मॉल मध्ये गेलो. मॉल मध्येच “पंजाबी पिंड दा धाबा” म्हणून होटेल आहे, मस्त बुफे होता. विशेष करून मूग डाळीचा हलवा अप्रतिम!

रात्री ११ वाजता जबलपूर इंदौर ओव्हरनाईट ट्रेन ने प्रयाण केले. रात्री झोपेत सुद्धा भेडाघाटचे संगमरवर दिसत होते!

प्रवासवर्णन – पंचमढी – भेडाघाट – इंदौर – पंचमढी (भाग २)

पंचमढी

२९ तारखेला रात्री ९:४० ची मुंबई सीएसटी वरून सुटणारी मुंबई कोलकाता मेल पकडायची होती. मुंबईच्या वाहतुकीचा धसका असल्याने संध्याकाळी ४ वाजताच आम्ही पुण्यावरून प्रयाण केले. पुण्यावरून मुंबईला जायला बऱ्याच प्रायव्हेट गाड्या आहेत. पण वाजवी दारात मुंबई पुणे टॅक्सी असोशिएशनची पॉईंट टू  पॉईंट  कुल कॅब जास्त भरवशाची आणि वाजवी दरात मिळते. फक्त एक तास आधी बुक करायची. आता तर त्यांनी टोयोटा इनोव्हा सुद्धा उपलब्ध केल्या आहेत. आम्ही मात्र साधी इंडिकाच घेतली (माझा कंजूष पणा दुसरे काय?).  ७२ वर्षाचे सरदारजी ड्रायव्हर होते. गेली ५६ वर्षे हे टॅक्सी चालवतायत. फाळणीनंतर निर्वासित म्हणून मुंबईत आले तेव्हापासून मुंबईतच. मूळ गाव आता पाकिस्तानात. “आपका मुलुख कौनसा” असा प्रश्न विचारला तर म्हणाले मुंबईच आमचे गाव. “हम महाराष्ट्रीयनही है”  त्यांच्या मुलांना छान मराठी बोलता येतं. साक्षात फाळणीचा अनुभव घेतलेला माणूस भेटायला मिळाला ह्याचं अप्रूप मुलांना वाटत होतं. मुलगी म्हणाली, “History is alive in front of us!”

ट्रेन चक्क  “निर्धारित समयपर” सुटली. बर्थवर अंथरूण पांघरुणाची छान सोय झाली होती.  रात्र असल्याने झोपण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता.  रात्रभर ट्रेनचा डबा एव्हढा हलत होता की पूर्ण अंग घुसळून निघालं. पूर्वी पण मी स्लीपरक्लास मध्ये प्रवास केला आहे. तेव्हा एवढे घुसळून गेल्याचे आठवत नाही. मला वाटतं की पूर्वीचे रूळाखालेचे  लाकडी स्लीपर बदलून सिमेंटचे स्लीपर घातल्या मुळे धक्के वाढत असावेत किंवा डबे जुने झाले असल्याने ही परिस्थिती असावी. रात्री विशेष जेवण झाले नव्हते. तेव्हा सकाळी ट्रेनमधील आम्लेट स्यांडविच मागवले. अप्रतिम चव होती.

११ वाजता पिपारीयाला उतरून प्रायव्हेट जीपने पंचमढीला पोचलो. पिपरिया – पंचमढी रस्ता अरुंद असला तरी चांगला आहे. घाट सुरू होईपर्यंत दुतर्फा फक्त सागाची झाडे. नंतर साल वृक्ष. ह्या सालचे खोड चांगलेच मजबूत असते. पूर्वी रेल्वेलाईन च्या खाली जे लाकडी स्लीपर्स असत ते ह्याच झाडाच्या खोडाचे. घाट सुरु झाला तसे हवा बदलली आणि थंडी सुरू झाली.पंचमढीला हॉटेल ग्लेनव्ह्यू  मध्ये बुकिंग होते. हॉटेल ग्लेनव्ह्यू हा पूर्वी ब्रिटीशलोकांचा बंगला होता. स्वातंत्र्योत्तर काळात  पी डब्लू डीने घेतला. पुढे मध्यप्रदेश सरकारने त्याचे हॉटेल मध्ये रूपांतर केले. चांगली १०-२० एकर जागा असेल. प्रशस्त बाग, मोठे व्हरांडे असलेली मेन बिल्डींग आणि पिछाडीला प्रायव्हेट कॉटेज आणि तंबू. आमचे तंबू मध्ये बुकिंग होते. हा तंबू म्हणजे शामियानाच जणू काही. एसी आणि बाथरूम सकट. १४ x १५ च्या चौथऱ्यावर बांधलेला तंबू. भरपूर जागा होती. हॉटेल मधेच जेवणाची सोय होती. जेवण साधेच पण अप्रतिम. आम्ही गेलो त्या दिवशी विशेष गर्दी नव्हती त्यामुळे एकूण सर्विस छान होती. पुढे गर्दी वाढल्यावर मात्र खालावली.

पंचमढी आणि माथेरान मध्ये बरेच साम्य आहे. जास्त गर्दी नाही. दुकाने फक्त बाजारपेठेतच. बाकी शांत भाग. इकडला बराचसा भाग सैन्याच्या ताब्यात आहे. आणि अजून तरी आपले “आदर्श” नेते ह्या भागात जागा लाटू शकलेले नाहीत. त्यामुळे ह्या जागेची महाबळेश्वर सारखी वाट लागलेली नाही. बाजारपेठेत स्वस्त कामचलाऊ अशी बरीच हॉटेले आहेत. थोडे दूर गेले तर MPTDC ची हॉटेले आहेत.  टूर कंपनी वाले बाजारपेठेतच उतरवतात. ज्याना पंचमढी पटेल व्हाल्यू (हा शब्दप्रयोग “आम्ही तिकडे गेलो होतो हो!” अशा फुशारक्या मारण्यासाठी केलेल्या पर्यटनाला वापरला जातो. का ते विचारू नये!) म्हणून करायचे आहे त्यांनी खुशाल बाजारपेठेतील हॉटेलात उतरावे.  पण पंचमढीचा खरा आनंद लुटायचा असेल तर MPTDC ला पर्याय नाही. (टीप : मला MPTDC कमिशन देत नाही). 

इकडली प्रेक्षणीय स्थळे दोन भागात विभागली आहेत. एक म्हणजे मंदिरे (बहुतांश शंकराची) आणि दुसरी म्हणजे रानातील धबधबे. आणि हे स्थळे पहायला जाण्यासाठी मारुती जिप्सीची सोय मिळते. पुण्या मुंबईत मारुती जिप्सी अगदी नामशेष झाली असली तरी इकडे मात्र ह्या गाड्यांचा सूळसूळाट आहे. विशेष करून धबधबे पहायला जायचा रस्ता कच्चा असल्याने फोर व्हील ड्राईव्ह गाडी असणे  गरजेचे असते. तिकडे ह्या जिप्सी उपयोगी पडतात. तुमची तीर्थयात्रेची इच्छा नसेल तरी इकडची शंकराची मंदिरे जरूर पहावी अशीच आहेत. नैसर्गिक गुहेत लपलेली ही मंदिरे वेगळाच अनुभव देऊन जातात. गुप्त महादेवाचे मंदीर हे एका चिंचोळ्या गुहेत आहे. दोन दगडाच्या कपारीत एक माणूस मावेल एवढीच रुंदी. त्यातून गाभाऱ्यात जायचे. जटाशंकर च्या मंदिरात जायचे तर एका दरीत सुमारे ३०० मीटरचा उतार आणि गुहेची उंची एव्हढी कमी की अगदी नास्तिक माणसाला सुद्धा वाकूनच आत जावे लागेल. त्यातल्या त्यात बडा महादेव मंदीर हे सर्वसामान्य आहे. ह्या मंदिरांत निवांत बसणे हा सुद्धा एक सुखद अनुभव आहे. शंकराचे अजून एक मंदिर आहे चौरागढला. १२०० पायऱ्या चढून जायचे. हा देव नवसाला पावतो. आणि नवस फेडायला देवाला त्रिशूळ वाहायचा. चौरागढ करायचे तर एक पूर्ण दिवस लागतो. जाऊन येऊन ६ तास. वेळे अभावी आम्ही चौरागढला जाऊ शकलो नाही.

पंचमढीचे धबधबे हे वनखात्याच्या अखत्यारीत येतात. जीप मागे ४५० रुपये एका दिवसाचा टोल द्यायचा. त्यात एक गाईड पण मिळतो.  धबधबे विलक्षण वगैरे नसले तरी ह्या धबधब्यांकडे नेणाऱ्या पायवाटा खूपच सुंदर आहेत. हौशी पण अननुभवी ट्रेकर्सना झेपेल असा रस्ता. दुतर्फा साल, मोह, आवळा अशी अस्सल भारतीय झाडे आणि त्यातून जाणारी वाट. काही ठिकाणी दगडी पायऱ्या , खळखळते पाणी, आणि थंड हवा. ह्यामुळे थकवा काही येत नाही. रजत प्रपात हा लोणावळा खंडाळ्याला पावसाळ्यात दिसेल असाच एक धबधबा. उन्हात चांदी सारखा चमकतो म्हणून रजत प्रपात. पुढे आहे अप्सरा विहार कुंड. ह्याला अप्सरा विहार कुंड अशासाठी म्हणतात कि इंग्रजांच्या काळात गोऱ्या मडमा इकडे डुंबायला येत. त्यांना पाहून आदिवासींना वाटे की जणू अप्सराच विहार करतायत.  म्हणून अप्सरा विहार कुंड. येथे आधुनिक अप्सरा करीना कपूर ने अशोका सिनेमाच्या चित्रीकरणात भाग घेतल्याचे मोठ्या अभिमानाने सांगितले जाते. दुसरा धबधबा म्हणजे “बी फॉल्स” ह्या धबधब्याच्या खाली उभे राहिल्यास पाण्याचा प्रवाह मधमाशांच्या डंखा प्रमाणे बोचतो म्हणून बी फॉल्स. ४०० मी. ची उतरंड करून ह्या धबधब्याच्या तळाशी जाता येते. ह्यात अंघोळ करून एकदा भिजले की उन्हात कोरडे व्हायचे आणि डोंगर चढून परतायचे. हा डोंगर विनासायास चढणे म्हणजे आपल्या हृदयाच्या निरोगीपणाची पावती मिळवणे असे समजायला हरकत नाही.

इकडे एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे माकडांचा धुमाकूळ. आमच्या गाईडच्या म्हणण्या नुसार गावाची लोकसंख्या १५००० तर माकडे १९००० ! आणि भलतीच सोकावलेली माकडे आहेत. एका मुलीच्या हातातील पर्स आमच्या देखात एका माकडाने हिसकावून घेतली. तेव्हा इकडे फिरताना हातातील गोष्टी संभाळणे फार महत्त्वाचे.

मुक्कामाच्या तिसऱ्या दिवशी रात्रीची ८:३० वाजता पिपरिया वरून सुटणारी भोपाल – जबलपूर जनशताब्दी गाठायला आम्ही संध्याकाळी पंचमढीला रामराम ठोकून रवाना झालो.

प्रवासवर्णन – पंचमढी – भेडाघाट – इंदौर – पूर्वतयारी (भाग १)

गेली चार वर्ष दिवाळीची सुट्टी म्हटलं की एक वार्षिक कौटुंबिक सहल हा आमचा शिरस्ता ठरलेलाच आहे. केरळ, राजस्थान आधीच पाहून झालेले. तेव्हा ह्या वेळी मध्यप्रदेशला जायचे ठरवले. असे लांबचे प्रवास म्हटले की पुण्या मुंबईचा मराठी मध्यमवर्ग डोळे मिटून केसरी – सचिन असे सोपे पर्याय निवडतो. आम्ही सुद्धा केरळला केसरी तर्फेच गेलो होतो. पण टूर बरोबर जायचे म्हणजे सकाळी लवकर उठून बस मधून गरागरा फिरायचे १७६० ठिकाणे अल्पावधीत पहायची, रोज मराठी जेवण जेवायचे असा दिनक्रम करायची आमची काही ईच्छा नव्हती. केरळ च्या सहली नंतर मला श्रमपरिहारासाठी लगेच एक निवांत सहल काढायची गरज भासली होती. राजस्थानला जाताना पुण्याच्या भांडारकर रस्त्यावरील एका नामांकित एजंटा कडून सहल आयोजित करून घेतली पण त्यांनी व्यवहारात बऱ्यापैकी फसवले होते.  तेव्हा ह्या खेपेस स्वतःच सहल आयोजित करून फिरायचे ठरवले.

एकदा मध्यप्रदेशला जायचे ठरल्यावर प्रश्न आला तो कोठली स्थळे पहायची ते. एका सहलीत पूर्ण मध्यप्रदेश पाहणे अशक्यच होते. आणि सुट्ट्यांच्या अभावामुळे आमच्याकडे फक्त १० दिवस होते. तेव्हा मध्यप्रदेशचा दक्षिण भाग पहायचे ठरवले. राजस्थानला रणथंबोर  पाहून झाले होते आणि आम्ही विशेष प्राणीमित्र वगैरे नसल्याने कान्हा वगळले. आधी फक्त इंदौरला गाडी घेऊन जायचे आणि जवळची ठिकाणे करायची असा बेत होता. मात्र नुकतीच नर्मदा परिक्रमेवर ३ पुस्तके वाचल्यामुळे व नेटवर मार्बल रॉकचे वर्णन वाचल्यामुळे जबलपूर जवळच्या भेडाघाटला कुठल्याही परिस्थितीत जायचेच असा फतवा मी काढला. बायकोला पंचमढीला जायचेच होते. आता माथेरान महाबळेश्वर सारखेच अजून एक हिलस्टेशन कुठे म्हणून मी नाराजीचा सूर लावला होता, पण स्त्रीहट्टाला बळी पडून पंचमढीला पण जायचे ठरले. इंदौर – पंचमढी – भेडाघाट हा एकून पल्ला जवळपास ६०० किमी एवढा आहे. शिवाय पुणे – इंदौर हा एकतर्फी ६०० किमी. म्हणजे एकून २४००- २५०० किमी आणि १० दिवस हे गणित जमत नव्हते. म्हणून स्वतःची गाडी काढण्याचा बेत रद्द केला आणि रेल्वेचा पर्याय स्वीकारला.

आमचे प्लॅनिंग जुलैमध्येच सुरू झाले असल्याने आणि आम्हाला हव्या असलेल्या गाड्यांचे  आरक्षण ऑगस्टमध्ये सुरू होत होते. त्यामुळे तिकिटे मिळण्याची खात्री होतीच. आरक्षणाच्या पहिल्याच दिवशी गजर लाऊन बरोब्बर ७:३० वाजता रेल्वेच्या ऑनलाईन वेबसाईट वर लॉगीन करून बुकिंग करायचे असे तीन दिवस करून सर्व गाड्यांचे बुकिंग करून टाकले. इंदौर वरून परतीचा  प्रवास मात्र विमानाने करायचे ठरले. बऱ्याच आधी बुकिंग केल्यामुळे स्वस्तात तिकीटे मिळाली. आता आले हॉटेल बुकिंग. आमचे स्नेही मधुकर भाटीया ह्यांनी नुकतीच स्वतःच्या गाडीने एक महिनाभर मध्य – उत्तर  भारत दर्शन सहल केली होती (पहा: ध्रुव भाटीयाचे प्रवास वर्णन). त्यांच्या सल्ल्यानुसार MPTDC च्या हॉटेल मध्ये बुकिंग करायचे असे ठरवले. पण प्रत्यक्षात फक्त पंचमढीलाच MPTDC च्या हॉटेल मध्ये राहिलो. जबलपूरला एकच दिवस मुक्काम होता आणि दुसऱ्या दिवशी रात्री ११ ला इंदौरची ट्रेन असल्याने आम्हाला लेट चेकऔट हवा होता. म्हणून आमचा मित्र आराधना ट्रॅव्हल्स संचालक मंदार किराणे ह्याच्या ओळखीने सामदरिया हॉटेल मध्ये २४ तास १ रूम मिळाली. इंदौरला MPTDC चे हॉटेल नाही. अशा तऱ्हेने प्रवासाची जय्यत तयारी ऑगस्ट मधेच पूर्ण झाली.

तेव्हा हे झाले नमनाला घडाभर तेल. पुढच्या लेखात वाचा प्रत्यक्ष प्रवासवर्णन.

मिशेल ओबमाकडून महाराष्ट्राची उपेक्षा! (अखिल वेगळेच्या बातम्या)

सकाळी ऑफिसला जायच्या गडबडीत होतो तेव्हाच नेमका फोन वाजला. उचलला तर अखिल वेगळे फोन वर! पूर्वी कधी ह्याचा माझा संपर्क नाही. पण परवा काय दुर्बुद्धी झाली आणि वेगळेच्या बातम्या ब्लॉगवर  टाकल्या. तेव्हापासून  वेगळे माझ्यावर बेहद खुष! दिवाळीच्या शुभेच्छा काय, फुकट महाखबरचा विशेष अंक काय! बायको पण आनंदली! दिवाळीत छान वाचायला मिळेल म्हणून नव्हे हो! पण नुकतीच आम्ही रद्दी विकलेली. तेव्हा कढईतून काढलेल्या गरमागरम चकल्या ठेवायला आयताच कागद मिळाला ना! असो.

तेव्हा अखिलला म्हटले “काय रे आज सकाळीच आठवण काढलीस?” अखिल म्हणाला, “अरे बातमीच तशी आहे. एकदम इंटरनॅशनल पातळीवरची! तुझ्या ब्लॉगवरच्या मित्रांसाठी खास तुला देतोय.  मला दादर स्टेशनच्या बाहेर भेट.” खरंतर मला दादरला उतरून ह्याला फुकटचा चहा पाजून त्याची बातमी घ्यायचा कंटाळा आला होता, पण म्हटले, फुकट ब्लॉगची प्रसिद्धी होईल, वाचकांची संख्या वाढेल. नाहीतरी स्वतःची मति कुंठलेली असल्याने ब्लॉग वर नवीन लिखाण होत नाहीये. तेव्हा म्हटले येतो!

दादर स्टेशन वर वेगळ्या दाढी खाजवत उभा होता. डोक्याला जखम, एक डोळा सुजलेला असा त्याचा अवतार. म्हटलं, “काय रे वेगळ्या, कोणाची कुरापत काढलीस?”  वेगळ्या गडबडीत होता. म्हणाला, “ते सर्व जाउदे! ही घे फाईल आणि टाक तुझ्या ब्लॉगवर. चल मी घाईत आहे! नवीन मुख्यमंत्री कोण होणार त्याची माहिती काढायचीय”. वेगळ्या ती फाईल माझ्या हातात कोंबून कधी त्या दादरच्या गर्दीत विरून गेला तेच कळलं नाही. ती फाईल घेऊन मी ऑफिस मध्ये गेलो. आपण काम करत आहोत असा आभास करण्यासाठी दोन चार ईमेल टाकून (बॉस ला सीसी मध्ये ठेवून!)  निवांत पणे वेगळ्याची फाईल उघडली. आणि काय सांगू! खरच सनसनाटी बातमी होती की हो! आता अधिक उत्सुकता न ताणता बातमी खाली देत आहे…

मिशेल ओबमाकडून महाराष्ट्राची घोर उपेक्षा! नेते आंदोलनाच्या तयारीत!

(मुंबईच्या खास वार्ताहरा कडून)

आज इंग्रजी पत्रांनी मिशेल ओबामांच्या नाताळच्या खरेदीची बातमी प्रसिद्ध केली आहे. हस्तकला प्रदर्शनातून मिशेलने पैसे संपेस्तोवर खरेदी केली. राजस्थान, गुजरात, बंगाल, कर्नाटक अशा राज्यांच्या स्टॉलवरून विविध गोष्टी खरेदी केल्या. पण मिशेलना आमच्या महाराष्ट्राची पैठणी, सावंतवाडीची लाकडी खेळणी, सोलापुरी चादरी काही पसंत पडलेल्या दिसत नाही. ह्यात नक्कीच काहीतरी राजकीय षड्यंत्र असल्याचा आमच्या वार्ताहराला संशय आल्याने, त्याने तडक मराठी माणसाचा कैवार घेऊ पहाणाऱ्या अनेक नेत्यांपैकी सध्या चलती असलेल्या श्री. मा.ज. वाकडे ह्यांची भेट घेऊन त्यांचे मत अजमावण्याचा प्रयत्न केला.

वार्ताहर: साहेब, मिशेल ओबामांच्या खरेदीमध्ये महाराष्ट्राची एकही वस्तू नाही त्या बद्दल तुमची काय प्रतिक्रिया?

मा.ज. : देशाच्या स्वातंत्र्या पासून महाराष्ट्राची उपेक्षा दिल्लीकडून चालू आहे. मिशेल ओबामा सुद्धा दिल्लीकरांची  महाराष्ट्राला सापत्न वागणूक देण्याची परंपरा पुढे चालू ठेवतायत. ही गंभीर बाब आहे. आम्ही ह्या बाबत मुख्यमंत्र्यांकडे दाद मागणार आहोत.

वार्ताहर: कोणत्या मुख्यमंत्र्यांकडे? मावळत्या की उगवत्या? आत्ताच्या मुख्यमंत्र्यांचा राजीनामा स्वीकारला गेला आहे.

मा.ज : कोणता मुख्यमंत्री हे महत्त्वाचे नाही. दाद मागणे महत्त्वाचे आहे.

वार्ताहर: तुम्ही नुसती दाद मागून गप्प बसणार का? तेवढ्याने काय होणार आहे?

मा.ज. : तुम्हा बातमीदारांना धीर नसतो. पहिल्यांदा दाद मागू. परंपरेप्रमाणे सरकार काही निर्णय घेणारच नाही. मग आम्ही आंदोलने छेडू! अख्खा महाराष्ट्र ढवळून काढू. महाराष्ट्रातल्या सगळ्या अमेरिकन कंपन्या बंद करू. त्यांना महाराष्ट्राची उत्पादने नकोत तर आम्हाला पण त्यांची उत्पादने नकोत. आम्ही त्यांच्या उत्पादनांच्या होळ्या पेटवू.

वार्ताहर: साहेब, पण जर तुम्ही अमेरिकन कंपन्या बंद केल्यात तर त्यात काम करणाऱ्या मराठी माणसाचे काय? ते रस्त्यावर येतील त्याचे काय?

मा.ज. :  विषय मराठी माणसाच्या अस्मितेचा आहे. त्यासाठी एक दोन नोकऱ्या गेल्या तरी बेहत्तर. नाहीतरी नोकरीची लाचारी करण्यापेक्षा मराठी माणसाने स्वतःचा धंदा काढला पाहिजे.

वार्ताहर: साहेब, तुम्ही अमेरिकन उत्पादनाच्या होळ्या करू म्हणता, मग त्यात तुमची फोर्ड गाडी पण जाळणार का?

आमच्या वार्ताहराच्या ह्या साळसूद प्रश्नाचा साहेबांच्या अवती भवती असलेल्या गुंड सदृश कार्यकर्त्याना एवढा राग आला की त्यानी आमच्या वार्ताहाराला मारहाण केली. त्यामुळे ही मुलाखत अर्धवटच राहिली. मा.ज. साहेब ही मारहाण पाहत कोकाकोलाची एक बाटली रिचवून निघून गेले. मात्र एक निश्चित. मिशेल ओबामांचा हा महाराष्ट्रावरील अन्याय येत्या काही दिवसात महाराष्ट्रवासीयांना डोकेदूखीचा ठरू शकतो!

जय महाराष्ट्र!!

ही बातमी वाचल्यावर मला वेगळेला झालेल्या  जखमांचा अर्थ लागला. भारीच उचापत्या आहे बुवा हा वेगळ्या!

(काल्पनिक)

भारतीय जनतेच्या मनाचा ठाव

माझ्या ब्लॉगिंगच्या सुरुवातीच्या काळात लिहिलेला हा एक बरा लेख (माझ्या मते)  बऱ्याच नवीन वाचकांच्या नजरेतून सुटला होता.  आणि एखाद्या ब्लॉग वरचे जुने लेख शोधून काढून वाचणे हे वाचकांच्या सहनशीलतेच्या बाहेर असल्याने ह्या जुन्या कढीला उत आणण्याचा हा प्रयत्न! मिडीयाचे टीआरपी चे खूळ माझ्याहि डोक्यात शिरले असल्याने ब्लॉगच्या हिट्स वाढवण्याचा वायफळ प्रयत्न आहे असे समजलेत तरी चालेल.
दिवस : २६ जानेवारी २०१०.

स्थानीय पुढारी

काल रात्री हुरडा पार्टीला जरा जास्तच झाली. पण काय करणार? सकाळी लवकर उठायलाच लागले. गणतंत्र दिवस ना? झेन्डावन्दनाचा एक तरी कार्यक्रम व्हायला हवा. नाहीतर प्रेस मध्ये छापून यायचे की नानासाहेब गणतंत्र दिवसाला गैरहजर! आधीच बरेच दिवस पेपरात आमच्याविषयी काही चांगले छापून येत नाही. पण वाईट प्रसिद्धी नको रे बाबा! नाहीतर परत मीडियाला गप्प करायला खर्च! आजकाल त्या भाईचा सारखा उदो उदो चालला आहे. आख्खी प्रेस विकत घेतली कि काय? बीआरटी च्या ठेक्या मध्ये चांगलीच मलाई खाल्लीन बोक्याने. आम्ही सत्तेवर नाही तर कोण कुत्रा विचारात नाही. बिल्डर आणि झोपडपट्टी दादांकडून किती दिवस पैसे उकळणार? मंदीने त्यांची पण कंबर मोडलीय. त्यात साहेबांनी भाववाढीची खेळी खेळवली. आख्खा महाराष्ट्र विकत घेतील एवढी माया आहे पण साली खा खा काही सुटत नाही. ५ वर्षांपूर्वी कसे लाळ घोटत आले होते मी पक्ष सोडावा म्हणून! म्हटलं तुमच्या पक्षात चांगली पोस्ट द्या,  तर नाही. त्यापेक्षा म्हणे ५० कोटी देतो आणि दुसरा पक्ष काढ! तेव्हा चांगली वाटली ऑफर. पण अजून सगळे पैसे दिले नाही. परत आता  ते अधून मधून स्विस बँकेचं लचांड! राहिलो असतो त्याच पक्षात तर बरं झालं असतं. सत्तेवर नक्कीच आलो असतो. श्रेष्ठी बरोबर केली असती मांडवली. जास्त फायदा  तर झाला असता? जाऊ दे! आता नवीन काहीतरी खेळी शोधली पायजे. तेलंगणा  सारखं आपण पण महाराष्ट्रापासून पासून आपला भाग वेगळा काढायची मागणी करावी का बरं? एकदा चाचपणी करायला हवी. पण हे उपोषण वगैरे नाही जमायचं. त्यापेक्षा महाराष्ट्र पेटवून द्यायची भाषा करू. म्हणजे तरी सीएम येईल आणि काहीतरी ऑफर देईल. लई खास! चांगला मुहूर्त आहे आजच. संध्याकाळी ठाण्याच्या सभेत बार उडवून देतो.

मध्यमवर्गीय माणूस

च्यायला एवढी चांगली सुट्टी मिळून पण काही फायदा नाही. शाळेने मुलांची हजेरी सक्तीची  केलीय. सुट्टीच्या दिवशी सकाळी सकाळी उठायला लावतात. काय वैताग आहे! एवढ्या फिया घेतात आणि वर आम्हालाच त्रास. पूर्ण सकाळ घालवली ह्या शाळेने. पटकन झेंडा फडकवायचा आणि राष्ट्रगीत म्हणून सोडून द्यायचा  तर नाही. फुकट सार्वजनिक जबाबदारी, लोकशाहीचं महत्त्व ह्यावर भाषणबाजी. आता सकाळपासून बाहेर म्हणून हिला पण घरी जावून स्वैपाकाचा कंटाळा म्हणजे खिश्याला चाट. इकडे महागाई  वाढलीय, नोकरीवर पगारवाढ तर सोडाच, ह्या वर्षी बोनस पण नाही झाला. खर्चाचे डोंगर उभे राहिलेत. गाडीचा EMI  घराचा EMI  मुलांच्या हजार शिकवण्या. त्यात वर ह्या काम वाल्या बाया पण पैसे वाढवून मागणार. माज आलाय ह्यांना नुसता. १० मिनिटात काम उरकणार आणि ५० रुपये वाढवून पाहिजेत. छे! नुसता उबग आला आहे. लवकर विसाचं काम झालं तर बरं. तेवढीच एक US  ट्रीप होईल. per diem  मध्ये थोडे पैसे तरी वाचतील. खरच जेव्हा L1  वर जायची संधी होती तेव्हा गेलो असतो तर किती बरं झालं असतं!

सामान्य पोलीस
रात्रभर नाकेबंदीवर बसून जाम कंटाळा आलाय. आता सकाळी घरी जावं,  तर स्टेशन वर बोलावलं आहे.  झेन्डावन्दन करायला. २० तास ड्युटी झाली पण आराम  नाही. हे गणतंत्र दिन, स्वातंत्र्य दिन , गणपती, नवरात्र असे दिवस आले की  पोट ढवळून निघतं. बाकीच्यांचा आनंद आणि आमची खरडपट्टी. लोकांना वाटतं पोलीस म्हणजे फक्त वरकमाई. ह्यांना आमची चिरीमिरी झोंबते. पण आमचे कष्ट कधी दिसत नाही. २-२ दिवस पोरांची तोंड बघायला मिळत नाही. मिळतो त्या पगारात कुठे घर चालवणार. परत घरात लक्ष नाही म्हणून हाताशी आलेली पोरं वाया जातायत. मी इकडे २६ नोव्हेंबरला  ताजला असताना मित्राचा फोन आला की  पोराला गर्द सकट उचलला. आता इकडे अतिरेक्यांशी लढू की पोराला सोडवायला जाऊ. खरतर  तेव्हाच मेलो असतो. पण  थोडक्यात वाचलो. तेव्हाच मेलो असतो तर घरच्यांना  थोडेफार पैसे तरी मिळाले असते. तरी बरं आता पोरगा मार्गी लागला आहे. पण पोराला नाही होऊ देणार पोलीस. बकवास काम आहे. त्यापेक्षा रिक्षा टॅक्सी चालवली तरी बरे!

शेतकरी
लै खराब दिवस चाल्लेत. आज शाळेच्या मैदानात आमदार आला व्हुता. झेंड्याला सलाम ठोकायला. शिन्च्यान शेतकऱ्याला प्याकेज का काय ते देतो असा सांगूत मतं घेवून जे त्वांड काळं केलं  तो आत्ता उगीवला. म्हनतो कसं, मंदी आलिया, सरकारची तिजोरी खाली हाय. कसलं प्याकेज मागताय. म्हने मंदी आलिया. तालुक्याला ह्या भाड्यानं मोठा बंगला उभारलाय, परत ह्याचीच माणसं आडती. पेरायला बी बियाण दिल्लं आणि तेवाच सस्त्या दामात पिक उचलायचा सौदा केलान. आता अवेळी पावसानं अर्ध पिक नासलं. जे काय उरलं सुरलं ते ह्यानं माती मोलानं उचललं . पुरं नुस्कान झालं. सावकाराकडून बोर खोदायला कर्ज घेतलं  ते फेडू की बायको पोरांना घालाय कापडं घेऊ? विदर्भात शेतकरी फास लावतोय  तर मंत्री म्हणतो नशाबाज शेतकरी होते. आता मला साधं तंबाकूचा बी व्यसन न्हाई तरी हातात पैका कुटं? मलाबी फास लावून घ्यावासा वाटू लागलाय. छी: अशा जिंदगीवर. परवा सरपंच म्हणत होता कि एशिजेड का कायसा हाय त्यात मोठी कंपनी समद्यांची जिमीन विकत घेऊ मागतेय. बक्कळ पैसा आहे म्हनं. पण ही जिमीन म्हणजे माझी माय. हिला विकून पैका  तो काय कामाचा? एक दिवस आला पैका पण निघून जायेल. नंतर परत ये रे माज्या मागल्या! काय समजत नाय. डोस्कं फुटायची वेळ आलीय. विठ्ठला, बाबा आता  तूच काय ते बघणार आमच्याकडे!

टीप – हा लेख सहज गम्मत म्हणून माझ्या कल्पनाशक्तीला शक्य तितका  ताण देऊन लिहिला आहे.  कोणत्याही समाजाला, लोकसमुदायाला दुखावणे हा उद्देश मुळीच नाही. तरीही कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील  तर क्षमस्व!