कस्तुरीमृग

अधुनिक ग्राहक हा कस्तुरीमृगासारखा असल्याचे माझे मत आहे. कस्तुरीमृगाला जशी आपल्याकडील मौल्यवान कस्तुरीची जाणीव नसते तसेच आपल्या आवडीनिवडीत दडलेल्या, पण उद्योगधंद्यांना मौल्यवान वाटणाऱ्या माहितीची ग्राहकाला जाणीव नसते.

तुम्ही जर म्युचल फंड घेत असाल तर तुम्हाला “KYC ” म्हणजेच Know Your Customer हा शब्दप्रयोग चांगलाच माहिती असेल. केवायसी पद्धत सरकारने बेनामी गुंतवणुकीवर अंकुश ठेवायला म्हणून चालू केली. पण आजकाल सर्वच उद्योगधंदे केवायसी पद्धत आपणहून वापरू लागले आहेत. जर आपला माल ग्राहकाला विकायचा तर त्यासाठी जाहिरातीचा मार्ग अवलंबावा लागतो. साधारणपणे व्यावसायिकाच्या कुवती प्रमाणे जाहिरात वर्तमानपत्रात / आकाशवाणी किंवा दूरदर्शन किंवा होर्डींग्स च्या मार्फत आणि आता इंटरनेटच्या मार्फत होते. पण जाहिरात करायची तर त्यात पैसा ओतायला हवा. आणि सर्वच उद्योगधंदे रिटर्न्स पाहूनच खर्च करतात. मग उगाच हवेत तीर मारल्यासारखी जाहिरात करण्यापेक्षा जिकडे माल खपेल तिकडेच जाहिरात का नाही करायची? असा प्रश्न साहजिकच पडतो. आणि म्हणूनच मग ग्राहकाला जाणून घेणे, त्याच्या सवयींचा अभ्यास करणे आणि त्यावरून संभाव्य खरेदीदार शोधून त्याच्यासमोर  आपल्या मालाचे सादरीकरण करणे हे किफायतशीर पडते. संगणकाच्या वाढत्या क्षमतेमुळे लाखो / कोट्यावधी व्यक्तींची माहिती गोळा करून त्याचे पृथक्करण करणे आणि मग संख्याशास्त्राचे नियम लावून विश्लेषण करणे शक्य झाले आहे. इथेच गुगल, फेसबुक वगैरेचे महत्त्व अधोरेखित होते. आपल्या प्रतिनिधीला लोकांकडे पाठवून माहिती गोळा करण्यापेक्षा लोक आपणहून जिकडे जातात तिकडूनच बेमालूमपणे आपण माहिती मिळवली तर जास्त सोयीस्कर. एवढे साधे सोपे गणित आहे. त्यातून फेसबुक , गुगल वापरताना वापरणारा नाही म्हटला तरी थोडा गाफीलच असतो. तेव्हा अशावेळी अजाणतेपणे तो बरीच माहिती देऊन जातो.

तुम्ही म्हणाल कि माझ्या एकट्याच्या आवडीनिवडी कळल्या जर एखाद्या उद्योगाला; तर काय एवढा फरक पडतो? पण थेंबे थेंबे तळे साचे ही म्हण इकडे चपखल बसते. जेव्हा जनसमुदायाच्या आवडीनिवडी, त्यांचे नेट सर्फिंग, त्यांचे सोशल मिडिया अपडेट एकत्रित करून पाहिले जातात तेव्हा त्यातून बरेच काही निघते. समुद्र मंथन केल्यावर अमृत जसे निघते तसे. पण समुद्र मंथनातून अमृताबरोबर विषही बाहेर पडते. आणि ह्या माहितीच्या मंथनातून निघणारे विष पिणार कोण तर तो भोळ्या सांब सदाशिवासारखाच जनता जनार्दन. म्हणूनच ह्या विषयात थोडे खोलवर जाणे महत्त्वाचे आहे.

आता ह्या माहिती मंथनात आपले खासगी पण शक्य तेवढे कसे जपायचे त्याचा विचार करुया. उद्देश आपली सगळी माहिती लपविणे हा नसून आपल्याकडून दिल्या जाणाऱ्या माहितीचे नियंत्रण करणे हा आहे. प्रथम आपण हे पाहू कि कोणकोणत्या मार्गाने आपल्याकडून नकळत माहिती काढली जाते. ते मार्ग म्हणजे:

१. मोठ्या डिपार्टमेंट स्टोर मध्ये दिले जाणारे कस्टमर कार्ड. ह्या द्वारे आपल्या खरेदीचा लेखाजोगा त्या कंपनीला दिला जातो
२. सोशल मिडीयाद्वारे गोळा केली जाणारी माहिती. ह्याची व्याप्ती आणि भीती दोन्ही प्रचंड आहेत
३. मोबाईल फोन द्वारे गोळा केली जाणारी माहिती. हे सुद्धा एक मोठं प्रकरण आहे.

डिपार्टमेंट स्टोर ने दिलेले कस्टमर कार्ड सरसकट वापरूच नये किंवा डिपार्टमेंट स्टोर मधून खरेदीच करू नये असे मी म्हणणार नाही. ज्या आपल्या रोजच्या गरजेच्या गोष्टी असतात (उदा: डाळ, तांदूळ, कपडे वगैरे) त्यांची खरेदी कस्टमर कार्डावर नोंदली गेली तर काही विशेष फरक मिळत नाही. मात्र खासगी गोष्टी खरेदी करताना (म्हणजे औषधे, अत्यंत वैयक्तिक स्वच्छतेच्या गोष्टी) कस्टमर कार्डच काय तर क्रेडीट कार्ड सुद्धा वापरू नये. सरळ रोखीत अशा गोष्टी खरेदी कराव्या. जेणेकरून स्टोरच्या संगणकाला तुमच्या वैयक्तिक आवडी निवडी समजणार नाहीत.

आता वळूया सोशल मिडियाकडे. सोशल मिडीया म्हणजे माहितीचा बकासुर आहे. ही माहिती कशी गोळा केली जाती हे थोडे विस्तृत स्वरूपात सांगणे गरजेचे आहे. आपण वेबसाईट पहायला ब्राउजर वापरतो. जसे की इंटरनेट एक्स्प्लोरर किंवा मोझीला फायरफॉक्स. ह्या ब्राउजर मध्ये कुकी नावाचा एक प्रकार असतो. कुकी म्हणजे दुसरे तिसरे काही नसून वेबसाईटच्या एका पानापासून दुसऱ्या पानावर जाताना काही संदर्भ कायम राहावे लागतात ते जपून ठेवायची जागा. उदाहरणार्थ तुम्ही फ्लिपकार्ट च्या एका पानावर २ पुस्तकांची खरेदी करून दुसऱ्या पानांवर जाता. तेव्हा तुमचा ब्राउजर दुसऱ्या पानाची विनंती फ्लिपकार्ट वेबसाईटला पाठवतो. पण एकाच वेळी फ्लिपकार्ट वेबसाईट असंख्य ब्राउजर्सच्या विनंत्या घेत असते. मग तुमच्या ब्राउजरला तुमच्या खरेदीच्या माहिती सकट दुसरे पान कसे पाठवायचे? तर ते कुकीचा वापर करून. प्रथम तुमच्या पहिल्या पानावरची खरेदी फ्लिपकार्ट वेबसाईट आपल्या डाटाबेस मध्ये नोंदवते आणि एक टोकन कोड ब्राउजरला पाठवते. हा टोकनकोड आपल्या कुकीमध्ये ठेवतो. जेव्हा ब्राउजर दुसरे पान मागवतो तेव्हा कुकीमधला टोकनकोड फ्लिपकार्टला पाठवतो.  ह्या पाठवलेल्या टोकनकोड मुळे फ्लिपकार्टला तुमची पहिल्या पानावरची खरेदी ओळखता येते आणि त्या खरेदीची माहिती दुसऱ्या पानावर आपल्याला दिसते. अशाप्रकारे कुकीचा वापर एका पानावरून दुसऱ्या पानावर जाताना संदर्भ राखायला होतो. ह्याच कुकीचा वापर गुगल तुम्ही काय सर्च करताय, कोणत्या साईट्सवर क्लिक करताय वगैरे माहिती मिळवायला करतो. आणि जर तुम्ही गुगल अकौंटमध्ये लॉगइन केलेले असेल तर ही सर्व माहिती तुमच्या नावावर नोंदली जाते.

फेसबुक तर ह्याही पुढे गेलंय. तुम्ही फेसबुकवर लॉगआउट न करता जर दुसऱ्या वेबसाईटवर गेलात आणि जर त्या वेबसाईटवर फेसबुकचे विजेट (म्हणजे फेसबुकचे चिन्ह असलेले एक बटन) असेल तर तुमची त्या वेबसाईटवरची नोंद सुद्धा फेसबुक करू शकते. समजा तुम्ही टाईम्स ऑफ इंडिया वरची एक चमचमीत बातमी वाचत असाल (टाईम्स वर अशा बातम्यांची वानवा नाही) तर फेसबुकवर त्याची नोंदणी होण्याची शक्यता बरीच आहे. ह्या व्यतिरिक्त तुमचे स्टेटस अपडेट, तुम्ही कोणाचे फोटो पहाताय, कोणाशी तुमची सर्वाधिक माहिती आहे अशा एक ना अनेक स्वरूपांची माहिती फेसबुक साठवत असते. ह्या शिवाय फेसबुकवर बरीच ऍप्स आहेत जी बरेचजण खेळतात. ही ऍप्स ऍड करायची असेल तर फेसबुक काही परवानग्या वापरते. जसे कि सदर ऍप ला तुमचे फोटो पहायची परवानगी , तुमच्या मित्रांची माहिती मिळवायची परवानगी वगैरे. एकदा का ही परवानगी दिली कि मग झालं. तुमच्या माहितीला फेसबुकाच्या बाहेर पाय फुटले. आता ही ऍप्स बनवणाऱ्या कंपन्या अशा कि आज आहेत तर उद्या नाही. फेसबुक कदाचित तुमची माहिती गोपनीय ठेऊ शकेल. पण ह्या छोट्या कंपन्यांच्या  हातात गेलेल्या तुमची माहिती अजून कुठे कशी जाईल कसे समजणार?

मग काय फेसबुक गुगल वापरूच नये काय? तसे मी सुचवत नाही. पण एकदा का ह्यातले धोके माहित असले कि त्या धोक्यांपासून स्वतःला शक्यतो सुरक्षित कसं ठेवायचं हे ठरवता येतं. नेटवर जाताना कोणती पथ्यं पाळायची त्याची एक छोटी यादी देत आहे. ही यादी म्हणजे अगदी गोपनीयतेची किल्ली नाहीये. पण खालील पथ्ये पाळली तर थोडीफार सुरक्षा तर नक्की मिळेल.

१. जीमेल  / फेसबुक हे वापरून झाली कि तत्काळ लॉग आउट / साईनआउट करून टाकावे. जीमेल / फेसबुक ब्राउजरच्या एका विंडोमध्ये लॉगइन करून दुसऱ्या विंडोमध्ये बातम्या वाचाल किंवा काही सर्च कराल तर ह्या साईटमध्ये त्याची नोंद होण्याची शक्यता आहे.
२. शक्यतो २ ब्राउजर वापरावे. म्हणजे एक इंटरनेट एक्सप्लोरर आणि दुसरा मोझीला फायरफॉक्स. माझ्या मते मोझीला फायरफॉक्स थोडा जास्त सुरक्षित आहे. तेव्हा ऑनलाईन बँकिंग वगैरे साठी तो वापरणे मी पसंत करतो. (मुद्दाम फायरफॉक्स वापरा असे सांगत नाहीये कारण ह्या विषयात बरीच मतमतांतरे आहेत). ऑनलाईन बँकिंग काम झाले कि ब्राउजर पूर्ण बंद करावा.
३. काही नाजूक / खासगी गोष्टींचे सर्च करताना किंवा त्यांचे वाचन करताना ब्राउजरचे प्रायव्हसी मोड वापरावे. व वाचायचे काम झाले कि ब्राउजर बंद करावा.
४. फेसबुकवर काही अपडेट टाकताना एखाद्या तिऱ्हाइताने वाचल्यास त्याचे आपल्याबद्दल काय मत होऊ शकते किंवा आपली काय माहिती मिळू शकते ह्याचा विचार करून अपडेट टाकावा. काही गोष्टी तर फेसबुकवर आजिबात टाकू नये. जसे कि आपले, आपल्या कुटुंबीयाचे आजारपण, आर्थिक परिस्तिथी वगैरे. शक्यतो आपली राजकीय मते मांडताना जरा विवेकाने वागावे. उगाच उठसुठ फेसबुकावर शिव्या दिल्या म्हणजे आपण शूरवीर होत नाही. उलट आपल्या समंजसपणाची पातळी आपण आपले मित्रमंडळ आणि त्यांचे मित्र-मैत्रिणी ह्यांच्या समोर उघडी करतो. अनोळखी चारचौघात जसे वागतो त्याला अनुरूपच वागावे.
५. फेसबुक ऍप्स वापरायच्या आधी त्यांच्या परवानग्या नीट वाचाव्या. एखादे ऍप आपल्या वॉलवर काही पोस्ट करायची परवानगी मागत असेल तर शक्यतो ते वापरू नये.  सध्या फेसबुकवर डेलीमोशन नावाचे ऍप काय धुमाकूळ घालतेय ते पहावे म्हणजे मी काय म्हणतोय ते समजेल.
६. आजकाल बरेचजण नेट स्टोरेज जसे कि गुगल डॉक किंवा बॉक्स डॉट नेट अशा साईट्स आपली डॉक्युमेंट्स साठवायला वापरतात. नेट स्टोरेज खूप सोयीचे पडते. मात्र, नेट स्टोरेज वापरताना आपली डॉक्युमेंट्स सांकेतिक (encrypted)  करून ठेवावीत. ह्यासाठी truecrypt  नावाचे उत्तम आणि अधिकृतरीत्या फुकट (open source)  सॉफ्टवेअर उपलब्ध आहे.

आपण ह्या गोष्टी अवलंबिल्या तर थोड्याफार प्रमाणात आपली माहिती सुरक्षित राहील. पण तरीही अजून बरीच माहिती आपल्या नकळत दिली जाते. ज्यात आपला संगणक , आपण कुठल्या स्थळावरून नेट पहातोय ते स्थळ वगैरे. सर्वसामान्य मंडळीना ह्याचे नियंत्रण करणे थोडे कठीण आहे. पण  संगणक सराईतांना  आपली नेटवरची ओळख पूर्ण पणे दडवणे काही प्रमाणात शक्य आहे. anonymous browsing असा सर्च मारला तर त्यावर माहिती मिळेल.

आपली माहिती पुरवणारा तिसरा स्त्रोत म्हणजे आपला मोबाईल फोन. पूर्वीचे फक्त फोन करता येईल असे संच जाऊन आता त्याची जागा स्मार्टफोनने घेतली आहे. त्यात जर Android फोन असेल तर त्यात गुगल हे आलेच. फोनवरील जीपीएस द्वारे गुगलला आपले स्थान कळते. शिवाय कुठे कुठे फिरतोय ह्याची पण नोंद होते. शिवाय Android apps द्वारे असंख्य app विक्रेते आपली माहिती मिळवायला टपलेले असतात. तेव्हा स्मार्ट फोनवरची पथ्ये अशी:

१.  फक्त अधिकृत वेबसाईट वरूनच apps  डाऊनलोड करावीत. उदा: Android market, नोकियासाठी OVI  स्टोर वगैरे.
२. ऍप डाउनलोड करायच्या आधी काही परवानग्या द्याव्या लागतात. ह्यात आपले contact book  पहाण्याची परवानगी, कॅमेरा वापरायची परवानगी वगैरे. अशा बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारच्या परवानग्या असतात. ऍप कोणत्या प्रकारची परवानगी मागते आहे ते लक्षपूर्वक पहावे. उगाच एखादा गेम जर तुमचे contact book पहायची परवानगी मागत असेल किंवा तुमचे एसएमएस पहायची परवानगी मगात असेल तर काही काळेबेरे आहे असे समजावे.
३. फेसबुक ऍप तर आपले contact book  पहायची तसेच आपले स्थळ जाणून घ्यायची परवानगी मागते. मी फेसबुक ऍपपेक्षा मोबाईल ब्राउजर मधून फेसबुक पाहणे पसंद करतो. फेसबुक ऍप मलातरी भोचक वाटले.
४. आजकाल गुगल सुद्धा तुमच्या स्थळाची माहिती मिळवू पहातो आहे. मोबाईल गुगल मध्ये तशी परवानगी विचारली जाते. आणि साळसूद पणे गुगल सांगते कि स्थळसापेक्ष  गोष्टींची माहिती देता यावी म्हणून स्थळ जाणणे गरजेचे आहे. पण उगाच गुगलला स्थळ जाणण्याचे परवानगी देऊ नये.

मी काही ह्या क्षेत्रातील जाणकार वगैरे नाही. पण जागरूकपणे आजूबाजूच्या घडामोडींची दखल घेऊन त्यांचा आपल्या जीवनावर काय परिणाम होऊ शकतो ह्याचा विचार करायची खोड आहे. त्यातून सुचलेल्या ह्या काही गोष्टी. ह्यामुळे काही प्रमाणात तरी आपल्या भोवती अगदी अपारदर्शक नसले तरी अर्धपारदर्शक कवच तयार करता येईल अशी आशा धरायला हरकत नाही.

Advertisements

काचेच्या भिंती

जगातील सर्वात अधिक गृहीत धरला गेलेला कोणता वर्ग असेल तर मध्यम वर्ग. मग ते भांडवलशाही राष्ट्र असो कि समाजवादी. तसं म्हटलं तर मध्यमवर्गीय समुदाय हा बऱ्यापैकी मोठा. पण विस्कळीत. ह्या वर्गातील लोक खाऊन पिऊन सुखी म्हणायला हरकत नाही. दोन वेळचं जेवण, राहायला छोटंसं का होईना – एक घर. अशा मूलभूत गरजा पूर्ण झालेल्या. त्यामुळे आपण बरं आणि आपलं काम बरं अशी वृत्ती. साहजिकच एकजूट वगैरे भानगड नाही. तेव्हा अशा समाजाला गुंडाळून ठेवून आपली पोळी भाजायला बाकीचे मोकळे. मध्यमवर्गाने देखील ही  परिस्थिती स्वीकारून घेतली आहे. त्याचीच प्रचिती मग निवडणूकीत असहभाग, कोर्ट कचेरी कडे पाठ अशा गोष्टीतून दिसून येते. आपल्याला मत असतं ही गोष्टच हा वर्ग विसरत चालला आहे कि काय अशी कधीतरी शंका येते.

आता मात्र मध्यमवर्गाला गंभीरपणे घेतला जातंय. राजकारणी लोकांकडून नव्हे तर उद्योगधन्द्यांकडून. वाढत्या मध्यमवर्गाबरोबर वाढणारी क्रयशक्ति उद्योगधंद्यांना खुणावतेय आणि त्याचीच परिणिती ग्राहकांसाठी आकर्षक योजना, स्वस्त हप्ते, एका गोष्टी वर एक गोष्ट फुकट अशा सवलतीत होते. पूर्वीची “घ्यायचं तर घ्या नाहीतर फुटा” संस्कृती हळूहळू विरत जाऊन नवीन रिटेल क्रांतीमध्ये ग्राहक खरोखरच राजा होतोय कि काय असे वाटून मध्यम वर्ग भलताच हुरळून जाऊ लागला आहे.

आता परवाचच उदाहरण घ्या ना! रिलायंस मार्ट मध्ये खरेदीला गेलो होतो. बिल करताना कॅशकाऊंटर वाला म्हणाला, “रिलायंस कस्टमर कार्ड निकालो तो उसपे पाँईंट मिलेंगे”. म्हटलं “नकोत” तर कसे पैसे कसे वाचतील ते सांगत बसला. वा! म्हणजे माझ्या पैशाची किती काळजी! ह्या धंदेवाल्यांना (वाचताना हा शब्द जेवढ्या कुत्सित पणे म्हणाल तितके तुम्ही खरे मध्यमवर्गीय!) एवढा का बुवा आपला पुळका? पण ह्या धंदेवाल्यांना नफ्याचा बरोब्बर वास लागतो. ग्राहकाला कस्टमर कार्ड देवून त्याच्या दरवेळच्या खरेदीची नोंद ठेवायची. त्यातून त्यांच्या आवडीनिवडी जाणून घ्यायच्या. ग्राहक भविष्यात काय खरेदी करतोय किंवा कोणत्या नवीन गोष्टी ग्राहकाला भुरळ पाडतील ह्याचे आडाखे बांधायचे आणि तदनुसार ग्राहकाला जाहिराती / कुपने पाठवायची. थोडक्यात ग्राहकाच्या खिशात किती खोलवर हात घालायचा हाच उद्देश.

आता तुम्ही म्हणाल ह्याची मध्यमवर्गीय विचारसरणी काही बदलत नाही. चांगली ग्राहकोपयोगी प्रगती होतोय आणि ह्याचा सूर मात्र नकारात्मक. प्रश्न नुसता खिशात खोल हात घालायचा असता तर ठीक. पण इकडे हे व्यवसाय आपल्या ग्राहकाबद्दल, इतकी माहिती गोळा करू लागले आहेत कि त्यांचा हात आपल्या खिशात आणि डोकं व्यक्तिगत आयुष्यात अशी परिस्थिती आहे. कल्पना करा. तुम्ही एक दोन वेळा रिलायंसमार्ट मधून इसबगोल घेतलंत म्हणून रिलायंसमार्ट च्या डेटाबेस मध्ये तुमच्या नावापुढे “बद्धकोष्ठ” असा शेरा गेलाय.

अतिशयोक्ती वाटते? एक घडलेली घटना सांगतो. अमेरिकेत टार्गेट नावाची रिटेल चेन आहे. “डेटा मायनिंग” च्या गोंडस नावाखाली ग्राहकांची माहिती गोळा करून त्याचे विश्लेषण करायचा घाट त्यांनी घातला. ग्राहकांना दिलेल्या कस्टमर कार्डाद्वारे ग्राहकांच्या खरेदीची माहिती त्यांच्या सवयी वगैरेची नोंद ठेवली जाऊन नंतर त्याचे संख्याशास्त्राच्या नियमानुसार संगणकाद्वारे विश्लेषण केले. मग त्यातून शास्त्रीयदृष्ट्या आडाखे बांधले. ग्राहकांच्या सवयीतून काही ठोक आडाखे टार्गेटच्या तंत्रज्ञाना आढळले. उदाहरणार्थ, त्याना असे आढळले कि गर्भधारणा झाल्यावर स्त्रियांच्या खरेदीत लक्षणीय बदल होतात. पूरक जीवनसत्वे, पोषक भाज्या अशा गोष्टींची खरेदी वाढू लागते. जसजशी प्रसूतीची तारीख जवळ येते तसे खरेदी केलेल्या कपड्यांची मापे बदलतात. ह्या माहितीचे इतके विश्लेषण केले होते कि टार्गेटचे संगणक प्रोग्राम्स स्त्री ग्राहकाच्या प्रसूतीची तारीख १-२ आठवड्यांच्या फरकात सांगू लागले. मग एखाद्या स्त्री ग्राहकाचा जस जसा प्रसूतीचा दिवस जवळ येईल तसे टार्गेट डायपर बेबी लोशन वगैरेची कुपने पोस्टाने पाठवू लागले. एकदा टार्गेटच्या एका दुकानात एक मनुष्य भांडायला आला. टार्गेटने त्याच्या १९ वर्षाच्या मुलीच्या नावाने डायपरची कुपने पाठवली होती. तेव्हा आपल्या मुलीचे आई होण्याचे वय आहे काय? तिला डायपरची कुपने का पाठवली अशी त्याची तक्रार होती. व्यवस्थापकाने त्याची माफी मागून पुन्हा अशी चूक होणार नाही अशी ग्वाही दिली.  काही दिवसांनी सदर इसमाला फोन करून आपल्या तक्रारीचे निवारण झाले कि नाही असा फोन केला. तेव्हा तो मनुष्य म्हणाला, कि टार्गेटची काही चूक नाही. आपल्या मुलीचे प्रताप ह्यालाच माहित नव्हते. ती खरोखरच गरोदर होती. आता बोला! (मूळ बातमी येथे वाचा)

ग्राहकाला अत्त्युच्च सेवा देण्याच्या नावाखाली त्याच्या व्यक्तिगत माहितीचे इतके संकलन केले जात आहे कि आपल्याला प्रायव्हसी राहणार कि नाही असा प्रश्न पडला आहे. जरा फेसबुकच्या पानाच्या उजवीकडे जाहिरात लक्ष देऊन पहा. मध्ये माझ्या फेसबुक अपडेट मध्ये मी एक दोन वेळा वाईनचा उल्लेख केला तर मला वाईन , बीअरच्या जाहिराती दिसू लागल्या. गुगलवर काही सर्च करायला गेले कि गुगल हजरजबाबीपणे आपले पूर्वीचे सर्च दाखवते. मध्ये जीमेलवरून माझ्या सीएला मेल पाठवली तर मला करबचत योजनेच्या जाहिराती दिसू लागल्या. मी महिन्याच्या सुट्टीचे बुकिंग केले तर विमानप्रवासाच्या जाहिराती.

उघड्या दारांच्या चाळींतून बंद दरवाज्यांच्या ब्लॉक मध्ये जाताना आपल्या घरांच्या भिंती काचेच्या कधी झाल्या हे आपल्याला कळलेलेच नाही. आधुनिक सोयी सुविधांच्या बदली आपण आपली एवढी माहिती खुली करत आहोत कि त्याचे भविष्यात काय विपरीत परिणाम होणार आहेत कोणास ठाऊक. पुढच्या लेखात ह्या काचेच्या भिंतींमध्ये आपली प्रायव्हसी कशी जपायची ह्याचा परामर्श घेऊ. तूर्तास रिलायंस मधून इसबगोलची खरेदी करायची नाही एव्हढे पथ्य पाळायचे. काय?

ब्रेक के बाद..

कालच काय वाटेल ते च्या महेंद्रनी फेसबुकवर निरोप टाकला कि सुकामेवाचे काय झाले, बरेच दिवसात काही लेख टाकला नाही. तेव्हा खरंतर मधे आलेली मरगळ झटकून टाकली आणि पुन्हा लिहायचे मनावर घेतले. काय लिहू काय लिहू असे विचार करत एक वर्ष निघून गेले. पण वर्षात काहीही लिहिलेले नसताना सुद्धा सुकामेवाची १५००० अवलोकने झालेले पाहून खरंच बरे वाटले. तेव्हा आता ब्रेक के बाद पुनश्च हरि ॐ करायचे ठरवले आहे. बघूया कसे काय जमते ते!

जो भजे हरि को सदा

पाच मिनिटापूर्वी पत्नीचा फोन आला की पंडितजी गेले. मन विषण्ण झाले. कोणीतरी जवळचे गेल्यावर होते तसेच. वास्तविक गेले काही दिवस पेपरातून त्यांच्या प्रकृतीच्या बातम्या वाचून मनाची तयारी झाली होतीच. पण आता ते खरच नाहीत ह्याची बोचरी जाणीव झाली. गेली कित्येक दशकं ह्या अनभिषिक्त सम्राटानं कित्येक जाणकार आणि माझ्या सारख्या संगीतात अजाण रसिकांच्या मनावर राज्य केलं. माझ्या बालपणीच्या कित्येक सकाळी रेडिओवरच्या पंडितजींच्या अभंगवाणीनं प्रफुल्लीत केल्या आहेत. सकाळची शाळा असे तेव्हा पांघरूणातून बळेबळे उठून दास घासताना पंडितजींचे सूर कानावर आले की सगळी मरगळ निघत असे. नंतर इंजिनीरिंगला असताना भीमसेनजींच्या रागदारीवर गणिताचा अभ्यास रात्री जागून केला आहे. नकळतच पंडितजी म्हणजे घरचीच एक व्यक्ती बनून गेले होते.

पंडितजींचे शेवटचे दर्शन सवाईला ते थोड्या वेळासाठी आले होते तेव्हा झाले. सवाईच्या शेवटच्या दिवशी पूर्वीच्या सभेत पंडितजींनी गायलेल्या “तीर्थ विठ्ठल” ची चित्रफीत दाखवली होती. त्यांचे गाण्यात पूर्ण रंगून जाणं, पूर्ण अंग घुसळून ताना घेणं सारच विलक्षण. अंगावर नुसते रोमांच उभे राहिले होते. सिंहाने राज्य करावं तसं राज्य केलं आणि खरच म्हणावसं वाटलं की झाले बहु होतीलही बहु परतू यासम हाच!
जाता जाता पंडितजींच्याच एका अजरामर भजनात थोडासा बदल करून श्रद्धांजली अर्पण करतो..

जो भजे सूरको सदा
सो ही परम पद पायेगा
सो ही परम पद पायेगा

आज रात्री राग दरबारी आणि जो भजे ऐकून पंडितजींचे स्मरण करणार. ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो.

माझ्या पत्नीची यथार्थ प्रतिक्रिया – “गंधर्व स्वगृही परतले…”

बातम्या – न घडलेल्या घटनांच्या

अखिल वेगळे हा आमच्या शाळेतला एक उचापत्या मुलगा. आता बातमीदार. घरात गडगंज श्रीमंती, पण ह्या पठ्ठ्याला पाहिल्यापासून बातमीदारच व्हायचे होते. स्वतःचे महाखबर नावाचे दैनिक काढले. दैनिक मराठी असले तरी गिऱ्हाईक अधिक करून भैय्ये आणि वाणी ! रद्दीपेक्षा स्वस्त असा महाखबरचा पेपर भेळ / पुड्या बांधायला बरा पडतो ना! त्यामुळे आमच्या वेगळेला मराठी सोडून अन्य भाषिकांचे जास्त प्रेम. उगाच “मराठी बाणा” वाल्या पक्षांच्या कुरापती पेपर मधून काढणे हा ह्याचा छंद. मग कधी त्यातून मार पण खायचा. (बहुतेक भेळ खाताना ह्याचे मराठी विरोधी लेख चुकून कोणी बाणेदार मराठी वाचत असावेत. आधीच भेळ खाऊन पोटात आग, आणि त्यावर ह्याच्या लेखाने डोक्यात आग, मग मारामारी करणार नाही तर काय?)

असो. तर असा हा आमचा आगळा वेगळा वेगळे बऱ्याच दिवसांनी मला भेटला. त्याला म्हटलं “काय रे वेगळ्या? बरेच दिवसात कोणाकडून मार खाल्ला नाहीस? काय पत्रकारिता सोडलीस काय?”  “छ्या! पत्रकारिता ह्या जन्मात सोडणार नाही. प्रस्थापितांना विस्थापित केल्याशिवाय गप्प बसतोय काय?” आता हे प्रस्थापित / विस्थापित हे शब्द माझं डोकं गरगरवणार काय अस वाटू लागलं. वेगळ्या मला इराण्याच्या हॉटेलात च्या पाजायला घेऊन गेला. च्या पीता पिता माझ्या समोर एक फाईल टाकली आणि सिगरेट शिलगावून मला म्हणाला, “वाच येत्या काही दिवसात येणाऱ्या बातम्या! ”  मी फाईल उघडून वाचू लागलो आणि डोळेच चमकले. त्याला म्हटले, “ह्या सगळ्या घडलेल्या घटना आहेत?”  माझ्याकडे वेगळ्या अगदी कुत्सित नजरेने पाहून म्हणाला, “छट! पण काही दिवसात घडतीलच बघ! मी मात्र सगळ्यांच्या आधीच छापून टाकणार आहे.” वेगळ्याकडे कौतुकाने पहात मी त्याने हळूच माझ्याकडे सरकवलेले बिल चुकते केले आणि आम्ही आपापल्या वाटेने निघालो.

दुसऱ्या दिवशी पेपर वाल्याकडे महाखबर मागितला तर पेपर वाल्याने असा काही वाकडा चेहरा केला की कुठून पेपर मागितला असे झाले. मग तिसऱ्या दिवशी वाण्याकडून घेतला. वाणी पण असला बदमाश! नुसता पेपर द्यायला तयार नाही १०० रुपयाची खरेदी करायला लावली. मला वेगळ्याने आधीच वाचलेल्या बातम्या खरच पेपरात आल्या आहेत का हे बघायची उत्सुकता होती. बातम्या खरंच छापून आल्या होत्या की हो! साहजिकच त्या वाचकांच्या पर्यंत पोचल्या नव्हत्या. (वाणी आणि भैय्ये आधीच सगळा महाखबर गायब करून टाकतात ना!) तेव्हा आमच्या प्रिय मित्र वेगळ्याच्या घडण्याआधी प्रसिद्ध झालेल्या बातम्या सर्वांपर्यंत पोचवायचा हा छोटासा प्रयत्न!

टेकड्या ठरल्या पुण्याच्या काळ !

विशेष प्रतिनिधीकडून,

गेले २-३ दिवस पुण्यात मुसळधार पावसाने धुमाकूळ घातला आहे. पानशेतच्या पुरात आले नसेल त्याहून जास्त पाणी शहरभर झाले होते. महापौरांचा बंगला सुद्धा ह्या पाण्यातून सुटला नाही. ११३ सरकारी वाहने आणि थोडीफार माणसे पाण्यात वाहून गेली.  काही नतद्रष्ट पर्यावरणवादी लोक बिल्डर लोकांनी नद्या  नाले बुजवले म्हणून पाणी साचले असा खोटा प्रचार करत आहेत. पण आपल्या माननीय पालक मंत्र्यानी पुण्याच्या परिस्थितीचा सखोल अभ्यास करून असा निष्कर्ष काढला आहे की ही परिस्थिती नद्या किंवा नाले बुजवल्यामुळे आली नसून पुण्यात मधेच उभ्या ठाकलेल्या टेकड्यांमुळे आली आहे. ह्या टेकड्यांवरून धो धो पावसाचे पाणी खाली वाहते आणि पूरसदृश परिस्थिती निर्माण होते. तेव्हा पालक मंत्री नवीन अध्यादेश जारी करून टेकड्या पाडण्या साठी बिल्डर कडून निविदा मागवणार आहेत. जो बिल्डर कमी खर्चात टेकडी जमीन दोस्त करेल त्याला त्या जागेवर बांधकाम करून आपला खर्च वसूल करता येईल अशी ही योजना असेल. ह्या योजनेला विरोध करणाऱ्यांना मोक्का लावला जाईल अशीही तरतूद केली आहे. बिल्डर समाजाने ह्या घोषणेचे स्वागत करून सरकारशी सहाय्य करायची तयारी दर्शवली आहे.

कोणीतरी सरकारशी उघडपणे सहकार्य करायची तशी ही पहिलीच वेळ आहे.

सरकार वापरणार कॉमनवेल्थ पॅटर्न!

कॉमनवेल्थ गेम च्या यशाने भारताची मान जगात खूपच उंचावली आहे. खेळ सुरु व्हायच्या आधी भ्रष्टाचाराच्या आरोपांनी झाकोळलेल्या संबंधितांमध्ये खेळाच्या यशाने नुसती सुटकेचीच भावना नव्हे तर मनात नवी उभारी आली आहे. आम्ही स्पर्धेच्या मुख्यांशी वार्तालाप केला असता त्यांनी सांगितले की एवढा मोठा प्रकल्प करताना उगाच शे दोनशे कोटीचा हिशेब लागत नाही म्हणुन गाजावाजा करू नये. अशाने ठेकेदारांकडून काम करवून घेणाऱ्या सरकारी अधिकाऱ्यांचे उगाच मानसिक खच्चीकरण होते. त्यामुळे देशाची प्रतिमा खराब होते.  ह्या पुढे अशीच मोठी कामे यशस्वी व्हावी म्हणून अशा प्रकल्पांवर काम करणाऱ्या कर्मचार्यांना लाच लुचपत विभागा पासून संरक्षण देण्याचा ठराव सरकार मंजूर करून घेणार आहे. विरोधी पक्षांनी पाठिंबा द्यायची तयारी दर्शवली आहे. त्या बदल्यात खासदारांना सुद्धा लाच लुचपत विभागाच्या करड्या नजरेतून सोडवण्याची तरतूद करायचे सरकारने ठरवले आहे. तसेच प्रकल्पांच्या एकून हिशेबांच्या २५% रकमेचा हिशोब देण्याची सक्ती आता सरकारी कर्मचाऱ्यांवर रहाणार नाही. त्यावर माहिती अधिकार सुद्धा लागू होणार नाही असा अध्यादेश सरकारने जारी केला आहे.  असा हा कॉमनवेल्थ पॅटर्न देशाला उन्नतीच्या पथावर नेऊन ठेवेल अशी आशा स्पर्धेच्या मुख्य अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

अयोध्येचा निकाल अमान्य! चॅनल जाणार सर्वोच्च न्यायालयात

उच्च न्यायालयाचा अयोध्येतील वादाबाबत निकाल सर्व सामान्य जनतेला मान्य असल्याचे चित्र दिसत असले तरी ह्या बाबत समस्त टीव्ही चॅनल वाल्यांमध्ये नाराजी आहे. निकाला नंतर दंगलीची अपेक्षा असल्याने चॅनल वाल्यांनी संवेदनशील ठिकाणी कॅमेरे, रिपोर्टर आणि अगदीच गरज पडली तर भरपूर दगड अशी व्यवस्था केली होती. दंगलीचा आखो देखा हाल द्यायची चोख व्यवस्था ह्या पूर्वी कधीच झाली नव्हती. आता न्यायालयाने सर्वांना खूष करणारा निकाल दिल्याने चॅनलवाल्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. पुढच्या आठवड्याभरात बातम्या कुठल्या द्यायच्या असा गहन प्रश्न त्यांच्यासमोर ठाकला आहे. लोकांच्या भावना दुखावल्या जाऊ नये म्हणून मुद्दाम असा समतोल निकाल देऊन दोन्ही बाजूनी पक्षपात केला गेला आहे असे चॅनल वाल्यांचे म्हणणे आहे. तेव्हा ह्या खटल्यातील वादी आणि प्रतिवादीनी जरी सर्वोच्च न्यायालयाने दाद मागितली नाही तरी उच्च न्यायालयाच्या ह्या निकालाचा पुनर्विचार करण्याची जनहित याचिका चॅनल वाले सादर करणार आहेत.

चोरांचे संमेलन – मध्यमवर्गीयांना दिलासा

नुकतेच पुण्या बाहेरील बालेवाडी क्रीडांगणात देशभरातील तुरुंगा बाहेरील चोरांचे, पुणेरी भामटा समाज ह्यांनी प्रायोजित केलेले संमेलन पार पडले. चोरांचा राजा शोभराज ह्याच्या प्रतिमेला हार घालून संमेलनाला सुरुवात झाली. संमेलनात चोरांच्या व्यथांवर प्रकाश पाडणारा एक परिसंवाद होता. त्यात आधुनिक चोरांच्या समस्या मांडल्या गेल्या. ऑनलाईन बँकिंग, एटीएम, डेबिट कार्ड ह्यामुळे लोक जास्त पैसे जवळ बाळगत नाहीत त्यामुळे चोरीचा धंदा फायदेशीर आहे का असा प्रश्न पुढे करण्यात आला. त्यावर ज्येष्ठ चोर दगडू मानकापे ह्यांनी कल्पकतेत कमी पडणाऱ्या चोरांवर तोंडसुख घेतले. त्याच्या मते चोर आपली शिकार नीट ओळखत नाहीत. मारुती चालवणारा, क्रेडीट कार्ड वापरणारा मध्यमवर्गीय नोकरदार शिकार करणे म्हणजेच आपले प्रयत्न फुकट घालवणे आहे. मध्यमवर्गीय नोकरदार माणसाला लुटण्याचे काम फक्त सरकार करू शकते असे मानकापे ह्यांचे मत होते. तेव्हा आधीच मेलेल्याला मारण्याचा मूर्खपणा चोरांनी करू नये असा सल्ला मानकापे ह्यांनी दिला. त्यापेक्षा चोरांनी आपला रोख सरकारी कर्मचाऱ्यांवर वळवावा असा मोलाचा सल्ला त्यांनी दिला. ह्या सावजाकडे घरात दाबून रोकड असते. शिवाय सफाईने ती चोरली तरी हे सावज पोलिसात जात नाही. कारण रोकडीचा हिशोब मागितला तर काय? तेव्हा सरकारी कर्मचाऱ्यां इतके सुरक्षित सावज नाही. आणि समस्त चोर समाज पिढ्यानपिढ्या आनंदाने चोरी करू शकेल असा विश्वास मानकापे ह्यांनी व्यक्त केला.

बऱ्याच काळाने मध्यमवर्गीयांना सुखावणारी एक तरी बातमी दिल्याचा आम्हास अत्यानंद होत आहे.

फ्रीज

सध्याच्या जमान्यात फ्रीज हा स्वयंपाकघरातील अपरिहार्य भाग झाला आहे. फ्रीज शिवाय जगणं मुश्कील वाटतं आजकाल. फ्रीज मुळे  नुसत्या बर्फाची किंवा थंड पाण्याचीच सोय झाली आहे असे नाही, तर फ्रीज आला म्हणून आठवड्याची भाजी एकदम आणता येऊ लागली. नाशिवंत गोष्टी जास्त काल टिकू लागल्या. पूर्वी १००-१५० लिटर चा फ्रीज पुरत असे, आता ४०० – ५०० लिटर फ्रीजपण अपुरा पडू लागलाय. अमेरिकेत तर फ्रीजचा पुरेपूर वापर होतो. तिकडे आमच्या ऑफिस मध्ये माझी एक अमेरिकन सहकारी होती. ह्या बाई वर्षातून फक्त दोन दिवस स्वयंपाक करायच्या आणि वेग वेगळ्या डब्यात तो भरून फ्रीजमध्ये गोठवायच्या! रोज रात्री एक डबा उघडून गरम करून खायचा. अमेरिकेत माझ्या बऱ्याच मित्रांकडे दोन दोन फ्रीज आहेत. एक फ्रीज नेहमीच्या वापरातील गोष्टी ठेवायला आणि दुसरा होलसेल मधून आणलेला माल साठवायला.

आता फ्रीज म्हटलं की त्याला वीज ही आलीच. आणि तशी बऱ्यापैकी वीज लागते. मोठ्या शहरात ठीक आहे, पण महाराष्ट्रातल्या असंख्य गावात ८-८ तास वीज नसते. तिकडे फ्रीज कसा काय चालवणार? आणि इन्व्हर्टर वर कितीकाळ चालवणार? पण तुम्हाला माहित आहे का, पूर्वीच्या काळी उष्णतेवर चालणारे फ्रीज असत. उष्णतेच्या प्रवाहाचे (heat transfer) सोपे तत्व वापरून हा फ्रीज चालायचा. पण वीजेच्या शोधानंतर  हे तंत्र मागे पडलं आणि विजेवर चालणारे फ्रीज लोकप्रिय झाले. मात्र उष्णतेवर चालणाऱ्या फ्रीजचा आता परत विचार करायला हवा. खासकरून भारतात, सूर्यापासून बरीच उष्णता निर्माण करता येईल. ती उष्णता वापरणारा फ्रीज तयार केला तर विजेची प्रचंड बचत करता येईल.

पण कोणत्याही उर्जेविना चालणारा फ्रीज बनवला तर? कल्पना अशक्य वाटते ना? गुजरातमधल्या कुंभाराने असा फ्रीज बनवला आहें. माठातल्या थंडगार पाण्यामागे जे तत्व आहें (evaporative cooling) तेच सामान्य तत्व वापरून मातीपासून बनवलेला फ्रीज म्हणजेच मिट्टी कूल. मनसुखलाल प्रजापती नावाच्या एका कुंभाराने बनवला. भाज्या आणि दूध साठवायला खूप उपयोगी पडेल असा हा फीज. गुजरातच्या खेड्यात लोकप्रिय झालाय. ह्या बद्दलची अधिक माहिती येथे मिळेल.

शिळेपाके न साठवता नुसत भाजीपाला दूध वगैरे गोष्टी साठवण्यापूर्ती आपली फ्रीजची गरज ठेवली, तर मिट्टीकूल सारखा उत्तम पर्याय नाही. मी तरी हा फ्रीज नक्कीच घेणार आहें.

आमुचा शिक्षणाचा धंदा

संस्कृत मध्ये एक सुभाषित आहे,

नास्ति विद्या समं बन्धु नास्ति विद्या समं सुर्हुद्

नास्ति विद्या समं वित्तं नास्ति विद्या समं धनः

अर्थ :-  विद्येसारखा भाऊ नाही, विद्येसारखा मित्र नाही आणि विद्येसारखा पैसा किंवा त्यासम धन नाही.

आजच्या भांडवलवादी जगाने मात्र आपल्या सोयीप्रमाणे ह्या सुभाषिताच्या दुसऱ्या ओळीचा अर्थ समजून घेतला आहे आणि विद्यादानाच्या पुण्यकर्माला विद्याविक्रीचे बाजारी रूप आणले आहे. पूर्वी फक्त अभियांत्रिकी आणि वैद्यकीय शिक्षण बाजारू होते. आता प्राथमिक शालेय शिक्षण सुद्धा इतके महाग होऊ घातले आहे की पूर्वीचे शिक्षणसम्राट एकवेळ परवडले असे म्हणायची वेळ आली आहे. गेल्या एका वर्षात मुंबई-पुण्याच्या काही शाळांनी आपल्या फिया ५० ते १००% वाढवल्या आहेत. दोन मुलांची वर्षाची फी लाखाच्या घरात! आपल्या मुलाला उत्तम शिक्षण मिळावे म्हणून प्रत्येक पालकाची धडपड असते. खिशाला थोडी चाट पडली तरी चालेल पण मध्यमवर्गीय पालक आपल्या मुलाच्या शिक्षणात कुठलीही कसर सोडत नाहीत. पालकांच्या ह्याच मनोवृत्तीचा फायदा उठवला जातो आहे. आणि सरकार कडून काही अंकुश वगैरे ठेवला जाण्याची अपेक्षा धरणे म्हणजे रेड्याकडून दुधाची अपेक्षा करण्यासारखे आहे. गेल्या ६-७ महिन्यात सरकारने खासगी शाळांच्या फी संबंधी इतकी उलट सुलट पत्रके प्रसिद्ध केली आहेत की त्यांचा अर्थ लावत बसण्यात एखादा मनुष्य ठार वेडा होईल.

२००९ च्या निवडणूक वर्षात खासगी शाळांच्या फी आकारणीत सुसूत्रता यावी म्हणून सरकारने २१ सदस्यांची बन्सल समिती स्थापन केली. पण त्यात पण मेख अशी की २१ पैकी १४ सदस्य खासगी शाळांच्या संचालक पदांवर होते. साहजिकच ह्या समितीचा अहवाल खासगी शाळांना सोयीस्कर असाच, म्हणजे शाळाना सरसकट ५०% फी वाढीची परवानगी देणारा. ह्या अहवालाच्या सादरीकरणात समितीतील पालक प्रतिनिधींनी सही केलेली नाही. ह्या अहवालावर काहीही निर्णय न घेता सरकारने हा अहवाल बासनात गुंडाळून २००९ नोव्हेंबर मध्ये फी वाढीला बंदी घालणारे एक पत्रक काढले. मग शाळा गेल्या कोर्टात. कोर्टाने सरकारचे पत्रक रद्द ठरवून सरकारला बन्सल कमिटीचा अहवाल सादर करायला आणि विद्यार्थ्यांचे हित जपता येईल असे धोरण स्वीकारायला सांगितले. तेव्हा पासून शिक्षण मंत्रालय उलट सुलट पत्रकं काढण्यात दंग आहे. शाळांनी मात्र कोर्टाचा निकाल आपल्या बाजूने लागल्याची दवंडी पिटून सर्रास फी वाढ केली. कोर्टाने विद्यार्थ्यांचे हित जपण्याबाबत केलेली टिपणी  सर्वजण सोयीस्कररित्या विसरले आहेत. आता काल पुन्हा कोर्टासमोर सरकारने नाक घासून आज पर्यंत प्रसिध्द केलेली सर्व पत्रकं रद्द करून १५ जुलै पर्यंत बन्सल समितीबाबत काय तो निर्णय घेण्याच कबूल केलंय. म्हणजे तोपर्यंत शाळांवर काही अंकुश नाही आणि फी वाढवायला शाळा मोकळ्या.

एकीकडे right to education सारखे कायदे करायचे आणि दुसरीकडे हा मुलभूत हक्क न परवडणारा करून ठेवायचा असा सरकारी कारभार. म्हणजे कर भरणारा जो मध्यमवर्ग तोच पिळला जाणार. पण जिथे गरीबांसाठी राबवल्या जाणाऱ्या सर्व शिक्षा अभियान सारख्या योजनेत राजरोस भ्रष्टाचार होतो अशा राज्यात कसली अपेक्षा ठेवणार? खरंतर सरकारला जाणून बुजून हा प्रश्न कुजवत ठेवायचा आहे अशी शंका येते. शालेय शिक्षणाचे सदा हरित कुरण चरायला शिक्षण संस्था सज्ज आहेत. कोठचे हात कसे ओले करायचे हे त्यांना चांगले ठाऊक आहे. आणि पांढरपेशा मध्यमवर्ग थोडी कुरकुर करेल आणि निमूट फिया भरेल. निवडणुकीच्या वेळी सरकारच्या नावाने बोटं मोडत घरी बसेल. हे सर्वांना चांगले ठाऊक आहे.

तरी बरं पालकवर्ग सध्या बऱ्यापैकी जागृत आहे. आमच्या मुलांच्या शाळेतील बरेच पालक एकत्र येऊन फी वाढीशी सामना कसा करायचा ह्यावर विचार करतायत. इतर शाळातसुद्धा अशीच परिस्थिती होतेय. बघूया पालकांच्या एकत्र येण्याने ह्या माजोरड्या संस्थाना काही लगाम घालता येतोय का!