कस्तुरीमृग

अधुनिक ग्राहक हा कस्तुरीमृगासारखा असल्याचे माझे मत आहे. कस्तुरीमृगाला जशी आपल्याकडील मौल्यवान कस्तुरीची जाणीव नसते तसेच आपल्या आवडीनिवडीत दडलेल्या, पण उद्योगधंद्यांना मौल्यवान वाटणाऱ्या माहितीची ग्राहकाला जाणीव नसते.

तुम्ही जर म्युचल फंड घेत असाल तर तुम्हाला “KYC ” म्हणजेच Know Your Customer हा शब्दप्रयोग चांगलाच माहिती असेल. केवायसी पद्धत सरकारने बेनामी गुंतवणुकीवर अंकुश ठेवायला म्हणून चालू केली. पण आजकाल सर्वच उद्योगधंदे केवायसी पद्धत आपणहून वापरू लागले आहेत. जर आपला माल ग्राहकाला विकायचा तर त्यासाठी जाहिरातीचा मार्ग अवलंबावा लागतो. साधारणपणे व्यावसायिकाच्या कुवती प्रमाणे जाहिरात वर्तमानपत्रात / आकाशवाणी किंवा दूरदर्शन किंवा होर्डींग्स च्या मार्फत आणि आता इंटरनेटच्या मार्फत होते. पण जाहिरात करायची तर त्यात पैसा ओतायला हवा. आणि सर्वच उद्योगधंदे रिटर्न्स पाहूनच खर्च करतात. मग उगाच हवेत तीर मारल्यासारखी जाहिरात करण्यापेक्षा जिकडे माल खपेल तिकडेच जाहिरात का नाही करायची? असा प्रश्न साहजिकच पडतो. आणि म्हणूनच मग ग्राहकाला जाणून घेणे, त्याच्या सवयींचा अभ्यास करणे आणि त्यावरून संभाव्य खरेदीदार शोधून त्याच्यासमोर  आपल्या मालाचे सादरीकरण करणे हे किफायतशीर पडते. संगणकाच्या वाढत्या क्षमतेमुळे लाखो / कोट्यावधी व्यक्तींची माहिती गोळा करून त्याचे पृथक्करण करणे आणि मग संख्याशास्त्राचे नियम लावून विश्लेषण करणे शक्य झाले आहे. इथेच गुगल, फेसबुक वगैरेचे महत्त्व अधोरेखित होते. आपल्या प्रतिनिधीला लोकांकडे पाठवून माहिती गोळा करण्यापेक्षा लोक आपणहून जिकडे जातात तिकडूनच बेमालूमपणे आपण माहिती मिळवली तर जास्त सोयीस्कर. एवढे साधे सोपे गणित आहे. त्यातून फेसबुक , गुगल वापरताना वापरणारा नाही म्हटला तरी थोडा गाफीलच असतो. तेव्हा अशावेळी अजाणतेपणे तो बरीच माहिती देऊन जातो.

तुम्ही म्हणाल कि माझ्या एकट्याच्या आवडीनिवडी कळल्या जर एखाद्या उद्योगाला; तर काय एवढा फरक पडतो? पण थेंबे थेंबे तळे साचे ही म्हण इकडे चपखल बसते. जेव्हा जनसमुदायाच्या आवडीनिवडी, त्यांचे नेट सर्फिंग, त्यांचे सोशल मिडिया अपडेट एकत्रित करून पाहिले जातात तेव्हा त्यातून बरेच काही निघते. समुद्र मंथन केल्यावर अमृत जसे निघते तसे. पण समुद्र मंथनातून अमृताबरोबर विषही बाहेर पडते. आणि ह्या माहितीच्या मंथनातून निघणारे विष पिणार कोण तर तो भोळ्या सांब सदाशिवासारखाच जनता जनार्दन. म्हणूनच ह्या विषयात थोडे खोलवर जाणे महत्त्वाचे आहे.

आता ह्या माहिती मंथनात आपले खासगी पण शक्य तेवढे कसे जपायचे त्याचा विचार करुया. उद्देश आपली सगळी माहिती लपविणे हा नसून आपल्याकडून दिल्या जाणाऱ्या माहितीचे नियंत्रण करणे हा आहे. प्रथम आपण हे पाहू कि कोणकोणत्या मार्गाने आपल्याकडून नकळत माहिती काढली जाते. ते मार्ग म्हणजे:

१. मोठ्या डिपार्टमेंट स्टोर मध्ये दिले जाणारे कस्टमर कार्ड. ह्या द्वारे आपल्या खरेदीचा लेखाजोगा त्या कंपनीला दिला जातो
२. सोशल मिडीयाद्वारे गोळा केली जाणारी माहिती. ह्याची व्याप्ती आणि भीती दोन्ही प्रचंड आहेत
३. मोबाईल फोन द्वारे गोळा केली जाणारी माहिती. हे सुद्धा एक मोठं प्रकरण आहे.

डिपार्टमेंट स्टोर ने दिलेले कस्टमर कार्ड सरसकट वापरूच नये किंवा डिपार्टमेंट स्टोर मधून खरेदीच करू नये असे मी म्हणणार नाही. ज्या आपल्या रोजच्या गरजेच्या गोष्टी असतात (उदा: डाळ, तांदूळ, कपडे वगैरे) त्यांची खरेदी कस्टमर कार्डावर नोंदली गेली तर काही विशेष फरक मिळत नाही. मात्र खासगी गोष्टी खरेदी करताना (म्हणजे औषधे, अत्यंत वैयक्तिक स्वच्छतेच्या गोष्टी) कस्टमर कार्डच काय तर क्रेडीट कार्ड सुद्धा वापरू नये. सरळ रोखीत अशा गोष्टी खरेदी कराव्या. जेणेकरून स्टोरच्या संगणकाला तुमच्या वैयक्तिक आवडी निवडी समजणार नाहीत.

आता वळूया सोशल मिडियाकडे. सोशल मिडीया म्हणजे माहितीचा बकासुर आहे. ही माहिती कशी गोळा केली जाती हे थोडे विस्तृत स्वरूपात सांगणे गरजेचे आहे. आपण वेबसाईट पहायला ब्राउजर वापरतो. जसे की इंटरनेट एक्स्प्लोरर किंवा मोझीला फायरफॉक्स. ह्या ब्राउजर मध्ये कुकी नावाचा एक प्रकार असतो. कुकी म्हणजे दुसरे तिसरे काही नसून वेबसाईटच्या एका पानापासून दुसऱ्या पानावर जाताना काही संदर्भ कायम राहावे लागतात ते जपून ठेवायची जागा. उदाहरणार्थ तुम्ही फ्लिपकार्ट च्या एका पानावर २ पुस्तकांची खरेदी करून दुसऱ्या पानांवर जाता. तेव्हा तुमचा ब्राउजर दुसऱ्या पानाची विनंती फ्लिपकार्ट वेबसाईटला पाठवतो. पण एकाच वेळी फ्लिपकार्ट वेबसाईट असंख्य ब्राउजर्सच्या विनंत्या घेत असते. मग तुमच्या ब्राउजरला तुमच्या खरेदीच्या माहिती सकट दुसरे पान कसे पाठवायचे? तर ते कुकीचा वापर करून. प्रथम तुमच्या पहिल्या पानावरची खरेदी फ्लिपकार्ट वेबसाईट आपल्या डाटाबेस मध्ये नोंदवते आणि एक टोकन कोड ब्राउजरला पाठवते. हा टोकनकोड आपल्या कुकीमध्ये ठेवतो. जेव्हा ब्राउजर दुसरे पान मागवतो तेव्हा कुकीमधला टोकनकोड फ्लिपकार्टला पाठवतो.  ह्या पाठवलेल्या टोकनकोड मुळे फ्लिपकार्टला तुमची पहिल्या पानावरची खरेदी ओळखता येते आणि त्या खरेदीची माहिती दुसऱ्या पानावर आपल्याला दिसते. अशाप्रकारे कुकीचा वापर एका पानावरून दुसऱ्या पानावर जाताना संदर्भ राखायला होतो. ह्याच कुकीचा वापर गुगल तुम्ही काय सर्च करताय, कोणत्या साईट्सवर क्लिक करताय वगैरे माहिती मिळवायला करतो. आणि जर तुम्ही गुगल अकौंटमध्ये लॉगइन केलेले असेल तर ही सर्व माहिती तुमच्या नावावर नोंदली जाते.

फेसबुक तर ह्याही पुढे गेलंय. तुम्ही फेसबुकवर लॉगआउट न करता जर दुसऱ्या वेबसाईटवर गेलात आणि जर त्या वेबसाईटवर फेसबुकचे विजेट (म्हणजे फेसबुकचे चिन्ह असलेले एक बटन) असेल तर तुमची त्या वेबसाईटवरची नोंद सुद्धा फेसबुक करू शकते. समजा तुम्ही टाईम्स ऑफ इंडिया वरची एक चमचमीत बातमी वाचत असाल (टाईम्स वर अशा बातम्यांची वानवा नाही) तर फेसबुकवर त्याची नोंदणी होण्याची शक्यता बरीच आहे. ह्या व्यतिरिक्त तुमचे स्टेटस अपडेट, तुम्ही कोणाचे फोटो पहाताय, कोणाशी तुमची सर्वाधिक माहिती आहे अशा एक ना अनेक स्वरूपांची माहिती फेसबुक साठवत असते. ह्या शिवाय फेसबुकवर बरीच ऍप्स आहेत जी बरेचजण खेळतात. ही ऍप्स ऍड करायची असेल तर फेसबुक काही परवानग्या वापरते. जसे कि सदर ऍप ला तुमचे फोटो पहायची परवानगी , तुमच्या मित्रांची माहिती मिळवायची परवानगी वगैरे. एकदा का ही परवानगी दिली कि मग झालं. तुमच्या माहितीला फेसबुकाच्या बाहेर पाय फुटले. आता ही ऍप्स बनवणाऱ्या कंपन्या अशा कि आज आहेत तर उद्या नाही. फेसबुक कदाचित तुमची माहिती गोपनीय ठेऊ शकेल. पण ह्या छोट्या कंपन्यांच्या  हातात गेलेल्या तुमची माहिती अजून कुठे कशी जाईल कसे समजणार?

मग काय फेसबुक गुगल वापरूच नये काय? तसे मी सुचवत नाही. पण एकदा का ह्यातले धोके माहित असले कि त्या धोक्यांपासून स्वतःला शक्यतो सुरक्षित कसं ठेवायचं हे ठरवता येतं. नेटवर जाताना कोणती पथ्यं पाळायची त्याची एक छोटी यादी देत आहे. ही यादी म्हणजे अगदी गोपनीयतेची किल्ली नाहीये. पण खालील पथ्ये पाळली तर थोडीफार सुरक्षा तर नक्की मिळेल.

१. जीमेल  / फेसबुक हे वापरून झाली कि तत्काळ लॉग आउट / साईनआउट करून टाकावे. जीमेल / फेसबुक ब्राउजरच्या एका विंडोमध्ये लॉगइन करून दुसऱ्या विंडोमध्ये बातम्या वाचाल किंवा काही सर्च कराल तर ह्या साईटमध्ये त्याची नोंद होण्याची शक्यता आहे.
२. शक्यतो २ ब्राउजर वापरावे. म्हणजे एक इंटरनेट एक्सप्लोरर आणि दुसरा मोझीला फायरफॉक्स. माझ्या मते मोझीला फायरफॉक्स थोडा जास्त सुरक्षित आहे. तेव्हा ऑनलाईन बँकिंग वगैरे साठी तो वापरणे मी पसंत करतो. (मुद्दाम फायरफॉक्स वापरा असे सांगत नाहीये कारण ह्या विषयात बरीच मतमतांतरे आहेत). ऑनलाईन बँकिंग काम झाले कि ब्राउजर पूर्ण बंद करावा.
३. काही नाजूक / खासगी गोष्टींचे सर्च करताना किंवा त्यांचे वाचन करताना ब्राउजरचे प्रायव्हसी मोड वापरावे. व वाचायचे काम झाले कि ब्राउजर बंद करावा.
४. फेसबुकवर काही अपडेट टाकताना एखाद्या तिऱ्हाइताने वाचल्यास त्याचे आपल्याबद्दल काय मत होऊ शकते किंवा आपली काय माहिती मिळू शकते ह्याचा विचार करून अपडेट टाकावा. काही गोष्टी तर फेसबुकवर आजिबात टाकू नये. जसे कि आपले, आपल्या कुटुंबीयाचे आजारपण, आर्थिक परिस्तिथी वगैरे. शक्यतो आपली राजकीय मते मांडताना जरा विवेकाने वागावे. उगाच उठसुठ फेसबुकावर शिव्या दिल्या म्हणजे आपण शूरवीर होत नाही. उलट आपल्या समंजसपणाची पातळी आपण आपले मित्रमंडळ आणि त्यांचे मित्र-मैत्रिणी ह्यांच्या समोर उघडी करतो. अनोळखी चारचौघात जसे वागतो त्याला अनुरूपच वागावे.
५. फेसबुक ऍप्स वापरायच्या आधी त्यांच्या परवानग्या नीट वाचाव्या. एखादे ऍप आपल्या वॉलवर काही पोस्ट करायची परवानगी मागत असेल तर शक्यतो ते वापरू नये.  सध्या फेसबुकवर डेलीमोशन नावाचे ऍप काय धुमाकूळ घालतेय ते पहावे म्हणजे मी काय म्हणतोय ते समजेल.
६. आजकाल बरेचजण नेट स्टोरेज जसे कि गुगल डॉक किंवा बॉक्स डॉट नेट अशा साईट्स आपली डॉक्युमेंट्स साठवायला वापरतात. नेट स्टोरेज खूप सोयीचे पडते. मात्र, नेट स्टोरेज वापरताना आपली डॉक्युमेंट्स सांकेतिक (encrypted)  करून ठेवावीत. ह्यासाठी truecrypt  नावाचे उत्तम आणि अधिकृतरीत्या फुकट (open source)  सॉफ्टवेअर उपलब्ध आहे.

आपण ह्या गोष्टी अवलंबिल्या तर थोड्याफार प्रमाणात आपली माहिती सुरक्षित राहील. पण तरीही अजून बरीच माहिती आपल्या नकळत दिली जाते. ज्यात आपला संगणक , आपण कुठल्या स्थळावरून नेट पहातोय ते स्थळ वगैरे. सर्वसामान्य मंडळीना ह्याचे नियंत्रण करणे थोडे कठीण आहे. पण  संगणक सराईतांना  आपली नेटवरची ओळख पूर्ण पणे दडवणे काही प्रमाणात शक्य आहे. anonymous browsing असा सर्च मारला तर त्यावर माहिती मिळेल.

आपली माहिती पुरवणारा तिसरा स्त्रोत म्हणजे आपला मोबाईल फोन. पूर्वीचे फक्त फोन करता येईल असे संच जाऊन आता त्याची जागा स्मार्टफोनने घेतली आहे. त्यात जर Android फोन असेल तर त्यात गुगल हे आलेच. फोनवरील जीपीएस द्वारे गुगलला आपले स्थान कळते. शिवाय कुठे कुठे फिरतोय ह्याची पण नोंद होते. शिवाय Android apps द्वारे असंख्य app विक्रेते आपली माहिती मिळवायला टपलेले असतात. तेव्हा स्मार्ट फोनवरची पथ्ये अशी:

१.  फक्त अधिकृत वेबसाईट वरूनच apps  डाऊनलोड करावीत. उदा: Android market, नोकियासाठी OVI  स्टोर वगैरे.
२. ऍप डाउनलोड करायच्या आधी काही परवानग्या द्याव्या लागतात. ह्यात आपले contact book  पहाण्याची परवानगी, कॅमेरा वापरायची परवानगी वगैरे. अशा बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारच्या परवानग्या असतात. ऍप कोणत्या प्रकारची परवानगी मागते आहे ते लक्षपूर्वक पहावे. उगाच एखादा गेम जर तुमचे contact book पहायची परवानगी मागत असेल किंवा तुमचे एसएमएस पहायची परवानगी मगात असेल तर काही काळेबेरे आहे असे समजावे.
३. फेसबुक ऍप तर आपले contact book  पहायची तसेच आपले स्थळ जाणून घ्यायची परवानगी मागते. मी फेसबुक ऍपपेक्षा मोबाईल ब्राउजर मधून फेसबुक पाहणे पसंद करतो. फेसबुक ऍप मलातरी भोचक वाटले.
४. आजकाल गुगल सुद्धा तुमच्या स्थळाची माहिती मिळवू पहातो आहे. मोबाईल गुगल मध्ये तशी परवानगी विचारली जाते. आणि साळसूद पणे गुगल सांगते कि स्थळसापेक्ष  गोष्टींची माहिती देता यावी म्हणून स्थळ जाणणे गरजेचे आहे. पण उगाच गुगलला स्थळ जाणण्याचे परवानगी देऊ नये.

मी काही ह्या क्षेत्रातील जाणकार वगैरे नाही. पण जागरूकपणे आजूबाजूच्या घडामोडींची दखल घेऊन त्यांचा आपल्या जीवनावर काय परिणाम होऊ शकतो ह्याचा विचार करायची खोड आहे. त्यातून सुचलेल्या ह्या काही गोष्टी. ह्यामुळे काही प्रमाणात तरी आपल्या भोवती अगदी अपारदर्शक नसले तरी अर्धपारदर्शक कवच तयार करता येईल अशी आशा धरायला हरकत नाही.

Advertisements

भारतीय जनतेच्या मनाचा ठाव

माझ्या ब्लॉगिंगच्या सुरुवातीच्या काळात लिहिलेला हा एक बरा लेख (माझ्या मते)  बऱ्याच नवीन वाचकांच्या नजरेतून सुटला होता.  आणि एखाद्या ब्लॉग वरचे जुने लेख शोधून काढून वाचणे हे वाचकांच्या सहनशीलतेच्या बाहेर असल्याने ह्या जुन्या कढीला उत आणण्याचा हा प्रयत्न! मिडीयाचे टीआरपी चे खूळ माझ्याहि डोक्यात शिरले असल्याने ब्लॉगच्या हिट्स वाढवण्याचा वायफळ प्रयत्न आहे असे समजलेत तरी चालेल.
दिवस : २६ जानेवारी २०१०.

स्थानीय पुढारी

काल रात्री हुरडा पार्टीला जरा जास्तच झाली. पण काय करणार? सकाळी लवकर उठायलाच लागले. गणतंत्र दिवस ना? झेन्डावन्दनाचा एक तरी कार्यक्रम व्हायला हवा. नाहीतर प्रेस मध्ये छापून यायचे की नानासाहेब गणतंत्र दिवसाला गैरहजर! आधीच बरेच दिवस पेपरात आमच्याविषयी काही चांगले छापून येत नाही. पण वाईट प्रसिद्धी नको रे बाबा! नाहीतर परत मीडियाला गप्प करायला खर्च! आजकाल त्या भाईचा सारखा उदो उदो चालला आहे. आख्खी प्रेस विकत घेतली कि काय? बीआरटी च्या ठेक्या मध्ये चांगलीच मलाई खाल्लीन बोक्याने. आम्ही सत्तेवर नाही तर कोण कुत्रा विचारात नाही. बिल्डर आणि झोपडपट्टी दादांकडून किती दिवस पैसे उकळणार? मंदीने त्यांची पण कंबर मोडलीय. त्यात साहेबांनी भाववाढीची खेळी खेळवली. आख्खा महाराष्ट्र विकत घेतील एवढी माया आहे पण साली खा खा काही सुटत नाही. ५ वर्षांपूर्वी कसे लाळ घोटत आले होते मी पक्ष सोडावा म्हणून! म्हटलं तुमच्या पक्षात चांगली पोस्ट द्या,  तर नाही. त्यापेक्षा म्हणे ५० कोटी देतो आणि दुसरा पक्ष काढ! तेव्हा चांगली वाटली ऑफर. पण अजून सगळे पैसे दिले नाही. परत आता  ते अधून मधून स्विस बँकेचं लचांड! राहिलो असतो त्याच पक्षात तर बरं झालं असतं. सत्तेवर नक्कीच आलो असतो. श्रेष्ठी बरोबर केली असती मांडवली. जास्त फायदा  तर झाला असता? जाऊ दे! आता नवीन काहीतरी खेळी शोधली पायजे. तेलंगणा  सारखं आपण पण महाराष्ट्रापासून पासून आपला भाग वेगळा काढायची मागणी करावी का बरं? एकदा चाचपणी करायला हवी. पण हे उपोषण वगैरे नाही जमायचं. त्यापेक्षा महाराष्ट्र पेटवून द्यायची भाषा करू. म्हणजे तरी सीएम येईल आणि काहीतरी ऑफर देईल. लई खास! चांगला मुहूर्त आहे आजच. संध्याकाळी ठाण्याच्या सभेत बार उडवून देतो.

मध्यमवर्गीय माणूस

च्यायला एवढी चांगली सुट्टी मिळून पण काही फायदा नाही. शाळेने मुलांची हजेरी सक्तीची  केलीय. सुट्टीच्या दिवशी सकाळी सकाळी उठायला लावतात. काय वैताग आहे! एवढ्या फिया घेतात आणि वर आम्हालाच त्रास. पूर्ण सकाळ घालवली ह्या शाळेने. पटकन झेंडा फडकवायचा आणि राष्ट्रगीत म्हणून सोडून द्यायचा  तर नाही. फुकट सार्वजनिक जबाबदारी, लोकशाहीचं महत्त्व ह्यावर भाषणबाजी. आता सकाळपासून बाहेर म्हणून हिला पण घरी जावून स्वैपाकाचा कंटाळा म्हणजे खिश्याला चाट. इकडे महागाई  वाढलीय, नोकरीवर पगारवाढ तर सोडाच, ह्या वर्षी बोनस पण नाही झाला. खर्चाचे डोंगर उभे राहिलेत. गाडीचा EMI  घराचा EMI  मुलांच्या हजार शिकवण्या. त्यात वर ह्या काम वाल्या बाया पण पैसे वाढवून मागणार. माज आलाय ह्यांना नुसता. १० मिनिटात काम उरकणार आणि ५० रुपये वाढवून पाहिजेत. छे! नुसता उबग आला आहे. लवकर विसाचं काम झालं तर बरं. तेवढीच एक US  ट्रीप होईल. per diem  मध्ये थोडे पैसे तरी वाचतील. खरच जेव्हा L1  वर जायची संधी होती तेव्हा गेलो असतो तर किती बरं झालं असतं!

सामान्य पोलीस
रात्रभर नाकेबंदीवर बसून जाम कंटाळा आलाय. आता सकाळी घरी जावं,  तर स्टेशन वर बोलावलं आहे.  झेन्डावन्दन करायला. २० तास ड्युटी झाली पण आराम  नाही. हे गणतंत्र दिन, स्वातंत्र्य दिन , गणपती, नवरात्र असे दिवस आले की  पोट ढवळून निघतं. बाकीच्यांचा आनंद आणि आमची खरडपट्टी. लोकांना वाटतं पोलीस म्हणजे फक्त वरकमाई. ह्यांना आमची चिरीमिरी झोंबते. पण आमचे कष्ट कधी दिसत नाही. २-२ दिवस पोरांची तोंड बघायला मिळत नाही. मिळतो त्या पगारात कुठे घर चालवणार. परत घरात लक्ष नाही म्हणून हाताशी आलेली पोरं वाया जातायत. मी इकडे २६ नोव्हेंबरला  ताजला असताना मित्राचा फोन आला की  पोराला गर्द सकट उचलला. आता इकडे अतिरेक्यांशी लढू की पोराला सोडवायला जाऊ. खरतर  तेव्हाच मेलो असतो. पण  थोडक्यात वाचलो. तेव्हाच मेलो असतो तर घरच्यांना  थोडेफार पैसे तरी मिळाले असते. तरी बरं आता पोरगा मार्गी लागला आहे. पण पोराला नाही होऊ देणार पोलीस. बकवास काम आहे. त्यापेक्षा रिक्षा टॅक्सी चालवली तरी बरे!

शेतकरी
लै खराब दिवस चाल्लेत. आज शाळेच्या मैदानात आमदार आला व्हुता. झेंड्याला सलाम ठोकायला. शिन्च्यान शेतकऱ्याला प्याकेज का काय ते देतो असा सांगूत मतं घेवून जे त्वांड काळं केलं  तो आत्ता उगीवला. म्हनतो कसं, मंदी आलिया, सरकारची तिजोरी खाली हाय. कसलं प्याकेज मागताय. म्हने मंदी आलिया. तालुक्याला ह्या भाड्यानं मोठा बंगला उभारलाय, परत ह्याचीच माणसं आडती. पेरायला बी बियाण दिल्लं आणि तेवाच सस्त्या दामात पिक उचलायचा सौदा केलान. आता अवेळी पावसानं अर्ध पिक नासलं. जे काय उरलं सुरलं ते ह्यानं माती मोलानं उचललं . पुरं नुस्कान झालं. सावकाराकडून बोर खोदायला कर्ज घेतलं  ते फेडू की बायको पोरांना घालाय कापडं घेऊ? विदर्भात शेतकरी फास लावतोय  तर मंत्री म्हणतो नशाबाज शेतकरी होते. आता मला साधं तंबाकूचा बी व्यसन न्हाई तरी हातात पैका कुटं? मलाबी फास लावून घ्यावासा वाटू लागलाय. छी: अशा जिंदगीवर. परवा सरपंच म्हणत होता कि एशिजेड का कायसा हाय त्यात मोठी कंपनी समद्यांची जिमीन विकत घेऊ मागतेय. बक्कळ पैसा आहे म्हनं. पण ही जिमीन म्हणजे माझी माय. हिला विकून पैका  तो काय कामाचा? एक दिवस आला पैका पण निघून जायेल. नंतर परत ये रे माज्या मागल्या! काय समजत नाय. डोस्कं फुटायची वेळ आलीय. विठ्ठला, बाबा आता  तूच काय ते बघणार आमच्याकडे!

टीप – हा लेख सहज गम्मत म्हणून माझ्या कल्पनाशक्तीला शक्य तितका  ताण देऊन लिहिला आहे.  कोणत्याही समाजाला, लोकसमुदायाला दुखावणे हा उद्देश मुळीच नाही. तरीही कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील  तर क्षमस्व!

 

विवाहसंस्थेचे वर्तमान

१२ जूनच्या लोकसत्ताच्या चतुरंग पुरवणी मध्ये अभिनेता श्री अतुल कुलकर्णी ह्यांचा “विवाहाच्या उत्क्रांतीचे वर्तमान” ह्या शीर्षकाचा एक  उत्कॄष्ठ लेख आहे. एक विचारवंत अभिनेता म्हणून आधीच प्रिय असलेल्या अतुलची एक विचारवंत लेखक म्ह्णून झालेली ही नवीन ओळख स्वागतार्हच आहे. आपले विचार, जरी ते वादजनक असले तरी, संयमित पणे कसे मांडावे ह्याचे उत्तम उदाहरण म्हणजे अतुल ह्यांचा लेख. मागच्याच आठवड्यात “विवाहाच्या उत्क्रांतिचा इतिहास” हा मंगला सामंत ह्यांचा महितिपूर्ण लेख वाचला. त्याच संकल्पनेचा धागा पकडून अतुलनी आपला लेख लिहिला. लेख वाचल्यावर बराच वेळ विचार केला आणि प्रतिक्रिया म्हणून इकडे लिहायचे ठरवले.

श्री अतुल ह्यांच्या लेखात त्यांचा विवाहसंस्थेवरचा आक्षेप स्पष्ट दिसून येतोय. त्यांचे हे वाक्य पहा:  “लग्नसंस्था ही एक मानवनिर्मित कृत्रिम व्यवस्था आहे आणि विवाहसंस्थेचंएक पुरुष आणि एक स्त्रीहे आजचं स्वरूप या कृत्रिमतेचे टोक आहे.” ह्या विधानासाठी एक नर अनेक माद्या किंवा एक मादी अनेक नर हे “basic instinct” आहेत हया शरीरसंबंधाच्या जीवशास्त्रीय नियमाचा ते आधार घेतात. मात्र मानवाच्या उत्क्रांतिमधून फक्त हाच मुद्दा वेगळा करून कसं चालेल? इतर प्राण्यांपासून मानवजीव जास्त प्रगत झाला तेव्हा त्याने त्याच्या बऱ्याच  basic instincts  वर काबू मिळवला. “बळी तो कान पिळी” (survival of the fittest)  हा पण एक basic instinct च आहे. पण मानवाने त्यावर बऱ्यापैकी मात मिळवून सबळ आणि दुर्बळ घटकांचा (ह्यात दुर्बळ घटक हा शब्द स्त्रीला उद्देशून नाहीये) एकत्र समाज बनवला. तेव्हा लोकशाही ही संस्था सुध्दा कॄत्रिम नव्हे काय? लोकलज्जेस्त्व वस्त्रधारण ही पण कॄत्रिम रीत नव्हे काय? पण ह्या कॄत्रिम संस्था मानवाने आपल्यावर लाद्ल्या नसत्या तर आपल्यात आणि श्वापदात फरक तो काय?

लग्न संस्था मानवावर एक नर एक मादी ची सक्ती करते असे अतुल म्हणतात. पण मी म्हणतो, बिघडले कुठे? मला वाटते कि उत्क्रांतिच्या एका ट्प्प्यात सक्षम प्रजननासाठी permutation and combinations of genes गरजेचे होते, त्यामुळे मानवाला polygamy and polyandry चे basic instincts प्राप्त झाले. मात्र अधुनिक काळात त्याचा काय उपयोग? जसे हळुहळु शेपटी गळून पडली तशी ही भावना पण कधीतरी लुप्त होइलच. लग्न ह्या संस्थेमध्ये ह्या basic instincts चा विचार नाही म्हणून ती लग्नसंस्थाच अमान्य करणे योग्य आहे काय?

लेखात पुढे अतुल म्हणतात की सध्याचे घटस्फोटाचे वाढते प्रमाण हे चुकीची व्यवस्था चॅलेंज होण्याचा परिणाम आहे. हा मुद्दाही तितकासा पटला नाही. तो सरसकट “बंधनात” अडकवले जाण्याचा परिणाम नाहीये तर “सक्तिने बंधनात” अडकवले जाण्याचा परिणाम आहे. विवाहसंस्थेचे फायदेतोटे लिहिताना आर्थिक सुसुत्रिकरण आणि कौटुंबिक स्थिरता हे फायदे अतुल मान्य करतात, पण तिकडेही तोटे लिहिताना लादलेली monogamy हा पहिला तोटा लिहिला जातो. पण हया तोट्यामुळे खरच किती नुकसान होते आहे? अन्न वस्त्र निवारा ह्या इतकी polygamy and polyandry नक्कीच महत्त्वाची नाही. मग त्याचा इतका ऊहापोह कशाला? ह्या गोष्टींना अतुलनी अवास्तव महत्त्व दिले आहे असे मला तरी वाटते.

आजच्या लग्नसंस्थेत बदल हवेत हे मात्र पटते. कुटंबातील स्त्रीच्या बदलत्या भूमिकेची दखल घेउन हे बदल व्हायला हवेत. आणि ते हळुहळु होतही आहेत. गावाकडच्या मुली सुध्दा आता वराबद्दलच्या अपेक्षा मांडू लागल्या आहेत. विवाहाच्या बंधनात अडकण्यापूर्वी compatibility checks हे मध्यमवर्गात होऊ लागले आहेत. ओपन मॅरेज, लिव्ह इन ह्या गोष्टी पचायला कठीण पण दखलपात्र नक्कीच आहेत. मला तरी वाटते कि ज्यांना ह्या गोष्टी अजमावायच्या आहेत त्यांनी मुल होऊ देण्याच्या अगोदर काय ते अनुभव घ्यावेत. मुलांच्या भावनिक विकासाच्या दॄष्टीने विवाहसंस्थेला दुसरा पर्याय मला तरी योग्य वाटत नाही.

लेखाच्या शेवटी अतुल विचारतात, “ही सगळी अधोगती वाटते? मूर्खपणा वाटतो? राग येतो? भीती वाटते? हे होणं अशक्य वाटतं? निदान भारतीय समाजात?(!) मंगलाताईंच्या लेखातले (किंवा राजवाडेंच्याभारतीय विवाहसंस्थेचा इतिहासया पुस्तकातले) काही उल्लेख वाचूनदेखील आपलं आजचं सुसंस्कृत (?) मन असंच बेचैन होत नाही काय? तो तर आपला इतिहास आहे.”  अहो पण आपला इतिहास असंस्कॄत होता म्हणून आपण पण असंस्कॄत गोष्टींचा पुरस्कार करावा काय? आदिमानवाच्या काळात भावनाविरहीत शरीरसंबंध होता त्यामुळे ज्या गोष्टी ग्राह्य होत्या त्या गोष्टी आजच्या भावनाप्रधान अशा आपल्या विकसित मेंदूला कशा बरे पटतील?

कोण जाणे, कदाचित माझे विचार काही पुरोगामी लोकांना बुरसटलेले वाटतील. पण अतुलच्या लेखात झालेले polygamy / polyandry चे पुर:स्करण मला तरी अनुचित वाटले म्हणून हा लेखनप्रपंच !

येरे येरे पावसा

अर्धा मे संपला. पुण्यात गरमीने अंगाची लाही लाही झाली आहे. मुंबईत कायमच्या पाणी टंचाईने अजून तीव्र रूप धारण केलं आहे. खेडोपाडी नद्या / विहिरी आटल्यात आणि लोकांची पाण्यासाठी पायपीट चालू झाली आहे. अशा परिस्थितीत “येरे येरे पावसा” कोण म्हणणार नाही? काल अंदमानात पाऊस आल्याचं ऐकून खरंच बरं वाटलं. बाकी येरे येरे पावसा ही कविता कोणी लिहिली ते माहित नाही, पण कवि सरकारी कामात खूपच जाणकार असावा. पैसा टाकल्याशिवाय काम होत नाही हे त्याला चांगल ठावूक आहे. मात्र ह्याच कवितेचं दुसर कडवं म्हणतं

येगं येगं सरी माझे मडके भरी

सर आली धावून मडके गेले वाहून.

ह्या ओळी मात्र सद्यस्थितीचं रास्त वर्णन करतात. पाऊस आला की असा कोसळतो की बहुतांश पाणी हे वाहून जातं. समुद्राला मिळतं आणि आपण बसतो पाणी टंचाईच्या नावाने शंख करीत.

वाढती लोकसंख्या , बेसुमार वृक्षतोड आणि घटणारी भूजल पातळी ह्या गोष्टींमुळे पावसाचे पाणी अडवून जिरवणे ही काळाची मोठी गरज बनली आहे.  फक्त गावातच नाही तर शहरात सुद्धा  ह्याची गरज आहे. गावात तेवढे डांबरीकरण नसल्याने पाणी जिरायला वाव बरा असतो. पण शहरात डांबर किंवा सिमेंटचे रस्ते! तेव्हा पाण्याला जिरायला वावच नाही. सगळे पाणी गटारात जाते. तेव्हा पाणी टंचाई कमी करायला नुसते सरकारवर अवलंबून न राहता प्रत्येकाने आपापल्या परीने प्रयत्न करायला हवेत. तहान लागल्यावर विहीर खोदायची आपली सवय. पण विहीर खोदायला जमिनीत पाणी तर हवे ना? तेव्हा तहान लागायची वाट नं पाहता, आपापल्या परीने प्रत्येकाने आत्ताच प्रयत्न करायला हवेत.

चांगली गोष्ट ही की लोकं जागृत होत आहेत. गावांमध्ये ओढ्यांना कच्चे बांध घालणे, शेततळी खणणे, डोंगरात चार खणणे अशा उपायांनी बरेच फायदे झाले आहेत. हिरवे बाजार, राळेगंज सिद्धी ह्या सारखी एकेकाळची दुष्काळग्रस्त गावं ह्या उपायांनी पाण्याच्या बाबत स्वयंपूर्ण झाली आहेत. ग्रामीण जनतेपेक्षा शहरातील जनता पाणी जास्त वापरते. तेव्हा पाण्याचा जपून वापर करण्याबरोबरच जल संवर्धनाची जबाबदारी पण शहरांनी पेलली पाहिजे. पालिकेने नियम करायची वाट न पाहता प्रत्येक सोसायटीने रेन वॉटर हार्वेस्टिंग करणे नितांत गरजेचे आहे.

माझ्या लहानपणापासून आमच्या सोसायटीत नेहमीच पाण्याची बोंब असे. ३-४ तासाच्या वर कधी पाणी येत नसे. मग प्रत्येकाच्या घरात  सिंटेक्सच्या टाक्या. पावसाळ्यात शेतकरी जसा ढगाकडे डोळे लाऊन बसतो तसे रोज सकाळी माझे वडील ह्या टाकीकडे डोळे लाऊन असायचे. एकदा टाकी भरली की आम्ही सारे हुश्श करत असू. आणि मग दिवसभर पाणी जपून वापरायचे. कोणी पाहुणे आले आणि बाथरूम मध्ये जाऊन आले की माझे वडील लागलीच बाथरूम मध्ये जाऊन पाहुण्यांनी नळ बरोबर बंद केलाय ना ह्याची खात्री करून घेत. कोणाला राहायला बोलवायचे तर पाणी सर्वांना पुरेल ना ह्याचीच काळजी असे. पण ह्यामुळे एक झाले ते म्हणजे पाणी जपून वापरायची नकळतच सवय लागली.

पुण्यात घर बांधायला घेतलं तेव्हा सुरवातीपासूनच रेन वॉटर हार्वेस्टिंग करायचं ठरवलं. नशिबानं बोर पण लागली. तेव्हा गच्चीत पडणार सर्व पाणी एकत्र गोळा करून बोर मध्ये परत सोडलं. पाऊस पडायला लागला की गच्चीतल पाणी धबाधबा खालच्या टाकीत पडतं आणि हा हा म्हणता बोर मध्ये मुरतं. ते बघताना एक वेगळच समाधान लाभतं. उपलब्ध माहिती नुसार एका पावसाळ्यात जवळपास ५० ते ६० हजार लिटर पाणी बोर मध्ये भरलं जातं. माझ्या मित्राचा अनुभव आहे. त्याच्या जवळपासच्या विहिरी मार्च पर्यंत आटायच्या . ह्याने रेन वॉटर हार्वेस्टिंग सुरु केल्या पासून आसपासच्या विहिरींची पाण्याची पातळी वाढली.

जेव्हा सोसायट्या रेन वॉटर हार्वेस्टिंगचे प्रस्ताव मांडतात तेव्हा काही नतद्र्ष्ट सभासद जास्त खर्च पडेल म्हणून आडून बसतात. अहो, उद्या पाणीच संपलं तर करायचे काय ते वाचवलेले पैसे? तेव्हा थोडा सारासार विचार करून अशा विधायक कामांना सर्वांनी हातभार लावणे गरजेचे आहे. आणि हो! अगदिच काही नाही तर आपल्या हातून पाण्याची नासधूस तरी होणार नाही एवढी काळजी तरी घेता येईलच ना!

सौजन्याची ऐशी तैशी

कल्पना करा, बरेच दिवसांनी तुम्ही एक छान नाटक पाहायला बसला आहात. अगदी पुढची सीट. नाटक रंगात येतेय आणि बरोब्बर तुमच्या मागच्या सीटवरच्या प्रेक्षकाने पायाची अवाजवी हालचाल करून तुमच्या सीटच्या पाठीवर धक्का मारला. तुम्ही एकदा त्रासून मागे पहिले. पण उपयोग शून्य. हे महाशय लाथा मारणे काही थांबवत नाहीत. आलाय असा अनुभव कधी? मला आलाय. असाच नाही, तर सहप्रेक्षकांना तसदी होईल अशा प्रकारे वागण्याचे वेगवेगळे प्रकार अनुभवले आहेत.

एकदा पार्ल्यात कट्यार काळजात घुसली चा प्रयोग पाहायला गेलो होतो. शेजारी एक प्रौढ स्त्री आणि त्यांची कन्या होते. राहुल देशपांडेचे “ह्या भुवनातील सूर” हे गाणे मस्त रंगत होते. आणि शेजारी “सू सू” असे नाकातून आवाज आले. आधी वाटले पं वसंतरावांच्या आठवणीने शेजारच्या बाईसाहेब गहिवरल्या की काय. पण कसले काय. बाईना सर्दी झाली होती. प्रथम दुर्लक्ष केले. पण ह्यांचे नस्यध्वनी काही थांबेना. बर म्हटलं मध्यंतरात बाई वॉशरूम मध्ये जाऊन गळणाऱ्या नाकाची काळजी घेतील, तर तसेही नाही. मध्यंतरानंतर परत तो नस्यध्वनी चालूच. जाम वैताग आला.

आजकाल नाटक सिनेमा चालू व्हायच्या आधी मोबाईल बंद करायला सांगतात. पण ऐकतो तो मूर्ख! एखादा सिरिअस प्रसंग चालू आहे पडद्यावर आणि कुठेतरी चालू होते “आल इज वेल” ची धून आणि मग तोंडावर हात ठेवून “मी सिनेमात आहे” असं सांगणारा महाभाग! काही लोकांना तर लाज नावाचा प्रकार माहितच नसतो. एकदा एक प्रेक्षक सिनेमा चालू असताना मोठ्या मोठ्याने फोन वर “जेवायला कुठे भेटायचे” ह्याची चर्चा करत होता. शेवटी आजूबाजूच्यांनी आरडा ओरडा करून त्याला गप्प केले. अजून एक गोष्ट. जीम मध्ये बाहेरची पादत्राणे घालून व्यायामाच्या ठिकाणी वावरायला परवानगी नसते. व्यायामाच्या ठिकाणी वापरायला वेगळा पादत्राणांचा जोड ठेवायचा असतो. आमच्या जीम मध्ये एक बाई बिनधोक नेहेमीच्या वापरातील बूट घालून येतात. मॅनेजरने खटकले तर म्हणतात काय की वाटलं तर दंड करा, पण मी हेच बूट घालणार. आता काय म्हणावे?

एकदा विमानाच्या बोर्डिंग पास साठी रांगेत उभा होतो. एक महाभागांनी घुसखोरी केली. साहजिकच बाकीचे प्रवासी उखडले. त्याला हटकले तर म्हणतो कसा “This is India. Not foreign to have lines”  आता हा देशाबाद्दलचा अभिमान म्हणावा कि देशाची लाज काढणे म्हणावे?  सार्वजनिक ठिकाणी आपल्यामुळे इतरांना त्रास होईल असे वागू नये ह्याची पुसटशी जाणीवही ह्या लोकांना नसावी काय? आणि ही सुशिक्षित मध्यमवर्गीय मंडळी.  सामाजिक जाणीव वगैरे नाहीच.
पण ह्याच आपल्या सुशिक्षित पण बेशिस्तप्रिय समाजात काही मनाला भिडणारे प्रसंग पण घडतात. गच्च भरलेल्या बस मध्ये एखादे आजी किंवा आजोबा धडपडत चढले तर आपणहून उठून त्यांना जागा देणारे पाहिलेत. लांब पल्ल्याच्या गाड्यांतून प्रवास करताना, जेव्हा जेवणाचा / फराळाचा डबा उघडला जातो तेव्हा सहप्रवाशाला आपल्या डब्यातल्या गोष्टी देऊ करणारे हमखास भेटतात. आणि अशी काही दृश्ये आढळली कि वाटतं
वा! माणुसकी अजून आहे तर शिल्लक
टीप: मागचा लेख आणी सद्य लेख ह्यांची शीर्षके नाटकांची नावे आहेत. हे केवळ योगायोगामुळे! शीर्षक देताना असा काही उद्देश नव्ह्ता.

मानापमान

परवा एका स्नेह्याशी बोलत होतो. ह्याने नुकतीच नवी नोकरी धरली होती. आयटी कंपनीमध्ये  सेल्स मनेजर म्हणून. कंपनी तशी छोटीच आणि थेट सीईओला रिपोर्टिंग. म्हणून स्वारी तशी खुशीत होती. पण बोलता बोलता त्याच्या बॉस बद्दल विषय निघाला तेव्हा म्हणाला की बॉस ने त्याला सांगितले की त्याने त्याच्या सर्व सिनिअर्स ना आदराने सर किंवा मॅडम म्हणून संबोधावे (“you should respect your seniors by calling them sir / madam”). आता आयटीमध्ये खरी सर किंवा मॅडम संबोधायची रीत एवढी प्रचलित नाही. तेव्हा साहजिकच ह्याला नवल वाटले. आणि त्याने जेव्हा मला सांगितले तेव्हा मला तर जास्तच नवल वाटले. नोकरीतला बराच काळ देशाबाहेर घालवल्यामुळे असेल, पण हे एवढे औपचारिक मानपान कधी महत्त्वाचे वाटलेच नाहीत. पण म्हणजे सिनिअर्स बद्दल आदर नाही असे नव्हे. वास्तविक आदर हा फक्त सिनिअर्स बद्दलच हवा का? प्रत्येक व्यक्तीबद्दल आदर हा असावाच ना! मग तो चेअरमन असो की ऑफिस बॉय असो.

अजून एक उदाहरण. भारतात परतल्यावर माझी पत्नी काही दिवस गंमत म्हणून एका जाहिरात कंपनीत नोकरी करत होती. कंपनी अगदी छोटी होती. १०-१२ लोक. मालक एकमेकांचे भाऊ आणि बहिण. एकदा भाऊसाहेब माझ्या पत्नीला काहीतरी कामाबद्दल सांगत होते. बोलण्याच्या ओघात सवयीप्रमाणे पत्नी “बरोबर आहे” “खरं आहे” असं काहीसं म्हणाली. तर संभाषण झाल्यावर मालकीणबाईनी हिला बोलवून घेतलं आणि सुनावलं की बोलताना मॅनर्स हवेत. म्हणजे काय तर मोठ्यानी काही सांगितल तर “बरोबर” असं म्हणू नये. कारण ते नेहमीच “बरोबरच” बोलत असतात. हे ऐकून तिला खरंतर गम्मतच वाटली.

आता पूर्वीसारखी स्पृश्यास्पृश्यता नाही, पण उच्चनीच भेदभाव मात्र अजून आहेच. बऱ्याच जुन्या कारखान्यांमध्ये , जिकडे कंपनीचे जेवण असते अशा ठिकाणी अजून कामगारांसाठी वेगळे कॅन्टिन, middle management  साठी वेगळे आणि  executive साठी अजून वेगळे कॅन्टिन. ज्युनिअर्सनी सिनिअर्सना आदराने बोलायचं. सिनिअर्स आले की जागेवरून उठायचं असल्या भलत्या अपेक्षा. ह्या उलट अनुभव अमेरीकेत आला. आमच्या कंपनीचा सीईओ सुद्धा सामान्यांसारखा जेवण विकत घ्यायला लाईनीत उभा रहायचा. आणि ही कंपनी लहान सहान नव्ह्ती तर fortunue 500 मधील एक.

आता  अजून एक अनुभव. २-३ वर्षापूर्वी मी ज्या कंपनीत होतो, त्या कंपनीचे एक उच्च अधिकारी म्हणजे एक पुण्यातील आयटी वर्तुळातील एक नावाजलेलं व्यक्तिमत्व. कर्मचाऱ्यांविषयी  ह्यांना एवढी आपुलकी की एकदा मिटींगमध्ये कर्मचाऱ्यांचा उल्लेख टिपिकल आयटी भाषेत resources  असा केला गेला तर ह्यांनी आम्हा सर्वांना सांगितलं, की resources  हा शब्द आपण निर्जीव गोष्टींना वापरतो.  आपण आपल्या कंपनीच्या employee  बद्दल बोलतो आहोत तेव्हा resources  न म्हणता engineer म्हणावे. ह्यांना कधी कोणी सर म्हणून हाक मारली नाही. पण प्रत्येक कर्मचाऱ्याच्या मनात ह्यांच्याबद्दल प्रचंड आदर होता. कारण ह्यांच्या मनात प्रत्येक कर्मचाऱ्याबद्दल तितकाच आदर होता.

शेवटी आदर / मान  ही काय मागायची गोष्ट आहे का? लोकांना आपणास आदराने सर म्हणावे असे सांगण्यापेक्षा, आपल्या वर्तनातून लोकांना आपल्याबद्दल रास्त आदर निर्माण होईल ह्याची काळजी घेणे जास्त महत्त्वाचे नाही का? नाहीतर काय, लोक म्हणतील तोंडावर सर. आणि मागून शिव्यांच्या लाखोल्या. असला विकतचा मान काय कामाचा?

“हेचि काय फळ तव तपाला” !

काल ई-सकाळवर डोमिसाईल प्रमाणपत्रावर लेख वाचत होतो. त्यात एका निवृत्त सैनिकाची प्रतिक्रिया आहे. गोव्यात जन्मलेले पण जन्माने मराठी असलेले हे गृहस्थ भारतीय सेनेत दाखल झाले. सैन्याची नोकरी, तेव्हा पोस्टिंग हे सीमेवरच. आयुष्यातील बराच काल महाराष्ट्रा बाहेर गेलेला. १० वर्षापूर्वी निवृत्त होऊन पुण्यात स्थायिक झाले. पण आता परिस्थिती अशी की ह्यांना / ह्यांच्या मुलांना डोमिसाईल प्रमाणपत्र मिळत नाहीये. कारण अशा प्रमाणपत्रासाठी १५ वर्ष महाराष्ट्रात राहावे लागते किंवा जन्माने महाराष्ट्रीयन असावे लागते. दुर्दैवाने ह्या दोन्ही पात्रता कसोट्यात हे गृहस्थ येत नाहीत. देशासाठी २७ वर्षं सेवा करून, ह्यांच्या पदरी सरकार कडून एका अर्थी नकारघंटाच. ही जर सत्य स्थिती असेल तर खरंच लाजिरवाणी गोष्ट आहे.

सैनिकांची एकूणच परिस्थिती अवघड. प्रतिकूल परिस्थितीत राहून ज्या देशाच्या संरक्षणासाठी लढायचं, त्याच देशात, निवृत्ती नंतर लाल फितीमुळे तयार झालेल्या प्रतिकूल परिस्थितीत जगायचं! माझ्या एका बालमित्राचा मावसभाऊ कारगिल मध्ये होता. हिमवादळात जायबंदी झाला म्हणून त्याला परत पाठवले. खिशात एक पैसा नाही. डॉक्टरी उपचार नाहीत. अशा परिस्थितीत बिचारा कसाबसा गावाला परतला. देशासाठी लढणाऱ्या, प्रसंगी आत्मसमर्पण करायची तयारी असणाऱ्या ह्या धाडसी सैनिकांची ही गत होत असेल तर ही फक्त त्या सैनिकांचीच नव्हे तर साऱ्या देशाचीच शोकांतिका आहे असे म्हणावे लागेल.

भारत सरकारच्या एकूण खर्चाच्या १४%  खर्च हा संरक्षणावर होतो.  पाकिस्तान , चीन ह्यासारखे उपद्व्यापी शेजारी आणि हजारो किमी ची आपली सीमारेषा. अशी परिस्थिती असताना सैन्याचे महत्त्व खूपच आहे. जर त्याची योग्य ती काळजी घेतली नाही तर नवीन तरुण कसे आकर्षित होणार? २००७ च्या एका अहवालानुसार “ऑफिसर” पदाच्या २४% जागा रिकाम्या आहेत. ह्याला कारणे बरीच आहेत. जोखमीचे काम आणि त्यामानाने कमी पगार, बढतीची क्लिष्ट प्रक्रिया ही  त्यातील मुख्य  कारणे!  तरी बरं सहाव्या वेतन आयोगामध्ये सैनिकान्च्या पगारवाढीची तरतूद केली आहे.

देशाच्या मूलभूत गरजा, अन्न आणि सुरक्षा ह्यांचे महत्त्व लक्षात घेऊनच दिवंगत पंतप्रधान लाल बहाद्दूर शास्त्री ह्यांनी “जय जवान जय किसान” अशी घोषणा केली होती. दुर्दैवाने हे दोन्ही व्यवसाय सध्या पूर्णपणे दूर्लक्षित आहेत. ईतके की एक स्पर्धा काय जिंकली तर क्रिकेटर्स ना आपण डोक्यावर घेउन नाचतो. त्यांच्यावर पैशाचा वर्षाव करतो. त्यांना करसवलती देतो. पण कारगीलचा एक योद्धा घरी परतताना साध्या रेल्वेचे तिकीट खरेदी करू शकत नाही. ह्यापेक्षा मोठे दुर्दैव ते काय?

जाता जाता एक निरीक्षण. ह्या जवान आणि किसानांशी संबंधित दोन्ही “खाती” सांभाळलेले मन्त्री कोण तर साक्षात “शरद पवार”! एक योगायोगच म्हणायचा!