बातम्या – न घडलेल्या घटनांच्या

अखिल वेगळे हा आमच्या शाळेतला एक उचापत्या मुलगा. आता बातमीदार. घरात गडगंज श्रीमंती, पण ह्या पठ्ठ्याला पाहिल्यापासून बातमीदारच व्हायचे होते. स्वतःचे महाखबर नावाचे दैनिक काढले. दैनिक मराठी असले तरी गिऱ्हाईक अधिक करून भैय्ये आणि वाणी ! रद्दीपेक्षा स्वस्त असा महाखबरचा पेपर भेळ / पुड्या बांधायला बरा पडतो ना! त्यामुळे आमच्या वेगळेला मराठी सोडून अन्य भाषिकांचे जास्त प्रेम. उगाच “मराठी बाणा” वाल्या पक्षांच्या कुरापती पेपर मधून काढणे हा ह्याचा छंद. मग कधी त्यातून मार पण खायचा. (बहुतेक भेळ खाताना ह्याचे मराठी विरोधी लेख चुकून कोणी बाणेदार मराठी वाचत असावेत. आधीच भेळ खाऊन पोटात आग, आणि त्यावर ह्याच्या लेखाने डोक्यात आग, मग मारामारी करणार नाही तर काय?)

असो. तर असा हा आमचा आगळा वेगळा वेगळे बऱ्याच दिवसांनी मला भेटला. त्याला म्हटलं “काय रे वेगळ्या? बरेच दिवसात कोणाकडून मार खाल्ला नाहीस? काय पत्रकारिता सोडलीस काय?”  “छ्या! पत्रकारिता ह्या जन्मात सोडणार नाही. प्रस्थापितांना विस्थापित केल्याशिवाय गप्प बसतोय काय?” आता हे प्रस्थापित / विस्थापित हे शब्द माझं डोकं गरगरवणार काय अस वाटू लागलं. वेगळ्या मला इराण्याच्या हॉटेलात च्या पाजायला घेऊन गेला. च्या पीता पिता माझ्या समोर एक फाईल टाकली आणि सिगरेट शिलगावून मला म्हणाला, “वाच येत्या काही दिवसात येणाऱ्या बातम्या! ”  मी फाईल उघडून वाचू लागलो आणि डोळेच चमकले. त्याला म्हटले, “ह्या सगळ्या घडलेल्या घटना आहेत?”  माझ्याकडे वेगळ्या अगदी कुत्सित नजरेने पाहून म्हणाला, “छट! पण काही दिवसात घडतीलच बघ! मी मात्र सगळ्यांच्या आधीच छापून टाकणार आहे.” वेगळ्याकडे कौतुकाने पहात मी त्याने हळूच माझ्याकडे सरकवलेले बिल चुकते केले आणि आम्ही आपापल्या वाटेने निघालो.

दुसऱ्या दिवशी पेपर वाल्याकडे महाखबर मागितला तर पेपर वाल्याने असा काही वाकडा चेहरा केला की कुठून पेपर मागितला असे झाले. मग तिसऱ्या दिवशी वाण्याकडून घेतला. वाणी पण असला बदमाश! नुसता पेपर द्यायला तयार नाही १०० रुपयाची खरेदी करायला लावली. मला वेगळ्याने आधीच वाचलेल्या बातम्या खरच पेपरात आल्या आहेत का हे बघायची उत्सुकता होती. बातम्या खरंच छापून आल्या होत्या की हो! साहजिकच त्या वाचकांच्या पर्यंत पोचल्या नव्हत्या. (वाणी आणि भैय्ये आधीच सगळा महाखबर गायब करून टाकतात ना!) तेव्हा आमच्या प्रिय मित्र वेगळ्याच्या घडण्याआधी प्रसिद्ध झालेल्या बातम्या सर्वांपर्यंत पोचवायचा हा छोटासा प्रयत्न!

टेकड्या ठरल्या पुण्याच्या काळ !

विशेष प्रतिनिधीकडून,

गेले २-३ दिवस पुण्यात मुसळधार पावसाने धुमाकूळ घातला आहे. पानशेतच्या पुरात आले नसेल त्याहून जास्त पाणी शहरभर झाले होते. महापौरांचा बंगला सुद्धा ह्या पाण्यातून सुटला नाही. ११३ सरकारी वाहने आणि थोडीफार माणसे पाण्यात वाहून गेली.  काही नतद्रष्ट पर्यावरणवादी लोक बिल्डर लोकांनी नद्या  नाले बुजवले म्हणून पाणी साचले असा खोटा प्रचार करत आहेत. पण आपल्या माननीय पालक मंत्र्यानी पुण्याच्या परिस्थितीचा सखोल अभ्यास करून असा निष्कर्ष काढला आहे की ही परिस्थिती नद्या किंवा नाले बुजवल्यामुळे आली नसून पुण्यात मधेच उभ्या ठाकलेल्या टेकड्यांमुळे आली आहे. ह्या टेकड्यांवरून धो धो पावसाचे पाणी खाली वाहते आणि पूरसदृश परिस्थिती निर्माण होते. तेव्हा पालक मंत्री नवीन अध्यादेश जारी करून टेकड्या पाडण्या साठी बिल्डर कडून निविदा मागवणार आहेत. जो बिल्डर कमी खर्चात टेकडी जमीन दोस्त करेल त्याला त्या जागेवर बांधकाम करून आपला खर्च वसूल करता येईल अशी ही योजना असेल. ह्या योजनेला विरोध करणाऱ्यांना मोक्का लावला जाईल अशीही तरतूद केली आहे. बिल्डर समाजाने ह्या घोषणेचे स्वागत करून सरकारशी सहाय्य करायची तयारी दर्शवली आहे.

कोणीतरी सरकारशी उघडपणे सहकार्य करायची तशी ही पहिलीच वेळ आहे.

सरकार वापरणार कॉमनवेल्थ पॅटर्न!

कॉमनवेल्थ गेम च्या यशाने भारताची मान जगात खूपच उंचावली आहे. खेळ सुरु व्हायच्या आधी भ्रष्टाचाराच्या आरोपांनी झाकोळलेल्या संबंधितांमध्ये खेळाच्या यशाने नुसती सुटकेचीच भावना नव्हे तर मनात नवी उभारी आली आहे. आम्ही स्पर्धेच्या मुख्यांशी वार्तालाप केला असता त्यांनी सांगितले की एवढा मोठा प्रकल्प करताना उगाच शे दोनशे कोटीचा हिशेब लागत नाही म्हणुन गाजावाजा करू नये. अशाने ठेकेदारांकडून काम करवून घेणाऱ्या सरकारी अधिकाऱ्यांचे उगाच मानसिक खच्चीकरण होते. त्यामुळे देशाची प्रतिमा खराब होते.  ह्या पुढे अशीच मोठी कामे यशस्वी व्हावी म्हणून अशा प्रकल्पांवर काम करणाऱ्या कर्मचार्यांना लाच लुचपत विभागा पासून संरक्षण देण्याचा ठराव सरकार मंजूर करून घेणार आहे. विरोधी पक्षांनी पाठिंबा द्यायची तयारी दर्शवली आहे. त्या बदल्यात खासदारांना सुद्धा लाच लुचपत विभागाच्या करड्या नजरेतून सोडवण्याची तरतूद करायचे सरकारने ठरवले आहे. तसेच प्रकल्पांच्या एकून हिशेबांच्या २५% रकमेचा हिशोब देण्याची सक्ती आता सरकारी कर्मचाऱ्यांवर रहाणार नाही. त्यावर माहिती अधिकार सुद्धा लागू होणार नाही असा अध्यादेश सरकारने जारी केला आहे.  असा हा कॉमनवेल्थ पॅटर्न देशाला उन्नतीच्या पथावर नेऊन ठेवेल अशी आशा स्पर्धेच्या मुख्य अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

अयोध्येचा निकाल अमान्य! चॅनल जाणार सर्वोच्च न्यायालयात

उच्च न्यायालयाचा अयोध्येतील वादाबाबत निकाल सर्व सामान्य जनतेला मान्य असल्याचे चित्र दिसत असले तरी ह्या बाबत समस्त टीव्ही चॅनल वाल्यांमध्ये नाराजी आहे. निकाला नंतर दंगलीची अपेक्षा असल्याने चॅनल वाल्यांनी संवेदनशील ठिकाणी कॅमेरे, रिपोर्टर आणि अगदीच गरज पडली तर भरपूर दगड अशी व्यवस्था केली होती. दंगलीचा आखो देखा हाल द्यायची चोख व्यवस्था ह्या पूर्वी कधीच झाली नव्हती. आता न्यायालयाने सर्वांना खूष करणारा निकाल दिल्याने चॅनलवाल्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. पुढच्या आठवड्याभरात बातम्या कुठल्या द्यायच्या असा गहन प्रश्न त्यांच्यासमोर ठाकला आहे. लोकांच्या भावना दुखावल्या जाऊ नये म्हणून मुद्दाम असा समतोल निकाल देऊन दोन्ही बाजूनी पक्षपात केला गेला आहे असे चॅनल वाल्यांचे म्हणणे आहे. तेव्हा ह्या खटल्यातील वादी आणि प्रतिवादीनी जरी सर्वोच्च न्यायालयाने दाद मागितली नाही तरी उच्च न्यायालयाच्या ह्या निकालाचा पुनर्विचार करण्याची जनहित याचिका चॅनल वाले सादर करणार आहेत.

चोरांचे संमेलन – मध्यमवर्गीयांना दिलासा

नुकतेच पुण्या बाहेरील बालेवाडी क्रीडांगणात देशभरातील तुरुंगा बाहेरील चोरांचे, पुणेरी भामटा समाज ह्यांनी प्रायोजित केलेले संमेलन पार पडले. चोरांचा राजा शोभराज ह्याच्या प्रतिमेला हार घालून संमेलनाला सुरुवात झाली. संमेलनात चोरांच्या व्यथांवर प्रकाश पाडणारा एक परिसंवाद होता. त्यात आधुनिक चोरांच्या समस्या मांडल्या गेल्या. ऑनलाईन बँकिंग, एटीएम, डेबिट कार्ड ह्यामुळे लोक जास्त पैसे जवळ बाळगत नाहीत त्यामुळे चोरीचा धंदा फायदेशीर आहे का असा प्रश्न पुढे करण्यात आला. त्यावर ज्येष्ठ चोर दगडू मानकापे ह्यांनी कल्पकतेत कमी पडणाऱ्या चोरांवर तोंडसुख घेतले. त्याच्या मते चोर आपली शिकार नीट ओळखत नाहीत. मारुती चालवणारा, क्रेडीट कार्ड वापरणारा मध्यमवर्गीय नोकरदार शिकार करणे म्हणजेच आपले प्रयत्न फुकट घालवणे आहे. मध्यमवर्गीय नोकरदार माणसाला लुटण्याचे काम फक्त सरकार करू शकते असे मानकापे ह्यांचे मत होते. तेव्हा आधीच मेलेल्याला मारण्याचा मूर्खपणा चोरांनी करू नये असा सल्ला मानकापे ह्यांनी दिला. त्यापेक्षा चोरांनी आपला रोख सरकारी कर्मचाऱ्यांवर वळवावा असा मोलाचा सल्ला त्यांनी दिला. ह्या सावजाकडे घरात दाबून रोकड असते. शिवाय सफाईने ती चोरली तरी हे सावज पोलिसात जात नाही. कारण रोकडीचा हिशोब मागितला तर काय? तेव्हा सरकारी कर्मचाऱ्यां इतके सुरक्षित सावज नाही. आणि समस्त चोर समाज पिढ्यानपिढ्या आनंदाने चोरी करू शकेल असा विश्वास मानकापे ह्यांनी व्यक्त केला.

बऱ्याच काळाने मध्यमवर्गीयांना सुखावणारी एक तरी बातमी दिल्याचा आम्हास अत्यानंद होत आहे.

Advertisements

विवाहसंस्थेचे वर्तमान

१२ जूनच्या लोकसत्ताच्या चतुरंग पुरवणी मध्ये अभिनेता श्री अतुल कुलकर्णी ह्यांचा “विवाहाच्या उत्क्रांतीचे वर्तमान” ह्या शीर्षकाचा एक  उत्कॄष्ठ लेख आहे. एक विचारवंत अभिनेता म्हणून आधीच प्रिय असलेल्या अतुलची एक विचारवंत लेखक म्ह्णून झालेली ही नवीन ओळख स्वागतार्हच आहे. आपले विचार, जरी ते वादजनक असले तरी, संयमित पणे कसे मांडावे ह्याचे उत्तम उदाहरण म्हणजे अतुल ह्यांचा लेख. मागच्याच आठवड्यात “विवाहाच्या उत्क्रांतिचा इतिहास” हा मंगला सामंत ह्यांचा महितिपूर्ण लेख वाचला. त्याच संकल्पनेचा धागा पकडून अतुलनी आपला लेख लिहिला. लेख वाचल्यावर बराच वेळ विचार केला आणि प्रतिक्रिया म्हणून इकडे लिहायचे ठरवले.

श्री अतुल ह्यांच्या लेखात त्यांचा विवाहसंस्थेवरचा आक्षेप स्पष्ट दिसून येतोय. त्यांचे हे वाक्य पहा:  “लग्नसंस्था ही एक मानवनिर्मित कृत्रिम व्यवस्था आहे आणि विवाहसंस्थेचंएक पुरुष आणि एक स्त्रीहे आजचं स्वरूप या कृत्रिमतेचे टोक आहे.” ह्या विधानासाठी एक नर अनेक माद्या किंवा एक मादी अनेक नर हे “basic instinct” आहेत हया शरीरसंबंधाच्या जीवशास्त्रीय नियमाचा ते आधार घेतात. मात्र मानवाच्या उत्क्रांतिमधून फक्त हाच मुद्दा वेगळा करून कसं चालेल? इतर प्राण्यांपासून मानवजीव जास्त प्रगत झाला तेव्हा त्याने त्याच्या बऱ्याच  basic instincts  वर काबू मिळवला. “बळी तो कान पिळी” (survival of the fittest)  हा पण एक basic instinct च आहे. पण मानवाने त्यावर बऱ्यापैकी मात मिळवून सबळ आणि दुर्बळ घटकांचा (ह्यात दुर्बळ घटक हा शब्द स्त्रीला उद्देशून नाहीये) एकत्र समाज बनवला. तेव्हा लोकशाही ही संस्था सुध्दा कॄत्रिम नव्हे काय? लोकलज्जेस्त्व वस्त्रधारण ही पण कॄत्रिम रीत नव्हे काय? पण ह्या कॄत्रिम संस्था मानवाने आपल्यावर लाद्ल्या नसत्या तर आपल्यात आणि श्वापदात फरक तो काय?

लग्न संस्था मानवावर एक नर एक मादी ची सक्ती करते असे अतुल म्हणतात. पण मी म्हणतो, बिघडले कुठे? मला वाटते कि उत्क्रांतिच्या एका ट्प्प्यात सक्षम प्रजननासाठी permutation and combinations of genes गरजेचे होते, त्यामुळे मानवाला polygamy and polyandry चे basic instincts प्राप्त झाले. मात्र अधुनिक काळात त्याचा काय उपयोग? जसे हळुहळु शेपटी गळून पडली तशी ही भावना पण कधीतरी लुप्त होइलच. लग्न ह्या संस्थेमध्ये ह्या basic instincts चा विचार नाही म्हणून ती लग्नसंस्थाच अमान्य करणे योग्य आहे काय?

लेखात पुढे अतुल म्हणतात की सध्याचे घटस्फोटाचे वाढते प्रमाण हे चुकीची व्यवस्था चॅलेंज होण्याचा परिणाम आहे. हा मुद्दाही तितकासा पटला नाही. तो सरसकट “बंधनात” अडकवले जाण्याचा परिणाम नाहीये तर “सक्तिने बंधनात” अडकवले जाण्याचा परिणाम आहे. विवाहसंस्थेचे फायदेतोटे लिहिताना आर्थिक सुसुत्रिकरण आणि कौटुंबिक स्थिरता हे फायदे अतुल मान्य करतात, पण तिकडेही तोटे लिहिताना लादलेली monogamy हा पहिला तोटा लिहिला जातो. पण हया तोट्यामुळे खरच किती नुकसान होते आहे? अन्न वस्त्र निवारा ह्या इतकी polygamy and polyandry नक्कीच महत्त्वाची नाही. मग त्याचा इतका ऊहापोह कशाला? ह्या गोष्टींना अतुलनी अवास्तव महत्त्व दिले आहे असे मला तरी वाटते.

आजच्या लग्नसंस्थेत बदल हवेत हे मात्र पटते. कुटंबातील स्त्रीच्या बदलत्या भूमिकेची दखल घेउन हे बदल व्हायला हवेत. आणि ते हळुहळु होतही आहेत. गावाकडच्या मुली सुध्दा आता वराबद्दलच्या अपेक्षा मांडू लागल्या आहेत. विवाहाच्या बंधनात अडकण्यापूर्वी compatibility checks हे मध्यमवर्गात होऊ लागले आहेत. ओपन मॅरेज, लिव्ह इन ह्या गोष्टी पचायला कठीण पण दखलपात्र नक्कीच आहेत. मला तरी वाटते कि ज्यांना ह्या गोष्टी अजमावायच्या आहेत त्यांनी मुल होऊ देण्याच्या अगोदर काय ते अनुभव घ्यावेत. मुलांच्या भावनिक विकासाच्या दॄष्टीने विवाहसंस्थेला दुसरा पर्याय मला तरी योग्य वाटत नाही.

लेखाच्या शेवटी अतुल विचारतात, “ही सगळी अधोगती वाटते? मूर्खपणा वाटतो? राग येतो? भीती वाटते? हे होणं अशक्य वाटतं? निदान भारतीय समाजात?(!) मंगलाताईंच्या लेखातले (किंवा राजवाडेंच्याभारतीय विवाहसंस्थेचा इतिहासया पुस्तकातले) काही उल्लेख वाचूनदेखील आपलं आजचं सुसंस्कृत (?) मन असंच बेचैन होत नाही काय? तो तर आपला इतिहास आहे.”  अहो पण आपला इतिहास असंस्कॄत होता म्हणून आपण पण असंस्कॄत गोष्टींचा पुरस्कार करावा काय? आदिमानवाच्या काळात भावनाविरहीत शरीरसंबंध होता त्यामुळे ज्या गोष्टी ग्राह्य होत्या त्या गोष्टी आजच्या भावनाप्रधान अशा आपल्या विकसित मेंदूला कशा बरे पटतील?

कोण जाणे, कदाचित माझे विचार काही पुरोगामी लोकांना बुरसटलेले वाटतील. पण अतुलच्या लेखात झालेले polygamy / polyandry चे पुर:स्करण मला तरी अनुचित वाटले म्हणून हा लेखनप्रपंच !

कथा – खालचा ’सा’ (अंतिम) भाग ३

दूसऱ्या दिवसापासूनच छोटा सुरिलाच्या स्पर्धेची तयारी सुरु झाली. मुलांना कॅमेराची सवय व्हावी म्हणून पूर्ण शूटींगची प्रक्रिया समजावून सांगण्यात आली. मुलांना कॅमेरे हाताळायला दिले. साऊंड रेकॉर्डिंग कसे चालते ते शिकवले गेले. माइक वापरायचा सराव झाला. अनेक अद्भूत गोष्टी! मुलं तर हरखूनच गेली.

स्वरेश ह्या सगळ्या गोष्टीत चांगलाच रमून गेला. आठवड्याभरात पहिल्या भागाचे शूटींग झाले. स्वरेशचे पहिल्या भागात पहिलेच गाणे होते. “ओंकार स्वरूपा” गाऊन स्वरेशने नुसती परिक्षकांचीच नाही तर हजर प्रेक्षकांचीही मनं जिंकली. माधवराव आणि संगीता वहिनींचा आनंद गगनात मावत नव्ह्ता. २ दिवसातच प्रसारण झाले आणि घरचा फोन आणि आईबाबांचे मोबाईल सारखे खणखणत होते. शुभेच्छांचा नुसता वर्षाव चालला होता. रातोरात स्वरेश स्टार झाला होता. पण ह्या सगळ्या गदारोळात स्वरेश मात्र अलिप्त होता. नेहमी हसत खेळत बागडणारा स्वरेश एकदम अंतर्मुख झाला होता. पण त्याचे आई बाबा आकस्मित प्रसिद्धीत एवढे रममाण झाले होते की त्यांच्या कुठले लक्षात यायला.

त्या रात्री स्वरेशला झोपच आली नाही. त्याला मनातून ह्या स्पर्धेतून बाहेर पडायचे होते. ह्या स्पर्धेमुळे त्याचे मित्र त्याला दुरावले होते. सगळे मित्र पूर्ण सुट्टीभर धमाल करत होते आणि हा आपला एका ट्युशन मधून दुसऱ्या ट्युशन मधे. सुट्टीची मजाच आली नाही. थोड्यावेळाकरता तर स्वरेशला असे पण वाटले की मुद्दाम वाईट गावे म्हणजे स्पर्धेतून बाद होऊ पण मग आई बाबांचा पडलेला चेहेरा त्याच्या डोळ्यासमोर आला. बाबा तो लहान असता पासून सांगायचे कि त्याला मोठ्ठा गायक बनायचे आहे. तो गायक झाला नाही तर त्यांची सर्व स्वप्न धुळीला मिळतील. अर्थात ह्याचा मतितार्थ कळायचा नाही पण आपण गायलो नाही तर काहीतरी भयंकर होईल असे काहीतरी स्वरेशला वाटे. फक्त बाबांना खुष करायचे म्हणून स्वरेश स्पर्धेत गात होता.

स्पर्धेत स्वरेशला प्रत्येक भागात यश मिळत होते. सगळीकडून कौतुक होत होते. आता शाळा पण सुरु झाली होती. अभ्यास आणि गाणे दोन्ही चालू होते. शाळेने स्वरेशला शूटिंगसाठी गैरहजर रहायची परवानगी दिली होती. एक दिवस मराठीच्या बाईंनी मुलांना निबंध लिहायला दिला होता. विषय होता “मला जादूची कांडी मिळाली तर” स्वरेशने दिलेल्या वेळेत निबंध लिहून बाईना वही दिली. तपासायला म्हणून बाई मुलांच्या वह्या घरी घेऊन गेल्या. छोटा सुरीला पाहताना बाईंना स्वरेशच्या निबंधाची आठवण आली, आणि त्यांनी त्याची वही उघडली. निबंध वाचता वाचता बाईंच्या डोळ्यात चक्कं अश्रू आले. त्यांनी वही बंद केली. टीव्ही बंद केला. आणि मुख्याध्यापिकांना फोन केला, तेव्हा कुठे त्यांना शांत वाटले. दुसऱ्या दिवशी मुख्याध्यापिका बाईनी निबंध वाचला. त्यांची पण तीच गत. त्यांनी स्वरेशची फाईल मागवून त्याच्या आईचा नंबर शोधला आणि लागलीच फोन करून शाळेत भेटायला बोलावले. कॉलेज मधून परस्पर येते असे सांगितले, तर मुख्याध्यापिका म्हणाल्या की दोघांनी यायला हवं.

दुसऱ्या दिवशी संगीता वहिनी आणि माधवराव मुख्याध्यापिकांना भेटायला गेले. स्वरेशच्या मराठीच्या बाई होत्याच. त्यांनी स्वरेशची निबंधाची वही पुढे केली. माधवरावांनी निबंध वाचून वही संगीता वहिनींच्या हातात दिली आणि सुन्नं बसून राहिले. संगीता वहिनींना तर निबंध वाचून हुंदकाच फुटला. स्वरेशने निबंधात लिहिले होते की जर त्याला जादूची कांडी मिळाली तर तो ह्या जगातून गाणेच नष्ट करेल. तबला पेटी तानपुरा सर्व नाहीसे करून टाकेल. कारण ह्या गाण्यापायी त्याला मित्रच राहिले नाहीत. रोज चांगला परफॉर्मन्स द्यायचे टेन्शन येत होते. रात्री डोळ्यासमोर नी, वरचा सा येऊन दचकून जाग येत होती. हे सर्व नको नकोसे झाले होते. एकदा गाणेच नष्ट झाले तर ह्या गोष्टी पण आपोआप निघून जातील. परत मित्र मिळतील. क्रिकेट, पोहणे अशी चंगळ करता येईल. असे काहीसे लिहिले होते.

माधवराव मुख्याध्यापिकांना म्हणाले, “मॅडम, नकळत आम्ही आमच्या मुलावर किती अन्याय केला. त्याच्या अंगावर एवढे मोठे ओझे टाकले. त्याचे बालपण हिरावून घेत होतो आम्ही. आपल्या मुलाला गाण्याच्या स्पर्धेत वरचा सा मिळावा म्हणुन अपेक्षा धरणारे आम्ही पालक ह्या नात्याने खालचा सा पण मिळवण्याच्या लायकीचे उरलो नाही.” मुख्याध्यापिका म्हणाल्या, “आपण नुसते तारे जमीन पर, थ्री इडियट्स सारखे सिनेमे पाहतो. आपण सिनेमात दाखवलेल्या पालकांसारखे नाही असे स्वतःला म्हणवतो. पण कुठेतरी ह्या सिनेमातला संदेश आपण विसरूनच जातो नाही का? मुलांना काय हवे तेच जाणून घेत नाही. मग त्यांच्या आतला असंतोष खदखदत राहतो. त्यातून मग काही मुलं आत्महत्त्येचा मार्ग अवलंबतात. नशीब स्वरेशच्या मनातला कल्लोळ आपल्याला लवकर कळला. आता घरी जाऊन ह्या विषयी वाच्यता न करता त्याच्यावरचे ओझे कसे दूर करायचे ते ठरवा.”

शिक्षकांचे आभार मानून ते दोघं घरी परतले. बाबांना पहाताच स्वरेशने सवयी प्रमाणे पेटी काढली. रियाजाला उशीर झाला होता. पण बाबा म्हणाले, “अरे स्वरेश आता उशीर झाला आहे. आज नको तो रियाज. खरं तर तु इतका छान गातोयस, काही दिवस तुझ्या गळयाला आराम. ट्युशन्स पण नाही.” स्वरेश चकीत होऊन बाबांकडे बघायला लागला. म्हणाला, “खरंच? मग स्पर्धेचं काय?” “अरे, तू असाच पुढे जाशील. टेन्शन न घेता गायचं. सर्वांना माहितेय आमचा स्वरेश किती छान गातो ते. त्यासाठी एव्ह्ढा आटापिटा करायची काय गरज?” स्वरेशने हाताला चिमटा घेऊन आपण स्वप्नात नाहीना ह्याची खात्री करून घेतली. “चल, बघतोस काय? उचल ती पेटी आणि ठेव जागेवर. आणि हो! तुझ्या मित्रांना सांग कि पुढच्या शेड्युलला मी त्यांना सर्वांना घेऊन जातोय. तुला चिअर अप करायला. त्यांना आई बाबांची परवानगी काढायला सांग”. स्वरेश तर आनंदाने उड्याच मारायला लागला. दुरावलेल्या मित्रांना जवळ करायची संधीच चालून आली होती ना!

पुढ्च्या शेड्युलला स्वरेश “सुरत पियाकी” हे नाट्यसंगीत बेफाम गायला. परिक्षकांकडे कौतुकाला शब्द नव्ह्ते. त्याच्या मित्रांनी तर पूर्ण स्टुडिओ डोक्यावर घेतला. शूटिंग नंतर माधवराव सर्वांना चौपाटीवर घेउन गेले. भेळ, पाणीपुरी, आईस्क्रिम म्हणजे नुसती चैन चालली होती. स्वरेशच्या तर चेहेऱ्यावरून आनंद ओसंडून चालला होता. माधवराव स्वरेशला न्याहाळत होते. फार दिवसांनी स्वरेश एव्हढा खुशीत होता. त्याच्याकडे बघता बघता डोळे पाणावले कधी हे कळलेच नाही.

(समाप्त)

कथा – खालचा ’सा’ भाग २

कुठून बाबांच्या रियाजाला लहानपणी ताल दिला असा विचार स्वरेशच्या मनात येऊन गेला. आईशी वाद घालण्यात काही अर्थ नाही हे तो पुरतं जाणून होता. तेव्हा गुपचूप त्याने dvd  लावली. मात्र भीमसेनजींचा सूर कानात गेले आणि मंत्रमुग्धपणे स्वरेश ते रेकॉर्डींग पाहू लागला.

’छोटा सुरीला’ हा टिव्ही वरचा भलताच लोकप्रिय कार्यक्रम होता. त्याची निवडप्रक्रीया पण तितकीच कठीण. माधवरावांनी चॅनल मध्ये ओळख काढून निवडप्रक्रीयेत यश कसे मिळवायचे ह्याची माहिती मिळवली होती. आणि बरंच झालं कि माहिती काढली. कारण तिथे कळलं की ५०,००० रुपये भरले कि त्वरीत दूसऱ्या फेरीत प्रवेश मिळतो. तेव्हा पहिल्या फेरीतून १० हजार स्पर्धकांतून ३०० स्पर्धकात आणि मग अंतिम ३० स्पर्धकात निवडून येण्यापेक्षा, एकदम ३०० मधून ३० मध्ये निवडून येणे बरे. असा विचार करून माधवरावांनी ताबडतोब ५० हजार रुपये भरून टाकले. एरव्ही नाकासमोर सरळ चालणाऱ्या माधवरावांना मुलाला प्रसिद्ध करण्याच्या नादात भ्रष्टाचाराचा आश्रय घ्यावा लागला होता.

दुसऱ्या दिवसापासून स्वरेशची गाण्याची तयारी जोमानं सुरु झाली. आत्तापर्यंत फक्तं शास्त्रीय गाणाऱ्या स्वरेशला आता १० विविध गाणी आत्मसात करायची होती. कारण स्पर्धेत विविधता हवी! सुट्ट्या सुरु झाल्या तरी सर्वेश सकाळी ६ वाजता ऊठे. कारण बाबा ऑफिसला जायच्या आधी नेहेमीचा शास्त्रीय संगीताचा रियाज घेत. मग ८ ते १० पर्यंत आयपॉडवर निवडक गाणी ऐकून त्यातील विविध जागा आत्मसात करायच्या. १०:३० वाजता आईच्या कॉलेजमधल्या मराठीच्या प्राध्यापिका लेले मॅडम त्या गाण्यांचे अर्थ आणि भाव समजावत. बरेचसे अर्थ डोक्यावरून जात, मग त्या कोणते गाणे कोठच्या मूड मध्ये बसते हे त्याच्या कडून पाठ करून घेत. मग ३ वाजता भावगीत आणि नाट्यसंगीत शिकवणारे गुरुजी येत. संध्याकाळी ४ ते ५ काय तो वेळ स्वरेश ला मोकळा मिळे, तेव्हा मित्र ऊनामुळे खेळत नसत. आणि स्वरेशच्या घरी मित्र जात नसत कारण स्वरेशची आई कुठेलेतरी अभ्यासासंबंधी खेळ शिकवेल ह्याची भीती!. मग स्वरेश व्हिडीओ गेम खेळत बसे. पाच नंतर पुन्हा २ तास रियाज. मग जेवण आणि थोडावेळ कार्टून आणि मग झोपणे. झोपताना बाबा सीडी वर परत गाणी लावत. जेणेकरून दिवसभराची उजळणी होई.

सराव करून दीड महीना होवून गेला होता. मुंबईला दूसऱ्या फेरीचे आमंत्रण आले.     स्वरेशपेक्षा त्याच्या आईवडलांनाच जास्त टेन्शन आले होते. ऑडीशनच्या दिवशी तिघंजण मुंबईला रविन्द्र नाट्यमंदीरला सकाळीच पोचले. ३-४ तासांच्या प्रतिक्षेनंतर शेवटी स्वरेशची ऑडीशन झाली. इतक्या दिवसांच्या अथक प्रयत्नांना यश आले नाही तरच आश्चर्य. स्वरेशची ’छोटा सुरीला’ च्या नविन सेशन मध्ये निवड झाली! स्वरेशच्या आईबाबांचा आनंद गगनात मावेनासा झाला.

ऑडीशन नंतर तिघंजण ताज मध्ये जेवायला गेले. जेवताना स्वरेश सहजच बोलून गेला, “चला सुटलो एकदाचा. आता उद्यापासून मला रोज खेळायला मिळणार!” माधवरावांच्या घशातच घास अडकला. “स्वरेश, अरे आता जबाबदारी अजून वाढलीय. आता तू टिव्हीवर येणार. सगळेजण तुझा परफॉर्मन्स पहाणार. बाकीच्या तीस जणात टिकून फायनलला जायचं आहे. आता तर चॅनलवाल्यांच्या ट्युशन्स असतील. शिवाय टिव्हीवर बोलायचं कसं ते शिकवायला एक सर रोज येणार आहेत.” “काय?, म्हणजे अजून ट्युशन्स? बाबा, म्हणजे मला खेळायला मिळणार नाही ह्या सुट्टीत?”, स्वरेश रडवेला झाला होता. “अरे, उलट तुला नविन दोस्त मिळतील. मागच्या वेळच्या छोटा सुरीला मध्ये पाहीलस ना कशी सर्व स्पर्धकांची गट्टी जमली होती?”, आई समजूत घालू लागली. स्वरेश खाली मान घालून जेवू लागला.

मात्र त्या दिवशी जोश्यांनी अगदी जीवाची मुंबई केली. ताजचे जेवण काय, नरिमन पॉईंट पासून मरिन ड्राईव्ह पर्यंत घोड्याच्या बग्गीतून सैर काय, संध्याकाळी ईरॉस मध्ये अवतारचा थ्रीडी सिनेमा काय. स्वरेशची नुसती चंगळ चालली होती.

(क्रमश:)

कथा – खालचा ’सा’ भाग १

“अरे स्वरेश ऊठ, ६:३० वाजले, चल पटकन तयार हो, दूध पी आणि सायन्सची उजळ्णी कर” अंगावरचे पांघरण खसकन ओढत आई म्हणाली. “अगं झोपूदे ना जरा! काल रात्री उशीरा झोपलोय, बाबांनी ११ पर्यंत गाण्याचा रियाज करून घेतलाय. मला येतंय परिक्षेचं सगळं” स्वरेश कूस बदलून अजून झोपायचा निष्फळ प्रयत्न करू लागला. पण त्याच्या आईला हे सर्व बहाणे पाठ होते. “असं नको करू राजा, अरे आजचा शेवटचा पेपर मग सुट्टी चालू झाली की देईन हं झोपायला”. नाराजीने का होईना, पण स्वरेश उठला. यांन्त्रिकपणे प्रातर्विधी ऊरकून मुकाट अभ्यासाला बसला.

पाचवीतला स्वरेश शाळेतला एक हुशार मुलगा म्हणून त्याच्या शिक्षकांत प्रिय होता. शिवाय वयाच्या ६ व्या वर्षापासून गाण्याचे शास्त्रीय शिक्षण वडिलांकडून घेत असल्याने शाळेच्या कोठल्याही समारंभात स्वरेशला गायला नेहेमी बोलावणे असे. वडील माधवराव जोशी एका खासगी कंपनीत मोठ्या हुद्द्यावर. लहानपणापासून गाण्याचा शौक. पण परिस्थितीमुळे गाणं करायचं सोडून, नोकरीत अडकावं लागलं. पण गाण्याचा ध्यास सोडला नाही. पं. वामनशास्त्र्यांकडे गाण्याची शिकवणी होती. स्वरेश ३-४ वर्षांचा असताना वडिलांचा रियाझ ऐकता ऐकता ताल धरू लागला तेव्हाच माधवरावांनी ठरवलं की ह्याला गायक बनवायचा. आपण प्रसिद्ध गायक झालो नाही पण आता मुलाला प्रसिद्ध गायक बनवायचं. त्यासाठी कितीही मेहनत घ्यावी लागली तरी चालेल. नशिबानं आर्थिक परिस्थिती पण चांगली आहे. स्वरेशची आई, सौ संगिता (पूर्वाश्रमीची रेखा) ह्या कॉलेजात प्रोफेसर होत्या. त्यांचा स्वरेशच्या गाण्याला विरोध नव्हता, पण त्याचे अभ्यासात दुर्लक्ष होता कमा नये, पहिला नंबर चूकता कामा नये असा त्यांचा कटाक्ष असे. परिणामी, अभ्यास आणि संगीतसाधना अशा दोन धोंड्यांवर पाय ठेवायची कसरत चालू होती.

सायन्सचा पेपर अपेक्षेप्रमाणे सोपाच गेला. स्वरेश खुशीत होता. आईने केलेला आवडीचा शिरा खात असतानाच घराची बेल वाजली. स्वरेशचे मित्र त्याला पोहायला बोलवायला आले. स्वरेशचा चेहेराच फुलला. पाण्यात डुंबायला कोणत्या मुलाला आवडत नाही? स्वरेश पटकन शिरा संपवून पोहायचे कपडे आणायला जातोय तोच आई त्याच्या मित्रांना म्हणाली, “स्वरेश नाही येणार पोहायला. त्याला छोटा सुरीलाच्या स्पर्धेची तयारी करायची आहे. उगाच पोहून सर्दी वगैरे झाली तर चान्स जाईल न त्याचा.” “काकू अहो एकच दिवस येउदे ना त्याला. आम्ही जास्त वेळ नाही पोहणार. सगळेजण येतायत. फक्त स्वरेशच राहिलाय.”  मुलांचा प्रतिपक्ष मांडणे चालू होते. आता कोलेजच्या उनाड पोरांच्या हरकती कोळून प्यायलेल्या प्रोफेसरीण बाई त्या. ह्या चिमुरड्या मुलांना गप्प करणे म्हणजे किस झाड कि पत्ती! त्या म्हणाल्या, “असं कराना, त्यापेक्षा सगळे इकडेच या. मी तुम्हाला गुगल अर्थ वर नवीन नवीन जागा ओळखायचा गेम शिकवीन”. ह्यांचं बोलणं संपायचा अवकाश की सगळी जत्रा गुपचूप पसार झाली. स्वरेशचा चेहेराच पडला. “काय ग आई, एक दिवस सुद्धा पोहायला देत नाहीस तू. किती दिवसांनी मी जाणार होतो! आता त्यांचा सगळ्यांचा ग्रूप बनेल. क्रिकेटच्या टीम्स ठरतील आणि मी कशातच नसणार. म्हणजे मला मग अम्पायर किंवा काम्पौंडच्या बाहेरचा फिल्डर असलं काहीतरी बनवतील”. “अरे स्वरेश, तुला ‘छोटा सुरीला” मध्ये जायचंय. हजारोंनी मुलं येणार. त्यात सिलेक्शन व्हायला पाहिजे. तू एवढा छान गातोस. उगाच घसा बसला म्हणून चान्स घालवून चालेल का?” “अगं   पण ते मला टीम मध्ये…”, “घेतील ते टीम मध्ये पण. एकदा तू सिलेक्ट झालास ना की तू टीव्ही वर झळकणार. म्हणजे तू स्टारच होणार किनाई? मग? तुला हवी ती टीम देतील. हवंतर कॅप्टन बनवतील. बरं ते जाऊदे. आज आता अभ्यास नाहीये. तेव्हा बाबांनी खास तुझ्या साठी पं भीमसेन जोशींची सवाई गंधर्व मधली dvd आणली आहे. ती बघ. मी लाऊन देते.”

कुठून बाबांच्या रियाजाला लहानपणी ताल दिला असा विचार स्वरेशच्या मनात येऊन गेला. आईशी वाद घालण्यात काही अर्थ नाही हे तो पुरतं जाणून होता. तेव्हा गुपचूप त्याने dvd  लावली. मात्र भीमसेनजींचा सूर कानात गेले आणि मंत्रमुग्धपणे स्वरेश ते रेकॉर्डींग पाहू लागला.

(क्रमश:)

मिसळाख्यान

आजकालच्या पंचतारांकित हॉटेलांच्या जमान्यात अजूनही मला बाहेर खाण्याचा परमानंद मिळतो तो म्हणजे कुठल्यातरी चिंचोळ्या बोळात, ग्राहक म्हणजे कोणी राजा वगैरे नसून ह्या पृथ्वीतलावरचा एक तुच्छ किडा आहे अशी धारणा असणाऱ्या मालकाच्या कळकट टपरीत लाईनीत उभे राहून, आपला नंबर लागल्यावर पुढ्यात आदळून ठेवलेल्या प्लेट मधली झणझणीत मिसळ ओरपण्यात. तुम्हाला माहित आहे? एखाद्या हॉटेलमधील मिळणाऱ्या मिसळीचा झणझणीतपणा न खाता ओळखणे अगदी सोपे आहे. एक म्हणजे हॉटेल मधला कळकटपणा पाहावा, जितके कळकट हॉटेल तितकी तिखट मिसळ. आणि दुसरे म्हणजे हॉटेलातील पब्लिक. जर सडेफटिंग, विशी ते पन्नाशी मधली पुरुषमंडळी जास्त असतील तर मिसळ हमखास तिखट. कोलेज मधली जोडपी असतील तर मिसळ सणसणीत, पण थोडी सुसह्य. जर मध्यमवर्गीय जोडपी असतील तर थोडीशी तिखट. आणी जर पोरंबाळ असतील तर अश्या हॉटेल मध्ये मी तरी मिसळ खात नाही. कारण अशा ठिकाणी मिळणारी मिसळ ही म्हणजे एसेल वर्ल्डला जाऊन फक्त १० फूट उंचीच्या पाळण्यात बसून परत यायचं, किंवा मसाला दूध पिऊन भांगेच्या नशेची अपेक्षा करायची.

पुण्यात ह्या सर्व प्रकारच्या मिसळी मिळतात. मिसळीच्या तिखटपणाच्या चढत्या भाजणी नुसार काही नावे द्यायची, तर पहिला नंबर पोटोबाचा. पोटोबा नावाची हॉटेलची नवीन चेन आहे. ह्यांची हॉटेल्स कोथरूडला महात्मा सोसायटीजवळ आणि करिष्मा जवळ, आणि औंधला McDonalds च्या मागे अजून एक अशा तीन शाखा आहेत. पुण्याच्या “आमची कोठेही शाखा नाही” नियमाचा भंग करण्याचं धाडस करणारे मला वाटतं हे पहिले मराठी उद्योजक.  ह्यांच्याकडे सर्वच पदार्थ छान मिळतात. मिसळ सुद्धा सौम्य असली तरी चविष्ट. सहकुटुंब सहपरिवार खाता येईल अशी मिसळ. पण जसे ताकाला कछछी बियर म्हटले म्हणून ते चढत नाही, तशी ही मिसळ सणसणीत दणका देत नाही.

जर बायको किंवा (बायको नसल्याचे भाग्य असल्यास) मैत्रिणी बरोबर  थोडेसे खाद्यसाहस करायचे असेल तर खुशाल बेडेकर मध्ये जावे. बेडेकरांचे दुकान आहे लक्ष्मी रस्त्या जवळ मुन्जाबाचा बोळ आहे, तिकडे. गेली कित्येक वर्ष ह्यांचे दुकान आहे तसे आहे. नाही म्हणायला थोडी रंगरंगोटी आलीय. मालकांच्या तोंडावरचा नम्रभाव पुणेरी बाण्याला शोभत नाही. पण सदाशिवपेठी खडूसपणा नसला तरी मिसळ संपली हे सांगण्यात धन्य मानतात. पुणेरी उद्योजकांचे हे खास वैशिष्ट्य. एखादी गोष्ट आहे हे सांगण्यापेक्षा नाही हे सांगण्यात काय आनंद मिळतो ह्यांना. मुंबईच्या कामतांनी ह्यांच्या कडून  “नाही” म्हणायला शिकून घ्यावं. असो. मिसळीबरोबर जो रस्सा मिळतो त्याला इकडे सॅम्पल म्हणतात. गावात गेले की माझी इकडे एकदातरी वर्णी लागतेच.

बेडेकरच्या जवळच शानिपारापाशी आहे ते श्री उपहारगृह. नक्की जागा सांगता येत नाही, कारण त्याच भागात दोन तीन वेळा दुकानाची जागा बदलत आली आहे. मध्ये काही दिवस जरा चांगला गाळा होता, पण मी शेवटचा जेव्हा गेलो होतो तेव्हा एका बांधकाम चालू असलेल्या इमारतीच्या तळगृहात (basement) ह्यांचा थाट होता. जागा भारी गैरसोयीची. पण गर्दी कोण. लाईन लावून मिसळ खाल्ली होती. बाकी मी कोलेज मध्ये असताना मला ह्यांच्या बद्दल कळले होते. तेव्हा मित्राला पत्ता विचारला. मित्र पक्का पुणेरी. तेव्हा सरळ पत्ता थोडीच देतोय? मला म्हणाला, “शानिपारापाशी जा. इकडे तिकडे फिर. आणि एक जुनाट वाडा दिसेल. आणि अख्ख्या पुण्यात इकडेच अन्न मिळतं असं त्या वाड्यासमोरच्या गर्दी कडे पाहून तुला वाटेल. तेच श्री उपहारगृह. पाटी शोधायच्या भानगडीत पडू नकोस”. माझ्या ह्या भल्या मित्राचं वर्णन अगदी तंतोतंत जुळलं होतं. मागच्या खेपेला सुद्धा तीच परिस्थिती होती. मिसळ मात्र एकदम झणझणीत. मागे एकदा माझ्या मावशीच्या मिस्टरांना चुकून इकडे आणलं. बिचारे वयस्कर. कधी तिखट नं खाणारे. एक घास घेतला काय आणि आग आग झाली. शेवटी दही मागवून घेतलं आणि कशीबशी संपवली. मला काही बोलले नाहीत, पण नक्कीच चरफडले असणार. सध्या दोन मालकीणबाई दुकान चालवतात. ह्यांच्या चेहऱ्याकडे पाहिले की अस्सल सदाशिवपेठी दर्शन होते. तसा मी निगरगट्ट आहे, पण श्री मध्ये मिसळ खाताना ह्या मालकीणबाईंचा कटाक्ष आपल्यावर पडला की उगाच पैसे न देता मिसळ खातोय कि काय अशी अपराधी भावना मनात येते. असो. ह्यांची साबुदाणा खिचडी पण एकदम मस्तं.

जर श्री च्या मिसळीने आणि त्यांच्या मालकीणबाईंच्या कटाक्षाने सुद्धा पोटात आग पडत नसेल, तर गरवारे कॉलेजचा रस्ता पकडावा. गरवारे कॉलेजजवळ कर्वे रस्त्यावरच एक टपरी आहे. नाव काटा किरर्र! इतकी लहान टपरी आहे की शोधायला वेळ लागतो. ह्यांची मिसळ म्हणजे तिखट जाळ. एक दोन घासात जिभेच्या संवेदना नष्टं होतात. एकदम बधीर व्हायला होतं. आणि पचनशक्ती चांगली नसल्यास, अजून पण बरंच काही बधीर होतं. ह्या तिखटाची अगदी नशा चढते. आणि टपरीची एकूण (अ)स्वच्छता पाहून मी इकडे कोणतेही पेय घेत नाही. तेव्हा मिसळ संपेपर्यंत सर्वांगाला घाम फुटतो. इकडून मिसळ खाऊन शेजारच्या रसवंती मधून उसाचा रस प्यायचा असा माझा क्रम.

बरं माझ्यासारखे काही अतिरेकी खवय्ये, ज्यांना ह्याहूनही तिखट हवे असेल तर त्यांनी चिंचवडच्या गांधी पेठेत, मशिदी समोरच्या गल्लीत नेवले ह्यांच्या उपहारगृहात जावं. ह्यांची  मिसळ इतकी तिखट की मी  त्या दुकानात शिरलो की नुसत्या घमघमाटाने माझ्या डोक्याला घाम येतो. एक इकडलीच मिसळ अशी आहे की मला सोबत लस्सी वगैरे पेयांचा आधार घ्यावा लागतो. (आत्ता ह्या मिसळीचा नुसता उल्लेख करून सुद्धा डोक्याला घाम सुटला म्हणजे विचार करा!)

बाकी अजून मंडई च्या जवळची श्रीकृष्ण भुवनची आणि टिळक रोड च्या रामनाथची मिसळ अजून चाखली नाही. ह्या शिवाय कोल्हापूरची देवीच्या देवळासमोर अलंकार ची मिसळ (आणि गोडाचा शिरा), कोल्हापुरलाच हॉटेल ओपलची मिसळ आणि मुंबईला गिरगावात विनय हेल्थ होमची  मिसळ (आणि पियुष) आवर्जून उल्लेखनीय.

बास, एव्हढं मिसळाख्यान झालं की उद्या गावात जाऊन मिसळ खालीच पाहिजे!

लग्नाला जातो मी!

खरं सांगायचं तर कोणाच्या लग्नाचे आमंत्रण म्हणजे माझ्या पोटात गोळा येतो. अहो आहेराच्या कल्पनेने नाही हो, पण लग्नाला जायचे म्हणजे एक तर चांगले चुंगले कपडे शोधून घालायचे, आधी वधु वराना भेटायला लागलेल्या लांबलचक लाईनीतउभे राहायचे आणि मग बुफेला उडालेल्या झुंबडीतून  ताट वाट्या सांभाळत वाट काढत जेवण वाढून घ्यायचे आणि घोड्यासारखे उभ्याने जेवायचे.  सर्व गोष्टी आठवल्या की वाटते एकवेळ पोस्टाने आहेर पाठवणे परवडले, पण ते लग्नाला जाणे नको. पण काय करणार, “जनरीत”  म्हणून जावे  तर लागतेच.

तेव्हा लग्न कोणाचे त्यावरून त्याची सुसह्यता मी ठरवतो. म्हणजे अगदी घरातील जवळच्या पैकी कोणाचे लग्न असेल तर जास्त सुसह्य. त्यातल्या त्यात वधुवरांना भेटायला जाण्याचे श्रम वाचतात.  आणि घरचेच कार्य त्यामुळे वातावरण पूर्णपणे ओळखीचेच असते. मात्र, जेवणाची आबाळ! शेवटच्याच पंगतीला जेवायला मिळते. खुपदा अशा लग्नात माझ्या मनात विचार येतो की जरा बाहेर सटकून मिसळ वगैरे चापून यावे. माझ्याच लग्नाची एक गोष्ट सांगतो. विधी वगैरे आटपून आम्हाला स्टेज वर उभे केले. भेटायला येणाऱ्या असंख्य लोकातील काही “जेवण छानच हो. बासुंदी खूपच छान” असे सांगत होते. आता इकडे २ च्या पुढे वाजून गेले होते. पोटात आगीचा डोंब. आणि गुरुजी अजून विधी बाकी आहेत असे दटावत होते. आणि लोक सांगतायत बासुंदी छान आहे. चायनीज टॉर्चर ह्यालाच म्हणतात का कोण जाणे. असो.

आता बायकोच्या आते, मामे , मावस  नातेवाईकाचे कार्य असेल तर मात्र सुसह्यता सोडा, असहायताच जास्त. एक तर ह्या नातेवाईकांचा एवढा परिचय नसतो. आणि पटकन कोणीतरी “ओळखलत ना!”  अशी गुगली टाकतं. आणि नेमकी अशाच वेळी बायको कोणतरी दूरची बहिण १५ वर्षानी आत्ता भेटली म्हणून तिच्याशी गप्पा मारण्यात कोठेतरी गुंग! आता १५ वर्षानंतर पहिल्यांदा भेटल्यावर गप्पांना विषय कसे मिळतात कोण जाणे. बऱ्याचदा हे विषय आपापले नवरे काय करतात (म्हणजे नोकरीत) आणि मुलं किती हुशार आहेत हे एकमेकीना कळण्या पुरतेच मर्यादित असतात. फारतर केव्हढी बदलीस तू (म्हणजे जाडी झालीस) हा संवाद. आता अशा लग्नात मला एक चांगलासा कोपरा शोधून बायकोची पर्स, पिशव्या वगैरे सांभाळत बसण्या व्यतिरिक्त फारशी भूमिका नसते. बर आणि ज्याचं लग्न असतं ती व्यक्ती मला विशेष ओळखत पण नसते. पण ह्यांच्या आई वडलांकडून अगदी आग्रहाचं निमंत्रण असतं. त्यामुळे जावच लागतं! अशा लग्नात पंगतीत किंवा बुफेच्या लाईनीत मी सर्वात पुढे असतो. आणि हातावर पाणी पडताच यजमानांना “जेवण छान होतं!” असं सांगून बायकोने काढता पाय घेण्याची वाट पाहत गाडीत बसतो.

माझ्याच आते, मामे , मावस  नात्यात लग्न असेल तर वेगळीच आफत. फक्त अशा कार्यात किंवा कोणा मयताला सोडून बाकी कधीही  नं भेटणाऱ्या दूरच्या नातेवाईक मंडळींशी गाठ पडते. त्यात सिनिअर मंडळी असतील तर  “लहान पणी किती अशक्त होता आणि आता कसे पोट पुढे आलेय”  किंवा “काय रे वडलांच्या डोक्यावर अजून केस आहेत आणि तुझे गेले?” असले काहीतरी  ऐकायचे. त्यातल्या त्यात लहान, म्हणजे प्रौढ असतील तर “अरे तुझ्या कंपनीत माझ्या मुलाला नोकरी मिळतेय का बघ ना! तुझा इमेल दे. मी त्याला ईमेल टाकायला सांगतो” असले काहीतरी. एकदा एका गृहस्थांनी कहरच केला. म्हणाले, “माझ्या मुलाचं अभ्यासात लक्षं नसतं. फार कमी मार्क. तुझ्यासारखाच कॉम्पुटर इंजिनिअर बनवणार आहे”. आता मी काही स्कॉलर वगैरे नव्हतो पण म्हणून हे असं काहीतरी ऐकून घ्यायचं होय? पण अशा प्रकारची मंडळी माझ्यावर एक उपकार करतात बुवा. माझ्या डोक्यात उगाच आपण कर्तुत्ववान आहोत अशी काही हवा जाऊन देत नाहीत. असो.

त्यातल्या त्यात सुसह्य लग्नं म्हणजे ऑफिस मधील कुणाचे तरी किंवा सोसायटीतील कुणाचे तरी. अशा लग्नात एक तर आपल्या सारखेच लग्नघराशी नाते नसलेले  आणि आपल्या नेहमीच्या परिचयाचे लोक असतात. तेव्हा हॉल वर कुठेतरी कोपऱ्यात कोंडाळं करून गप्पांचा फड रंगतो. अगदी वधूवरांना भेटायला गर्दी कमी होईपर्यंत आरामात वाट पाहता येते. ग्रूप मधलाच एखादा उत्साही मेनू काय आहे आणि काय घ्यावे आणि काय टाळावे ह्याची यादी आणतो, त्यामुळे  बुफे मधला वेळ कमी होतो. आणि एकूणच  वेळ मजेत जातो.