भीमाशंकर


भीमाशंकर बद्दल बऱ्याच जणांकडून ऐकलं होतं पण कधी जाण्याचा योग आला नव्हता. आमच्या ऑफिसमधील एक सहकारी नुकताच जाऊन आला होता. त्याने केलेलं वर्णन ऐकल्यापासून भीमाशंकरला कधी एकदा जातोय असं झालं होतं. पण गाडी न काढता सायकलने जायचा बेत होता. पुण्यापासुन भीमाशंकर १०० किमी आहे. शनिवारी निघून रविवारी परत यायचे. जाऊन येऊन २०० किमी. पूर्वी अनेकदा शतकी सायकल सफरी केल्यामुळे आवाक्यातली ट्रिप वाटत होती.

आता इतकं लांब जायचं तर सोबत शोधायला हवी. एकट्याला घरातून सोडणार नाहीत. माझ्या इतर सायकल मित्राना मेसेजेस टाकले. पहिल्या खेपेला कोणीच तयार नव्हते म्हणून बेत रद्द करायला लागला. पण २ आठवड्याने परत सायकलमित्रांचा पिच्छा पुरवायला सुरुवात केली. एकजण तयार झाला.पण त्याच्याकडे रोड बाईक होती. त्यामुळे सामान न्यायला सपोर्ट व्हेकल घ्यावी का असा प्रश्न होता. पण मला सपोर्ट व्हेकलची कल्पना काही रुचली नाही. कारण बरोबर गाडी आहे म्हटलं कि मग सायकलिंग पूर्ण न करता शेवटचे काही किमी गाडीतून जायचा मोह होतो. शेवटी रस्ता रोड बाईक योग्य नसला तर काय घ्या! म्हणून त्याला बेत रद्द करायला लागला. त्याची शंका रास्तच होती.

आता मी एकटाच उरलो होतो. पण आता माघार नाही. वीर सावरकरांनी नाहीतरी म्हटलंच आहे, “आलात तर तुमच्याबरोबर नाहीतर तुमच्या विना”. तेव्हा म्हटलं आता एकला चालो रे. काय होईल ते शंभो महादेव पाहून घेईल.

शनिवारी सकाळी ६ वाजता सायकलवर टांग मारली आणि सफर सुरु झाली. बरोबर कपडे, सायकल दुरुस्त करावी लागली तर लागणारी जुजबी हत्यारं, जास्तीची ट्यूब, पंक्चर पॅच, २ लिटर पाणी, खजूर, केळी, हेड टॉर्च आणि महत्त्वाचं म्हणजे गोप्रो कॅमेरा अशी जय्यत तयारी केली होती.

भीमाशंकरचा रस्ता तीन टप्प्यात आहे. आधी नाशिक हायवे, मग राजगुरूनगर ते शिरगाव फाटा असा चास कमान धरणाच्या कडे कडेने जाणारा रस्ता आणि पुढे मग घाट रस्ता. नाशिक हायवे तसा सरळ सोट आहे. शिवाय रस्ता खड्डे विरहित. हे म्हणजे मोठी चैनच. पण रहदारी प्रचंड. काळा धूर ओकणारे ट्रक आणि टमटम, बिनदिक्कत उलट दिशेने येणारे दुचाकी स्वार आणि विशेषतः काळ्या काचा असलेल्या पांढऱ्या गाड्या उडवणारे आधुनिक मावळे यांचा फार त्रास. हे आधुनिक मावळे जणू काही आपण अमेरिकेत किंवा यूरोपात गाडी चालवतोय अशा थाटात रस्त्याच्या उजव्या बाजूने गाडी चालवत असतात आणि वर आपल्याकडेच त्यांच्या मध्ये आल्यामुळे रागावून बघतात. ह्यांना खरंच जर यूरोपात किंवा अमेरिकेत धाडलं तर तिकडे यांचा देशाभिमान जागृत व्हायचा आणि तिकडे रस्त्याच्या डाव्या बाजूने गाडी चालवायचे. मूर्ख लेकाचे. असो.

तर पहिला ३५ किमीचा प्रवास तसा छान झाला. आता पोटात कावळे कोकलू लागले होते. राजगुरूनगरच्या जवळ मिसळ आणि चहाचा कार्यक्रम झाला. मिसळीत मटकी हात न आखडता घातली होती. सोबत काकडीचा आणि टोमॅटोचा एक एक तुकडा, दही वाटी आणि चक्क जिलेबी होती. मजा आया. न्याहरीनंतर राजगुरूनगरवरून भीमाशंकरचा फाटा घेतला. राजगुरूनगर मागे पडलं आणि चित्र एकदम पालटलं. दोन्ही बाजूला हिरवीगार शेतं, नुकत्याच पडलेल्या पावसामुळे स्वछ झालेला, चकाकणारा रस्ता आणि समोर सह्याद्रीचे उत्तुंग डोंगर. शेतांतून नुकत्याच पेरलेल्या भाताच्या रोपांचा घमघमाट सुटला होता. रिपरिप पाऊस पडत होता. मस्त वातावरण होतं. मधेच पावसाची जोराची सर आली. एका चिंचेच्या झाडाचा आडोसा घेऊन सायकल लावली आणि सोबतचं एक केळं खाल्लं पावसाचा जोर कमी झाल्यावर पुढे निघालो.

हा रस्ता धरणाच्या कडेकडेने जातो. त्यामुळे सारखे चढ उतार आहेत. एक लय पकडता येत नाही. जरा थोडा उतार लागतोय न लागतोय तोच मोठा चढ. गिअर बदलताना मोठी तारांबळ उडते. त्यात पेडल मारताना जरा जास्तच श्रम पडत होते. म्हणून मग उतरून जरा तपासणी केली तर लक्षात आलं कि मागचं चाक ब्रेकला घासत होतं. थोडीफार खाडखूड करूनही काही फायदा नव्हता. मग ब्रेक जरा सैल केले. नाहीतरी आज चढच असणार होता. ह्याचा फायदा झाला व सायकल ने बरा वेग पकडला. एव्हाना १० वाजून गेले असावेत. पुण्यावरून महागड्या बाइक्सचे ताफे च्या ताफे गडगडत जात होते. अधून मधून काही छपरी पोरं पण एक एका बाईक वर तिघे अशी उगाच हुल्लडबाजी करत चालली होती. कुठे थोडी पाण्याची धार जरी  दिसली कि थांबून सेल्फी घेण्याचा कार्यक्रम चालू होता. मधेच एक छान धबधबा लागला. पण तिकडची गर्दी पाहून न थांबता पुढे निघालो. वाटेत एके ठिकाणी चहा घेतला. अशा वातावरणात शांत बसून गरमागरम चहाचे भुरके घेण्यासारखं सुख नाही.

साधारण १२च्या सुमारास शिरगाव फाट्यापाशी पोचलो. आता घाट सुरु होणार होता. पाऊस मुसळधार होता. थांबून परत एक चहा मारला आणि उगाच स्थानिक लोकांकडे घाट कसा आहे वगैरे चौकशी केली. मला एक वाईट खोड आहे. घाट चढायचं म्हटलं कि उगाच दहा जणांना चढ कसा आहे म्हणून विचारत बसायचं. तरी माहित आहे, दहाजणांची दहा उत्तरं. मग त्यातल्या त्यात आपल्याला सोयीचं वाटेल ते उत्तर घ्यायचं. तर मला गाववाल्याने सांगितलं कि २ अडीच किमी चढ मग सपाट. चढावर सायकल ढकलून न्यावी लागेल. म्हटलं ठीक आहे.

खालचे गिअर टाकून चढ चढायला सुरुवात केली. पहिला कठीण चढ गेल्यावर हलकासा उतार आणि मग सपाट रस्ता आला. घाट चढताना उतार आला कि मला जाम वैताग येतो. कारण जेवढा उतार तेवढा अधिक नंतर चढ वाढतो. असो. थोडा सपाट रस्ता गेल्यावर मात्र एका वळणावर चढ अचानक तीव्र झाला. इतका कि एका गाडीने चक्क श्वास सोडला. बहुधा ड्रायवरचा गिअरचा अंदाज चुकला होता. त्याच्या मागून मी धापा टाकत पेडल मारत निघालो होतो. काही केल्या सायकल हाताने ढकलायची नाही असा मी निश्चय केला होता. वळण पार केल्यावर श्वास घेण्यासाठी थांबलो. समोर विहंगम दृश्य होतं. पाण्याने भरलेली भातशेती, डोंगरावरून वाहणारे धबधबे आणि दूरवर बसलेली हिरवाई. सोबतचे एक केळे फस्त केले आणि परत सायकलवर टांग मारली. चढ काही संपता संपत नव्हता. वाटेत गुराखी भेटला. विचारलं अजून किती आहे चढ (जुनी खोड!) तर म्हणे हा काय संपलाच. मला विचारलंन कुठनं आलात. म्हटलं पुण्यावरून. तर कपाळावर हात मारून म्हणे पुण्यावरून सायकलवर यायचं काय खूळ. एसटी येते की. आता काय उत्तर देणार ह्याला? निघालो.

गुराख्याने चढाबद्दल ठोकूनच दिलं होतं. थोडा पुढे गेलो तर अजून एक तीव्र चढ. वरून धो धो पाऊस. रस्ता संपतोय कि नाही अशी परिस्थिती. हाच तो क्षण असतो कि जेव्हा मनात येतं कशाला झाक मारली आणि आलो इतक्या लांब. अशा वेळी जर सपोर्ट व्हेकल असतं तर सायकल सोडून गाडीत बसायची अनावर इच्छा झाली असती. तानाजी पडल्यावर सूर्याजीने गडाचे दोर कसे कापले आणि मावळ्यांसमोर लढण्याशिवाय दुसरा पर्याय कसा उरला नव्हता त्या प्रसंगाची उगाच आठवण झाली. थोडं गरगरल्यासारखंपण वाटत होतं. अतिश्रमाचा परिणाम. मग मी माझे रामबाण अस्त्र म्हणजे खजूर काढले. ३-४ खजूर खाऊन पाणी प्यायलो आणि ताजा तवाना होऊन पुढे कूच करू लागलो. पण आता नवीन समस्या पुढे ठाकली. असा सोसाट्याचा वारा सुरु झाला कि जणू काही मला पुढे जाण्यापासून थोपवत होता. म्हणजे मी पेडल मारतोय पण सायकल तसूभरपण पुढे जात नाही अशी परिस्थिती. कसा बसा मी सायकल चक्क रेटत होतो.

जवळपास अर्धा तासभर वारा, चढ आणि मुसळधार पाऊस यांना झेलत मी कसाबसा तो चढ पार पाडला आणि तळेघर गावापाशी पोचलो. एव्हाना २ वाजून गेले होते. खजुराचा असर संपला होता. प्रचंड भूक लागली होती. तळेघरला वडापावशिवाय दुसरे काही नव्हते. पावसात तशीच सायकल पुढे दामटली. म्हटलं पुढे नीट जेवण मिळेल. पण छया! पुढे एकही दुकान दिसत नव्हते. देऊळ अजून १२ किमीवर. वारा तर अजून मला हाकलायलाच बसला होता जणू काही. तळेघरलाच थांबायला हवं होतं. पण तशीच सायकल रेटत राहिलो. घाटातल्या सारखा तीव्र नसला तरी अजून चढ होताच. एक ढाबा दिसला. पण फक्त चहा मिळत होता. विचारलं जेवण कुठे मिळेल तर म्हणे अजून ३ किमी. मग काय, मारा पेडल. बरोब्बर तीन किमीवर नटराज हॉटेल दिसलं तडक हॉटेलाच्या आवारात शिरलो. नखशिखांत भिजलो होतो. कोण हे ध्यान आलंय असं सगळेजण माझ्याकडे पहात होते. पण कोणाची पर्वा न करता एक टेबल गाठून जेवण मागवलं आणि भरपेट जेवलो.

जेऊन उरलेले ९ किमी अंतर कापून देऊळ गाठायचा बेत होता. पण भिजल्यामुळे अंगात थंडी भरली. पाऊस तर तुफान लागलेला. त्यात तो घोंघावणारा वारा. हॉटेलची उबदार जागा सोडवेना. शेवटी पुढे जायचा प्लान रद्द करून तिकडेच रूम घेतली व कपडे बदलून मस्त पांघरूण घेऊन ताणून दिली.

झोपून उठेस्तोवर संध्याकाळचे ५ वाजून गेले होते. पाऊस काही थांबायची लक्षणं नव्हती. मोबाईलला रेंज नाही आणि रूमवर टीव्ही नाही. हे एक प्रकारे चांगलच होतं. रेस्टॉरंट मध्ये जाऊन मस्त गरम चहा मागवला आणि व्हरांड्यात नुसता पाऊस न्याहाळत चहाचे गरम घुटके घेत उभा राहिलो. मजा आली. चहाचं बिल द्यायला काऊंटर वर गेलो तर मॅनेजरची प्रश्नाची सरबत्ती. कुठून आलात, किती वाजता निघालात, तुमचं वय काय, एकटेच का, सायकलचे पैसे किती, घाटात पण सायकल चालवली का वगैरे वगैरे. वेटर लोक पण जमा झालेले. उगाच सेलिब्रिटी असल्यासारखं भासून गेलं. चहाचे पैसे काढले तर मॅनेजर नको म्हणाला. मनात म्हटलं जेवणाचे पण पैसे घेणार नसशील तर अजून १०० प्रश्नांची उत्तरं देऊ. असो.

जेवणाच्या वेळेपर्यंतचा वेळ मोबाईलमधले कचरा फोटो, विडीओ वगैरे डिलीट मारून अक्षरशः सत्कारणी लावला. उगाच वाटून गेलं जेव्हा मोबाईल नव्हते तेव्हा कसा काय वेळ घालवला असता? अंगावर शहारा येऊन गेला आणि आपलं डिलीटच सत्कर्म पुढे चालू ठेवलं. रात्री ९ वाजेपर्यंत २ जीबी जागा रिकामी झाली.

रात्रीचं जेवल्यावर मस्त किशोर कुमारची गाणी ऐकत कधी झोप लागली ते कळलंच नाही.

पाऊस आणि वारा रात्रभर थैमान घालत होते. सकाळी ५:३० वाजता उठलो तरी पाऊस चालूच. अशा पावसात उरलेले ९ किमी जाऊन देऊळ पाहून परत फिरायचं तर घरी पोचायला उशीर व्हायचा. म्हणून देवळाचा प्लान कँन्सल करून सरळ परतीच्या वाटेवर लागलो. महादेवाला मला भेटायची इच्छा नसावी बहुतेक.

उतारावरून विनासायास जाताना आदल्या दिवसाचे परिश्रम आठवले. पण एका दिवसात बराच बदल झाला होता. पाऊस इतका प्रचंड झाला होता कि आजूबाजूच्या डोंगरांवरून धबधबे कोसळायला लागले होते. पूर्ण आसमंत पावसात पार न्हाऊन निघाला होता. अजून रहदारी सुरु झाली नव्हती. एका ठिकाणी थांबून डोळे भरून सृष्टी सौंदर्य पाहून घेतलं. “याच साठी केला होता अट्टाहास” असा फील आला. जो घाट चढायला १:३० तास लागला, तोच घाट १५-२० मिनिटात उतरून शिरगावला पोचलो.

पुढचा प्रवास मात्र वाटलं तितका सोपा नव्हता. सारखे चढ उतार. त्यात सायकल कुरकुरायला लागली. पुढच्या मडगार्डचा एक नट पडल्याने ते डुगडूगायला लागलं. गिअर शिफ्टिंगचं पण काहीतरी बिनसलं. त्यात मागच्या चाकानं पुन्हा ब्रेकशी सलगी करायला सुरुवात झाली. पुण्यापर्यंत धडधाकट जातेय कि नाही अशी शंका. पण सायकलीने दगा दिला नाही. जेवणाच्या वेळेत घरी व्यवस्थित पोचवलं.

शंकराने देवळात दर्शन भले दिलं नसेल. पण त्या पावसाचा रुद्रावतार, ते कोसळणारे असंख्य धबधबे, तो मस्तवाल वारा यांच्या माध्यमातून जणू आपल्या तांडवाची झलकच  मला दाखवली असा विचार मनात येऊन गेला.

खाली या सफरीची छोटीशी क्लिप दिली आहे. न जाणो माझं हे वर्णन वाचून कोणा एकाला तरी सायकलवर टांग मारायची स्फूर्ती आली तर!

 

7 thoughts on “भीमाशंकर”

  1. Life time experience!!!
    विशेषतः एवढा थकवा आल्यावर हॉटेलात उबदार रूम मध्ये बसून धो-धो पडणारा पाऊस न्याहाळत गरम गरम चहाचे घुटके मारायची मजा औरच….

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: