काचेच्या भिंती


जगातील सर्वात अधिक गृहीत धरला गेलेला कोणता वर्ग असेल तर मध्यम वर्ग. मग ते भांडवलशाही राष्ट्र असो कि समाजवादी. तसं म्हटलं तर मध्यमवर्गीय समुदाय हा बऱ्यापैकी मोठा. पण विस्कळीत. ह्या वर्गातील लोक खाऊन पिऊन सुखी म्हणायला हरकत नाही. दोन वेळचं जेवण, राहायला छोटंसं का होईना – एक घर. अशा मूलभूत गरजा पूर्ण झालेल्या. त्यामुळे आपण बरं आणि आपलं काम बरं अशी वृत्ती. साहजिकच एकजूट वगैरे भानगड नाही. तेव्हा अशा समाजाला गुंडाळून ठेवून आपली पोळी भाजायला बाकीचे मोकळे. मध्यमवर्गाने देखील ही  परिस्थिती स्वीकारून घेतली आहे. त्याचीच प्रचिती मग निवडणूकीत असहभाग, कोर्ट कचेरी कडे पाठ अशा गोष्टीतून दिसून येते. आपल्याला मत असतं ही गोष्टच हा वर्ग विसरत चालला आहे कि काय अशी कधीतरी शंका येते.

आता मात्र मध्यमवर्गाला गंभीरपणे घेतला जातंय. राजकारणी लोकांकडून नव्हे तर उद्योगधन्द्यांकडून. वाढत्या मध्यमवर्गाबरोबर वाढणारी क्रयशक्ति उद्योगधंद्यांना खुणावतेय आणि त्याचीच परिणिती ग्राहकांसाठी आकर्षक योजना, स्वस्त हप्ते, एका गोष्टी वर एक गोष्ट फुकट अशा सवलतीत होते. पूर्वीची “घ्यायचं तर घ्या नाहीतर फुटा” संस्कृती हळूहळू विरत जाऊन नवीन रिटेल क्रांतीमध्ये ग्राहक खरोखरच राजा होतोय कि काय असे वाटून मध्यम वर्ग भलताच हुरळून जाऊ लागला आहे.

आता परवाचच उदाहरण घ्या ना! रिलायंस मार्ट मध्ये खरेदीला गेलो होतो. बिल करताना कॅशकाऊंटर वाला म्हणाला, “रिलायंस कस्टमर कार्ड निकालो तो उसपे पाँईंट मिलेंगे”. म्हटलं “नकोत” तर कसे पैसे कसे वाचतील ते सांगत बसला. वा! म्हणजे माझ्या पैशाची किती काळजी! ह्या धंदेवाल्यांना (वाचताना हा शब्द जेवढ्या कुत्सित पणे म्हणाल तितके तुम्ही खरे मध्यमवर्गीय!) एवढा का बुवा आपला पुळका? पण ह्या धंदेवाल्यांना नफ्याचा बरोब्बर वास लागतो. ग्राहकाला कस्टमर कार्ड देवून त्याच्या दरवेळच्या खरेदीची नोंद ठेवायची. त्यातून त्यांच्या आवडीनिवडी जाणून घ्यायच्या. ग्राहक भविष्यात काय खरेदी करतोय किंवा कोणत्या नवीन गोष्टी ग्राहकाला भुरळ पाडतील ह्याचे आडाखे बांधायचे आणि तदनुसार ग्राहकाला जाहिराती / कुपने पाठवायची. थोडक्यात ग्राहकाच्या खिशात किती खोलवर हात घालायचा हाच उद्देश.

आता तुम्ही म्हणाल ह्याची मध्यमवर्गीय विचारसरणी काही बदलत नाही. चांगली ग्राहकोपयोगी प्रगती होतोय आणि ह्याचा सूर मात्र नकारात्मक. प्रश्न नुसता खिशात खोल हात घालायचा असता तर ठीक. पण इकडे हे व्यवसाय आपल्या ग्राहकाबद्दल, इतकी माहिती गोळा करू लागले आहेत कि त्यांचा हात आपल्या खिशात आणि डोकं व्यक्तिगत आयुष्यात अशी परिस्थिती आहे. कल्पना करा. तुम्ही एक दोन वेळा रिलायंसमार्ट मधून इसबगोल घेतलंत म्हणून रिलायंसमार्ट च्या डेटाबेस मध्ये तुमच्या नावापुढे “बद्धकोष्ठ” असा शेरा गेलाय.

अतिशयोक्ती वाटते? एक घडलेली घटना सांगतो. अमेरिकेत टार्गेट नावाची रिटेल चेन आहे. “डेटा मायनिंग” च्या गोंडस नावाखाली ग्राहकांची माहिती गोळा करून त्याचे विश्लेषण करायचा घाट त्यांनी घातला. ग्राहकांना दिलेल्या कस्टमर कार्डाद्वारे ग्राहकांच्या खरेदीची माहिती त्यांच्या सवयी वगैरेची नोंद ठेवली जाऊन नंतर त्याचे संख्याशास्त्राच्या नियमानुसार संगणकाद्वारे विश्लेषण केले. मग त्यातून शास्त्रीयदृष्ट्या आडाखे बांधले. ग्राहकांच्या सवयीतून काही ठोक आडाखे टार्गेटच्या तंत्रज्ञाना आढळले. उदाहरणार्थ, त्याना असे आढळले कि गर्भधारणा झाल्यावर स्त्रियांच्या खरेदीत लक्षणीय बदल होतात. पूरक जीवनसत्वे, पोषक भाज्या अशा गोष्टींची खरेदी वाढू लागते. जसजशी प्रसूतीची तारीख जवळ येते तसे खरेदी केलेल्या कपड्यांची मापे बदलतात. ह्या माहितीचे इतके विश्लेषण केले होते कि टार्गेटचे संगणक प्रोग्राम्स स्त्री ग्राहकाच्या प्रसूतीची तारीख १-२ आठवड्यांच्या फरकात सांगू लागले. मग एखाद्या स्त्री ग्राहकाचा जस जसा प्रसूतीचा दिवस जवळ येईल तसे टार्गेट डायपर बेबी लोशन वगैरेची कुपने पोस्टाने पाठवू लागले. एकदा टार्गेटच्या एका दुकानात एक मनुष्य भांडायला आला. टार्गेटने त्याच्या १९ वर्षाच्या मुलीच्या नावाने डायपरची कुपने पाठवली होती. तेव्हा आपल्या मुलीचे आई होण्याचे वय आहे काय? तिला डायपरची कुपने का पाठवली अशी त्याची तक्रार होती. व्यवस्थापकाने त्याची माफी मागून पुन्हा अशी चूक होणार नाही अशी ग्वाही दिली.  काही दिवसांनी सदर इसमाला फोन करून आपल्या तक्रारीचे निवारण झाले कि नाही असा फोन केला. तेव्हा तो मनुष्य म्हणाला, कि टार्गेटची काही चूक नाही. आपल्या मुलीचे प्रताप ह्यालाच माहित नव्हते. ती खरोखरच गरोदर होती. आता बोला! (मूळ बातमी येथे वाचा)

ग्राहकाला अत्त्युच्च सेवा देण्याच्या नावाखाली त्याच्या व्यक्तिगत माहितीचे इतके संकलन केले जात आहे कि आपल्याला प्रायव्हसी राहणार कि नाही असा प्रश्न पडला आहे. जरा फेसबुकच्या पानाच्या उजवीकडे जाहिरात लक्ष देऊन पहा. मध्ये माझ्या फेसबुक अपडेट मध्ये मी एक दोन वेळा वाईनचा उल्लेख केला तर मला वाईन , बीअरच्या जाहिराती दिसू लागल्या. गुगलवर काही सर्च करायला गेले कि गुगल हजरजबाबीपणे आपले पूर्वीचे सर्च दाखवते. मध्ये जीमेलवरून माझ्या सीएला मेल पाठवली तर मला करबचत योजनेच्या जाहिराती दिसू लागल्या. मी महिन्याच्या सुट्टीचे बुकिंग केले तर विमानप्रवासाच्या जाहिराती.

उघड्या दारांच्या चाळींतून बंद दरवाज्यांच्या ब्लॉक मध्ये जाताना आपल्या घरांच्या भिंती काचेच्या कधी झाल्या हे आपल्याला कळलेलेच नाही. आधुनिक सोयी सुविधांच्या बदली आपण आपली एवढी माहिती खुली करत आहोत कि त्याचे भविष्यात काय विपरीत परिणाम होणार आहेत कोणास ठाऊक. पुढच्या लेखात ह्या काचेच्या भिंतींमध्ये आपली प्रायव्हसी कशी जपायची ह्याचा परामर्श घेऊ. तूर्तास रिलायंस मधून इसबगोलची खरेदी करायची नाही एव्हढे पथ्य पाळायचे. काय?

Advertisements

10 thoughts on “काचेच्या भिंती”

  1. धन्यवाद प्रविण, महेंद्र, नितीन, धनश्री आणि विद्याधर!

   महेंद्र, गुगल शिवाय जगणे मुश्किल आहे, पण ह्या बदलत्या समिकरणात कसे जुळवून घ्यायचे ते नक्की शिकायला हवे
   नितीन, बरोबर बोललास.. पुढचा लेख ह्या बदलांचा आपल्यावर वाईट परीणाम होऊ नये म्हणून काय करावे त्यावर लिहितो आहे
   विद्याधर, वर्षभर ब्ल़ाँगविश्ब विशेष पाहीलेच नाही.. फेसबुकाचा परीणाम 🙂 महेंद्रंचा पुश कामी आला …

 1. आता तर गुगल शिवाय जगायची सवय लावून घ्यायला हवी. माहिती आणि तंत्रज्ञानाचा विस्फोट कसा काय रोखता येइल, किंवा त्याच्या व्यापारी वापरावर कशी बंदी घालता येईल हा कायदा येईल लवकरच…

 2. समर्पक शीर्षक !
  सध्याच्या बाजारपेठीय जीवन शैली आणि अत्याधुनिक तंत्रज्ञाचे मदतीने सामन्यांच्या आयुष्यावर होणाऱ्या प्रभावाचे उत्तम वर्णन लेखामध्ये उमटले आहे.
  गुगल वर काही search केले कि काहीवेळातच तुमच्या कॉम्पुटर स्क्रीन वर त्या search शी संबधित जाहिराती झळकायला लागतात हा अनुभव तर आता काही नवीन राहिलेला नाही उलट तो आपल्या सवयीचा झाला आहे.
  या अत्याधुनिक तंत्राचा आपल्या फायद्या साठी आपण कसा उपयोग करून घ्यायचा हा “व्यापारी दृष्टीकोण” प्रत्येकाने ठेवायला हवा !!

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s