चित्रपट – बालगंधर्व


नुकताच बालगंधर्व चित्रपट प्रसिद्ध झाला. वर्तमान पत्रात संमिश्र समीक्षाही आल्या. पण पेपरातल्या ह्या समीक्षा म्हणजे चित्रपट शास्त्राचा किस काढल्या सारखे वाटते. म्हणून म्हटले एका सामान्य प्रेक्षकाच्या नजरेतून ह्या चित्रपटाविषयी लिहावे. नाहीतरी बालगंधर्वांची  कलासेवा ही  “मायबाप” प्रेक्षकांनाच अर्पिली होती. तेव्हा ह्या “मायबाप ” प्रेक्षकाला चित्रपटाविषयी काय वाटते तेही कळायला नको का!

पहिल्या प्रथम, हा चित्रपट काढल्याबद्दल श्री नितीन चंद्रकांत देसाई ह्यांचे कौतुक आणि आभार! सध्याच्या जमान्यात नाट्यसंगीताची आवाड जपणारे माझ्यासारखे मागासवर्गीय (संगीतात!) रसिक तसे कमीच. माझ्या पिढीने नाट्यसंगीते नुसतीच ऐकलीत. पण संगीत नाटकांचा सुवर्णकाळ पाहणे आमच्या नशिबी नव्हते. बालगंधर्वांबद्दल फक्त अत्रे, पुल देशपांडे ह्यांच्या लिखाणातून वाचलेले आणि कधी तरी आजोबांनी उल्लेख केलेला. ह्या चित्रपटाने तो काळ डोळ्यासमोर उभा केला. आता चित्रपट म्हटले म्हणजे वास्तवाशी थोडीफार फारकत होणारच. हा माहितीपट खचितच नव्हे. तेव्हा काही सीन पहाताना दिग्दर्शकाचा कल्पनाविलास लक्षात येतोच. (उदा कलाकारांच्या साड्यांचे डिझाईन जुन्या काळातले वाटत नाही, किंवा गंधर्व आणि पत्नी ह्यांचे काही प्रसंग जुन्या काळातल्या पती परमेश्वर संस्कृतीतले वाटत नाहीत). पण ह्या अगदीच क्षुल्लक गोष्टी. ह्याकडे थोडी डोळेझाक केली प्रेक्षकाला त्या काळात घेऊन जाण्याचे काम चित्रपटाने मस्त साधले आहे असे मला तरी वाटले.

ह्या चित्रपटाच्या जमेच्या बऱ्याच बाजू आहेत. सुबोध भावेंचा सक्षम अभिनय आणि आनंद भाटेंची आवाजाची साथ ह्या महत्त्वाच्या गोष्टी. सुबोध भावेंनी तर अभिनयाची कमालच केली आहे. बालगंधर्वांचा साधेभोळेपणा आणि स्त्री भूमिकेत असतानाचा शृंगार किंवा स्त्री सुलभ हालचाली दोन्ही अतिशय उत्तम. विशेष म्हणजे मुलीच्या निधनाची वार्ता कळल्यावर सुद्धा प्रयोग करताना “नाही मी बोलत नाथा” च्या वेळचा अभिनय म्हणजे उच्चच! हे गाणे म्हणजे थोडेसे लाडिक स्वरूपाचे. ते साकारताना ओठातून हास्य आणि आतले कन्या विरहाचे दु:ख नुसत्या नजरेतून दाखवण्याचे जे काही कसब सुबोधने साधले आहे त्या साठी त्यांना साक्षात दंडवत! पूर्वी सिरीयल मध्ये का चित्रपटात सुबोध भावेंची कुठलीतरी खलनायकाची भूमिका पहिली होती. तोच हा कलाकार का अशी शंका वाटेल इतकी सुरेख भूमिका भाव्यांनी वटवली आहे. नंतर गंधर्वांच्या उतरत्या काळात गोहरबाईंबरोबर कृष्णाचे काम करताना कृष्णाच्या वेशातले थकलेले बालगंधर्व सुद्धा मस्तच. बालगंधर्वांची विनयशीलता भावेंच्या चेहेरया वरून नुसती ओसंडून वाहत होती. एका प्रसंगात बालगंधर्व मॅनेजरला अत्तरवाल्याला पैसे द्यायला करारीपणे सांगतात. तेव्हा सुद्धा आवाज न चढवता, नुसत्या डोळ्यातून करारीपणा आणि आवाजातून मृदुपणा अशा दोन परस्परविरोधी भावना व्यक्त करणे म्हणजे अशक्यच.

सुबोध भावेंच्या अभिनयाला तोडीस तोड साथ दिली ती आनंद भाटेंनी. आनंद भाटे लहान असतापासून बालगंधर्वांची पदे गात आले आहेत. लहानपणी आनंदगंधर्व म्हणून गौरवलेले भाटे ह्यांनी आपली उपाधी सार्थ ठरवली आहे. ह्या चित्रपटात त्यानी म्हटलेली बरीचशी पदे स्त्री भूमिकेच्या तोंडी आहेत. तेव्हा पदातले भाव एखादी गायिका जसे व्यक्त करेल तसेच व्यक्त केले आहेत. गाण्यात पुरुषीपणा अजिबात येऊ दिला नाही. आनंद भाटे, राहुल देशपांडे ह्यांच्या सारख्या कलाकारांमुळे नाट्यसंगीताचे वैभव आजच्या पिढीपर्यंत पोचू शकते आहे हे सौभाग्यच .

अशा चित्रपटाला संगीत दिग्दर्शन देणे म्हणजे कठीणच. संगीत हा ह्या चित्रपटाचा आत्मा, आणि बऱ्याच चाली आधीच रूढ झालेल्या. तरीसुद्धा त्यावर आपली छाप आणायचे कौशल्य कौशल इनामदारांनी साधले. सुरवातीच्या नांदीचे रिमिक्स मस्त जमले आहे. पण “नाही मी बोलत नाथा” च्या मूळ चालीवर सुपर इम्पोज केलेले करुण संगीत  (कन्या वियोगाचा प्रसंग) मात्र मूळ गाण्याची मजा कमी करते.  “परवर दिगार” आणि “दया छाया” चे मिक्सिंग सुंदर जमले आहे.

विशेष उल्लेख करावासा वाटतो तो आर्या आंबेकरचा. लहानपणीच्या बालगंधर्वांच्या तोंडी एक चीज घातली आहे. ती आर्याने अशी काही म्हटली आहे की बस! एवढ्या लहान वयात गाण्यात केवढी जाण आहे. ही मुलगी मोठेपणी मोठी कलाकार होणार हे निश्चित. मला नकळत वन्स मोर म्हणावेसे वाटले पण लक्षात आले की हा चित्रपट आहे.

चित्रपट तुटक वाटतो, बालगंधर्वांच्या गुणांपेक्षा अवगुणच जास्त दिसतात अशी टीका मी वर्तमानपत्रात वाचली. पण मी त्यातल्या गाण्यात बुडून गेलो असल्याने आणि सुबोध भावेंच्या अभिनयाने खल्लास झालो असल्याने मला काही ह्या त्रुटी जाणवल्याच नाहीत. प्रेक्षकाला मंत्रमुग्ध करायचे काम चित्रपटाने नक्कीच केले आहे.

आणि हो! चित्रपटाच्या अखेरीस बालगंधर्वांची दुर्मिळ छायाचित्रे दाखवतात. तेव्हा उगीच बाहेर पडण्याची घाई न करण्याची प्रेक्षकाना विनंती. काही प्रेक्षकांना गर्दी व्हायच्या आत पार्किंग मधून गाडी काढायची इतकी घाई होते की बाकीचे प्रेक्षक अजून बसले असतानाच त्यांच्या मधून उठून व्यत्यय आणतात. तेव्हा कृपा करुण पडदा काळा होईपर्यंत खुर्चीतून उठू नये एवढीच ह्या पुणेरी प्रेक्षकाची विनवणी!

Advertisements

17 thoughts on “चित्रपट – बालगंधर्व”

 1. समीक्षा एवढी सुंदर आहे तर चित्रपट नक्कीच अप्रतिम असेल !!! मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार नाही ह्याचे वाईट वाटतय!!

  1. अल्पना
   मोठ्या पडद्यावर खचित मजा येते. पण तसे नाही तर डीव्हीडी येईल तेव्हा नक्की Surround Sound System वर पहा. प्रेक्षकात बसून नाटक पहिल्याचा भास होईल.

 2. आपल्या पिढीला त्यांचा संगीत सुवर्णकाळ पाहायला मिळाला नाही हे अगदी खरे…ते अनुभवण्यासाठी तरी असे चित्रपट सिनेमागृहात जाऊनच पाहायला हवेत…
  नक्कीच पाहायला जाणार….

 3. छान लिहिली आहे समीक्षा 🙂
  चित्रपट नक्कीच बघावा असा असणारच 🙂
  दोन वेळा तिकीट न मिळाल्यामुळे परत आलोय 😦

 4. कालच चित्रपट पाहिला.
  १) बालगंधर्वांचे दुर्गुण जास्त प्रमाणात दाखवले गेले आहे. व्यवहार शुन्य असे वागणे, बरेचदा पराकोटीचे नेभळट प्रकारचे वाटते.
  २) सिनेमा मधे खाली येणारी इंग्रजी सबटायटल्स खूप व्यत्यय आणतात, मराठी सिनेमाला थिएटर मधे सबटायटल ची गरज काय?
  ३) गाणी सगळीच अप्रतीम. केवळ तेवढाच एक मुद्दा या सिनेमाला तारून नेतो.
  ४)बालगंधर्वांचे कपडे आणि दागीने एकदम अप्रतीम. मेकप पण वयानुसार केल्या गेला आहे.
  ५) बालगंधर्वांच्या जीवनातले इतर पॉझिटीव्ह कंगोरे जास्त दाखवता आले असते. तो प्रसंग , बालगंधर्व २५ हजार रुपयांची अत्तरं विकत घेतात( दिड लाखाचे कर्ज असताना सुध्दा) किंवा सिनेमाच्या शेवटी मिळालेले पैसे एका मजार समोर ठेऊन देतात , किंवा बायकोला म्हातारपणी सोडून जातात हे सगळे प्रसंग दाखवल्यामुळे त्यांच्या व्यवहार शुन्यतेमुळे , त्यांचा खूप राग येतो. या उलट बालगंधर्वांबद्दल वाटणारा आदर वाढवणारे प्रसंग जास्त टाकले असते, तर ते योग्य ठरले असते. संपूर्ण चित्रपट भर बालगंधर्व म्हणजे एक नाट्काला वाहून घेतलेला व्यवहार शुन्य ( आजच्या भाषेत मूर्ख) माणूस अशी प्रतिमा उभी करण्याचे कारण समजले नाही.
  कितीही मूर्ख असलेला माणूस दिड लाखाचं कर्ज असताना २५ हजार रुपये त्याकाळचे अत्तरात खर्च करणार नाही..असो.. नाहीतर प्रतिक्रियेचे पोस्ट व्हायचे 🙂

  1. महेंद्र,
   हा चित्रपट पाहिल्यावर मी आचार्य अत्र्यांचा बालगन्धर्वांवरचा लेख पुन्हा वाचला. दुर्दैवाने त्यांची व्यवहारशून्यता तेव्हाच्या काळात जाहीर होती असे दिसते. पुण्यात सिटीप्राईड ला इंग्लिश टायटल नव्हते. बाकी मला तरी नाही वाटत कि मुद्दाम चुकीची बाजू दाखवली गेली असेल. मी तर गाण्यातच बुडलो होतो त्यामुळे ह्या गोष्टी विशेष पहिल्या नाहीत 🙂

   1. आचार्य अत्र्यांचा बालगन्धर्वांवरचा लेख कोठे वाचायला मिळेल

   2. आजच्या व्यवहारी जगाचा विचार केला तर बालगंधर्वाचे वागणे चूक वाटेल.पण आजच्या सारखे वागले असते तर ते बालगंधर्व झालेच नसते. आणि कोणी कस वागाव हे आपण ठरवू शकत नाही. अशी वेडी माणसच इतिहास घडवतात हे लक्षात घ्या.कितीही मूर्ख असलेला माणूस दिड लाखाचं कर्ज असताना २५ हजार रुपये त्याकाळचे अत्तरात खर्च करणार नाही.हे सामान्य माणसाचे काम नव्हे त्या करता बाल गंधर्वाच व्हावे लागते.प्रेक्षकांना ते मायबाप समजत आणि आजचे नट स्वतःलाच मायबाप समजतात.

 5. मला तर बालगंधर्व फिल्म आवडला..काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न केलाय मराठी सिनेमात..त्यात नितीन देसाई यांची ऐतिहासीक दृष्टी एकदम २० -३० वर्षे मागे गेल्याची अनुभूती देते…एकंदरीत एकदा तरी पाहावा निदान पुणेकरांनी तरी… हा हा..

 6. निरंजन
  अहो पेपरातल्या समीक्षकांना अक्कल असते का ? काहीही छापतात. युझलेस.
  त्यांच्या समीक्षणाचा मान ठेवला असता तर बालगंधर्व, वेनस्डे, पेज ३, ट्राफिक सिग्नल, ये मेरा इंडिया, यांसारख्या अजून बऱ्याच वेगळ्या विषयांवरच्या चित्रपटांना मुकलो असतो.

  टग्या

  1. @ अविनाश, माझ्याकडे निवडक अत्रे म्हणून पुस्तक आहे त्यात हा लेख होता.
   @ bolmj , महेश आणि टग्या, आपल्या मताशी सहमत.
   @ठणठणपाळ, कोणालाही “अक्कल असते का” हा प्रश्न मी विचारणार नाही, पण फक्त समीक्षकांच्या मतावर चित्रपटाची गुणवत्ता ठरत नाही हे खरे.

   सर्वांचे ब्लॉग वर मन:पूर्वक स्वागत आणि प्रतिक्रियेबद्दल आभार !

 7. …….असा बालगंधर्व आता न होणे ……असे ऐतिहासिक काव्य आहे. त्याची प्रचिती मागच्या पिढीने घेतली पण आम्हा अभाग्याना ते धन पाहता आले नाही. धर्मात्मा पहिला होता पण त्यांनी पुढे सिनेमा न करण्याचे कारण या सिनेमा मध्ये किती सहज पणे दाखवून दिले आहे. गाणार्यांना असा अवरोध चालत नसतोच. या हि गोष्टीला आजचे लोक व्यवहार शून्यता समजत असतील सुद्धा . गंधर्व किती ग्रेट होते ते थोडे फार समजले तरी खूप आहे. तुमची प्रतिक्रिया छान आहे.

 8. aajch ha chitrapat paahila. shabdach nahit. keval apratim. subodh bhave, aani sarvach kalakar atishy sunder. Balgandhavanche gane ,tyancya tana tantotant aalya aahet. Nitin Desainche manapurvak abhinandan. Asech bhavya divya chitrapat te nehmi nirmit karot hich sadicha.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s