प्रवासवर्णन – पंचमढी – भेडाघाट – इंदौर : इंदौरची खादाडी (भाग ५ अंतिम)


गेले तीन दिवस इंदौर मध्ये राहून सुद्धा खादाडीला मुहूर्त सापडत नव्हता म्हणून बेचैन होतो. शेवटच्या दिवशी मात्र व्यवस्थित ठरवून इंदौर स्थलदर्शन आणि खादाडी साधायचे पक्के केले. इंदौरमध्ये प्रेक्षणीय काय हा मोठा प्रश्न होता. (टीप: मी प्रेक्षणीय “स्थळांबद्दल” बोलत आहे ह्याची तरुण वाचकांनी नोंद घ्यावी!) शेवटी लालबाग पॅलेस पहायचे ठरले.

महेंद्र कुलकर्णींनी नीलकंठ भोजनालयाबाद्द्ल लिहिलेले वाचले होतेच. तेव्हा पहिल्यांदा ते शोधून दुपारच्या जेवणाची सोय करून घेतली. इतके साधे सात्विक मराठमोळे जेवण की दिल खूश हो गया. जेवण झाल्या बरोब्बर महेंद्रना एसमेस ने आभार कळवले. नीलकंठ भोजनालय हे अगदी सामान्य दिसणारे होटेल आहे. थाळी सिस्टीम. ह्यात स्वीट नाही. ती वेगळी. पुण्यात जसे उद्धट पणे सांगतात “थाळीत स्वीट येत नाही!” तसे न सांगता अगदी आपुलकीने “कुछ स्वीट लेंगे?” म्हणून आग्रह होता. पण पानातले जेवणच इतके चविष्ट होते की मिठाईची गरजच भासली नाही. मला गवार आजिबात आवडत नाही तरी पानातली गवारीची भाजी सुद्धा मिटक्या मारत खाल्ली.

पुणेरी पाटी

नीलकंठ भोजनालयातून तृप्त झाल्यावर लालबाग पॅलेस पहायला गेलो. हा राजवाडा पाश्चिमात्य स्थापत्यकला वापरून बनवलेला आहे. आत मध्ये गेल्यावर सुद्धा सर्वत्र पाश्चात्य संस्कृतीचा अंमल दिसत होता. आतल्या वस्तूंची मात्र पार वाट लागलेली होती. आतून अगदीच रया गेलेला हा राजवाडा पाहून निराशाच झाली. खरं तर मला हे संस्थानिकांचे राजवाडे पहाताना चीडच येते. जेव्हा सामान्य जनता इंग्रजांच्या जाचात भरडून निघत होती तेव्हा बरेचसे संस्थानिक स्वतःला किती जास्त तोफांच्या सलामी मिळतील ह्या विवंचनेत होते (सयाजीराव गायकवाड, शाहू महाराज ह्यांसारखे काही सन्माननीय अपवाद वगळता येतील).  स्वातंत्र्यवीर सावरकरांचे १८५७ च्या लढयावरचे पुस्तक वाचले की ह्या राजांच्या निष्क्रियतेची  जाणीव होते. कुठे युद्धात तोफांचा वापर करणारे छत्रपति शिवाजी महाराज आणि कुठे स्वतःला सलामी घेण्यासाठी तोफांचा वापर करणारे हे भातुकलीतले राजे. असो!

पॅलेस पाहून झाल्यानंतर जैन काच मंदिर. पूर्ण काचांचे बनलेले देऊळ. मला तरी विशेष काही वाटले नाही. ह्या दोन गोष्टी पाहिल्यावर इंदौर मध्ये पहाण्यापेक्षा खाण्यासच जास्त महत्त्व दिले पाहिजे असे ठरवून आम्ही होटेलच्या रूम वर गेलो.

५६ दुकान

संध्याकाळी पुरेपूर खादाडी करायला म्हणून व्यवस्थित बेत तयार केला. पहिल्यांदा छावणी भागात पाणी पुरी (माहिती सौजन्य कै. अभिनय कुलकर्णी) खायला गेलो. मुंबई पुण्यापेक्षा खचितच वेगळी चव आहे. आणि हो! ही फक्त तिखट पाणी आणि बुंदी घालूनच खातात. पाण्यात हिंगाचा वेगळाच स्वाद होता. खाऊन झाल्यावर सुद्धा त्याची मंद जाणीव होत होती. पाणी पुरी खाल्ल्यावर मोर्चा वळवला ५६ दुकान कडे. इकडे खाण्यापिण्याची लाईनीत ५६ दुकाने आहेत. इकडे चिकन हॉटडॉग छान मिळतात म्हणून ऐकले होते पण अपेक्षाभंग झाला. चिकन कटलेट बनपावात घालून दिले. मग प्रकाश स्वीट मध्ये रबडी खाल्ली आणि घरी घेऊन जायला वेगवेगळे फरसाण बांधून घेतले. इकडे घेतलेला चहाचा मसाला एकदम स्वादिष्ट.

आता वेळ झाली होती ती बहुचर्चित सराफावरचे रस्त्यावरचे पदार्थ चाखायची. महेंद्रच्या ब्लॉग वर वाचले होते तेव्हापासून भुट्टे का कीस खायचाच हे ठरवले होते. तेव्हा ते फेमस जोशींचे दुकान शोधून भुट्टे का कीस आणि दहीवडा मागवला. दोन्ही पदार्थ लाजवाब! मग पुन्हा रबडी आणि गुलाबजाम! गुलाबजाम नुसता तोंडात टाकल्यावर विरघळेल असा! आता शिकंजी खाऊन खादाडीचा समारोप करायची वेळ आली होती. पण गोडावर गोड कसे खायचे म्हणून सामोसा घेतला. समोसा ओके होता. मात्र शिकांजी जबरदस्त. आपल्याकडे मिळणाऱ्या पियुषची आठवण करून देणारी चव. पण बरीच दाट.

इंग्लंड मध्ये असताना पब हॉपिंग (म्हणजे एकाच दिवसात अनेक बार मध्ये जाऊन तिकडली स्पेशल बीअर पिणे) अनुभवले होते. इंदौरमध्ये “फूड स्टॉल हॉपिंग” झाले. अगदी पोट  फुटेस्तोवर खाऊन झाल्यावर रात्री जुन्या राजवाड्यावरची रोषणाई पाहून परतलो.

आता घरी जायचे वेध लागले होते. … आणि इंदौरची प्रसिद्ध घमंडी लस्सी खायची राहिल्याबद्दल हळहळ 🙂

जुना राजवाडा

आमचा थोडक्यात सफरनामा

दिवस १ – पुणे – मुंबई टॅक्सी. मुंबई – पिपरिया प्रवास कोलकाता मेलने (रात्री ९:४० ला प्रयाण)
दिवस २ – सकाळी १०:३० ला पिपारीयाला आगमन. पिपरिया – पंचमढी प्रायव्हेट कार, पंचमढी दर्शन
दिवस ३ – पंचमढी दर्शन
दिवस ४ – पंचमढी दर्शन, संध्याकाळी पिपारीयाला प्रयाण. रात्री ८:४० ची जबलपूरला जाणारी भोपाल जबलपूर जनशताब्दी. जबलपूरच्या  हॉटेलमध्ये एक रात्र.
दिवस ५ –  भेडाघाट दर्शन, रात्री ११ वाजता जबलपूर इंदौर ओव्हर नाईट ट्रेन.
दिवस ६ – सकाळी ११ वाजता इंदौरला आगमन. हॉटेल मध्ये चेक इन. जमेल तेव्हढे  इंदौर दर्शन.
दिवस 7 – ओमकारेश्वर महेश्वर दर्शन
दिवस ८ – मांडू दर्शन
दिवस ९ – इंदौर खादाडी
दिवस १० – पुण्यास परत.


(समाप्त)

Advertisements

7 thoughts on “प्रवासवर्णन – पंचमढी – भेडाघाट – इंदौर : इंदौरची खादाडी (भाग ५ अंतिम)”

 1. इंदौर मधे अजून बऱ्याच चांगल्या जागा आहेत. दर वेळेस नविन जागा शोधत असतो, इंदौर माझी फेवरेट जागा आहे .. 🙂 दर वेळेस नविन काहीतरी सापडतंच इंदौरला.

  1. महेंद्र,

   पुढच्यावेळी परत इंदौरला जायच्या आधी तुमच्याकडून सर्व तपशील घ्यायला हवेत! वास्तविक, कुठल्याही ट्रीपला जाताना तुमच्या कडून माहिती घ्यायला हवी!

 2. झक्कास झाली ट्रीप एकंदरीत ! बाकी शीर्षकातलं ‘प्रवासवर्णन’ बदलून ‘खादाडीवर्णन’ करावं का??

  आणि अखेरीस आपल्या परंपरेनुसार णी षे ढ !! 😉

  1. हेरंब,

   प्रवासात स्थानिक खादाडी हा महत्त्वाचा भाग असला पाहिजे अशी आमची धारणा आहे! आणि होय, आत्ता पर्यंतच्या आमच्या पर्यटनात ही सहल सर्वात छान होती असे म्हणता येईल.

   -निरंजन

 3. आपला प्रवास वर्णन वाचला. खूपच छान आहे . प्रवासाच्या शेवटी प्रवासाचे ठळक आणि महत्वाचे दिवसाप्रमाणे माहिती दिलीत .त्याबाबत धन्यवाद . इतरांना आपला प्रवास तुम्ही सांगितल्या प्रमाणे करता (स्वताहून व स्वस्त ) फक्त पुढच्या वेळी (प्रवास खर्च +हॉटेल +फिरणे +जेवण+इत्यादी +हॉटेल फोन क्रमांक ) दिल्यास बरे होईल व प्रवासाचा बजेट बनवता येईल .
  टीप :- निरंजन प्रमाणे स्टेप बाय स्टेप माहिती (प्रवास वर्णन दिल्यास इतरांना प्रवास आखणे /खर्चाचे अंदाज बांधे सोयीचे होईल

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s