मिशेल ओबमाकडून महाराष्ट्राची उपेक्षा! (अखिल वेगळेच्या बातम्या)


सकाळी ऑफिसला जायच्या गडबडीत होतो तेव्हाच नेमका फोन वाजला. उचलला तर अखिल वेगळे फोन वर! पूर्वी कधी ह्याचा माझा संपर्क नाही. पण परवा काय दुर्बुद्धी झाली आणि वेगळेच्या बातम्या ब्लॉगवर  टाकल्या. तेव्हापासून  वेगळे माझ्यावर बेहद खुष! दिवाळीच्या शुभेच्छा काय, फुकट महाखबरचा विशेष अंक काय! बायको पण आनंदली! दिवाळीत छान वाचायला मिळेल म्हणून नव्हे हो! पण नुकतीच आम्ही रद्दी विकलेली. तेव्हा कढईतून काढलेल्या गरमागरम चकल्या ठेवायला आयताच कागद मिळाला ना! असो.

तेव्हा अखिलला म्हटले “काय रे आज सकाळीच आठवण काढलीस?” अखिल म्हणाला, “अरे बातमीच तशी आहे. एकदम इंटरनॅशनल पातळीवरची! तुझ्या ब्लॉगवरच्या मित्रांसाठी खास तुला देतोय.  मला दादर स्टेशनच्या बाहेर भेट.” खरंतर मला दादरला उतरून ह्याला फुकटचा चहा पाजून त्याची बातमी घ्यायचा कंटाळा आला होता, पण म्हटले, फुकट ब्लॉगची प्रसिद्धी होईल, वाचकांची संख्या वाढेल. नाहीतरी स्वतःची मति कुंठलेली असल्याने ब्लॉग वर नवीन लिखाण होत नाहीये. तेव्हा म्हटले येतो!

दादर स्टेशन वर वेगळ्या दाढी खाजवत उभा होता. डोक्याला जखम, एक डोळा सुजलेला असा त्याचा अवतार. म्हटलं, “काय रे वेगळ्या, कोणाची कुरापत काढलीस?”  वेगळ्या गडबडीत होता. म्हणाला, “ते सर्व जाउदे! ही घे फाईल आणि टाक तुझ्या ब्लॉगवर. चल मी घाईत आहे! नवीन मुख्यमंत्री कोण होणार त्याची माहिती काढायचीय”. वेगळ्या ती फाईल माझ्या हातात कोंबून कधी त्या दादरच्या गर्दीत विरून गेला तेच कळलं नाही. ती फाईल घेऊन मी ऑफिस मध्ये गेलो. आपण काम करत आहोत असा आभास करण्यासाठी दोन चार ईमेल टाकून (बॉस ला सीसी मध्ये ठेवून!)  निवांत पणे वेगळ्याची फाईल उघडली. आणि काय सांगू! खरच सनसनाटी बातमी होती की हो! आता अधिक उत्सुकता न ताणता बातमी खाली देत आहे…

मिशेल ओबमाकडून महाराष्ट्राची घोर उपेक्षा! नेते आंदोलनाच्या तयारीत!

(मुंबईच्या खास वार्ताहरा कडून)

आज इंग्रजी पत्रांनी मिशेल ओबामांच्या नाताळच्या खरेदीची बातमी प्रसिद्ध केली आहे. हस्तकला प्रदर्शनातून मिशेलने पैसे संपेस्तोवर खरेदी केली. राजस्थान, गुजरात, बंगाल, कर्नाटक अशा राज्यांच्या स्टॉलवरून विविध गोष्टी खरेदी केल्या. पण मिशेलना आमच्या महाराष्ट्राची पैठणी, सावंतवाडीची लाकडी खेळणी, सोलापुरी चादरी काही पसंत पडलेल्या दिसत नाही. ह्यात नक्कीच काहीतरी राजकीय षड्यंत्र असल्याचा आमच्या वार्ताहराला संशय आल्याने, त्याने तडक मराठी माणसाचा कैवार घेऊ पहाणाऱ्या अनेक नेत्यांपैकी सध्या चलती असलेल्या श्री. मा.ज. वाकडे ह्यांची भेट घेऊन त्यांचे मत अजमावण्याचा प्रयत्न केला.

वार्ताहर: साहेब, मिशेल ओबामांच्या खरेदीमध्ये महाराष्ट्राची एकही वस्तू नाही त्या बद्दल तुमची काय प्रतिक्रिया?

मा.ज. : देशाच्या स्वातंत्र्या पासून महाराष्ट्राची उपेक्षा दिल्लीकडून चालू आहे. मिशेल ओबामा सुद्धा दिल्लीकरांची  महाराष्ट्राला सापत्न वागणूक देण्याची परंपरा पुढे चालू ठेवतायत. ही गंभीर बाब आहे. आम्ही ह्या बाबत मुख्यमंत्र्यांकडे दाद मागणार आहोत.

वार्ताहर: कोणत्या मुख्यमंत्र्यांकडे? मावळत्या की उगवत्या? आत्ताच्या मुख्यमंत्र्यांचा राजीनामा स्वीकारला गेला आहे.

मा.ज : कोणता मुख्यमंत्री हे महत्त्वाचे नाही. दाद मागणे महत्त्वाचे आहे.

वार्ताहर: तुम्ही नुसती दाद मागून गप्प बसणार का? तेवढ्याने काय होणार आहे?

मा.ज. : तुम्हा बातमीदारांना धीर नसतो. पहिल्यांदा दाद मागू. परंपरेप्रमाणे सरकार काही निर्णय घेणारच नाही. मग आम्ही आंदोलने छेडू! अख्खा महाराष्ट्र ढवळून काढू. महाराष्ट्रातल्या सगळ्या अमेरिकन कंपन्या बंद करू. त्यांना महाराष्ट्राची उत्पादने नकोत तर आम्हाला पण त्यांची उत्पादने नकोत. आम्ही त्यांच्या उत्पादनांच्या होळ्या पेटवू.

वार्ताहर: साहेब, पण जर तुम्ही अमेरिकन कंपन्या बंद केल्यात तर त्यात काम करणाऱ्या मराठी माणसाचे काय? ते रस्त्यावर येतील त्याचे काय?

मा.ज. :  विषय मराठी माणसाच्या अस्मितेचा आहे. त्यासाठी एक दोन नोकऱ्या गेल्या तरी बेहत्तर. नाहीतरी नोकरीची लाचारी करण्यापेक्षा मराठी माणसाने स्वतःचा धंदा काढला पाहिजे.

वार्ताहर: साहेब, तुम्ही अमेरिकन उत्पादनाच्या होळ्या करू म्हणता, मग त्यात तुमची फोर्ड गाडी पण जाळणार का?

आमच्या वार्ताहराच्या ह्या साळसूद प्रश्नाचा साहेबांच्या अवती भवती असलेल्या गुंड सदृश कार्यकर्त्याना एवढा राग आला की त्यानी आमच्या वार्ताहाराला मारहाण केली. त्यामुळे ही मुलाखत अर्धवटच राहिली. मा.ज. साहेब ही मारहाण पाहत कोकाकोलाची एक बाटली रिचवून निघून गेले. मात्र एक निश्चित. मिशेल ओबामांचा हा महाराष्ट्रावरील अन्याय येत्या काही दिवसात महाराष्ट्रवासीयांना डोकेदूखीचा ठरू शकतो!

जय महाराष्ट्र!!

ही बातमी वाचल्यावर मला वेगळेला झालेल्या  जखमांचा अर्थ लागला. भारीच उचापत्या आहे बुवा हा वेगळ्या!

(काल्पनिक)

Advertisements

12 thoughts on “मिशेल ओबमाकडून महाराष्ट्राची उपेक्षा! (अखिल वेगळेच्या बातम्या)”

 1. हा हा हा.. झक्कास एकदम..

  >> वार्ताहर: कोणत्या मुख्यमंत्र्यांकडे? मावळत्या की उगवत्या?

  हे वाचून तर अक्षरशः लोळलो 😀

  अखिल वेगळे ……………………… अमर रहे… आपलं सॉरी जिंदाबाद… 😉

  1. @विक्रम, संकेत, मयूर आणि नंदन, ब्लॉगवर आपले स्वागत आहे 🙂 लेख आवडल्याचे कळवलेत त्याबद्दल आभारी आहे 🙂

   @हेरंब, काल टाईम्स मध्ये मिशेलची बातमी वाचली आणि माझ्यातला अखिल एकदम जागा झाला 🙂 शालजोडीतले मारायला बरा बकरा मिळाला आहे 🙂 प्रतिक्रियेबद्दल धंन्यवाद!

  1. @नंदकुमार, ब्लॉग वर स्वागत आहे आणि प्रतिक्रियेबद्दल धंन्यवाद!
   @हर्षद, तुमचा सल्ला नक्की लक्षात ठेवीन 🙂
   @विद्याधर, धन्यवाद! तुमची गोष्ट मस्त झाली आहे. प्रतिक्रिया टाकतोय

 2. अधून मधून वेगळ्याच्या भेटीची संधी सोडू नका….एकदम ढासू बातम्या देतो हा…प्रचंड भारी….:)
  जाता जाता…ती कुणा बेंगरुळूच्या दाम्पत्याने कुठली सिल्क साडी विणली होती त्याच काय झाल??? 🙂

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s