मुखपृष्ठ > माझा आवडता लेख, सहजच लिहूनी गेलो, हलकेफुलके > बातम्या – न घडलेल्या घटनांच्या

बातम्या – न घडलेल्या घटनांच्या


अखिल वेगळे हा आमच्या शाळेतला एक उचापत्या मुलगा. आता बातमीदार. घरात गडगंज श्रीमंती, पण ह्या पठ्ठ्याला पाहिल्यापासून बातमीदारच व्हायचे होते. स्वतःचे महाखबर नावाचे दैनिक काढले. दैनिक मराठी असले तरी गिऱ्हाईक अधिक करून भैय्ये आणि वाणी ! रद्दीपेक्षा स्वस्त असा महाखबरचा पेपर भेळ / पुड्या बांधायला बरा पडतो ना! त्यामुळे आमच्या वेगळेला मराठी सोडून अन्य भाषिकांचे जास्त प्रेम. उगाच “मराठी बाणा” वाल्या पक्षांच्या कुरापती पेपर मधून काढणे हा ह्याचा छंद. मग कधी त्यातून मार पण खायचा. (बहुतेक भेळ खाताना ह्याचे मराठी विरोधी लेख चुकून कोणी बाणेदार मराठी वाचत असावेत. आधीच भेळ खाऊन पोटात आग, आणि त्यावर ह्याच्या लेखाने डोक्यात आग, मग मारामारी करणार नाही तर काय?)

असो. तर असा हा आमचा आगळा वेगळा वेगळे बऱ्याच दिवसांनी मला भेटला. त्याला म्हटलं “काय रे वेगळ्या? बरेच दिवसात कोणाकडून मार खाल्ला नाहीस? काय पत्रकारिता सोडलीस काय?”  “छ्या! पत्रकारिता ह्या जन्मात सोडणार नाही. प्रस्थापितांना विस्थापित केल्याशिवाय गप्प बसतोय काय?” आता हे प्रस्थापित / विस्थापित हे शब्द माझं डोकं गरगरवणार काय अस वाटू लागलं. वेगळ्या मला इराण्याच्या हॉटेलात च्या पाजायला घेऊन गेला. च्या पीता पिता माझ्या समोर एक फाईल टाकली आणि सिगरेट शिलगावून मला म्हणाला, “वाच येत्या काही दिवसात येणाऱ्या बातम्या! ”  मी फाईल उघडून वाचू लागलो आणि डोळेच चमकले. त्याला म्हटले, “ह्या सगळ्या घडलेल्या घटना आहेत?”  माझ्याकडे वेगळ्या अगदी कुत्सित नजरेने पाहून म्हणाला, “छट! पण काही दिवसात घडतीलच बघ! मी मात्र सगळ्यांच्या आधीच छापून टाकणार आहे.” वेगळ्याकडे कौतुकाने पहात मी त्याने हळूच माझ्याकडे सरकवलेले बिल चुकते केले आणि आम्ही आपापल्या वाटेने निघालो.

दुसऱ्या दिवशी पेपर वाल्याकडे महाखबर मागितला तर पेपर वाल्याने असा काही वाकडा चेहरा केला की कुठून पेपर मागितला असे झाले. मग तिसऱ्या दिवशी वाण्याकडून घेतला. वाणी पण असला बदमाश! नुसता पेपर द्यायला तयार नाही १०० रुपयाची खरेदी करायला लावली. मला वेगळ्याने आधीच वाचलेल्या बातम्या खरच पेपरात आल्या आहेत का हे बघायची उत्सुकता होती. बातम्या खरंच छापून आल्या होत्या की हो! साहजिकच त्या वाचकांच्या पर्यंत पोचल्या नव्हत्या. (वाणी आणि भैय्ये आधीच सगळा महाखबर गायब करून टाकतात ना!) तेव्हा आमच्या प्रिय मित्र वेगळ्याच्या घडण्याआधी प्रसिद्ध झालेल्या बातम्या सर्वांपर्यंत पोचवायचा हा छोटासा प्रयत्न!

टेकड्या ठरल्या पुण्याच्या काळ !

विशेष प्रतिनिधीकडून,

गेले २-३ दिवस पुण्यात मुसळधार पावसाने धुमाकूळ घातला आहे. पानशेतच्या पुरात आले नसेल त्याहून जास्त पाणी शहरभर झाले होते. महापौरांचा बंगला सुद्धा ह्या पाण्यातून सुटला नाही. ११३ सरकारी वाहने आणि थोडीफार माणसे पाण्यात वाहून गेली.  काही नतद्रष्ट पर्यावरणवादी लोक बिल्डर लोकांनी नद्या  नाले बुजवले म्हणून पाणी साचले असा खोटा प्रचार करत आहेत. पण आपल्या माननीय पालक मंत्र्यानी पुण्याच्या परिस्थितीचा सखोल अभ्यास करून असा निष्कर्ष काढला आहे की ही परिस्थिती नद्या किंवा नाले बुजवल्यामुळे आली नसून पुण्यात मधेच उभ्या ठाकलेल्या टेकड्यांमुळे आली आहे. ह्या टेकड्यांवरून धो धो पावसाचे पाणी खाली वाहते आणि पूरसदृश परिस्थिती निर्माण होते. तेव्हा पालक मंत्री नवीन अध्यादेश जारी करून टेकड्या पाडण्या साठी बिल्डर कडून निविदा मागवणार आहेत. जो बिल्डर कमी खर्चात टेकडी जमीन दोस्त करेल त्याला त्या जागेवर बांधकाम करून आपला खर्च वसूल करता येईल अशी ही योजना असेल. ह्या योजनेला विरोध करणाऱ्यांना मोक्का लावला जाईल अशीही तरतूद केली आहे. बिल्डर समाजाने ह्या घोषणेचे स्वागत करून सरकारशी सहाय्य करायची तयारी दर्शवली आहे.

कोणीतरी सरकारशी उघडपणे सहकार्य करायची तशी ही पहिलीच वेळ आहे.

सरकार वापरणार कॉमनवेल्थ पॅटर्न!

कॉमनवेल्थ गेम च्या यशाने भारताची मान जगात खूपच उंचावली आहे. खेळ सुरु व्हायच्या आधी भ्रष्टाचाराच्या आरोपांनी झाकोळलेल्या संबंधितांमध्ये खेळाच्या यशाने नुसती सुटकेचीच भावना नव्हे तर मनात नवी उभारी आली आहे. आम्ही स्पर्धेच्या मुख्यांशी वार्तालाप केला असता त्यांनी सांगितले की एवढा मोठा प्रकल्प करताना उगाच शे दोनशे कोटीचा हिशेब लागत नाही म्हणुन गाजावाजा करू नये. अशाने ठेकेदारांकडून काम करवून घेणाऱ्या सरकारी अधिकाऱ्यांचे उगाच मानसिक खच्चीकरण होते. त्यामुळे देशाची प्रतिमा खराब होते.  ह्या पुढे अशीच मोठी कामे यशस्वी व्हावी म्हणून अशा प्रकल्पांवर काम करणाऱ्या कर्मचार्यांना लाच लुचपत विभागा पासून संरक्षण देण्याचा ठराव सरकार मंजूर करून घेणार आहे. विरोधी पक्षांनी पाठिंबा द्यायची तयारी दर्शवली आहे. त्या बदल्यात खासदारांना सुद्धा लाच लुचपत विभागाच्या करड्या नजरेतून सोडवण्याची तरतूद करायचे सरकारने ठरवले आहे. तसेच प्रकल्पांच्या एकून हिशेबांच्या २५% रकमेचा हिशोब देण्याची सक्ती आता सरकारी कर्मचाऱ्यांवर रहाणार नाही. त्यावर माहिती अधिकार सुद्धा लागू होणार नाही असा अध्यादेश सरकारने जारी केला आहे.  असा हा कॉमनवेल्थ पॅटर्न देशाला उन्नतीच्या पथावर नेऊन ठेवेल अशी आशा स्पर्धेच्या मुख्य अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

अयोध्येचा निकाल अमान्य! चॅनल जाणार सर्वोच्च न्यायालयात

उच्च न्यायालयाचा अयोध्येतील वादाबाबत निकाल सर्व सामान्य जनतेला मान्य असल्याचे चित्र दिसत असले तरी ह्या बाबत समस्त टीव्ही चॅनल वाल्यांमध्ये नाराजी आहे. निकाला नंतर दंगलीची अपेक्षा असल्याने चॅनल वाल्यांनी संवेदनशील ठिकाणी कॅमेरे, रिपोर्टर आणि अगदीच गरज पडली तर भरपूर दगड अशी व्यवस्था केली होती. दंगलीचा आखो देखा हाल द्यायची चोख व्यवस्था ह्या पूर्वी कधीच झाली नव्हती. आता न्यायालयाने सर्वांना खूष करणारा निकाल दिल्याने चॅनलवाल्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. पुढच्या आठवड्याभरात बातम्या कुठल्या द्यायच्या असा गहन प्रश्न त्यांच्यासमोर ठाकला आहे. लोकांच्या भावना दुखावल्या जाऊ नये म्हणून मुद्दाम असा समतोल निकाल देऊन दोन्ही बाजूनी पक्षपात केला गेला आहे असे चॅनल वाल्यांचे म्हणणे आहे. तेव्हा ह्या खटल्यातील वादी आणि प्रतिवादीनी जरी सर्वोच्च न्यायालयाने दाद मागितली नाही तरी उच्च न्यायालयाच्या ह्या निकालाचा पुनर्विचार करण्याची जनहित याचिका चॅनल वाले सादर करणार आहेत.

चोरांचे संमेलन – मध्यमवर्गीयांना दिलासा

नुकतेच पुण्या बाहेरील बालेवाडी क्रीडांगणात देशभरातील तुरुंगा बाहेरील चोरांचे, पुणेरी भामटा समाज ह्यांनी प्रायोजित केलेले संमेलन पार पडले. चोरांचा राजा शोभराज ह्याच्या प्रतिमेला हार घालून संमेलनाला सुरुवात झाली. संमेलनात चोरांच्या व्यथांवर प्रकाश पाडणारा एक परिसंवाद होता. त्यात आधुनिक चोरांच्या समस्या मांडल्या गेल्या. ऑनलाईन बँकिंग, एटीएम, डेबिट कार्ड ह्यामुळे लोक जास्त पैसे जवळ बाळगत नाहीत त्यामुळे चोरीचा धंदा फायदेशीर आहे का असा प्रश्न पुढे करण्यात आला. त्यावर ज्येष्ठ चोर दगडू मानकापे ह्यांनी कल्पकतेत कमी पडणाऱ्या चोरांवर तोंडसुख घेतले. त्याच्या मते चोर आपली शिकार नीट ओळखत नाहीत. मारुती चालवणारा, क्रेडीट कार्ड वापरणारा मध्यमवर्गीय नोकरदार शिकार करणे म्हणजेच आपले प्रयत्न फुकट घालवणे आहे. मध्यमवर्गीय नोकरदार माणसाला लुटण्याचे काम फक्त सरकार करू शकते असे मानकापे ह्यांचे मत होते. तेव्हा आधीच मेलेल्याला मारण्याचा मूर्खपणा चोरांनी करू नये असा सल्ला मानकापे ह्यांनी दिला. त्यापेक्षा चोरांनी आपला रोख सरकारी कर्मचाऱ्यांवर वळवावा असा मोलाचा सल्ला त्यांनी दिला. ह्या सावजाकडे घरात दाबून रोकड असते. शिवाय सफाईने ती चोरली तरी हे सावज पोलिसात जात नाही. कारण रोकडीचा हिशोब मागितला तर काय? तेव्हा सरकारी कर्मचाऱ्यां इतके सुरक्षित सावज नाही. आणि समस्त चोर समाज पिढ्यानपिढ्या आनंदाने चोरी करू शकेल असा विश्वास मानकापे ह्यांनी व्यक्त केला.

बऱ्याच काळाने मध्यमवर्गीयांना सुखावणारी एक तरी बातमी दिल्याचा आम्हास अत्यानंद होत आहे.

Advertisements
 1. vijay
  ऑक्टोबर 6, 2010 येथे 2:58 pm

  batamya kalpak pan satyavadi ahet

 2. सचिन
  ऑक्टोबर 6, 2010 येथे 3:20 pm

  हाहाह
  ह ह पु वा

 3. ऑक्टोबर 6, 2010 येथे 3:46 pm

  या बातम्यांवर तूम्ही “१ रु. च्या” एस एम एस ने “लोकमत” घेऊ शकता.:) आवडले.

  • ऑक्टोबर 6, 2010 येथे 8:11 pm

   विजय, सचिन आणि हर्षद, तिघांचेही ब्लॉगवर स्वागत! आणि अभिप्रायाबद्दल धन्यवाद!

 4. Daulat Phene
  ऑक्टोबर 6, 2010 येथे 8:31 pm

  Jabardast

  • ऑक्टोबर 7, 2010 येथे 9:02 सकाळी

   धंन्यवाद दौलत आणि देवीदास! दोघांचे ब्लॉगवर स्वागत 🙂

   हेरंब, बरेच दिवसांनी ब्लॉगवर येणे झाले 🙂 प्रतिक्रियेबद्दल धंन्यवाद!
   घोषणा आवडली 🙂 आमच्या वेगळ्याचे पण चाहते आहेत हे ऐकून त्याला थोडे तरी बरे वाटेल ! त्याच्या सर्व बातम्या (शेवटची सोडून) खोट्या ठरोत हीच सदिच्छा!

 5. ऑक्टोबर 6, 2010 येथे 8:51 pm

  आमचे आराध्य दैवत, प्रेरणास्थान, माननीय रारा वेगळे साहेब (दाढीवाले) यांच्याविषयी केलेल्या अपमानास्पद लिखाणाचा आम्ही णीशेढ करतो.

  अध्यक्ष
  अखिल वेगळे फ्यान क्लब

  जब तक ये जग सगळा रहेगा |
  अखिल हमारा वेगळा रहेगा ||

  निरंजन, लय लय भारी.. त्या ‘वेगळ्या’ चा इमेल आयडी शोधून त्याला ही पोस्ट मेल कर 😉

 6. ऑक्टोबर 7, 2010 येथे 8:17 सकाळी

  एकदम मस्त. आवडल्या बातम्या. कल्पकता भन्नाट आहे.

 7. ऑक्टोबर 7, 2010 येथे 9:00 सकाळी

  अखिल वागळे .. माझा पण फेवरेट.. बातम्या लै भारी.. मज्जा आली वाचायला. मिडीयावर अगदी शालजॊडीतले मारले आहेत. ह ह पू वा…

  • ऑक्टोबर 7, 2010 येथे 9:11 सकाळी

   महेंद्र,
   अखिल वेगळे एकदम काल्पनिक आहे बरं का! अशा प्रकारची व्यक्ती अस्तित्वात असलेली माझ्या तरी ध्यानात नाही 🙂 . मिडीयाच्या भंपक पणावर बरेच दिवसांपासून लिहायचे होते. ह्यावेळी ते जमले.
   प्रतिक्रियेबद्दल धंन्यवाद.

   • नोव्हेंबर 10, 2010 येथे 2:12 pm

    आहे.. अशाच सिमिलर नावाची व्यक्ती आहे , जी असेच काहीतरी बरळत असते… 🙂

 8. ऑक्टोबर 7, 2010 येथे 6:52 pm

  लय भारी!
  अखिल वेगळे 😀

  • ऑक्टोबर 9, 2010 येथे 7:43 सकाळी

   विद्याधर,
   धन्यवाद! लिहिताना अखिल वेगळे असा जमून येईल ह्याची कल्पनाच आली नाही 🙂

 9. ऑक्टोबर 8, 2010 येथे 10:12 pm

  aadhi takaleli comment ithe alich nahi vatate.

  kaay error jhali kalat nahi.

  Faar jhakaas lekh.

  Shaal jodi toon pathani sota hanla ahet..

  • ऑक्टोबर 9, 2010 येथे 7:41 सकाळी

   निचिकेत,
   आधीची कॉमेंट मला तरी दिसली नाही. सेव्ह झाली नसावी.
   प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद!

 10. ऑक्टोबर 10, 2010 येथे 2:55 सकाळी

  मस्त मजा आली वाचायला….:)

 11. नोव्हेंबर 9, 2010 येथे 6:23 pm

  Akdum Jhakasss

  Tumache wagale sorry Vegale prem pahun Bharavun gelo 😉

  • नोव्हेंबर 10, 2010 येथे 11:09 सकाळी

   @विक्रम, हे वेगळे प्रेम हल्लीच उफाळून येत आहे 🙂 प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद!

 1. No trackbacks yet.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: