आमुचा शिक्षणाचा धंदा


संस्कृत मध्ये एक सुभाषित आहे,

नास्ति विद्या समं बन्धु नास्ति विद्या समं सुर्हुद्

नास्ति विद्या समं वित्तं नास्ति विद्या समं धनः

अर्थ :-  विद्येसारखा भाऊ नाही, विद्येसारखा मित्र नाही आणि विद्येसारखा पैसा किंवा त्यासम धन नाही.

आजच्या भांडवलवादी जगाने मात्र आपल्या सोयीप्रमाणे ह्या सुभाषिताच्या दुसऱ्या ओळीचा अर्थ समजून घेतला आहे आणि विद्यादानाच्या पुण्यकर्माला विद्याविक्रीचे बाजारी रूप आणले आहे. पूर्वी फक्त अभियांत्रिकी आणि वैद्यकीय शिक्षण बाजारू होते. आता प्राथमिक शालेय शिक्षण सुद्धा इतके महाग होऊ घातले आहे की पूर्वीचे शिक्षणसम्राट एकवेळ परवडले असे म्हणायची वेळ आली आहे. गेल्या एका वर्षात मुंबई-पुण्याच्या काही शाळांनी आपल्या फिया ५० ते १००% वाढवल्या आहेत. दोन मुलांची वर्षाची फी लाखाच्या घरात! आपल्या मुलाला उत्तम शिक्षण मिळावे म्हणून प्रत्येक पालकाची धडपड असते. खिशाला थोडी चाट पडली तरी चालेल पण मध्यमवर्गीय पालक आपल्या मुलाच्या शिक्षणात कुठलीही कसर सोडत नाहीत. पालकांच्या ह्याच मनोवृत्तीचा फायदा उठवला जातो आहे. आणि सरकार कडून काही अंकुश वगैरे ठेवला जाण्याची अपेक्षा धरणे म्हणजे रेड्याकडून दुधाची अपेक्षा करण्यासारखे आहे. गेल्या ६-७ महिन्यात सरकारने खासगी शाळांच्या फी संबंधी इतकी उलट सुलट पत्रके प्रसिद्ध केली आहेत की त्यांचा अर्थ लावत बसण्यात एखादा मनुष्य ठार वेडा होईल.

२००९ च्या निवडणूक वर्षात खासगी शाळांच्या फी आकारणीत सुसूत्रता यावी म्हणून सरकारने २१ सदस्यांची बन्सल समिती स्थापन केली. पण त्यात पण मेख अशी की २१ पैकी १४ सदस्य खासगी शाळांच्या संचालक पदांवर होते. साहजिकच ह्या समितीचा अहवाल खासगी शाळांना सोयीस्कर असाच, म्हणजे शाळाना सरसकट ५०% फी वाढीची परवानगी देणारा. ह्या अहवालाच्या सादरीकरणात समितीतील पालक प्रतिनिधींनी सही केलेली नाही. ह्या अहवालावर काहीही निर्णय न घेता सरकारने हा अहवाल बासनात गुंडाळून २००९ नोव्हेंबर मध्ये फी वाढीला बंदी घालणारे एक पत्रक काढले. मग शाळा गेल्या कोर्टात. कोर्टाने सरकारचे पत्रक रद्द ठरवून सरकारला बन्सल कमिटीचा अहवाल सादर करायला आणि विद्यार्थ्यांचे हित जपता येईल असे धोरण स्वीकारायला सांगितले. तेव्हा पासून शिक्षण मंत्रालय उलट सुलट पत्रकं काढण्यात दंग आहे. शाळांनी मात्र कोर्टाचा निकाल आपल्या बाजूने लागल्याची दवंडी पिटून सर्रास फी वाढ केली. कोर्टाने विद्यार्थ्यांचे हित जपण्याबाबत केलेली टिपणी  सर्वजण सोयीस्कररित्या विसरले आहेत. आता काल पुन्हा कोर्टासमोर सरकारने नाक घासून आज पर्यंत प्रसिध्द केलेली सर्व पत्रकं रद्द करून १५ जुलै पर्यंत बन्सल समितीबाबत काय तो निर्णय घेण्याच कबूल केलंय. म्हणजे तोपर्यंत शाळांवर काही अंकुश नाही आणि फी वाढवायला शाळा मोकळ्या.

एकीकडे right to education सारखे कायदे करायचे आणि दुसरीकडे हा मुलभूत हक्क न परवडणारा करून ठेवायचा असा सरकारी कारभार. म्हणजे कर भरणारा जो मध्यमवर्ग तोच पिळला जाणार. पण जिथे गरीबांसाठी राबवल्या जाणाऱ्या सर्व शिक्षा अभियान सारख्या योजनेत राजरोस भ्रष्टाचार होतो अशा राज्यात कसली अपेक्षा ठेवणार? खरंतर सरकारला जाणून बुजून हा प्रश्न कुजवत ठेवायचा आहे अशी शंका येते. शालेय शिक्षणाचे सदा हरित कुरण चरायला शिक्षण संस्था सज्ज आहेत. कोठचे हात कसे ओले करायचे हे त्यांना चांगले ठाऊक आहे. आणि पांढरपेशा मध्यमवर्ग थोडी कुरकुर करेल आणि निमूट फिया भरेल. निवडणुकीच्या वेळी सरकारच्या नावाने बोटं मोडत घरी बसेल. हे सर्वांना चांगले ठाऊक आहे.

तरी बरं पालकवर्ग सध्या बऱ्यापैकी जागृत आहे. आमच्या मुलांच्या शाळेतील बरेच पालक एकत्र येऊन फी वाढीशी सामना कसा करायचा ह्यावर विचार करतायत. इतर शाळातसुद्धा अशीच परिस्थिती होतेय. बघूया पालकांच्या एकत्र येण्याने ह्या माजोरड्या संस्थाना काही लगाम घालता येतोय का!

Advertisements

8 thoughts on “आमुचा शिक्षणाचा धंदा”

 1. खरंच भयानक प्रकार चालू आहेत. आईबाबांनी आमचं कॉलेज शिक्षण कर्ज काढून पूर्ण केलं. आम्हाला लेकाच्या शालेय शिक्षणासाठीच कर्ज काढावं लागणार बहुतेक !! 😦

  1. हेरंब,
   भारतात येण्यापूर्वी लेकाच्या पूर्ण शिक्षणाची भरपूर तजवीज करून ठेव. तिकडे आहेस तो पर्यंत शालेय शिक्षणाचा तरी खर्च नाही!

 2. फार फार कठिण व आवाक्याबाहेरचे झालेयं सगळेच. कॉलेजच्या फीजनी तर तोंडाला फेस आणलायं. आपण मध्यमवर्गीय किमान शिक्षण तरी मुलांना देऊ शकत होतो पण आताशा कितपत परवडेल अशी शंका भेडसावू लागली आहे. 😦 ते पुरेपूर जाणून आहेत, थोडा विरोध होईल….दोनचार डोकी एकत्र येऊन प्रयत्न करतील आणि मग इतर निमुटपणे फिया भरत आहेत हे पाहून नाईलाजाने तोच मार्ग अवलंबतील.

  1. भानस ताई
   ब्लॉग वर स्वागत! मी पण आपल्या ब्लॉगचा वाचक आहे. जनतेची मूग गिळून स्वस्थ बसण्याची सवय आणि आहे ती परिस्थिती जुळवून घेण्याची तयारी ह्यामुळे त्यांचं फावतं. चार डोकी एकत्र करणं किती कठीण आहे हे ह्या निमित्ताने आम्हाला कळून चुकलं आहे.

 3. >>आजच्या भांडवलवादी जगाने मात्र आपल्या सोयीप्रमाणे ह्या सुभाषिताच्या दुसऱ्या ओळीचा अर्थ समजून घेतला आहे
  एकदम खरं…अगदी मनातलं..
  अहो बालवर्गातल्या मुलांची फीसुद्धा माझ्या इंजिनियरिंगच्या फीपेक्षा जास्त असते, आणि मी फार वर्षांपूर्वीची गोष्ट करत नाही..माझं सरकारी कॉलेज होतं म्हणून ठीक…काहीच्या काही फिया ठेवतात..पण मला आश्चर्य ह्याचं वाटतं, की भरणारे भरतात पण..काहीही खळखळ न करता…
  नवश्रीमंत वर्गातल्या अनेकांना वाटतं, की जास्त महाग म्हणजे जास्त क्वालिटी..मग आमच्या शाळे सारख्या एकेकाळच्या उत्तम मराठी शाळांचीही क्रीम विद्यार्थ्यांविना रया गेल्यागत वाटते…वाईट वाटतं पाहून…
  पुलंनी कित्येक वर्षांपूर्वीच निरिक्षण करून ठेवलं होतं..’असा मी असामी’त…
  ‘ह्या शाळा म्हणजे काय, किया भरा आणि लोकांच्या पोरांचे वाढदिवस साजरे करा’…:)

  1. मराठी शाळांची रया गेली आहे हे मात्र खरं. खरंतर पालकांची “इंग्रजी शिवाय गत्यंतर नाही” ही मनोवृत्ती त्याला जबाबदार आहे (आम्हीही त्यातून सुटलेलो नाही!)

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s