विवाहसंस्थेचे वर्तमान


१२ जूनच्या लोकसत्ताच्या चतुरंग पुरवणी मध्ये अभिनेता श्री अतुल कुलकर्णी ह्यांचा “विवाहाच्या उत्क्रांतीचे वर्तमान” ह्या शीर्षकाचा एक  उत्कॄष्ठ लेख आहे. एक विचारवंत अभिनेता म्हणून आधीच प्रिय असलेल्या अतुलची एक विचारवंत लेखक म्ह्णून झालेली ही नवीन ओळख स्वागतार्हच आहे. आपले विचार, जरी ते वादजनक असले तरी, संयमित पणे कसे मांडावे ह्याचे उत्तम उदाहरण म्हणजे अतुल ह्यांचा लेख. मागच्याच आठवड्यात “विवाहाच्या उत्क्रांतिचा इतिहास” हा मंगला सामंत ह्यांचा महितिपूर्ण लेख वाचला. त्याच संकल्पनेचा धागा पकडून अतुलनी आपला लेख लिहिला. लेख वाचल्यावर बराच वेळ विचार केला आणि प्रतिक्रिया म्हणून इकडे लिहायचे ठरवले.

श्री अतुल ह्यांच्या लेखात त्यांचा विवाहसंस्थेवरचा आक्षेप स्पष्ट दिसून येतोय. त्यांचे हे वाक्य पहा:  “लग्नसंस्था ही एक मानवनिर्मित कृत्रिम व्यवस्था आहे आणि विवाहसंस्थेचंएक पुरुष आणि एक स्त्रीहे आजचं स्वरूप या कृत्रिमतेचे टोक आहे.” ह्या विधानासाठी एक नर अनेक माद्या किंवा एक मादी अनेक नर हे “basic instinct” आहेत हया शरीरसंबंधाच्या जीवशास्त्रीय नियमाचा ते आधार घेतात. मात्र मानवाच्या उत्क्रांतिमधून फक्त हाच मुद्दा वेगळा करून कसं चालेल? इतर प्राण्यांपासून मानवजीव जास्त प्रगत झाला तेव्हा त्याने त्याच्या बऱ्याच  basic instincts  वर काबू मिळवला. “बळी तो कान पिळी” (survival of the fittest)  हा पण एक basic instinct च आहे. पण मानवाने त्यावर बऱ्यापैकी मात मिळवून सबळ आणि दुर्बळ घटकांचा (ह्यात दुर्बळ घटक हा शब्द स्त्रीला उद्देशून नाहीये) एकत्र समाज बनवला. तेव्हा लोकशाही ही संस्था सुध्दा कॄत्रिम नव्हे काय? लोकलज्जेस्त्व वस्त्रधारण ही पण कॄत्रिम रीत नव्हे काय? पण ह्या कॄत्रिम संस्था मानवाने आपल्यावर लाद्ल्या नसत्या तर आपल्यात आणि श्वापदात फरक तो काय?

लग्न संस्था मानवावर एक नर एक मादी ची सक्ती करते असे अतुल म्हणतात. पण मी म्हणतो, बिघडले कुठे? मला वाटते कि उत्क्रांतिच्या एका ट्प्प्यात सक्षम प्रजननासाठी permutation and combinations of genes गरजेचे होते, त्यामुळे मानवाला polygamy and polyandry चे basic instincts प्राप्त झाले. मात्र अधुनिक काळात त्याचा काय उपयोग? जसे हळुहळु शेपटी गळून पडली तशी ही भावना पण कधीतरी लुप्त होइलच. लग्न ह्या संस्थेमध्ये ह्या basic instincts चा विचार नाही म्हणून ती लग्नसंस्थाच अमान्य करणे योग्य आहे काय?

लेखात पुढे अतुल म्हणतात की सध्याचे घटस्फोटाचे वाढते प्रमाण हे चुकीची व्यवस्था चॅलेंज होण्याचा परिणाम आहे. हा मुद्दाही तितकासा पटला नाही. तो सरसकट “बंधनात” अडकवले जाण्याचा परिणाम नाहीये तर “सक्तिने बंधनात” अडकवले जाण्याचा परिणाम आहे. विवाहसंस्थेचे फायदेतोटे लिहिताना आर्थिक सुसुत्रिकरण आणि कौटुंबिक स्थिरता हे फायदे अतुल मान्य करतात, पण तिकडेही तोटे लिहिताना लादलेली monogamy हा पहिला तोटा लिहिला जातो. पण हया तोट्यामुळे खरच किती नुकसान होते आहे? अन्न वस्त्र निवारा ह्या इतकी polygamy and polyandry नक्कीच महत्त्वाची नाही. मग त्याचा इतका ऊहापोह कशाला? ह्या गोष्टींना अतुलनी अवास्तव महत्त्व दिले आहे असे मला तरी वाटते.

आजच्या लग्नसंस्थेत बदल हवेत हे मात्र पटते. कुटंबातील स्त्रीच्या बदलत्या भूमिकेची दखल घेउन हे बदल व्हायला हवेत. आणि ते हळुहळु होतही आहेत. गावाकडच्या मुली सुध्दा आता वराबद्दलच्या अपेक्षा मांडू लागल्या आहेत. विवाहाच्या बंधनात अडकण्यापूर्वी compatibility checks हे मध्यमवर्गात होऊ लागले आहेत. ओपन मॅरेज, लिव्ह इन ह्या गोष्टी पचायला कठीण पण दखलपात्र नक्कीच आहेत. मला तरी वाटते कि ज्यांना ह्या गोष्टी अजमावायच्या आहेत त्यांनी मुल होऊ देण्याच्या अगोदर काय ते अनुभव घ्यावेत. मुलांच्या भावनिक विकासाच्या दॄष्टीने विवाहसंस्थेला दुसरा पर्याय मला तरी योग्य वाटत नाही.

लेखाच्या शेवटी अतुल विचारतात, “ही सगळी अधोगती वाटते? मूर्खपणा वाटतो? राग येतो? भीती वाटते? हे होणं अशक्य वाटतं? निदान भारतीय समाजात?(!) मंगलाताईंच्या लेखातले (किंवा राजवाडेंच्याभारतीय विवाहसंस्थेचा इतिहासया पुस्तकातले) काही उल्लेख वाचूनदेखील आपलं आजचं सुसंस्कृत (?) मन असंच बेचैन होत नाही काय? तो तर आपला इतिहास आहे.”  अहो पण आपला इतिहास असंस्कॄत होता म्हणून आपण पण असंस्कॄत गोष्टींचा पुरस्कार करावा काय? आदिमानवाच्या काळात भावनाविरहीत शरीरसंबंध होता त्यामुळे ज्या गोष्टी ग्राह्य होत्या त्या गोष्टी आजच्या भावनाप्रधान अशा आपल्या विकसित मेंदूला कशा बरे पटतील?

कोण जाणे, कदाचित माझे विचार काही पुरोगामी लोकांना बुरसटलेले वाटतील. पण अतुलच्या लेखात झालेले polygamy / polyandry चे पुर:स्करण मला तरी अनुचित वाटले म्हणून हा लेखनप्रपंच !

Advertisements

12 thoughts on “विवाहसंस्थेचे वर्तमान”

 1. विवाहसंस्थेवर आक्षेप घेताना प्राण्यांत कामोद्दीपनाचा काळ मर्यादित असतो तर माणसाच्या बाबतीत या काळाला मर्यादा नसते याकडे अतुल कुलकर्णी यानी दुर्लक्ष केले आहे.

 2. अतुल कुलकर्णी हे माझ्या सर्वांत आवडत्या अभिनेत्यांपैकी एक आहेत. पण हा त्यांचा मुद्दा फार खटकला!
  पॉलिगॅमी ही काही मूलभूत गरज नाही, की ज्या बेसिसवर आपण विवाहसंस्थेला चॅलेंज करावं….
  तुमचं मत अगदी बरोबर आहे, की ‘सक्तीच्या’ बंधनामुळे विवाह धोक्यात येतात, बंधनांमुळे नाही!
  बाकी ‘लिव्ह इन’ वगैरे प्रकार खरंतर किचकटच..पण ते करायचे तर मुलांच्या आधी हे एकदमच पटलं…
  सही लिहिलंय एकदम तुम्ही!

  1. विद्याधर,
   धन्यवाद!, मीही अतुलचा चाहता आहे. त्यांचा अभिनयच नव्हे तर लिखाणसुद्धा मस्तच आहे. पण विचार काही पटले नाहीत बुवा!

 3. हेच, अगदी असेच विचार हां लेख वाचताना मनात येत होते.

  हे लिहून एक मोठ्ठं काम केलंत.

  पूर्ण सहमत.

  पण उदात्तीकरण करायला अतुलने लेख लिहिलाय असं वाटत नाही.

  त्यानं facts सांगितल्या आहेत.

  1. नचिकेत,
   ब्लॉगवर स्वागत! अतुलनी फॅक्ट मांडल्या असल्या तरी अप्रत्यक्षपणे पॉलिगामीचं समर्थन केलं आहे असं मला तरी वाटतं.

 4. लेख वाचला. खुप विचित्र विचार आहेत अतूलचे.
  १)सध्याचे घटस्फोटाचे वाढते प्रमाण हे चुकीची व्यवस्था चॅलेंज होण्याचा परिणाम आहे. म्हणजे नेमकं काय ते समजलेलं नाही.
  २) लादलेली monogamy हा पहिला तोटा लिहिला जातो.
  हा मुद्दा तर अजीबात पटला नाही. लादलेली म्हणजे काय? काहीतरीच वाटलं वाचतांना. मुद्दा अजिबात पटलेला नाही. पॉलीगामी मुळे काय फायदे होणार आहेत हेच समजलेले नाही. आपण सुसंस्कृत म्हणवतो, तेंव्हा काहीतरी नियम हवेतच!
  जर आज एखाद्याला पॉलीगामी ची परवानगी दिली गेली तर तो वेश्येकडे जाईल का? किंवा परवानगी नाही म्हणून जाणार नाही असे आहे का? जे काही आहे, ते संस्कारांवर अवलंबुन आहे असे वाटते.
  तुमचे ऍनॅलिसीस मात्र छान आहे.

  1. महेंद्र,
   संस्काराला महत्त्व आहेच. पण मला वाटतं कि अतुलचं मत असं आहे कि आपले संस्कारच चुकीच्या समजुतीवर तयार झाले आहेत 😦

 5. अतुल माझा अतिशय लाडका अभिनेता व लेखक-कवी. अतुलच्या लेखात त्याने नचिकेत म्हणतो तसे उदात्तीकरण केले नसून सत्य मांडलेयं. दुसरे म्हणजे पॉलिगामीचं समर्थन म्हणण्यापेक्षा केवळ लादले गेलेय म्हणून हे करा किंवा करू नका असे होता नये. अनेक विवाह अगदी चाळीस वर्षे होऊनही लादले गेलेत या स्वरूपातच असतात व त्यातला एकजण राम म्हणत नाही तोवर नाईलाजाने खेचत राहतात. आपले विवेचन आवडले.

  1. अतुल कवी पण आहे हे माहित नव्हतं.
   अतुलनी सत्य मांडलय हे खरं आहे, पण एकून लेखाचा रोख पाहता कुठेतरी polygamy चे नकळत समर्थन होतेय असे वाटले. ह्याबाबत मी चूक असेन कदाचित.
   ” केवळ लादले गेलेय म्हणून हे करा किंवा करू नका असे होता नये.” हे पटले!

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s