येरे येरे पावसा


अर्धा मे संपला. पुण्यात गरमीने अंगाची लाही लाही झाली आहे. मुंबईत कायमच्या पाणी टंचाईने अजून तीव्र रूप धारण केलं आहे. खेडोपाडी नद्या / विहिरी आटल्यात आणि लोकांची पाण्यासाठी पायपीट चालू झाली आहे. अशा परिस्थितीत “येरे येरे पावसा” कोण म्हणणार नाही? काल अंदमानात पाऊस आल्याचं ऐकून खरंच बरं वाटलं. बाकी येरे येरे पावसा ही कविता कोणी लिहिली ते माहित नाही, पण कवि सरकारी कामात खूपच जाणकार असावा. पैसा टाकल्याशिवाय काम होत नाही हे त्याला चांगल ठावूक आहे. मात्र ह्याच कवितेचं दुसर कडवं म्हणतं

येगं येगं सरी माझे मडके भरी

सर आली धावून मडके गेले वाहून.

ह्या ओळी मात्र सद्यस्थितीचं रास्त वर्णन करतात. पाऊस आला की असा कोसळतो की बहुतांश पाणी हे वाहून जातं. समुद्राला मिळतं आणि आपण बसतो पाणी टंचाईच्या नावाने शंख करीत.

वाढती लोकसंख्या , बेसुमार वृक्षतोड आणि घटणारी भूजल पातळी ह्या गोष्टींमुळे पावसाचे पाणी अडवून जिरवणे ही काळाची मोठी गरज बनली आहे.  फक्त गावातच नाही तर शहरात सुद्धा  ह्याची गरज आहे. गावात तेवढे डांबरीकरण नसल्याने पाणी जिरायला वाव बरा असतो. पण शहरात डांबर किंवा सिमेंटचे रस्ते! तेव्हा पाण्याला जिरायला वावच नाही. सगळे पाणी गटारात जाते. तेव्हा पाणी टंचाई कमी करायला नुसते सरकारवर अवलंबून न राहता प्रत्येकाने आपापल्या परीने प्रयत्न करायला हवेत. तहान लागल्यावर विहीर खोदायची आपली सवय. पण विहीर खोदायला जमिनीत पाणी तर हवे ना? तेव्हा तहान लागायची वाट नं पाहता, आपापल्या परीने प्रत्येकाने आत्ताच प्रयत्न करायला हवेत.

चांगली गोष्ट ही की लोकं जागृत होत आहेत. गावांमध्ये ओढ्यांना कच्चे बांध घालणे, शेततळी खणणे, डोंगरात चार खणणे अशा उपायांनी बरेच फायदे झाले आहेत. हिरवे बाजार, राळेगंज सिद्धी ह्या सारखी एकेकाळची दुष्काळग्रस्त गावं ह्या उपायांनी पाण्याच्या बाबत स्वयंपूर्ण झाली आहेत. ग्रामीण जनतेपेक्षा शहरातील जनता पाणी जास्त वापरते. तेव्हा पाण्याचा जपून वापर करण्याबरोबरच जल संवर्धनाची जबाबदारी पण शहरांनी पेलली पाहिजे. पालिकेने नियम करायची वाट न पाहता प्रत्येक सोसायटीने रेन वॉटर हार्वेस्टिंग करणे नितांत गरजेचे आहे.

माझ्या लहानपणापासून आमच्या सोसायटीत नेहमीच पाण्याची बोंब असे. ३-४ तासाच्या वर कधी पाणी येत नसे. मग प्रत्येकाच्या घरात  सिंटेक्सच्या टाक्या. पावसाळ्यात शेतकरी जसा ढगाकडे डोळे लाऊन बसतो तसे रोज सकाळी माझे वडील ह्या टाकीकडे डोळे लाऊन असायचे. एकदा टाकी भरली की आम्ही सारे हुश्श करत असू. आणि मग दिवसभर पाणी जपून वापरायचे. कोणी पाहुणे आले आणि बाथरूम मध्ये जाऊन आले की माझे वडील लागलीच बाथरूम मध्ये जाऊन पाहुण्यांनी नळ बरोबर बंद केलाय ना ह्याची खात्री करून घेत. कोणाला राहायला बोलवायचे तर पाणी सर्वांना पुरेल ना ह्याचीच काळजी असे. पण ह्यामुळे एक झाले ते म्हणजे पाणी जपून वापरायची नकळतच सवय लागली.

पुण्यात घर बांधायला घेतलं तेव्हा सुरवातीपासूनच रेन वॉटर हार्वेस्टिंग करायचं ठरवलं. नशिबानं बोर पण लागली. तेव्हा गच्चीत पडणार सर्व पाणी एकत्र गोळा करून बोर मध्ये परत सोडलं. पाऊस पडायला लागला की गच्चीतल पाणी धबाधबा खालच्या टाकीत पडतं आणि हा हा म्हणता बोर मध्ये मुरतं. ते बघताना एक वेगळच समाधान लाभतं. उपलब्ध माहिती नुसार एका पावसाळ्यात जवळपास ५० ते ६० हजार लिटर पाणी बोर मध्ये भरलं जातं. माझ्या मित्राचा अनुभव आहे. त्याच्या जवळपासच्या विहिरी मार्च पर्यंत आटायच्या . ह्याने रेन वॉटर हार्वेस्टिंग सुरु केल्या पासून आसपासच्या विहिरींची पाण्याची पातळी वाढली.

जेव्हा सोसायट्या रेन वॉटर हार्वेस्टिंगचे प्रस्ताव मांडतात तेव्हा काही नतद्र्ष्ट सभासद जास्त खर्च पडेल म्हणून आडून बसतात. अहो, उद्या पाणीच संपलं तर करायचे काय ते वाचवलेले पैसे? तेव्हा थोडा सारासार विचार करून अशा विधायक कामांना सर्वांनी हातभार लावणे गरजेचे आहे. आणि हो! अगदिच काही नाही तर आपल्या हातून पाण्याची नासधूस तरी होणार नाही एवढी काळजी तरी घेता येईलच ना!

Advertisements

10 thoughts on “येरे येरे पावसा”

 1. जबरदस्त माहिती दिलीत तुम्ही…खरंच शहरात लोकांमध्ये जागरुकता आली नाहीय..सगळ्यांना शॉर्ट टर्मचा विचार करण्याची सवय लागलीय…

 2. गंगा-कावेरी जोडण्याची योजना भूजल स्थिती सुधारावी म्हणून आखली होती. केंद्रीय पाटबंधारे खात्याने तिचा निकाल लावला.

  1. मनोहर, नदी जोड प्रकल्प नं होणं हे देशाचं दुर्भाग्यच म्हणायला हवं.
   महेन्द्र, सोसायटीवाल्यांची ही मनोव्रुत्ती सगळीकडेच आहे. सामाजिक बांधिलकीची जाणीव आपल्याला कधी होणार आहे कोण जाणे.
   विद्याधर, खरं आहे. शॉर्टटर्म विचार करण्यामुळे आपल्या पुढच्या पिढीचेच आपण नुकसान करतोय ह्याची पण जाणीव नाहीये.
   हेरंब, लहानपणी अनुभवलेली पाणीटंचाई बरंच शिकवून गेली. म्हणून हे करायची प्रेरणा लाभली! By the way, that Month compulsory thing is a side-effect of the new theme. Tried looking for the code to change, but could not find 😦
   आणि हो!, नवीन परिचयात अहो जाहो ठिक आहे, आता अरे तुरे करायला हरकत नाही 🙂

 3. पाणी कमीपडलं तर सोसायटीवाले टॅंकर मागवतील, तो खर्च चालतो, पण रेन हार्वेस्टींग सारख्या गोष्टींना कायम विरोधच असतो. आमच्या पण सोसायटीत सरळ मोडीत काढलं बोअरवेलचं सजेशन.

 4. उत्तम कल्पना.. आणि तुम्ही त्याची अंमलबजावणी करताय हे सगळ्यात महत्वाचं !!

  वर नावाच्या ठिकाणी ‘महिना (आवश्यक)’ असं दिसतंय. मी चुकून मे लिहिणार होतो 😛

 5. ’बोले तैसा चाले’ साठी तुमचं उदा. द्यायला हवं नाहीतर पाणी वाचवा म्हणून सांगणारेच कितीवेळा असं काही करत असतील??
  आपण अजुनही काही उपक्रम करत असालच, जसं झाडं लावणे आणि जगवणे इ…त्यासाठी शुभेच्छा…

  1. अपर्णा,
   प्रतिक्रिये बद्द्ल धन्यवाद! रेन वॉटर हार्वेस्टींग बरोबरच अजून बरेच काही केले आहे. ओला कचरा जिरवणे, थंडाव्यासाठी गच्चीत लॉन, जांभा दगडाचे बांधकाम, विंडमील, सौर ऊर्जा इत्यादी!

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s