आंबा पिकतो


आंबा पिकतो रस गळतो कोकणचा राजा झिम्मा खेळतो

आंबा, त्यातही हापूस म्हणजे मराठी माणसाचा अगदी वीकपॉइंट! मात्र आजकाल हा कोकणचा राजा झिम्मा खेळायचे सोडून लपंडाव आणि खोखो (मद्रासी भावा बरोबर) हेच खेळ जास्त खेळायला लागला आहे. मी भारतात परतून ४ वर्ष झाली, पण दर वर्षी “यंदा आंबा कमी” हेच पेपरात वाचतोय. पण हया फळाची बाजारातील आवक कमी झाली तरी घरातील आवक काही कमी झाली नाही. आणि कशी होणार? शेवटी दहा वर्षांचा वचपा भरून काढायचा होता ना!

मुंबईला असताना आंबा खरेदीचे काम आमच्या वडिलांकडे लागलेले असायचे. विलेपार्ल्याच्या मार्केटातून हापूस आणि पायरी आणून त्यांच्या पक्वतेनुसार पलंगाखाली रचून ठेवले जायचे. मग रविवार म्हणजे आमरस पूरी आणि बटाटा भाजी! तेव्हा डायट, कॅलरीज असे अप्रिय शब्द मध्यमवर्गात रूढ झाले नव्ह्ते. आणि वाढतं वय होतं तेव्हा दाबून जेवण करायचो. एकदा मावशी ने पैज लावली, ५० पुऱ्या खायच्या. आणि हवा तितका आमरस. ५० पुऱ्या खाल्ल्या तर १०० रुपये बक्षीस. मी तब्बल ४० पुऱ्या खाल्ल्या! पण मग पुलावाचा घमघमाट खुणावू लागला म्हणून म्हट्ले, १०० रू गेले तेल लावत! पुलावाचा समाचार घेऊ! हाय! गेले ते दिन गेले.

बाळपणी कोकणात आजोळी जायचो तिकडे रायवळ आंबे विकायला यायचे. आजोबा शेकड्याने घ्यायचे. भूक लागली की उचल आंबा आणि लाव तोंडाला. कोकणातून परत येई पर्यंत सगळे कपडे आंब्याच्या डागांनी पिवळे! पण हापूस आंबा मात्र फोडी करूनच खायचा. नंतर कुठे तरी हापूसच्या गोल फोडी करून त्या बाउल सारख्या धरून चमच्याने खायची पद्धत पाहिली. खरा आंब्याचा शौकीन असा आंबा खाणार नाही, पण मला मात्र ती पद्धत आवडली.

आंबा खरेदी करणे ही सुद्धा एक कला आहे हे मला माहीत नव्ह्ते. रचलेल्या राशींमधून चांगली फळं शोधून घ्यायला तयार नजरच पाहीजे. आमच्या वडिलांना आहे अशी नजर. माझ्या मामाची पण नजर अशीच पक्की. तो सकाळी उठून क्रॉफर्ड मार्केटच्या घाऊक बाजारात जायचा. तिकडे सौदा पेट्यांचा (आंब्याच्या. भाई लोकांच्या पेट्या नव्हे!) आणि मुरलेला ग्राहक तोंडाने सौदा करत नसे. तिकडच्या व्यापाऱ्यांची बोटांची सांकेतिक भाषा असे. मामाला ती भाषा चांगलीच अवगत होती. त्यामुळे इतरांपेक्षा स्वस्तात मस्त आंबे मिळत असत. मला मात्र आंबा खरेदी नीट जमत नाही. भाव करणे (कुठल्याच गोष्टीत) तर आयुष्यात कधी जमेल असे वाटत नाही. कित्येक वेळा हापूस म्हणून मद्रास / बंगलोरचा टुकार आंबा घेऊन आलो आहे. मग नंतर आंब्याच्या पेटीतील पेपर पाहून कोकणातला आहे की नाही हे पाहू लागलो. कोणाला माहित? हे विक्रेते कोकणातून रद्दी आणून त्यात मद्रासचा आंबा पॅक करतही असतील.

ह्या वर्षी पहिले काही दिवस असेच नकली आंबे खाल्ले. पण कालच माझ्या एका वहिनीच्या माहेरून थेट रत्नागिरीहून पेटी आली आणि खऱ्या हापूसची चव जीभेला पटली. अहाहा! आमरस खाऊन झाला आणि लागलीच लेख लिहायला बसलो!

Advertisements

11 thoughts on “आंबा पिकतो”

 1. रत्नागिरीच्या हापूसची बातच न्यारी. अहो जसा तुम्हाला बंगलोर/म्हैसूरचा आंबा कोकणातला सांगून विकला तसा इथे बंगलोरला कुठला तरी आंबा हापूस म्हणून विकताना मी पाहिलेले आहे.
  मला पण गेल्या आठवड्यातच घराहून हापूसची पेटी आली. मी पण टाकतो फोटो म्हणजे लोकं निषेध करायला मोकळी. 😉
  बाकी ४० पुर्‍या आणि वर पुलाव!!! क्या बात है मानलं बुवा.

  1. सिद्धार्थ,

   हापूस ओळखायचे क्लासेस निघाले पाहिजेत आता!

   बाकी ४० पुऱ्या वगैरे गोष्टी म्हणजे गद्धे पंचवीशीतला आचरट पणा होत्या 🙂 आता आठवताना हसू येते!

   प्रतिक्रिये बद्दल आभार!

 2. हापूस ओळखणे हा सर्टिफिकेट कोर्स होणे आवश्यक आहे आणि चांगला हापूस दुबईला जातो आणि आपल्याला फुटकळ मिळतो, ह्यावरही तात्विक चिंतन होणे गरजेचे आहे!
  बाकी…चाळीस पुर्‍या आणि पुढे पुलाव..डेडली.

 3. रविवार म्हणजे आमरस पूरी आणि बटाटा भाजी!…. सही…
  बायको माहेरी गेली आहे राव… भुर्जी-पाव वर जगतोय.. आणि तुम्ही असल्या पोस्ट टाकता…. 😀

 4. ४० पुरया आणि वर पुलाव…एकदम जबरा..हापुस आंबा माझाही वीक पॉंईट..
  गेले २-३ दिवस अगदि मनसोक्त आस्वाद घेतला असल्याने हया चविष्ट पोस्टचा निषेध करत नाही..

  1. @विद्याधर, चांगला हापूस खायचा तर कोकणात कनेक्शन पाहिजे, नाहीतर दुबईची ट्रिप!
   @गजानन, तुमचे बुर्जी पावचे दिवस लवकर संपो हीच प्रार्थना
   @देवेन्द्र, ४० पुऱ्यांचं नवल आता मला पण वाटलं. आता ५ च्या वर नाही खाउ शकत!

 5. अरेच्च्या .. आंब्याची पोस्ट आणि माझी वाचायची राहून कशी गेली !!!
  खादाडीच्या (आणि विशेषतः आंब्यांच्या) पोस्ट्स मी निदान निषेध करण्यासाठी तरी वाचतोच 😉 ..
  तेव्हा तुमचा जोरदार निषेध !!! आणि ४० पुर्‍या??? बाप रे बाप.. धन्य आहे 🙂

  1. हेरंब,
   हापूसच्या बाबतीत आम्ही न्यू जर्सी करांचा निषेध करायला हवा. आता हापूस आयातीला अमेरिकेत परवानगी आहे ना! बाकी ४० पुऱ्यांबाबतच्या प्रतिक्रीया पाहून असं वाटतंय की भलताच आचरटपणा झाला होता 🙂

 6. >> आता हापूस आयातीला अमेरिकेत परवानगी आहे ना!

  नाही रे. मला वाटतं बुशच्या पहिल्या (की दुस-या?) टर्म मध्ये फक्त एक वर्ष परवानगी होती असं काहीतरी मी ऐकलं आहे. पण नंतर पुन्हा त्यांनी quality आणि hygiene ची कारणं देऊन आमच्या मुखीचा आंबा काढून घेतला 😦

 7. हाय! गेले ते दिन गेले….:)

  निषेध करणार होते पण यावेळी आंबा खायला खास गेलो होतो मुंबईला मेमध्ये त्यामुळे सध्यातरी तृप्त आहे….शिवाय येताना थोडा आमरसही फ़्रीज करुन आणला आहे….दुधाची तहान ताकावर…
  सगळे आंबे एकीकडे आणि कोकणातला हापुस एकीकडे. उगाच नाही त्याला राजा म्हणत…माझा मुलगा आल्या-आल्या नेहमीच्या सवयीने अमेरिकेतही नाश्त्याला ’आमा’ मागायला लागला…:)

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s