आंबा पिकतो

आंबा पिकतो रस गळतो कोकणचा राजा झिम्मा खेळतो

आंबा, त्यातही हापूस म्हणजे मराठी माणसाचा अगदी वीकपॉइंट! मात्र आजकाल हा कोकणचा राजा झिम्मा खेळायचे सोडून लपंडाव आणि खोखो (मद्रासी भावा बरोबर) हेच खेळ जास्त खेळायला लागला आहे. मी भारतात परतून ४ वर्ष झाली, पण दर वर्षी “यंदा आंबा कमी” हेच पेपरात वाचतोय. पण हया फळाची बाजारातील आवक कमी झाली तरी घरातील आवक काही कमी झाली नाही. आणि कशी होणार? शेवटी दहा वर्षांचा वचपा भरून काढायचा होता ना!

मुंबईला असताना आंबा खरेदीचे काम आमच्या वडिलांकडे लागलेले असायचे. विलेपार्ल्याच्या मार्केटातून हापूस आणि पायरी आणून त्यांच्या पक्वतेनुसार पलंगाखाली रचून ठेवले जायचे. मग रविवार म्हणजे आमरस पूरी आणि बटाटा भाजी! तेव्हा डायट, कॅलरीज असे अप्रिय शब्द मध्यमवर्गात रूढ झाले नव्ह्ते. आणि वाढतं वय होतं तेव्हा दाबून जेवण करायचो. एकदा मावशी ने पैज लावली, ५० पुऱ्या खायच्या. आणि हवा तितका आमरस. ५० पुऱ्या खाल्ल्या तर १०० रुपये बक्षीस. मी तब्बल ४० पुऱ्या खाल्ल्या! पण मग पुलावाचा घमघमाट खुणावू लागला म्हणून म्हट्ले, १०० रू गेले तेल लावत! पुलावाचा समाचार घेऊ! हाय! गेले ते दिन गेले.

बाळपणी कोकणात आजोळी जायचो तिकडे रायवळ आंबे विकायला यायचे. आजोबा शेकड्याने घ्यायचे. भूक लागली की उचल आंबा आणि लाव तोंडाला. कोकणातून परत येई पर्यंत सगळे कपडे आंब्याच्या डागांनी पिवळे! पण हापूस आंबा मात्र फोडी करूनच खायचा. नंतर कुठे तरी हापूसच्या गोल फोडी करून त्या बाउल सारख्या धरून चमच्याने खायची पद्धत पाहिली. खरा आंब्याचा शौकीन असा आंबा खाणार नाही, पण मला मात्र ती पद्धत आवडली.

आंबा खरेदी करणे ही सुद्धा एक कला आहे हे मला माहीत नव्ह्ते. रचलेल्या राशींमधून चांगली फळं शोधून घ्यायला तयार नजरच पाहीजे. आमच्या वडिलांना आहे अशी नजर. माझ्या मामाची पण नजर अशीच पक्की. तो सकाळी उठून क्रॉफर्ड मार्केटच्या घाऊक बाजारात जायचा. तिकडे सौदा पेट्यांचा (आंब्याच्या. भाई लोकांच्या पेट्या नव्हे!) आणि मुरलेला ग्राहक तोंडाने सौदा करत नसे. तिकडच्या व्यापाऱ्यांची बोटांची सांकेतिक भाषा असे. मामाला ती भाषा चांगलीच अवगत होती. त्यामुळे इतरांपेक्षा स्वस्तात मस्त आंबे मिळत असत. मला मात्र आंबा खरेदी नीट जमत नाही. भाव करणे (कुठल्याच गोष्टीत) तर आयुष्यात कधी जमेल असे वाटत नाही. कित्येक वेळा हापूस म्हणून मद्रास / बंगलोरचा टुकार आंबा घेऊन आलो आहे. मग नंतर आंब्याच्या पेटीतील पेपर पाहून कोकणातला आहे की नाही हे पाहू लागलो. कोणाला माहित? हे विक्रेते कोकणातून रद्दी आणून त्यात मद्रासचा आंबा पॅक करतही असतील.

ह्या वर्षी पहिले काही दिवस असेच नकली आंबे खाल्ले. पण कालच माझ्या एका वहिनीच्या माहेरून थेट रत्नागिरीहून पेटी आली आणि खऱ्या हापूसची चव जीभेला पटली. अहाहा! आमरस खाऊन झाला आणि लागलीच लेख लिहायला बसलो!

Advertisements