मानापमान


परवा एका स्नेह्याशी बोलत होतो. ह्याने नुकतीच नवी नोकरी धरली होती. आयटी कंपनीमध्ये  सेल्स मनेजर म्हणून. कंपनी तशी छोटीच आणि थेट सीईओला रिपोर्टिंग. म्हणून स्वारी तशी खुशीत होती. पण बोलता बोलता त्याच्या बॉस बद्दल विषय निघाला तेव्हा म्हणाला की बॉस ने त्याला सांगितले की त्याने त्याच्या सर्व सिनिअर्स ना आदराने सर किंवा मॅडम म्हणून संबोधावे (“you should respect your seniors by calling them sir / madam”). आता आयटीमध्ये खरी सर किंवा मॅडम संबोधायची रीत एवढी प्रचलित नाही. तेव्हा साहजिकच ह्याला नवल वाटले. आणि त्याने जेव्हा मला सांगितले तेव्हा मला तर जास्तच नवल वाटले. नोकरीतला बराच काळ देशाबाहेर घालवल्यामुळे असेल, पण हे एवढे औपचारिक मानपान कधी महत्त्वाचे वाटलेच नाहीत. पण म्हणजे सिनिअर्स बद्दल आदर नाही असे नव्हे. वास्तविक आदर हा फक्त सिनिअर्स बद्दलच हवा का? प्रत्येक व्यक्तीबद्दल आदर हा असावाच ना! मग तो चेअरमन असो की ऑफिस बॉय असो.

अजून एक उदाहरण. भारतात परतल्यावर माझी पत्नी काही दिवस गंमत म्हणून एका जाहिरात कंपनीत नोकरी करत होती. कंपनी अगदी छोटी होती. १०-१२ लोक. मालक एकमेकांचे भाऊ आणि बहिण. एकदा भाऊसाहेब माझ्या पत्नीला काहीतरी कामाबद्दल सांगत होते. बोलण्याच्या ओघात सवयीप्रमाणे पत्नी “बरोबर आहे” “खरं आहे” असं काहीसं म्हणाली. तर संभाषण झाल्यावर मालकीणबाईनी हिला बोलवून घेतलं आणि सुनावलं की बोलताना मॅनर्स हवेत. म्हणजे काय तर मोठ्यानी काही सांगितल तर “बरोबर” असं म्हणू नये. कारण ते नेहमीच “बरोबरच” बोलत असतात. हे ऐकून तिला खरंतर गम्मतच वाटली.

आता पूर्वीसारखी स्पृश्यास्पृश्यता नाही, पण उच्चनीच भेदभाव मात्र अजून आहेच. बऱ्याच जुन्या कारखान्यांमध्ये , जिकडे कंपनीचे जेवण असते अशा ठिकाणी अजून कामगारांसाठी वेगळे कॅन्टिन, middle management  साठी वेगळे आणि  executive साठी अजून वेगळे कॅन्टिन. ज्युनिअर्सनी सिनिअर्सना आदराने बोलायचं. सिनिअर्स आले की जागेवरून उठायचं असल्या भलत्या अपेक्षा. ह्या उलट अनुभव अमेरीकेत आला. आमच्या कंपनीचा सीईओ सुद्धा सामान्यांसारखा जेवण विकत घ्यायला लाईनीत उभा रहायचा. आणि ही कंपनी लहान सहान नव्ह्ती तर fortunue 500 मधील एक.

आता  अजून एक अनुभव. २-३ वर्षापूर्वी मी ज्या कंपनीत होतो, त्या कंपनीचे एक उच्च अधिकारी म्हणजे एक पुण्यातील आयटी वर्तुळातील एक नावाजलेलं व्यक्तिमत्व. कर्मचाऱ्यांविषयी  ह्यांना एवढी आपुलकी की एकदा मिटींगमध्ये कर्मचाऱ्यांचा उल्लेख टिपिकल आयटी भाषेत resources  असा केला गेला तर ह्यांनी आम्हा सर्वांना सांगितलं, की resources  हा शब्द आपण निर्जीव गोष्टींना वापरतो.  आपण आपल्या कंपनीच्या employee  बद्दल बोलतो आहोत तेव्हा resources  न म्हणता engineer म्हणावे. ह्यांना कधी कोणी सर म्हणून हाक मारली नाही. पण प्रत्येक कर्मचाऱ्याच्या मनात ह्यांच्याबद्दल प्रचंड आदर होता. कारण ह्यांच्या मनात प्रत्येक कर्मचाऱ्याबद्दल तितकाच आदर होता.

शेवटी आदर / मान  ही काय मागायची गोष्ट आहे का? लोकांना आपणास आदराने सर म्हणावे असे सांगण्यापेक्षा, आपल्या वर्तनातून लोकांना आपल्याबद्दल रास्त आदर निर्माण होईल ह्याची काळजी घेणे जास्त महत्त्वाचे नाही का? नाहीतर काय, लोक म्हणतील तोंडावर सर. आणि मागून शिव्यांच्या लाखोल्या. असला विकतचा मान काय कामाचा?

8 thoughts on “मानापमान”

  1. आमच्या कडे पण सरळ नावानेच बोलवायची पध्दत आहे. युजवली इनिशिअल्स ने बोलावतात. बरेचदा तर मला असंही वाटतं की माझं नांव एमबीके आहे म्हणून.
    जोक अपार्ट, जो माणुस मान मागतो, तो त्या मानाला पात्र नसतो असे माझे मत आहे. मान हा आपोआपच दिला जातो- जर लायकी असेल तर. फक्त मान दिलाय हे दाखवण्याचे प्रकार वेगवेगळे असतात. ब्रिटिशकालीन कल्पना आता इतिहास जमा झालेल्या आहेत. पुर्वी आमच्या कार्पोरेट ऑफिसला तर सगळ्यांच्या वॉश रुम्स पण वेगवेगळ्या होत्या. तिन प्रकारच्या वॉश रुम्स होत्या..पण आता गेले ते दिवस!!

  2. खरे कॉरपोरेट विश्व सोडले तर सगळी कडे (भारतात) मानापमान नाट्य (फक्त गद्य) चालूच असते. अगदी आय आय टी सारख्या शैक्षणिक संस्था सुध्दा यातून सुटलेल्या नाहीत. :-):-)

  3. मस्त अनुभव आहेत सगळे. पहिले दोन म्हणजे लोकांच्या अजूनही बुरसटलेल्या मानसिकतेचे पुरावे आहेत.

    resources वाला प्रसंग खूप भावला !!

    1. @हेरंब, “बुरसटलेल्या” शब्द आवडला. resources चा प्रसंग हा खराच डोळे उघडणारा होता. त्यानंतर मी कटाक्षाने हा शब्द कर्मचाऱ्यांसाठी वापरायचे टाळतो!
      @शांतीसुधा, आपले मत एकदम पटले.
      @महेंद्र, हे इनिशिअल्सने संबोधणे मला खूप आवडते. “लायकी असेल तर. फक्त मान दिलाय हे दाखवण्याचे प्रकार वेगवेगळे असतात” हे पटले.

  4. हि सगळी ब्रिटीशांची देणगी आहे…आपले लोक वरिष्ठ ब्रिटिशांना सर, मादाम म्हणायचे…त्यामुळे ते गेल्यावर त्यांच्या जागी वर गेलेल्यांना आपण पण मान घ्यावा असं वाटू लागलं. अर्थात असं मला वाटतं. कारण, अमेरिकेचं वारं आल्यावर आपल्याकडेही मोकळं वातावरण होऊ लागलं आहे. पण बऱ्याच ठिकाणी अजूनही ‘बुरसटलेल्या’ कल्पना आहेत.

  5. हे मानापमान नाट्य कुठल्याच क्षेत्राला सुटलेले नाही. resources अतिशय भावले.
    शेवटी आदर / मान ही काय मागायची गोष्ट आहे का? नेमके हेच भल्याभल्यांना समजत नाही…. लेख भावला. 🙂

यावर आपले मत नोंदवा