मिसळाख्यान


आजकालच्या पंचतारांकित हॉटेलांच्या जमान्यात अजूनही मला बाहेर खाण्याचा परमानंद मिळतो तो म्हणजे कुठल्यातरी चिंचोळ्या बोळात, ग्राहक म्हणजे कोणी राजा वगैरे नसून ह्या पृथ्वीतलावरचा एक तुच्छ किडा आहे अशी धारणा असणाऱ्या मालकाच्या कळकट टपरीत लाईनीत उभे राहून, आपला नंबर लागल्यावर पुढ्यात आदळून ठेवलेल्या प्लेट मधली झणझणीत मिसळ ओरपण्यात. तुम्हाला माहित आहे? एखाद्या हॉटेलमधील मिळणाऱ्या मिसळीचा झणझणीतपणा न खाता ओळखणे अगदी सोपे आहे. एक म्हणजे हॉटेल मधला कळकटपणा पाहावा, जितके कळकट हॉटेल तितकी तिखट मिसळ. आणि दुसरे म्हणजे हॉटेलातील पब्लिक. जर सडेफटिंग, विशी ते पन्नाशी मधली पुरुषमंडळी जास्त असतील तर मिसळ हमखास तिखट. कोलेज मधली जोडपी असतील तर मिसळ सणसणीत, पण थोडी सुसह्य. जर मध्यमवर्गीय जोडपी असतील तर थोडीशी तिखट. आणी जर पोरंबाळ असतील तर अश्या हॉटेल मध्ये मी तरी मिसळ खात नाही. कारण अशा ठिकाणी मिळणारी मिसळ ही म्हणजे एसेल वर्ल्डला जाऊन फक्त १० फूट उंचीच्या पाळण्यात बसून परत यायचं, किंवा मसाला दूध पिऊन भांगेच्या नशेची अपेक्षा करायची.

पुण्यात ह्या सर्व प्रकारच्या मिसळी मिळतात. मिसळीच्या तिखटपणाच्या चढत्या भाजणी नुसार काही नावे द्यायची, तर पहिला नंबर पोटोबाचा. पोटोबा नावाची हॉटेलची नवीन चेन आहे. ह्यांची हॉटेल्स कोथरूडला महात्मा सोसायटीजवळ आणि करिष्मा जवळ, आणि औंधला McDonalds च्या मागे अजून एक अशा तीन शाखा आहेत. पुण्याच्या “आमची कोठेही शाखा नाही” नियमाचा भंग करण्याचं धाडस करणारे मला वाटतं हे पहिले मराठी उद्योजक.  ह्यांच्याकडे सर्वच पदार्थ छान मिळतात. मिसळ सुद्धा सौम्य असली तरी चविष्ट. सहकुटुंब सहपरिवार खाता येईल अशी मिसळ. पण जसे ताकाला कछछी बियर म्हटले म्हणून ते चढत नाही, तशी ही मिसळ सणसणीत दणका देत नाही.

जर बायको किंवा (बायको नसल्याचे भाग्य असल्यास) मैत्रिणी बरोबर  थोडेसे खाद्यसाहस करायचे असेल तर खुशाल बेडेकर मध्ये जावे. बेडेकरांचे दुकान आहे लक्ष्मी रस्त्या जवळ मुन्जाबाचा बोळ आहे, तिकडे. गेली कित्येक वर्ष ह्यांचे दुकान आहे तसे आहे. नाही म्हणायला थोडी रंगरंगोटी आलीय. मालकांच्या तोंडावरचा नम्रभाव पुणेरी बाण्याला शोभत नाही. पण सदाशिवपेठी खडूसपणा नसला तरी मिसळ संपली हे सांगण्यात धन्य मानतात. पुणेरी उद्योजकांचे हे खास वैशिष्ट्य. एखादी गोष्ट आहे हे सांगण्यापेक्षा नाही हे सांगण्यात काय आनंद मिळतो ह्यांना. मुंबईच्या कामतांनी ह्यांच्या कडून  “नाही” म्हणायला शिकून घ्यावं. असो. मिसळीबरोबर जो रस्सा मिळतो त्याला इकडे सॅम्पल म्हणतात. गावात गेले की माझी इकडे एकदातरी वर्णी लागतेच.

बेडेकरच्या जवळच शानिपारापाशी आहे ते श्री उपहारगृह. नक्की जागा सांगता येत नाही, कारण त्याच भागात दोन तीन वेळा दुकानाची जागा बदलत आली आहे. मध्ये काही दिवस जरा चांगला गाळा होता, पण मी शेवटचा जेव्हा गेलो होतो तेव्हा एका बांधकाम चालू असलेल्या इमारतीच्या तळगृहात (basement) ह्यांचा थाट होता. जागा भारी गैरसोयीची. पण गर्दी कोण. लाईन लावून मिसळ खाल्ली होती. बाकी मी कोलेज मध्ये असताना मला ह्यांच्या बद्दल कळले होते. तेव्हा मित्राला पत्ता विचारला. मित्र पक्का पुणेरी. तेव्हा सरळ पत्ता थोडीच देतोय? मला म्हणाला, “शानिपारापाशी जा. इकडे तिकडे फिर. आणि एक जुनाट वाडा दिसेल. आणि अख्ख्या पुण्यात इकडेच अन्न मिळतं असं त्या वाड्यासमोरच्या गर्दी कडे पाहून तुला वाटेल. तेच श्री उपहारगृह. पाटी शोधायच्या भानगडीत पडू नकोस”. माझ्या ह्या भल्या मित्राचं वर्णन अगदी तंतोतंत जुळलं होतं. मागच्या खेपेला सुद्धा तीच परिस्थिती होती. मिसळ मात्र एकदम झणझणीत. मागे एकदा माझ्या मावशीच्या मिस्टरांना चुकून इकडे आणलं. बिचारे वयस्कर. कधी तिखट नं खाणारे. एक घास घेतला काय आणि आग आग झाली. शेवटी दही मागवून घेतलं आणि कशीबशी संपवली. मला काही बोलले नाहीत, पण नक्कीच चरफडले असणार. सध्या दोन मालकीणबाई दुकान चालवतात. ह्यांच्या चेहऱ्याकडे पाहिले की अस्सल सदाशिवपेठी दर्शन होते. तसा मी निगरगट्ट आहे, पण श्री मध्ये मिसळ खाताना ह्या मालकीणबाईंचा कटाक्ष आपल्यावर पडला की उगाच पैसे न देता मिसळ खातोय कि काय अशी अपराधी भावना मनात येते. असो. ह्यांची साबुदाणा खिचडी पण एकदम मस्तं.

जर श्री च्या मिसळीने आणि त्यांच्या मालकीणबाईंच्या कटाक्षाने सुद्धा पोटात आग पडत नसेल, तर गरवारे कॉलेजचा रस्ता पकडावा. गरवारे कॉलेजजवळ कर्वे रस्त्यावरच एक टपरी आहे. नाव काटा किरर्र! इतकी लहान टपरी आहे की शोधायला वेळ लागतो. ह्यांची मिसळ म्हणजे तिखट जाळ. एक दोन घासात जिभेच्या संवेदना नष्टं होतात. एकदम बधीर व्हायला होतं. आणि पचनशक्ती चांगली नसल्यास, अजून पण बरंच काही बधीर होतं. ह्या तिखटाची अगदी नशा चढते. आणि टपरीची एकूण (अ)स्वच्छता पाहून मी इकडे कोणतेही पेय घेत नाही. तेव्हा मिसळ संपेपर्यंत सर्वांगाला घाम फुटतो. इकडून मिसळ खाऊन शेजारच्या रसवंती मधून उसाचा रस प्यायचा असा माझा क्रम.

बरं माझ्यासारखे काही अतिरेकी खवय्ये, ज्यांना ह्याहूनही तिखट हवे असेल तर त्यांनी चिंचवडच्या गांधी पेठेत, मशिदी समोरच्या गल्लीत नेवले ह्यांच्या उपहारगृहात जावं. ह्यांची  मिसळ इतकी तिखट की मी  त्या दुकानात शिरलो की नुसत्या घमघमाटाने माझ्या डोक्याला घाम येतो. एक इकडलीच मिसळ अशी आहे की मला सोबत लस्सी वगैरे पेयांचा आधार घ्यावा लागतो. (आत्ता ह्या मिसळीचा नुसता उल्लेख करून सुद्धा डोक्याला घाम सुटला म्हणजे विचार करा!)

बाकी अजून मंडई च्या जवळची श्रीकृष्ण भुवनची आणि टिळक रोड च्या रामनाथची मिसळ अजून चाखली नाही. ह्या शिवाय कोल्हापूरची देवीच्या देवळासमोर अलंकार ची मिसळ (आणि गोडाचा शिरा), कोल्हापुरलाच हॉटेल ओपलची मिसळ आणि मुंबईला गिरगावात विनय हेल्थ होमची  मिसळ (आणि पियुष) आवर्जून उल्लेखनीय.

बास, एव्हढं मिसळाख्यान झालं की उद्या गावात जाऊन मिसळ खालीच पाहिजे!

Advertisements

19 thoughts on “मिसळाख्यान”

 1. इथे जरा गावाबाहेरच्या मिसळींची नावे:
  पिरंगुटला घाट उतरुन गेले की लगेच एक हॉटेल आहे, तिथे.
  भोरला हॉटेल श्रीराम.
  नाशिक रोडला राजगुरुनगरला स्वामिनी. अजूनही बरीच आहेत.

 2. वा अजून एक मिसळ चाहता मिळाला ..
  मस्त लिहिलयस
  मला स्वतः ला श्रीकृष्ण ची मिसळ आवडते. काटा किर्र, रामनाथ, बेडेकर, ही पण चांगली आहेत .. श्री ची मिसळ म्हणजे जेवण असत मी दोनदा तिथून परत आलोय .. वाई मध्ये शेवडे यांची मिसळ भारी लागलेली ..

  पण मिसळ खाल्यानंतर फार फार तर चहा प्यावा .. नाहीतर इतर गोष्टीने तिची चव जिभेवर राहत नाही अस मला वाटत .. तू तर उसाचा रस पितोस !! 🙂
  आता उद्या दुपारी मिसळ हाणलीच पाहिजे !

  1. @ पंकज, अजून होटेलच्या नावांबद्दल धन्यवाद! पिरंगुटचा घाट उतरून म्हणजे टेस्टी बाईट म्हणायचे आहे का? त्याची पण मिसळ छान असते. मग कुठे खाल्ली आज मिसळ? 🙂
   @वीरेंद्र, मिसळ आणि चहा हे तर राजमान्य कॉम्बिनेशन! पण काटा किर्र नंतर मात्र मला उसाचा रसच!
   तुम्हा दोघांना प्रतिक्रियेबद्दल धन्यावाद!

 3. मी आज पुरेपूर कोल्हापूर ची मिसळ (?) खाल्ल्याचा प्रमाद केला . चांगले मिसळीचे दुकानं ओळखण्याची लक्षणे तुम्ही वर दिली असताना मी त्या कडे दुर्लक्ष करून नळ स्टोप पाशी असलेल्या या होटेल मध्ये गेलो .. ३० रुपये देउन कट मध्ये घातलेले तरंगणारे फरसाण व कांदा कोथिंबीर खाल्ली. कोल्हापुरी चव अजिबात नव्हती. कृपया नोंद घ्यावी. याची शिक्षा किंवा उतारा म्हणून मग समुद्र मध्ये भाजी चे तुकडे व भाजी चे धान्य वडे खावून समाधान मानले !! 😦

  असो .. पुन्हा कधीतरी होटेल श्रीपादला भेट देण्याचा मानस झालं आहे ! बघू कधी योग येतो ते !

  1. @पंकज, चला अजून एका मिसळीच्या दुकानाची भर पडली. लवकरच दौरा काढला पाहिजे.
   @वीरेंद्र, हुं, पुरेपूर कोल्हापूर पुरेपूर पांचट निघाले म्हणजे! मिसळीच्या बाबतीत तरी. बाकी हे धान्य वडे काय आहे बुवा?

 4. पुणे नगर रस्त्यावर एक हॉटेल आहे तिथे पण चांगली मिळते मिसळ पुण्याला जास्त कुठल्या ठिकाणी खाल्लेली नाही.
  ,मुंबईला परळ आणि गिरगांव बेस्ट एकदम मिसळ खायला.

   1. परळ ला श्रीकृष्ण म्हणून एक लहानशी टपरी आहे. लोअर परेल वरुन एनएम जोशी मार्गावर मेन रोड वर डाव्या हाताला आहे. ( उजवीकडे वळ्लं की एनएमजोशी पोलिस चौकी )

 5. सुरेख! म्हणजे एकदम चरचरीत लेख 🙂
  आताच जेऊन आलोय तरीसुद्धा पाणी सुटल :p

  रामनाथची पण झणझणीत असते. वरती म्हटल्या प्रमाणे ‘पुरेपूर’ मी पण एकदा खाऊन गंडलो आहे x-(
  बेडेकर ची मला ‘गोड’ लागली होती, तिकडे कोहापुरी/तिखट अस सांगावं लागत का?

  मला मिसळ बरोबर पावापेक्षा ‘स्लाईस’ आवडते. कोल्हापूर मध्ये स्लाईसच मिळते. (वड्या बरोबर सुद्धा)

  एक odd ठिकाण म्हणजे FC रोड वरच शर्वरी! मिसळ साठी प्रसिद्ध नाही(आणि खूप महाग पण आहे) तरी सुद्धा वर उल्लेखलेल्या ठिकाणी जाऊ शकत नसेल तर इथली मिसळ ठीकठाक असते!

  श्री ची खायला हवी पण एकंदरीत अनुभव डेंजर दिसतात 🙂

 6. Hello Niranjan,
  Initially I had not seen ur profile/picture 🙂
  Then I realized its ‘u’!
  Hope u remember me. I was working under u in ur previous organization.
  It was really nice to read this 🙂

  Since I couldnt see ur email id, had to write in the comment 🙂
  probably u may not want to publish this!

  If u get time, please have a look at my novice blogging attempt 🙂 http://baleghol.blogspot.com/

  Thanks,
  -Sachin Powar

 7. जर डोंबिवलीत आलात तर ह्या ३ ठिकाणी

  मिसळ ट्राय करा…

  १. शिव मंदिराजवळ…(स्मशान रस्ता)..भयंकर तिखट..

  २. आस्वाद (राणावत मेडिकल, मानपाडा रोड, च्या समोर एक बोळ आहे, सपन बेकरीच्या बाजूला ,फक्त सकाळी.)

  ३. मून-मून (ठाण्यातील मामलतदारचीच मिसळ, फक्त संध्याकाळी ५ नन्तर, १०० ते १२५ प्लेट्स विकतात आणि मनसोक्त अपमान करतात पण चव चांगली आहे.)

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s