लग्नाला जातो मी!


खरं सांगायचं तर कोणाच्या लग्नाचे आमंत्रण म्हणजे माझ्या पोटात गोळा येतो. अहो आहेराच्या कल्पनेने नाही हो, पण लग्नाला जायचे म्हणजे एक तर चांगले चुंगले कपडे शोधून घालायचे, आधी वधु वराना भेटायला लागलेल्या लांबलचक लाईनीतउभे राहायचे आणि मग बुफेला उडालेल्या झुंबडीतून  ताट वाट्या सांभाळत वाट काढत जेवण वाढून घ्यायचे आणि घोड्यासारखे उभ्याने जेवायचे.  सर्व गोष्टी आठवल्या की वाटते एकवेळ पोस्टाने आहेर पाठवणे परवडले, पण ते लग्नाला जाणे नको. पण काय करणार, “जनरीत”  म्हणून जावे  तर लागतेच.

तेव्हा लग्न कोणाचे त्यावरून त्याची सुसह्यता मी ठरवतो. म्हणजे अगदी घरातील जवळच्या पैकी कोणाचे लग्न असेल तर जास्त सुसह्य. त्यातल्या त्यात वधुवरांना भेटायला जाण्याचे श्रम वाचतात.  आणि घरचेच कार्य त्यामुळे वातावरण पूर्णपणे ओळखीचेच असते. मात्र, जेवणाची आबाळ! शेवटच्याच पंगतीला जेवायला मिळते. खुपदा अशा लग्नात माझ्या मनात विचार येतो की जरा बाहेर सटकून मिसळ वगैरे चापून यावे. माझ्याच लग्नाची एक गोष्ट सांगतो. विधी वगैरे आटपून आम्हाला स्टेज वर उभे केले. भेटायला येणाऱ्या असंख्य लोकातील काही “जेवण छानच हो. बासुंदी खूपच छान” असे सांगत होते. आता इकडे २ च्या पुढे वाजून गेले होते. पोटात आगीचा डोंब. आणि गुरुजी अजून विधी बाकी आहेत असे दटावत होते. आणि लोक सांगतायत बासुंदी छान आहे. चायनीज टॉर्चर ह्यालाच म्हणतात का कोण जाणे. असो.

आता बायकोच्या आते, मामे , मावस  नातेवाईकाचे कार्य असेल तर मात्र सुसह्यता सोडा, असहायताच जास्त. एक तर ह्या नातेवाईकांचा एवढा परिचय नसतो. आणि पटकन कोणीतरी “ओळखलत ना!”  अशी गुगली टाकतं. आणि नेमकी अशाच वेळी बायको कोणतरी दूरची बहिण १५ वर्षानी आत्ता भेटली म्हणून तिच्याशी गप्पा मारण्यात कोठेतरी गुंग! आता १५ वर्षानंतर पहिल्यांदा भेटल्यावर गप्पांना विषय कसे मिळतात कोण जाणे. बऱ्याचदा हे विषय आपापले नवरे काय करतात (म्हणजे नोकरीत) आणि मुलं किती हुशार आहेत हे एकमेकीना कळण्या पुरतेच मर्यादित असतात. फारतर केव्हढी बदलीस तू (म्हणजे जाडी झालीस) हा संवाद. आता अशा लग्नात मला एक चांगलासा कोपरा शोधून बायकोची पर्स, पिशव्या वगैरे सांभाळत बसण्या व्यतिरिक्त फारशी भूमिका नसते. बर आणि ज्याचं लग्न असतं ती व्यक्ती मला विशेष ओळखत पण नसते. पण ह्यांच्या आई वडलांकडून अगदी आग्रहाचं निमंत्रण असतं. त्यामुळे जावच लागतं! अशा लग्नात पंगतीत किंवा बुफेच्या लाईनीत मी सर्वात पुढे असतो. आणि हातावर पाणी पडताच यजमानांना “जेवण छान होतं!” असं सांगून बायकोने काढता पाय घेण्याची वाट पाहत गाडीत बसतो.

माझ्याच आते, मामे , मावस  नात्यात लग्न असेल तर वेगळीच आफत. फक्त अशा कार्यात किंवा कोणा मयताला सोडून बाकी कधीही  नं भेटणाऱ्या दूरच्या नातेवाईक मंडळींशी गाठ पडते. त्यात सिनिअर मंडळी असतील तर  “लहान पणी किती अशक्त होता आणि आता कसे पोट पुढे आलेय”  किंवा “काय रे वडलांच्या डोक्यावर अजून केस आहेत आणि तुझे गेले?” असले काहीतरी  ऐकायचे. त्यातल्या त्यात लहान, म्हणजे प्रौढ असतील तर “अरे तुझ्या कंपनीत माझ्या मुलाला नोकरी मिळतेय का बघ ना! तुझा इमेल दे. मी त्याला ईमेल टाकायला सांगतो” असले काहीतरी. एकदा एका गृहस्थांनी कहरच केला. म्हणाले, “माझ्या मुलाचं अभ्यासात लक्षं नसतं. फार कमी मार्क. तुझ्यासारखाच कॉम्पुटर इंजिनिअर बनवणार आहे”. आता मी काही स्कॉलर वगैरे नव्हतो पण म्हणून हे असं काहीतरी ऐकून घ्यायचं होय? पण अशा प्रकारची मंडळी माझ्यावर एक उपकार करतात बुवा. माझ्या डोक्यात उगाच आपण कर्तुत्ववान आहोत अशी काही हवा जाऊन देत नाहीत. असो.

त्यातल्या त्यात सुसह्य लग्नं म्हणजे ऑफिस मधील कुणाचे तरी किंवा सोसायटीतील कुणाचे तरी. अशा लग्नात एक तर आपल्या सारखेच लग्नघराशी नाते नसलेले  आणि आपल्या नेहमीच्या परिचयाचे लोक असतात. तेव्हा हॉल वर कुठेतरी कोपऱ्यात कोंडाळं करून गप्पांचा फड रंगतो. अगदी वधूवरांना भेटायला गर्दी कमी होईपर्यंत आरामात वाट पाहता येते. ग्रूप मधलाच एखादा उत्साही मेनू काय आहे आणि काय घ्यावे आणि काय टाळावे ह्याची यादी आणतो, त्यामुळे  बुफे मधला वेळ कमी होतो. आणि एकूणच  वेळ मजेत जातो.

Advertisements
 1. फेब्रुवारी 24, 2010 येथे 9:25 pm

  मी तर गेली कित्येक वर्ष ’तिकडचं’ कार्य अटेंड केलेलं नाही. मुद्दाम टाळलं असं नाही, पण नेमकं त्याच वेळेस काहीतरी काम निघायचं.

  ऑफिस मधल्या कलिग्जची लग्न अटेंड करणं मला पण सोपं वाटतं. 🙂

 2. फेब्रुवारी 24, 2010 येथे 9:45 pm

  लेख आवडला. लग्नात आपल्या कोणी ओळखीचे नसले तर फारच मजा येते. व्यक्तीनिरीक्षण, सुखद भोजन आणि हातावर पाणी पडताच पलायन!! 🙂

  अरुंधती

  Sing, Dance, Meditate, Celebrate!
  http://iravatik.blogspot.com/

  • फेब्रुवारी 24, 2010 येथे 9:56 pm

   धन्यवाद अरुंधती! व्यक्ती निरीक्षणावर एक वेगळाच लेख होऊ शकतो! 🙂

 3. फेब्रुवारी 24, 2010 येथे 11:28 pm

  हा हा हा.. मस्तच. छान हलकाफुलका झालाय लेख !!

  • फेब्रुवारी 25, 2010 येथे 10:53 सकाळी

   हेरंब,
   धन्यवाद. परवाच एका लग्नाला जाऊन आलो. तेव्हा सुचलं.

 4. फेब्रुवारी 25, 2010 येथे 10:20 सकाळी

  आता खरं सांगतो, एक कन्फेशन…स्वतःचं लग्न होण्यापुर्वी सगळी लग्नं अगदी आवर्जुन अटेंड करायचो. एखादी सुंदर मुलगी दिसली की तिची माहिती काढणं वगैरे सुरु व्हायचं.
  गेले ते दिवस………!!!!! 🙂

  • फेब्रुवारी 25, 2010 येथे 11:04 सकाळी

   महेंद्र,
   एकदम सही बोललात. 🙂

 5. फेब्रुवारी 25, 2010 येथे 11:05 सकाळी

  स्वतःच्या लग्नाआधीची (अर्थातच लोकांची) लग्नं आणि मग स्वतःचं लग्न झाल्यानंतरची लग्नं यातही फ़रक आहे..पण आमच्या लग्नानंतर आम्ही कुठल्याच लग्नाला मायदेशी नव्हतो त्यामुळे ते दुसरं अजून अनुभवायचं आहे..बघुया कधी योग येतो ते…
  मस्त झालीय ही पोस्ट…

  • फेब्रुवारी 25, 2010 येथे 11:12 सकाळी

   धन्यवाद अपर्णा!
   अहो, स्त्रियांसाठी लग्नाला जाणे ही कधीही हवी हवीशीच गोष्ट असते. मिरवायला मिळतं ना! नाहीतर लॉकर मधले खरे दागिने बाहेर कधी येणार? पंचाईत असते ती लग्न होऊन बसलेल्या गरीब बिचाऱ्या पुरुषांची! महेंद्रची प्रतिक्रिया वाचलीत तर लक्षात येईलच काय म्हणतोय ते

 6. फेब्रुवारी 26, 2010 येथे 4:28 pm

  “मनात विचार येतो की जरा बाहेर सटकून मिसळ वगैरे चापून यावे”
  ३ दिवसापूर्वी मी हे प्रत्यक्ष केले.अचानक गायब होऊन नारायण पेठेत बेडेकरांच्या आसर्‍याला गेलो.मुहुर्ताच्या आत पोचताना मात्र धावपळ झाली.
  इछुकांनी मिसळ केंद्रामधे जे वेटिंग असते त्याचा अंदाज घ्यावा…

  • फेब्रुवारी 26, 2010 येथे 5:07 pm

   हर्षद,
   वेटिंग बद्दल योग्यच बोललात. मध्ये एकदा मुंजीला मी पण नाश्त्याला उपमा होता म्हणून सटकून डेक्कनच्या अप्पाची खिचडी खायला सटकलो होतो. पण गर्दी पाहून परतावे लागले. नाहीतर मुहूर्ताला गैरहजर म्हणून शिव्या खायला लागल्या असत्या ना 😦

 7. मार्च 3, 2010 येथे 3:52 pm

  Niranjan

  Swati Pitre here. Good blog, have been reading the posts for a while. Just didnt get a chance to give feedback. Keep the good work.

  Swati

 1. No trackbacks yet.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: