परदेशात हार्ट ऄटक


६ नोव्हेंबर २००८. पहाटेचे २:०० – २:३० वाजले असतील. मोबाइलच्या रिंग ने जाग आली. इतक्या पहाटे फोन म्हणून जरा टरकलोच. आणि ती भीती दुर्दैवाने खरी ठरली. आईचा पाटाया (थायलंड) वरून फोन. बाबांना छातीत दुखायला लागले होते म्हणून तिकडे हॉस्पिटल मध्ये ठेवले होते. हार्ट ऄटक होता. Angioplasty चालू आहे तेव्हा ताबडतोब इकडे ये. माझे पायच लटपटायला लागले. मग गोंधळेकर काका फोनवर आले. त्यांनी सांगितलं की काळजीचं कारण नाही कारण बाबा स्टेबल होते, पण आता किती दिवस ठेवतील हे माहित नव्हतं.

फोन ठेवला आणि सुन्नं होउन बसलो. काही सुधरेना. २-३ दिवसांपूर्वीच आई वडील त्यांच्या मित्र-मंडळींबरोबर सचिन ट्रॅव्हल आयोजित थायलंड, सिंगापूर आणि मलेशियाच्या दौऱ्यावर गेले होते. तशी वडीलांची प्रकृती ठणठणीत होती. रोज भरपूर चालणे व्हायचे. फार वर्षांपूर्वी बीपीचा त्रास होता, पण नेहमी चेकप असे, त्यामुळे बीपी आटोक्यात. chlorestorl तर इतके नॉर्मल की तिशीच्या तरुणांना लाज वाटेल. शुगर नॉर्मल. डॉक्टर नेहेमी ह्यांच्या प्रकृतीवर खुश! मग असे का व्हावे? हाच नाही तर असे बरेच प्रश्न डोक्यात. तोंड वगैरे धुवून घेतले. पत्नीने लागलीच माझी बॅग भरायला घेतली. जाताना ईन्शुरन्स काढला होता. तरी सुद्धा सगळी डेबिट कार्ड, क्रेडीट कार्ड आणि चेकबुक जवळ ठेवले. पटकन इंटरनेट वर जावून थायलंड च्या विसा ची माहिती घेतली. नशीब visa on arrival ची सोय होती. २ दिवसात मी कामासाठी अमेरिकेत जाणार होतो. तेव्हा बॉसला ईमेलने कळवले की ट्रिप रद्द करावी लागेल. सहकाऱ्याला माझ्या तिकडच्या सगळ्या मिटींग्स रद्द करायचा निरोप दिला.

एव्हाना ४ वाजले होते. आईने त्यांच्या बरोबर असलेल्या सचिनच्या टूर लीडर चा, शैलेशचा  नंबर दिला होता तिकडे जरा घाबरतच फोन लावला. बाबांची angioplasty व्यवस्थित पार पडली आहे असे कळले आणि जीवात जीव आला. आता मुंबईला जाऊन विमान पकडायचे. आयत्यावेळी कुठे तिकीट मिळणार? विचार करायची कुवतच निघून गेली होती. मग पुणे मुंबई टॅक्सीला फोन करून ती बोलावली. साधारण ६ वाजता टॅक्सी आली आणि मुंबईला निघालो. ८ पर्यंत वाशीला पोचलो. आता डोके काम करू लागले होते. ऑफिसच्या एजंटला आणि सहकाऱ्यांना फोन करून तिकीटाची व्यवस्था होतेय का हे पाहायला सांगितले. सचिनच्या ऑफिस मध्ये फोन केला. तिकडून खुद्द सचिन जकातदारांचा मोबाइल नंबर मिळाला. सचिनशी बोललो आणि त्यांच्या शांत आवाजाने बरेच बरे वाटले. ते म्हणाले कोठल्याही परिस्थितीत तुम्हाला बँकॉकला पोहचवण्याची माझी जबाबदारी. काही काळजी करू नका.  त्यानी दुपारी १२ पर्यंत ऑफिस ला बोलावले. रात्रीच्या विमानाचे तिकीट पाहणार होते. मग मुंबईच्या आमच्या घरी गेलो. वडीलांचे पूर्वीचे वैद्यकीय तपासण्यांचे कागद घेतले आणि थोडावेळ चक्कं झोप काढली. कारण दुसरे करण्यासारखे काहीच नव्हते.

दुपारी बारा वाजता सचिनच्या ऑफिस मध्ये पोचलो. सचिन स्वतः तिकीटाची खटपट करत होते. तिकडे ईन्शुरन्स एजंट भेटला. त्याने अगदी छातीठोक पणे क्लेम पास होईल असे सांगितले. तेव्हढ्यात त्याने माझा पण ट्रॅव्हल ईन्शुरस काढला. साधारण एक पर्यंत तिकीट हातात मिळाले. तिकडेच आस्वाद मध्ये काहीतरी पोटात ढकलले आणि परत मुंबईच्या घरी गेलो. नातेवाईकांना फोन करून कळवले. मावस बहिणीने पैसे आहेत की लागतील ह्याची चौकशी केली. आप्त स्वकीयांचे पाठबळ आहे ह्या विचारानेच बरे वाटले.

रात्री विमानात बसलो. शैलेशने हॉस्पिटलला कसे यायचे त्याच्या सविस्तर सूचना दिल्या होत्याच. विमानतळावर उतरल्यावर प्रथम सिमकार्ड घेतले आणि प्रथम आईला फोन करून कळवले. आतापर्यंत सोबतची मंडळी ट्रिपबरोबर पुढे गेली होती. पण शैलेश आईबरोबर मागे थांबला होता. त्याचे मागे थांबणे म्हणजे खरच मोठे उपकार होते आमच्यावर. टूर पुढे गेल्याने आईला हॉटेल सोडावे लागले होते. पण शैलेशने  हॉटेलच्या सर्विस अपार्टमेंट मध्ये सोय केली होती. मी एअरपोर्टवरून बसने पाटायाला पोचलो व तडक हॉस्पिटलमध्ये गेलो. आई हॉस्पिटलच्या दारातच उभी होती. हॉस्पिटलच्याच आवारात सर्विस अपार्टमेंट. तिकडे गेलो. प्रशस्त दोन बेड असलेली रूम होती. समान ठेवले. शैलेशने मी पोचेपर्यंत काय काय झाले ते सर्व सांगितले. मला कॉलिंग कार्ड घेउन दिले. भारतात फोन करायला. आवश्यक ते सर्व नंबर दिले. मगच तो पुढे गेलेल्या टूरला जॉईन व्हायला गेला. मग बाबांना पाहायला गेलो. ICU मध्ये होते पण प्रकृती ओके दिसत होती. Ventilator लावला होता. थोड्यावेळाने डॉक्टर आले. angioplasty चांगली झाली म्हणाले.

बाबांना जेव्हा प्रथम हॉस्पिटल मध्ये आणले तेव्हा ताबडतोब angiography करून डॉक्टरने आईला सांगितले होते की मी angioplasty करतोय, तुम्ही पैसे भरा. नशीब आई कडे Debit card होते. त्यावरून तिने पैसे भरले. ऄटक आल्यापासून १:३० तासाच्या आत ट्रीटमेंट मिळाली म्हणूनच वाचले असे म्हणाला. त्यांचे आभार मानले. बाबा ICU मध्ये असल्याने तिकडे बसण्यात काहीच फायदा नव्हता. तेव्हा अपार्टमेंट मध्ये गेलो. प्रवासाचा शीण आणि टेन्शन ह्यामुळे दमलो होतोच. शिवाय बाकी करण्यासारखे काही नव्हते. तेव्हा चक्क झोपलो. आईला पण दोन दिवस झोप नव्हती. ती पण झोपली.

दोन दिवसात बाबांना ICU मधून स्पेशल रूम मध्ये हलवले. ती रूम एव्हढी मोठी होती की मी आणि आईने नर्सच्या परवानगीने आमचा बाडबिस्तरा त्या रूम मधेच हलवला. पेशंटबरोबरच्या माणसाला झोपायची सोय होतीच. त्यामुळे बाबांना पण दिलासा की सर्व एकत्र. त्यांची रिकव्हरी चांगली होती. आता हॉस्पिटलवाले आतापर्यंतचे बिल भरा म्हणून सांगू लागले. आम्ही ईन्शुरन्स कडे बोट दाखवले. माझा एजंट बरोबर संवाद चालू होताच. पण ईन्शुरन्स काही कॅशलेसचे अप्रुव्हल देईना. कसे बसे हॉस्पिटल वाल्यांना तंगवून ठेवले. बिलाचा आकडा बराच मोठा होता.

अजून तीन दिवसांनी तपासण्या करून बाबा परत जायला फिट आहेत असे डॉक्टरने प्रमाणपत्र दिले. सचिनच्या एजंटने दुसऱ्या दिवसाचे विमानाचे तिकीट पण दिले. पण ईन्शुरन्स काही पैसे देईना. हॉस्पिटलने तर दमच भरला की पैसे मिळत नाही तोपर्यंत सोडणार नाही. मग काय करावे? जायच्या दिवशी शेवटी ईन्शुरन्सने सांगितले की आता इकडे येउन क्लेम करा. आम्ही कॅशलेस क्लेम नाही देणार. झालं. म्हणजे आली का पंचाईत. बिलाचा आकडा भरमसाठ होता. माझ्याकडे फक्त १ तास उरला होता. नाहीतर विमान पकडता नसते आले. शेवटी मी माझी सगळी कार्डस काढली आणि प्रत्येक कार्डाचे लिमिट संपेपर्यंत वापरले. कसेबसे पैसे भरले गेले आणि आम्ही त्या परक्या देशातून बाहेर पडलो.

आता बाबा एकदम बरे आहेत. आईने ह्या सर्वप्रकरणाचा धसका घेतला होता. थायलंडला  खंबीर पणे परिस्थिती हाताळली होती.  परत आल्यावर तिचे  बीपी वाढले. हॉस्पिटलमध्ये ठेवावे लागले. सुदैवाने गंभीर काही नाही. सचिन ट्रॅव्हल ने, विशेष म्हणजे टुर लीडर शैलेशने  खूपच मदत केली. आणि आई बाबांची मित्र मंडळी श्री गोंधळेकर काका (आता स्वर्गवासी), आणि गोंधळेकर मावशी, श्री निळेकर काका आणि काकू आणि बाकीचे बरेच सहप्रवासी ह्यांची पण त्या दिवशी बरीच मदत झाली. गोंधळेकर आणि निळेकर काका काकू ट्रिप सोडून आईबरोबर थांबायला निघाले होते.

अजूनही हा प्रसंग आठवून अंगावर काटे येतात. देव करो आणि कुणावरही असा प्रसंग न येवो. इन्शुरन्स क्लेम अजून पर्यंत सेटल नाही झाला. सध्या Insurance Ombdusman च्या विचाराधीन आमची केस आहे. इन्शुरन्स म्हणते Pre-Existing condition होती. पण एजंटने पॉलीसी देताना pre-existing condition कधी विचारलीच नाही. इन्शुरन्स देताना डॉक्टरचा चेकप केला नाही. मी कोर्टातील आमच्यासारख्या केसेस शोधल्या. कोर्टाने दरवेळी इन्शुरन्सला पूर्ण शहानिशा न करता इन्शुरन्स दिल्याबद्दल दोषी ठरवले आहे. माझी केस ऐकल्यावर Insurance ombdusman सुद्धा इन्शुरन्स कंपनीवर डाफरला. आशा आहे की पैसे कधीतरी मिळतील.

ह्या प्रसंगावरून सर्वाना एकच विनंती आहे. प्रवासाला जाताना नीट चौकशी करूनच इन्शुरन्स काढावा. शक्यतो एजंट पासून दूर राहावे आणि सरळ कंपनी कडूनच ईन्शुरन्स काढावा (Ombdusman ने मला दिलेल्या ह्या कानपिचक्या)!

Advertisements

9 thoughts on “परदेशात हार्ट ऄटक”

 1. असा अनुभव न येवो पण उपयुक्त माहिती दिलीत. आई वडिलांना अमेरिकेत आणताना कोणता विमा उतरवायचा? कोणती काळजी घ्यायची ते सांगु शकाल का? धन्यवाद.

  1. अभिजित
   माझं असं मत आहे कि सरकारी कंपनीचाच इन्शुरन्स घ्यावा. प्रायव्हेट कंपन्या इन्शुरन्स चा प्रीमियम मिळेपर्यंत गोड गोड बोलतात आणि नंतर हिडीस फिडीस. सरकारी कंपन्या पहिल्यापासूनच हिडीस फिडीस वागणूक देतील, पण Right to Information Act, IRDA ह्यांना जास्त वचकून असतात. आता हे माझे स्वतःचे मत आहे, सगळेचजण ह्याशी सहमत होतील असेनाही.

   मात्र, संपूर्ण वैद्यकीय तपासणी करून इन्शुरन्सने मागितले नाही तरी ते रिपोर्ट द्यावेत. शक्यतो इन्शुरन्सलाच वैद्यकीय तपासणी करण्यास भाग पडावे. डायबेटीस, बीपी असेल तर त्यासाठी जास्त प्रीमियम भरावा लागत असेल तरी मागेपुढे न पाहता तो भरावा. आम्ही घरातील इतर गडबडीमुळे ह्यावेळी थोडे गाफील राहिलो आणि हा नसता मनस्ताप झाला. माझ्या आई वडलांनी पूर्वी अमेरिकेत येताना पूर्ण वैद्यकीय तपासणी करून मगच न्यू इंडिया अशुरंस चा इन्शुरन्स घेतला होता.

 2. पैसा हाताशी होता म्हणुन बरं झालं, नाही तर सेव्हिंग अकाउंटला असे किती पैसे ठेवतो आपण?? कदाचित खोटं वाटेल, मी अजुनही क्रेडीट कार्ड वापरत नाही. कायम डेबिट कार्डवरच सगळे व्यवहार करतो, पण आता हे पोस्ट वाचल्यावर वाटायला लागलंय की एक क्रेडीट कार्ड अवश्य असायलाच पाहिजे.

  1. महेंद्र,
   आजच्या जमान्यात क्रेडीट कार्ड माझ्यामते खूप आवश्यक गोष्ट झाली आहे. मी उलट डेबिट कार्ड पेक्षा क्रेडीट कार्ड जास्त वापरतो कारण बँकिंग चे नियम असे आहेत की डेबिट कार्ड वरून फ्रॉड झाल्यास, खात्यातील पूर्ण रक्कम जाऊ शकते. पण क्रेडीट कार्ड फ्रॉड ला आपली जबाबदारी मर्यादित असते. आता माझी माहिती ऐकीव आहे, पण बरेच जणांकडून असेच ऐकले आहे. आणि क्रेडीट कार्ड जबाबदारीने वापरले म्हणजेझाले.

   अजून एक गोष्ट मी पाळतो म्हणजे ६-८ महिन्याचा घरखर्च भागेल एव्हढी किमान रक्कम सेविंग मध्ये कायम ठेवावी. त्यामुळे थोडा का होईना पण फायदा झाला.

 3. खुप महत्वाची महिति दिलित निरंजन महोदय, धन्यवद! न्यु इंडिया इं. कं. तरी चांगली वागणुक देते कां? मला तर सगळे एकाच माळेचे मणि वाटतात.वयोमानानुसार आता आम्ही कोणतच कार्ड वापरु शकत नाही.
  माहितीबद्दल धन्यवाद !

  1. खरं सांगायचं तर कुठलीच इन्शुरन्स कंपनी चांगली वागणूक देत नाही. पण सरकारी कंपन्या माहिती अधिकाराखाली येतात. त्यामुळे अगदीच हतबल होऊन बसायची वेळ येत नाही.माझा insurance ombdusman च्या कार्यालयाबाबत चांगला अनुभव आहे. (अर्थात क्लेम अजून मिळायचा आहे). जेव्हा केव्हा चौकशी केली आहे तेव्हा तेव्हा सौजन्यपूर्ण माहिती मिळाली आहे.
   -निरंजन

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s