वॉटर राफ्टिंग


माझा पूर्वीच्या कंपनीतील मित्रांचा एक ग्रूप आहे. आता बऱ्याच जणांनी ती कंपनी सोडली, तरी वर्षातून २-३ वेळा तरी आम्ही सहकुटुंब भेटून एकत्र धमाल करतोच. कधी कोणाच्या फार्म हॉउस वर, तर कधी रिसोर्ट वर. मागच्या ऑक्टोबर मध्ये असेच ठरवून आम्ही एकत्र वॉटर राफ्टिंग  ला गेलो. आता वॉटर राफ्टिंग म्हटलं तर आपल्या डोळ्यासमोर येतं ते उत्तरेत हिमाचल प्रदेश किंवा दक्षिणेला कर्नाटकातील दंडेली. पण मुंबई पुण्याच्या जवळ, गोवा हायवे वर कोलाड नावाचे गाव आहे. ह्या कोलाडच्या जवळच कुंडलिका नदी आहे. ह्या नदीवर सुद्धा वॉटर राफ्टिंगची सोय आहे. महाराष्ट्रातील ह्या एकमेव ठिकाणी वॉटर राफ्टिंग होते.

तर आमचा एक मित्र हेमंत ह्याने पुढाकार घेऊन foliage tour  तर्फे बुकिंग केले. रोज सकाळी ९ ते १० च्या सुमाराला राफ्ट निघतात. तेव्हा आदल्या दिवशी जायचे ठरले. ह्या राफ्टींगच्या ठिकाणापासून जवळच सुतारवाडी गावात पूजा फार्म्स नावाचे रेसोर्ट आहे. तेव्हा आदल्या दिवशी इकडे उतरलो. तसे म्हटले तर साधेच रेसोर्ट. पण रम्य परिसर आहे. तलावाच्या काठाशी. ह्यांचे  चक्कं पाण्यात खांब ठोकून बांधलेले  कॉटेज आहे. तसेच तंबूंची सोय पण आहे. एका तंबूत सहा खाटा. आमचा मूळ उद्देश हा गप्पा टाकणे असल्या मुळे आम्ही तंबुच बुक केले होते. कोणीही झोप आली की कुठल्याही तंबूत मिळेल ती जागा पकडून झोपायचे. रेसोर्ट मधेच जेवणाची पण सोय. शाकाहारी / मांसाहारी काय हवे ते आधी पासून कळवायचे. ठरल्याप्रमाणे आदल्या दिवशी संध्याकाळी पोचलो. नेहमीप्रमाणे रात्रभर गप्पा टप्पा. आणि विषयांना काही तोटा नाही. कंपनीचे राजकारण ते अध्यात्म / तत्त्वज्ञान.  कसे कसे विषयांतर होत जाते ते कळतच नाही.

दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून नाश्ता केला आणि Foliage च्या ऑफिस मध्ये गेलो. तिकडे गाड्या पार्क केल्या आणि सहा आसनी रिक्षा घेऊन राफ्टींग चालू करायच्या जागी केलो. कारण जिकडून राफ्टींग चालू करणार तिकडे परत यायचे नव्हते ना. इकडे राफ्टींग आपल्या मनात येईल तेव्हा करणे शक्य नसते. कारण नदीतले नेहमीच पाणी खोलवर नसते. जेव्हा Tata Power  वाले धरणातून पाणी सोडतात तेव्हाच पाण्याची पातळी काही तासांसाठी वाढते. ह्या वाढलेल्या पातळीतच राफ्टींग करायचे. आणि बरं. हे पाणी कधी सोडतील ह्याचा काही नेम नाही. साधारण १० – १०:३० पर्यंत कधीतरी पाणी सोडतात. आम्ही ९:३० पर्यंत ह्या जागी पोचलो होतो. नदीच्या किनाऱ्यावर बसून पाणी सोडताना भोंगा होतो त्याची वाट पाहत बसलो. १० वाजे पर्यंत काही पाणी सोडले नव्हते. आता हे पाणी सोडणार की नाही ह्याची चिंता वाटू लागली. माझ्यासारख्या काही जणांना फुकट लवकर उठायला लागले (म्हणजे सकाळी ७ वाजता) म्हणून वैताग. पण शेवटी १०:१५ ला भोंगा वाजला. आता १५-२० मिनिटात पाण्याची पातळी वाढणार होती.

जसा भोंगा वाजला तसे राफ्टींग च्या instructors  नी आम्हाला राफ्टींगसंबंधी सूचना आणि वल्हे मारण्याचे प्रात्यक्षिक दिले. राफ्टींगचे गट पाडले. प्रत्येक राफ्ट मध्ये ६ जण आणि Instructor.  मग सर्वानी मिळून आपापला राफ्ट उचलून नदीत घातला. नदीपात्रातील खडकांमुळे  जे रॅपीड तयार होतात, त्यांच्या तीव्रतेनुसार राफ्टींगचे रेटिंग ठरते. हे १ ते ५ च्या दरम्यान असते. क्लास १ चे राफ्टींग अगदी सोपे तर क्लास ५ चे कठीण आणि जास्त धोकादायक पण. कुंडलीकाचे रॅपीडस हे क्लास २ ते ३ च्या दरम्यान आहेत.

जसे आमचे राफ्टस पाण्यात उतरले तेव्हा instructor chya आज्ञेनुसार आम्ही वल्हवायला सुरूवात केली. आधी शांत वाटणारा प्रवाह जसे रॅपीड जवळ येई तेव्हा खळखळू लागे. instructor  मुदाम त्या खळखळाटात राफ्ट घालवायला लावे. राफ्ट जेव्हा त्या रॅपीड मध्ये शिरे तेव्हा एवढा डागमगे, की आम्ही पाण्यात पडतोय की काय अशी भीती. आणि आमच्यातल्या काहीजणांनाच पोहता येत होते. पण life jackets  होती. बाकी बुडण्यापेक्षा खडकावर आपटून जखमी व्हायची जास्त भीती. पण सुदैवाने तसे काही झाले नाही. पण रॅपीडस मधून जाताना जाम मजा येई.

एकूण १० किमी प्रवास होता. नदीतील रॅपीडस संपल्यावार instructor  ने सर्वांना पाण्यात उड्या मारायला लावल्या. आमच्यातील जे घाबरत होते त्यांना पण चक्क पाण्यात ढकलले. life jacket होते तरी पोहता येत नसल्याने भीती. पण एकदा पाण्यात उडी मारल्यावर मस्त तरंगत शेवटचे एक किमी अंतर कापले. आतापर्यंत डोक्यावरचे उन चढले होते. राफ्ट नदीबाहेर काढले. आम्हाला आमच्या गाड्यांपर्यंत न्यायला रिक्षा आल्याच होत्या. त्यात तसेच ओल्या कपड्यांनिशी बसून पार्किंगच्या जागी आलो. मग रेसोर्ट वर जावून जेवणावर ताव मारला.

एकूण रोजच्या धकाधकीच्या जीवनातून बाहेर पडून चांगली बॅटरी चार्ज करून घेतली होती. जेवण झाल्यावर ताम्हिणी घाटाचा रस्ता धरला. नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे quick byte मध्ये थांबून चहापाणी वगैरे करून आपापल्या घरी पुण्याला परतलो. घाण्याला जुंपून घ्यायला!

सगळे फोटो सौजन्य :  श्री विजय कुरूप.

Advertisements

4 thoughts on “वॉटर राफ्टिंग”

 1. मस्त आहे. मुंबईपासुन किती किमी असेल?पर हेड साधारण खर्च किती येतो ? राफ्टिंग साठी कमित कमी किती लोकं हवे असतात?
  एकदा पुर्वी पहलगामला राफ्टींग केलं होतं. इथे इतक्या जवळ सोय आहे हे माहिती नव्हतं. अतिशय महत्वपुर्ण माहिती.

  1. महेंद्र ,
   लिहिण्याच्या ओघात, ही माहिती द्यायची राहिलीच. मुंबईपासून १३८ किमी वर आहे. एकटा दुकटा मनुष्य सुद्धा जाऊ शकतो. माणशी १२५० – १३०० रुपये खर्च येतो. राहण्या खाण्याचे अधिक. अधिक माहितीसाठी ही लिंक पहा:
   http://kundalikarafting.in

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s