पुणेरी वाहतूक


काल परवाच पुण्यातील दुचाकीवीरांवर अनिकेतने लिहिलेला लेख वाचला. बाकी पुण्यातील दुचाकी स्वार हे म्हणजे अजब प्रकरण आहे. एरवी ऑफिसात वगैरे अगदी नम्रपणे वागणाऱ्या व्यक्ती सुद्धा जेव्हा दुचाकीवर स्वार होतात तेव्हा त्यांच्या अंगात काय वारं संचारतं कोण जाणे! बहुतेक दुचाकीच्या वेगाने ह्यांच्या पार डोक्यात वारं घुसत असावं. कारण हेल्मेट वगैरे घालणं हे भ्याडपणाचं लक्षण समजलं जातं ना! अगदी मुली देखील अतिरेकी  फ्याशनने आपले चेहेरे व डोके झाकून घेतील पण हेल्मेट नाही घालणार. रोज कोणीतरी दुचाकीवरून पडून मेल्याचे किंवा जबर जायबंदी झाल्याचे पेपरात येते, पण सगळे पालथ्या घड्यावार पाणी. कालच मी जिममधून घरी  जात असताना एक माता आपल्या लहान मुलाला स्कूटी वरून शाळेत नेताना पहिली. स्वारी वळणावर सुद्धा वेग कमी करत नव्हती. आणि खुशाल डाव्या बाजूने जड वाहनांना ओलांडून वेगात चालली होती. एवढी कसली घाई! आता स्वतःची नाही पण त्या लहान जीवाची काळजी घ्यावी का नाही? एकदा असाच सुसाट जाणारा वीर सिग्नलला थांबलेला सापडला. मी त्याला गमतीने म्हटले, “राव आत्ता एवढी घाई करताय, वर जायला  नका करू म्हणजे मिळवली”. हॅ हॅ करत हसला आणि सिग्नल मिळताच सुसाट निघून गेला. कशापासून एवढा पळत होता देव जाणे.

दुसरे “मार्गवीर” (road warriors) म्हणजे रिक्षावाले. ह्यांच्या रिक्षामध्ये जीव केवढासा, पण शेजारून जाणाऱ्या सुमोशी वेगाची स्पर्धा करतील. अचाट आत्मविश्वास! आणि ह्यांची खासियत म्हणजे एखाद्या सिग्नलला पार डाव्या लेन मध्ये उभे असतील, पण सिग्नल सुटायच्या वेळी काय एकदम विचार बदलतील आणि चक्क उजवीकडे वळणार. बाकीचे वाहनचालक कितीही शंख करत असतील तरी बेहत्तर. बर रिक्षाचा एवढा सूळसुळाट  आहे तरी तुम्हाला काही कामासाठी रिक्षा हवी असेल तर आजिबात मिळणार नाही. कोठ्ल्याश्या स्टॅण्ड वर रिक्षा लावून हे सगळे चकाट्या पिटत बसणार.

मी पुण्याच्या हद्दीबाहेर, वाकडला राहतो. आमच्या इकडे अजून एक प्रकार आढळतो. ह्यांना “गुंठामंत्री” असे नाव आहे. मध्ये जागांचे भाव गगनाला भिडले तेव्हा आपल्या शेतजमिनी विकून पैसा मिळवलेल्या होतकरू शेतकऱ्यांचे रिकामटेकडे युवराज, म्हणून त्यांना गमतीने “गुंठामंत्री” म्हणतात. ह्यांची खूण म्हणजे पांढरी scorpio किंवा tata सफारी.  आणि गाडीवर हमखास लिहिलेले असणार, “दादांची कृपा”, किंवा “राज साहेब” किंवा वाघाचे चित्र. त्यावरून त्यांचे राजकीय हितसंबंध ओळखायचे. एखादा  धूर्त “कुंपणावरचा” कार्यकर्ता त्याच्या गाडीवर “साहेबांची कृपा” लिहील. आता साहेब हे सर्व पक्षात आहेत त्यामुळे ह्या पठ्ठ्याची निष्ठा गुलदस्त्यात. ह्यांना आपली गाडी म्हणजे रणगाडाच वाटतो. आणि ह्यांची गाडी सरळ लाईनीत कधीही जाणार नाही. सारखे लेन बदलणार. जणूकाही गाडीत डीझेल बरोबर रात्री नं संपलेली “देशी” पण मिसळलेली आहे. आणि खुशाल चुकीच्या बाजूने गाडी चालवतील. तेही गाडीचे डोळे वटारून, म्हणजे हेडलाईट लावून. आणि पोलिसांचा सुद्धा ह्यांच्याकडे कानाडोळा. बिचारे म्हणत असतील,  “न जाणो खरच कुठल्या दादांची कृपा असेल तर आपली बदली व्हायची!”

ह्या दादांवरून एक गंमत आठवली. सध्या पोलिसांना रहदारीचे नियम  तोडणाऱ्यांना पकडायला ब्लॅकबेरी दिलाय. वाहनाचा किंवा लायसन्सचा नंबर टाकला की वाहनाची किंवा चालकाची सर्व माहिती मिळते आणि दंड आकारणी सोपी जाते. ह्याच्या उदघाटनासाठी अजितदादा आले होते. तेव्हा पोलिसांची विनोदबुद्धी अचानकपणे जागृत झाली. आणि त्यांनी चक्क अजितदादा नियमभंग करणाऱ्या चालकाला दंडाची पावती देतानाचा फोटो काढून पेपरात प्रसिद्धीला दिला. तो फोटो पाहून हसून हसून पुरेवाट झाली. तो चालक पण अशी पोज देत होता, जणू काही बक्षिसच स्वीकारत आहे. बाकी मंत्र्याकडून दंड का होईना, काहीतरी मिळाले ह्याचेच त्याला अप्रूप असावे.

ह्या सर्वांच्या व्यतिरिक्त कॉल सेंटर वाले, टेम्पोवाले ह्यांच्या आपल्या तऱ्हा आहेतच. ह्या सर्व सर्कशीत शांत डोक्याने सर्व नियम पाळून गाडी हाकणे म्हणजे उच्च काम आहे. एखाद्याला अध्यात्मिक साधनेची एक सुरुवातीची  पातळी, म्हणजे क्रोध नियंत्रण, ही गाठायची असेल तर त्याने पुण्यात अतिशय शांत चित्ताने गाडी चालवण्याचा सराव करावा असे आपले माझे मत आहे.

बाकी  पुण्यातील रहदारीचे नियम धाब्यावार बसवणाऱ्या महाभागांबद्दल माझे एक स्नेही सदाशिव पेठी खाक्यात म्हणतात, “पुण्याच्या लोकांचा अजून आपल्याला स्वातंत्र्य मिळाले आहे ह्यावर विश्वास नाही. कायदेभंग हीच देशसेवा अशी त्यांची धारणा आहे!”

Advertisements

2 thoughts on “पुणेरी वाहतूक”

 1. Farach sundar lihilay. “पुण्याच्या लोकांचा अजून आपल्याला स्वातंत्र्य मिळाले आहे ह्यावर विश्वास नाही. कायदेभंग हीच देशसेवा अशी त्यांची धारणा आहे!”
  Apratim …

  Mala pan kahi suggestions dya please mazya blog baddal …
  http://maplechipaane.blogspot.com/

  1. शंतनू, ते वाक्य माझ्या एका स्नेह्यांचे आहे. त्यांना अभिप्राय कळवतोच.
   तुमचा ब्लॉग जरूर वाचीन, पण सूचना वगैरे देण्याइतपत आमची लायकी नाही हो! जे मनात येईल ते लिहितो आणि शक्यतो कोणाचा अपमान वगैरे होणार नाही एवढे पाहतो.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s