प्रवासवर्णन – पंचमढी – भेडाघाट – इंदौर : ओंकारेश्वर, महेश्वर,मांडू (भाग ४)
स्टेशनवरून हॉटेल वर जातानाचा रस्ता भर बाजारपेठेतूनच होता. अगदी पुण्याच्या तुळशीबाजारामधून जातोय की काय असेच वाटेल. आमचे हॉटेल असलेला भाग मात्र अलीकडेच विकसित झाल्या सारखा दिसत होता. मोठे रस्ते, चकचकीत मॉल्स होते. रात्रीच्या रेल्वे प्रवासात घुसळून निघाल्यामूळे पहिल्या दिवशी आरामात जमेल तेवढेच इंदौर दर्शन करायचे ठरले. लाल बाग पॅलेसला जायला म्हणून निघालो. पण पॅलेस ५:३० वाजताच बंद. मग बडा गणपंती मंदिर पाहून परत आलो. गणपतीची २५ फूट भव्य मूर्ती आहे. ह्या मूर्तीची खासियत म्हणजे ह्याचा सांगाडा तांबे, सोने आणि चांदीचा बनला आहे. मूर्ती बनवण्यात विविध तीर्थस्थानातील माती, चुनखडी, गूळ (!) आणि हत्ती घोडे तबल्यातील चिखल अशा गोष्टी वापरण्यात आल्या आहेत. (संदर्भासाठी येथे पहा).
दुसरा दिवस ओमकारेश्वर आणि महेश्वर. ओमकारेश्वर हे १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक. ह्या स्थळाच्या भोवती नर्मदेचा ॐ आकाराचा वेढा पडलाय म्हणून ओमकारेश्वर. नुकत्याच झालेल्या धरणामुळे इकडे नर्मदेचे पात्र रोडावल्या सारखे वाटते. ओमकारेश्वरमध्ये शिरताच बडवे मागे लागतात. सुरवातीला १०० रुपये दक्षिणा मागणारे बडवे मंदिर जवळ येताच २० रुपयापर्यंत खाली येतात. हे म्हणे पूजा सांगणार आणि पिंडीवर जलाभिषेक करणार. ह्या बडव्यांमूळे की कशा मूळे माहित नाही. पण पंचमढीच्या शंकराच्या मंदिरात मिळणारं देवदर्शनाचं समाधान इकडे मिळालं नाही. ह्या मंदिराचं एक वैशिष्ट्य हे जाणवलं की एका वर एक अशी तीन मंदिरं आहेत.
सकाळी ओमकारेश्वर करून दुपारी जेवायच्या सुमाराला महेश्वर मध्ये. इकडे परत MPTDC च्या हॉटेलात जेवलो. जेवण ठीकठाक. मग इकडूनच होडीने होळकर घाटावर गेलो. घाट बांधायला वापरलेल्या दगडावर जागोजागी नाजूक कोरीव काम केलेले. इकडेच अहिल्याबाई होळकरांचा वाडा पण आहे. घाटाच्या भव्यतेच्या मानाने वाडा अगदीच साधा होता. अगदी पुण्यातल्या एखाद्या वाड्या सारखा. इकडे जवळच हातमागाचे कारखाने आहेत. प्रसिद्ध माहेश्वरी साड्या विणण्याचे काम चालू होते. बायकोचे इकडे रेंगाळणे खिसा हलका होण्याची सूचना देऊ लागले म्हणून घाई करू लागलो, पण पडायचा खड्डा तो पडलाच. स्वतःसाठी आणि कुणाला द्यायला म्हणून खरेदी झाल्यावर दुकानदाराने नुकतीच हातमागावरून आलेली साडी बाहेर काढली म्हणून त्याची पण खरेदी! असो!
होळकर घाटापासून मोटारबोटीने १५ – २० मिनिटांवर सहस्रधारा म्हणून भाग आहे. इकडे नर्मदेच्या पात्राची खोली कमी आहे. आणि प्रवाह असंख्य खडकांवर आपटून पुढे जातो त्यामुळे होणारया सहस्रधारा. आम्ही सोडलो तर हा परिसर पूर्ण निर्मनुष्य होता. फक्त नर्मदेचा खळखळाट ऐकत किनाऱ्यावर बसून राहायला आवडले असते. पण दुपारचे तीनचे उन आणि मुलांना आलेला कंटाळा ह्या दोन गोष्टींमुळे काढता पाय घेतला. हॉटेलात लिंबू सरबत घेऊन परतीच्या वाटेला लागलो.
परताना अंधार होऊ लागला होता आणि रस्त्या च्या दोन्ही बाजूला असलेल्या घरा दारांतून पणत्या लावून दिवाळी साजरी होत होती. कोठेही विजेचा मागमूस दिसला नाही. त्यामुळे अंधारात पणत्या छान दिसत होत्या. काय गंमत आहे आपल्या शहरी मानसिकतेची! आपल्या घरात वीज नसेल तर जीव खालीवर होतो. पण ह्या गावात पणत्यांचे दिसणारे विलोभनीय दृश्य पहाताना वीज नाही म्हणून असे दृश्य पहायला मिळाल्याचा आनंद होतो. पण ते बिचारे गावकरी रोजच अंधारात असतात ह्याची जाणीव होत नाही!
दुसऱ्या दिवशी मांडवगड उर्फ मांडू! पूर्वी ,१३व्या शतकातील माळवा प्रांतातील परमार राजांची राजधानी. पुढे मुघलांच्या ताब्यात गेलेली. बऱ्याच जुन्या इमारतींचे अवशेष सुस्थितीत असलेली ही जागा. जुन्या काळातल्या स्थापत्यशास्त्राचे नमुने छान जतन करून ठेवले आहेत. शासकीय दप्तरी ह्या इमारती मुघलांनी बांधल्या असा उल्लेख असला तरी इकडचे स्थानिक गाईड मात्र ही परमार काळातील ह्या वास्तु असल्याचे दडपून सांगतात. खरे खोटे ते परमार, मुघल आणि देवच जाणे. पण ह्या वास्तू खरंच पहाण्या सारख्या आहेत.
मांडवगड परिसर हा डोंगरावर वसलेला असल्याने पाण्याचा तसं म्हटलं तर तुटवडाच. ह्या प्रश्नावर मात करायला ठिकठिकाणी तलाव बांधले गेले होते. जहाज महालात तर चक्क रेन वॉटर हार्वेस्टिंग केल्याचे पाहिले. शिवाय उन्हाळ्यात तलावा वरून वाहाणाऱ्या वाऱ्यांपासून नैसर्गिक थंडावा मिळावा अशा रीतीने महालाची जागा निश्चित केली गेली होती. पुढे आहे राणी रूपमतीचा महाल. राणी रूपमतीचे माहेर नर्मदेच्या तटावर. लहानपणा पासुनचा रोज सकाळी नर्मदा दर्शनाचा तिचा नेम होता. तेव्हा तिला मांडवगडावरून सुद्धा नर्मदादर्शन व्हावे म्हणून तिचा प्रियकर बाज बाहादूरने हा महाल मांडवगडाच्या उंच भागावर बांधला. इकडून ७-८ किमी वर नर्मदा नदी दिसते.
आता आम्हाला असा प्रश्न पडला की पावसाळ्यात ढगाळ हवा असेल तेव्हा ही रूपमती बाई काय करत असावी? तर त्याचा उपाय खुद्द नर्मदामैय्यानेच केला असल्याचे आमचा गाईड म्हणाला. नर्मदेने रूपमतीला दृष्टांत दिला की बाजबहादुराच्या महाला समोर तिचे अस्तित्व आहे. म्हणून खोदले ते रेवाकुंड. नर्मदेच्या अस्तित्वाचे परिमाण म्हणून येथे तिची प्रतिमा व नर्मदेच्या पात्रात सापडते तशी वाळू सापडली. हे रेवाकुंड नर्मदा परिक्रमावासीयांच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहे. तसेच इकडे चतुर्भुज रामाचे एकमेव असे प्राचीन देऊळ आहे. तेही परिक्रमावासीयांच्या दृष्टीने महत्त्वाचे.
इकडे एक खास प्रकारचा एको पॉईंट आहे. ह्याची खासियत म्हणजे आपण बोललेल्या वाक्यातला शेवटचाच शब्द परत ऐकू येतो. दंतकथा अशी आहे की इकडे पूर्वीच्या एका दाईचे भूत रहाते आणि ते विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देते. उदाहरणार्थ जर एखाद्या विद्यार्थ्याने विचारले की “दाई मा मी पास होणार की फेल?” तर उत्तर येईल, “फेल”. असे म्हणतात की स्वातंत्र्य प्राप्तीनंतर लगेचच पंडित नेहरू इकडे आले असता त्यांना ह्या एको पॉईंटबद्दल सांगितले गेले. तेव्हा त्यांच्या बरोबर फारूक अब्दुल्ला होते. तेव्हा अब्दुल्लांची गंमत करण्याच्या उद्देशाने नेहेरुंनी आवाज दिला “दाई मा, काश्मीर पाकिस्तान का है या भारतका?” तर उत्तर आले “भारतका” ह्यावर अब्दुल्लांनी विचारले “दाई मा पंडितजी सच बोल रहे है या झूट” उत्तर काय आले ते सुज्ञांस सांगणे न लगे. असो. आमच्या अखिल वेगळेची खास बातमी अशी की कलमाडी साहेबानी सुद्धा इकडे विचारले की “दाई मा राष्ट्रकुल स्पर्धेत घोटाळा झाला की नाही?” आणि दाई मा चे उत्तर रेकोर्ड करून पुरावा म्हणून कोर्टात वापरणार आहेत म्हणे.
बाकी इकडे दुपारच्या जेवणात मस्त पैकी दाल बाफला आणि लाडू चे जेवण लोकल हॉटेलात मिळाले. कणकेचे ओवा घालून केलेले गोळे भरपूर तुपात परतून कडक करायचे खाताना ते कुस्कारायचे आणि त्यावर फोडणीचे वरण घालून खायचे. एकदम चविष्ट पदार्थ आहे हा.
एकूण आमची मांडूची सहल उत्तम झाली. पण इंदौरला येऊन ३ दिवस होऊनसुद्धा अजून म्हणावी तशी खादाडी झाली नाही म्हणून जीव तळमळत होता. इंदौरच्या खादाडीबद्दल पुढच्या लेखात!







निरंजन, झक्कास चाललंय वर्णन.. फोटोही छान. पहिल्यापासून वाचत होतो.. शेवटच्या भागावर प्रतिक्रिया देऊ म्हणून थांबलो. पण आजचा भाग एकदमच मस्त झालाय..
आणि
>> आमच्या अखिल वेगळेची खास बातमी अशी की कलमाडी साहेबानी सुद्धा इकडे विचारले की “दाई मा राष्ट्रकुल स्पर्धेत घोटाळा झाला की नाही?” आणि दाई मा चे उत्तर रेकोर्ड करून पुरावा म्हणून कोर्टात वापरणार आहेत म्हणे.
हे तर बेस्टच !!
धन्यवाद हेरंब!
are..Indore rajvadyachya samor pan ek chota dhaba ahe..tithe Garam Pohyanvar dalimbache dane ghalun detat….aai ga…lajawab…tithe tase pohe khallyapasun ghari suddha pohe mhatale ki dalimb havech…
श्वेता,
पोह्यावर डाळिंबाचे दाणे? वा! मस्त आयडीया आहे! आजच घरचे डाळींब काढलेय प्रयोग करून पहायला हवा!
Hi,
First time reading your blog, very interesting and catchy.
Keep it up buddy.
Pohyavarche Dalimbe ekte try karoo naka, amhala pan bolwa.
Rgds,
Prashant
pravas varnan channach aahe,suttit mi tikade jayache mhantoy.
संजय,
प्रतिक्रिये बद्दल धन्यवाद, तुमची सहल कशी झाली ते जरूर कळवा!
shriram……….
mala hi maheshwar v ma narmada darhsnacha yog lavakar aahe
mukund dhule
नमस्कार, आपल्या प्रवासास शुभेच्छा!