Archive

Archive for ऑक्टोबर , 2010

भारतीय जनतेच्या मनाचा ठाव

ऑक्टोबर 9, 2010 10 comments
माझ्या ब्लॉगिंगच्या सुरुवातीच्या काळात लिहिलेला हा एक बरा लेख (माझ्या मते)  बऱ्याच नवीन वाचकांच्या नजरेतून सुटला होता.  आणि एखाद्या ब्लॉग वरचे जुने लेख शोधून काढून वाचणे हे वाचकांच्या सहनशीलतेच्या बाहेर असल्याने ह्या जुन्या कढीला उत आणण्याचा हा प्रयत्न! मिडीयाचे टीआरपी चे खूळ माझ्याहि डोक्यात शिरले असल्याने ब्लॉगच्या हिट्स वाढवण्याचा वायफळ प्रयत्न आहे असे समजलेत तरी चालेल.
दिवस : २६ जानेवारी २०१०.

स्थानीय पुढारी

काल रात्री हुरडा पार्टीला जरा जास्तच झाली. पण काय करणार? सकाळी लवकर उठायलाच लागले. गणतंत्र दिवस ना? झेन्डावन्दनाचा एक तरी कार्यक्रम व्हायला हवा. नाहीतर प्रेस मध्ये छापून यायचे की नानासाहेब गणतंत्र दिवसाला गैरहजर! आधीच बरेच दिवस पेपरात आमच्याविषयी काही चांगले छापून येत नाही. पण वाईट प्रसिद्धी नको रे बाबा! नाहीतर परत मीडियाला गप्प करायला खर्च! आजकाल त्या भाईचा सारखा उदो उदो चालला आहे. आख्खी प्रेस विकत घेतली कि काय? बीआरटी च्या ठेक्या मध्ये चांगलीच मलाई खाल्लीन बोक्याने. आम्ही सत्तेवर नाही तर कोण कुत्रा विचारात नाही. बिल्डर आणि झोपडपट्टी दादांकडून किती दिवस पैसे उकळणार? मंदीने त्यांची पण कंबर मोडलीय. त्यात साहेबांनी भाववाढीची खेळी खेळवली. आख्खा महाराष्ट्र विकत घेतील एवढी माया आहे पण साली खा खा काही सुटत नाही. ५ वर्षांपूर्वी कसे लाळ घोटत आले होते मी पक्ष सोडावा म्हणून! म्हटलं तुमच्या पक्षात चांगली पोस्ट द्या,  तर नाही. त्यापेक्षा म्हणे ५० कोटी देतो आणि दुसरा पक्ष काढ! तेव्हा चांगली वाटली ऑफर. पण अजून सगळे पैसे दिले नाही. परत आता  ते अधून मधून स्विस बँकेचं लचांड! राहिलो असतो त्याच पक्षात तर बरं झालं असतं. सत्तेवर नक्कीच आलो असतो. श्रेष्ठी बरोबर केली असती मांडवली. जास्त फायदा  तर झाला असता? जाऊ दे! आता नवीन काहीतरी खेळी शोधली पायजे. तेलंगणा  सारखं आपण पण महाराष्ट्रापासून पासून आपला भाग वेगळा काढायची मागणी करावी का बरं? एकदा चाचपणी करायला हवी. पण हे उपोषण वगैरे नाही जमायचं. त्यापेक्षा महाराष्ट्र पेटवून द्यायची भाषा करू. म्हणजे तरी सीएम येईल आणि काहीतरी ऑफर देईल. लई खास! चांगला मुहूर्त आहे आजच. संध्याकाळी ठाण्याच्या सभेत बार उडवून देतो.

मध्यमवर्गीय माणूस

च्यायला एवढी चांगली सुट्टी मिळून पण काही फायदा नाही. शाळेने मुलांची हजेरी सक्तीची  केलीय. सुट्टीच्या दिवशी सकाळी सकाळी उठायला लावतात. काय वैताग आहे! एवढ्या फिया घेतात आणि वर आम्हालाच त्रास. पूर्ण सकाळ घालवली ह्या शाळेने. पटकन झेंडा फडकवायचा आणि राष्ट्रगीत म्हणून सोडून द्यायचा  तर नाही. फुकट सार्वजनिक जबाबदारी, लोकशाहीचं महत्त्व ह्यावर भाषणबाजी. आता सकाळपासून बाहेर म्हणून हिला पण घरी जावून स्वैपाकाचा कंटाळा म्हणजे खिश्याला चाट. इकडे महागाई  वाढलीय, नोकरीवर पगारवाढ तर सोडाच, ह्या वर्षी बोनस पण नाही झाला. खर्चाचे डोंगर उभे राहिलेत. गाडीचा EMI  घराचा EMI  मुलांच्या हजार शिकवण्या. त्यात वर ह्या काम वाल्या बाया पण पैसे वाढवून मागणार. माज आलाय ह्यांना नुसता. १० मिनिटात काम उरकणार आणि ५० रुपये वाढवून पाहिजेत. छे! नुसता उबग आला आहे. लवकर विसाचं काम झालं तर बरं. तेवढीच एक US  ट्रीप होईल. per diem  मध्ये थोडे पैसे तरी वाचतील. खरच जेव्हा L1  वर जायची संधी होती तेव्हा गेलो असतो तर किती बरं झालं असतं!

सामान्य पोलीस
रात्रभर नाकेबंदीवर बसून जाम कंटाळा आलाय. आता सकाळी घरी जावं,  तर स्टेशन वर बोलावलं आहे.  झेन्डावन्दन करायला. २० तास ड्युटी झाली पण आराम  नाही. हे गणतंत्र दिन, स्वातंत्र्य दिन , गणपती, नवरात्र असे दिवस आले की  पोट ढवळून निघतं. बाकीच्यांचा आनंद आणि आमची खरडपट्टी. लोकांना वाटतं पोलीस म्हणजे फक्त वरकमाई. ह्यांना आमची चिरीमिरी झोंबते. पण आमचे कष्ट कधी दिसत नाही. २-२ दिवस पोरांची तोंड बघायला मिळत नाही. मिळतो त्या पगारात कुठे घर चालवणार. परत घरात लक्ष नाही म्हणून हाताशी आलेली पोरं वाया जातायत. मी इकडे २६ नोव्हेंबरला  ताजला असताना मित्राचा फोन आला की  पोराला गर्द सकट उचलला. आता इकडे अतिरेक्यांशी लढू की पोराला सोडवायला जाऊ. खरतर  तेव्हाच मेलो असतो. पण  थोडक्यात वाचलो. तेव्हाच मेलो असतो तर घरच्यांना  थोडेफार पैसे तरी मिळाले असते. तरी बरं आता पोरगा मार्गी लागला आहे. पण पोराला नाही होऊ देणार पोलीस. बकवास काम आहे. त्यापेक्षा रिक्षा टॅक्सी चालवली तरी बरे!

शेतकरी
लै खराब दिवस चाल्लेत. आज शाळेच्या मैदानात आमदार आला व्हुता. झेंड्याला सलाम ठोकायला. शिन्च्यान शेतकऱ्याला प्याकेज का काय ते देतो असा सांगूत मतं घेवून जे त्वांड काळं केलं  तो आत्ता उगीवला. म्हनतो कसं, मंदी आलिया, सरकारची तिजोरी खाली हाय. कसलं प्याकेज मागताय. म्हने मंदी आलिया. तालुक्याला ह्या भाड्यानं मोठा बंगला उभारलाय, परत ह्याचीच माणसं आडती. पेरायला बी बियाण दिल्लं आणि तेवाच सस्त्या दामात पिक उचलायचा सौदा केलान. आता अवेळी पावसानं अर्ध पिक नासलं. जे काय उरलं सुरलं ते ह्यानं माती मोलानं उचललं . पुरं नुस्कान झालं. सावकाराकडून बोर खोदायला कर्ज घेतलं  ते फेडू की बायको पोरांना घालाय कापडं घेऊ? विदर्भात शेतकरी फास लावतोय  तर मंत्री म्हणतो नशाबाज शेतकरी होते. आता मला साधं तंबाकूचा बी व्यसन न्हाई तरी हातात पैका कुटं? मलाबी फास लावून घ्यावासा वाटू लागलाय. छी: अशा जिंदगीवर. परवा सरपंच म्हणत होता कि एशिजेड का कायसा हाय त्यात मोठी कंपनी समद्यांची जिमीन विकत घेऊ मागतेय. बक्कळ पैसा आहे म्हनं. पण ही जिमीन म्हणजे माझी माय. हिला विकून पैका  तो काय कामाचा? एक दिवस आला पैका पण निघून जायेल. नंतर परत ये रे माज्या मागल्या! काय समजत नाय. डोस्कं फुटायची वेळ आलीय. विठ्ठला, बाबा आता  तूच काय ते बघणार आमच्याकडे!

टीप - हा लेख सहज गम्मत म्हणून माझ्या कल्पनाशक्तीला शक्य तितका  ताण देऊन लिहिला आहे.  कोणत्याही समाजाला, लोकसमुदायाला दुखावणे हा उद्देश मुळीच नाही. तरीही कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील  तर क्षमस्व!

 

Categories: वैचारिक

बातम्या – न घडलेल्या घटनांच्या

ऑक्टोबर 6, 2010 19 comments

अखिल वेगळे हा आमच्या शाळेतला एक उचापत्या मुलगा. आता बातमीदार. घरात गडगंज श्रीमंती, पण ह्या पठ्ठ्याला पाहिल्यापासून बातमीदारच व्हायचे होते. स्वतःचे महाखबर नावाचे दैनिक काढले. दैनिक मराठी असले तरी गिऱ्हाईक अधिक करून भैय्ये आणि वाणी ! रद्दीपेक्षा स्वस्त असा महाखबरचा पेपर भेळ / पुड्या बांधायला बरा पडतो ना! त्यामुळे आमच्या वेगळेला मराठी सोडून अन्य भाषिकांचे जास्त प्रेम. उगाच “मराठी बाणा” वाल्या पक्षांच्या कुरापती पेपर मधून काढणे हा ह्याचा छंद. मग कधी त्यातून मार पण खायचा. (बहुतेक भेळ खाताना ह्याचे मराठी विरोधी लेख चुकून कोणी बाणेदार मराठी वाचत असावेत. आधीच भेळ खाऊन पोटात आग, आणि त्यावर ह्याच्या लेखाने डोक्यात आग, मग मारामारी करणार नाही तर काय?)

असो. तर असा हा आमचा आगळा वेगळा वेगळे बऱ्याच दिवसांनी मला भेटला. त्याला म्हटलं “काय रे वेगळ्या? बरेच दिवसात कोणाकडून मार खाल्ला नाहीस? काय पत्रकारिता सोडलीस काय?”  ”छ्या! पत्रकारिता ह्या जन्मात सोडणार नाही. प्रस्थापितांना विस्थापित केल्याशिवाय गप्प बसतोय काय?” आता हे प्रस्थापित / विस्थापित हे शब्द माझं डोकं गरगरवणार काय अस वाटू लागलं. वेगळ्या मला इराण्याच्या हॉटेलात च्या पाजायला घेऊन गेला. च्या पीता पिता माझ्या समोर एक फाईल टाकली आणि सिगरेट शिलगावून मला म्हणाला, “वाच येत्या काही दिवसात येणाऱ्या बातम्या! ”  मी फाईल उघडून वाचू लागलो आणि डोळेच चमकले. त्याला म्हटले, “ह्या सगळ्या घडलेल्या घटना आहेत?”  माझ्याकडे वेगळ्या अगदी कुत्सित नजरेने पाहून म्हणाला, “छट! पण काही दिवसात घडतीलच बघ! मी मात्र सगळ्यांच्या आधीच छापून टाकणार आहे.” वेगळ्याकडे कौतुकाने पहात मी त्याने हळूच माझ्याकडे सरकवलेले बिल चुकते केले आणि आम्ही आपापल्या वाटेने निघालो.

दुसऱ्या दिवशी पेपर वाल्याकडे महाखबर मागितला तर पेपर वाल्याने असा काही वाकडा चेहरा केला की कुठून पेपर मागितला असे झाले. मग तिसऱ्या दिवशी वाण्याकडून घेतला. वाणी पण असला बदमाश! नुसता पेपर द्यायला तयार नाही १०० रुपयाची खरेदी करायला लावली. मला वेगळ्याने आधीच वाचलेल्या बातम्या खरच पेपरात आल्या आहेत का हे बघायची उत्सुकता होती. बातम्या खरंच छापून आल्या होत्या की हो! साहजिकच त्या वाचकांच्या पर्यंत पोचल्या नव्हत्या. (वाणी आणि भैय्ये आधीच सगळा महाखबर गायब करून टाकतात ना!) तेव्हा आमच्या प्रिय मित्र वेगळ्याच्या घडण्याआधी प्रसिद्ध झालेल्या बातम्या सर्वांपर्यंत पोचवायचा हा छोटासा प्रयत्न!

टेकड्या ठरल्या पुण्याच्या काळ !

विशेष प्रतिनिधीकडून,

गेले २-३ दिवस पुण्यात मुसळधार पावसाने धुमाकूळ घातला आहे. पानशेतच्या पुरात आले नसेल त्याहून जास्त पाणी शहरभर झाले होते. महापौरांचा बंगला सुद्धा ह्या पाण्यातून सुटला नाही. ११३ सरकारी वाहने आणि थोडीफार माणसे पाण्यात वाहून गेली.  काही नतद्रष्ट पर्यावरणवादी लोक बिल्डर लोकांनी नद्या  नाले बुजवले म्हणून पाणी साचले असा खोटा प्रचार करत आहेत. पण आपल्या माननीय पालक मंत्र्यानी पुण्याच्या परिस्थितीचा सखोल अभ्यास करून असा निष्कर्ष काढला आहे की ही परिस्थिती नद्या किंवा नाले बुजवल्यामुळे आली नसून पुण्यात मधेच उभ्या ठाकलेल्या टेकड्यांमुळे आली आहे. ह्या टेकड्यांवरून धो धो पावसाचे पाणी खाली वाहते आणि पूरसदृश परिस्थिती निर्माण होते. तेव्हा पालक मंत्री नवीन अध्यादेश जारी करून टेकड्या पाडण्या साठी बिल्डर कडून निविदा मागवणार आहेत. जो बिल्डर कमी खर्चात टेकडी जमीन दोस्त करेल त्याला त्या जागेवर बांधकाम करून आपला खर्च वसूल करता येईल अशी ही योजना असेल. ह्या योजनेला विरोध करणाऱ्यांना मोक्का लावला जाईल अशीही तरतूद केली आहे. बिल्डर समाजाने ह्या घोषणेचे स्वागत करून सरकारशी सहाय्य करायची तयारी दर्शवली आहे.

कोणीतरी सरकारशी उघडपणे सहकार्य करायची तशी ही पहिलीच वेळ आहे.

सरकार वापरणार कॉमनवेल्थ पॅटर्न!

कॉमनवेल्थ गेम च्या यशाने भारताची मान जगात खूपच उंचावली आहे. खेळ सुरु व्हायच्या आधी भ्रष्टाचाराच्या आरोपांनी झाकोळलेल्या संबंधितांमध्ये खेळाच्या यशाने नुसती सुटकेचीच भावना नव्हे तर मनात नवी उभारी आली आहे. आम्ही स्पर्धेच्या मुख्यांशी वार्तालाप केला असता त्यांनी सांगितले की एवढा मोठा प्रकल्प करताना उगाच शे दोनशे कोटीचा हिशेब लागत नाही म्हणुन गाजावाजा करू नये. अशाने ठेकेदारांकडून काम करवून घेणाऱ्या सरकारी अधिकाऱ्यांचे उगाच मानसिक खच्चीकरण होते. त्यामुळे देशाची प्रतिमा खराब होते.  ह्या पुढे अशीच मोठी कामे यशस्वी व्हावी म्हणून अशा प्रकल्पांवर काम करणाऱ्या कर्मचार्यांना लाच लुचपत विभागा पासून संरक्षण देण्याचा ठराव सरकार मंजूर करून घेणार आहे. विरोधी पक्षांनी पाठिंबा द्यायची तयारी दर्शवली आहे. त्या बदल्यात खासदारांना सुद्धा लाच लुचपत विभागाच्या करड्या नजरेतून सोडवण्याची तरतूद करायचे सरकारने ठरवले आहे. तसेच प्रकल्पांच्या एकून हिशेबांच्या २५% रकमेचा हिशोब देण्याची सक्ती आता सरकारी कर्मचाऱ्यांवर रहाणार नाही. त्यावर माहिती अधिकार सुद्धा लागू होणार नाही असा अध्यादेश सरकारने जारी केला आहे.  असा हा कॉमनवेल्थ पॅटर्न देशाला उन्नतीच्या पथावर नेऊन ठेवेल अशी आशा स्पर्धेच्या मुख्य अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

अयोध्येचा निकाल अमान्य! चॅनल जाणार सर्वोच्च न्यायालयात

उच्च न्यायालयाचा अयोध्येतील वादाबाबत निकाल सर्व सामान्य जनतेला मान्य असल्याचे चित्र दिसत असले तरी ह्या बाबत समस्त टीव्ही चॅनल वाल्यांमध्ये नाराजी आहे. निकाला नंतर दंगलीची अपेक्षा असल्याने चॅनल वाल्यांनी संवेदनशील ठिकाणी कॅमेरे, रिपोर्टर आणि अगदीच गरज पडली तर भरपूर दगड अशी व्यवस्था केली होती. दंगलीचा आखो देखा हाल द्यायची चोख व्यवस्था ह्या पूर्वी कधीच झाली नव्हती. आता न्यायालयाने सर्वांना खूष करणारा निकाल दिल्याने चॅनलवाल्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. पुढच्या आठवड्याभरात बातम्या कुठल्या द्यायच्या असा गहन प्रश्न त्यांच्यासमोर ठाकला आहे. लोकांच्या भावना दुखावल्या जाऊ नये म्हणून मुद्दाम असा समतोल निकाल देऊन दोन्ही बाजूनी पक्षपात केला गेला आहे असे चॅनल वाल्यांचे म्हणणे आहे. तेव्हा ह्या खटल्यातील वादी आणि प्रतिवादीनी जरी सर्वोच्च न्यायालयाने दाद मागितली नाही तरी उच्च न्यायालयाच्या ह्या निकालाचा पुनर्विचार करण्याची जनहित याचिका चॅनल वाले सादर करणार आहेत.

चोरांचे संमेलन – मध्यमवर्गीयांना दिलासा

नुकतेच पुण्या बाहेरील बालेवाडी क्रीडांगणात देशभरातील तुरुंगा बाहेरील चोरांचे, पुणेरी भामटा समाज ह्यांनी प्रायोजित केलेले संमेलन पार पडले. चोरांचा राजा शोभराज ह्याच्या प्रतिमेला हार घालून संमेलनाला सुरुवात झाली. संमेलनात चोरांच्या व्यथांवर प्रकाश पाडणारा एक परिसंवाद होता. त्यात आधुनिक चोरांच्या समस्या मांडल्या गेल्या. ऑनलाईन बँकिंग, एटीएम, डेबिट कार्ड ह्यामुळे लोक जास्त पैसे जवळ बाळगत नाहीत त्यामुळे चोरीचा धंदा फायदेशीर आहे का असा प्रश्न पुढे करण्यात आला. त्यावर ज्येष्ठ चोर दगडू मानकापे ह्यांनी कल्पकतेत कमी पडणाऱ्या चोरांवर तोंडसुख घेतले. त्याच्या मते चोर आपली शिकार नीट ओळखत नाहीत. मारुती चालवणारा, क्रेडीट कार्ड वापरणारा मध्यमवर्गीय नोकरदार शिकार करणे म्हणजेच आपले प्रयत्न फुकट घालवणे आहे. मध्यमवर्गीय नोकरदार माणसाला लुटण्याचे काम फक्त सरकार करू शकते असे मानकापे ह्यांचे मत होते. तेव्हा आधीच मेलेल्याला मारण्याचा मूर्खपणा चोरांनी करू नये असा सल्ला मानकापे ह्यांनी दिला. त्यापेक्षा चोरांनी आपला रोख सरकारी कर्मचाऱ्यांवर वळवावा असा मोलाचा सल्ला त्यांनी दिला. ह्या सावजाकडे घरात दाबून रोकड असते. शिवाय सफाईने ती चोरली तरी हे सावज पोलिसात जात नाही. कारण रोकडीचा हिशोब मागितला तर काय? तेव्हा सरकारी कर्मचाऱ्यां इतके सुरक्षित सावज नाही. आणि समस्त चोर समाज पिढ्यानपिढ्या आनंदाने चोरी करू शकेल असा विश्वास मानकापे ह्यांनी व्यक्त केला.

बऱ्याच काळाने मध्यमवर्गीयांना सुखावणारी एक तरी बातमी दिल्याचा आम्हास अत्यानंद होत आहे.

Follow

Get every new post delivered to your Inbox.

Join 36 other followers