Archive

Archive for जानेवारी, 2010

पंढरीची वारी

जानेवारी 31, 2010 9 comments

वारकरी

आषाढ महिना म्हणजे पुण्यामध्ये वारीची धांदल असते.  देहू वरून संत तुकारामांची पालखी आणि आळंदी वरून संत ज्ञानेश्वरांची. दोन्ही पालख्यांचा पुण्यात दोन दिवस मुक्काम. पूर्वी मी कॉलेजला असताना वारीचा आणि माझा संबंध हा फक्त पुण्यातील traffic  बदल  ह्या पुरताच मर्यादित होता. पण माझा मित्र रवी ह्याच्या कडून त्याच्या वारीचे (पुणे-सासवड) वर्णन ऐकले आणि मागच्या वर्षी मी पण त्याच्या बरोबर जायचे ठरवले. तेव्हा नुकतेच श्री कुंटे ह्यांचे नर्मदेऽऽहर पुस्तक वाचून मी प्रभावित झालो होतो. तेव्हा म्हटले नर्मदा परिक्रमा दूरची बात, एक पुणे सासवड पायी चालून जायचा तर अनुभव घेऊ!

तेव्हा पालख्यांच्या पुण्यातून प्रस्थानाच्या दिवशी मी आणि रवीने स्वारगेट पासून वारी चालू करायचे ठरवले. कमीत कमी सामान बरोबर असावे म्हणून एक पाण्याची बाटली आणि थोडेसे मेथीचे थेपले एवढेच घेतले. माझा नेहेमीचा वापरातील मोबाईल घरी ठेवून स्वस्तातील स्वस्त मोबाईल अगदी गरज लागली तर म्हणून घेतला. माझ्यासाठी हाच मोठ्ठा त्याग होता. कारण mobile with internet access  म्हणजे माझ्या अंगाचा अविभाज्य भाग. तोच घरी ठेवला. खरं म्हणजे त्याग वगैरे काही नाही, उगाच चोरीला नको जायला म्हणून ठेवला. (आता घ्या! वारीला निघाले निवृत्तीचा आव आणून आणि चोरीची भीती! हा अध्यात्माचा मार्ग कठीणच बुवा!) आणि चक्क वाकड पासून स्वारगेट पर्यंत बस ने गेलो. भारतात परतल्यावर पहिल्यांदाच पुण्याचा बस चा प्रवास होता. पण वारीच्या धुंदीत होतो ना!

बरोबर सात वाजता रवी आणि मी स्वारगेट वरून सुरुवात केली. वाटेत आमच्या सारखी बरीच हौशी मंडळी होती. पुण्यात एक प्रथा आहे. वारकरी मंडळांना काही पुणेरी दानशूर मंडळी चहा, खिचडी, राजगिरा चिक्की असं बरंच काही फुकट वाटत असतात. बाकी पुण्यात फुकट काही मिळणार नाही. पण पुणेरी मंडळींचा वारकरी लोकांवर फारच जीव आहे. माझ्या महाग फोन  बरोबर मध्यमवर्गीय शिष्टाचार  पण मी  घरीच सोडून आलो होतो, तेव्हा आम्ही  बिनधास्त इतर वारकरीमंडळींबरोबर रांग लावून  हे फुकट वाटप जमवत होतो. फक्त पिशव्या जास्ती जड होऊ नयेत एवढीच काळजी घेतली. तशी  मला खाण्याची बरीच आवड. आणि नुसते थेपले सासवड पर्यंत काय पुरणार असा विचार. तेव्हा दोन चार चिक्कीची पाकिटे घेऊन ठेवली. चहा तर केव्हाही प्रियच. शिवाय एवढा चालणार त्यामुळे  जास्त गोड पोटात गेल्यावर  येणारी अपराधी  भावना नाही.

जसे आम्ही कॅम्प च्या जवळ आलो तशी वारकरी मंडळींची गर्दी वाढू लागली. रस्ते गाड्यांना बंदच होते. जेथे बघाल तिकडे फक्त माणसेच. काही पुरुष झेंडे घेऊन चालले होते, बायकांच्या डोक्यावर तुळशी वृंदावन. लोक आपापल्या दिन्ड्यांबरोबर भजने गात चालली होती. आम्हीच आपले सडे फटिंग, दोन माणसांची दिंडी.  साधारण हडपसर पर्यंत पोचलो असू तेव्हा ज्ञानोबांच्या पालखीचे दर्शन झाले. माउलींच्या पादुकांचे दर्शन घ्यायला कोण गर्दी होती. आम्ही पण त्या गर्दीत सामील होऊन धक्का बुक्की खात पादुकांचे दर्शन घेतले. रवीने बरोबर त्याचा कॅमेरा आणला होता. तेव्हा त्याने काही फोटो काढले. जवळपास सात किलोमीटर चालल्यावर आम्ही पहिली विश्रांती चहाच्या टपरीवर घेतली. माझा विश्वास बसत नव्हता की मी चक्क स्वारगेट ते फुरसुंगी नाका विनासायास चालून आलो. अधून मधून मी रविला विचारात असे की आपण एकूण पल्ल्याच्या किती टक्के चाललो. रवी अगदी वारकरी माणसाच्या निर्विकार चेहेऱ्याने सांगे की अजून खूपच चालायचे आहे.

तेव्हा फुरसुंगी सोडून आम्ही उरळी देवाच्या दिशेने चालू लागलो. उरळी देवाची ह्या गावाच्या नावात देव आहे पण हवेत राम नाही. आख्या पुण्याचा कचरा ह्या ठिकाणी आणून टाकला जातो. पूर्ण गावात ह्या कचऱ्याचे प्रदूषण जाणवते. स्वतःचे जीवन आरामदायी व्हावे म्हणून ह्या गावाला आपण नकळत त्रास देत आहोत अशी भावना मनात आली आणी वाईट वाटले. इकडेच एका गावात पालखी च्या स्वागताची जोरात तयारी चालली होती. पालखीचे येथे थोडावेळ विश्रांतीचे स्थान. त्या जागी, गावातील पोलीस महिलांनी छान सडा टाकून रांगोळी काढली होती. पोलिसी वेशातील ही भाविकता एकदम भारी वाटली. येथेच एके ठिकाणी रस्त्यावार खिचडी वाटत होते. आता खिचडी म्हणजे मला खूपच प्रिय! आणि जवळची चिक्की इतर वारकऱ्यांना देऊन आणि स्वतः खाऊन संपली होती. तेव्हा खिचडी खाल्ली आणि दिवेघाटाच्या दिशेने वाटचाल सुरु केली.

दिवेघाटाच्या पायथ्याशी बरीच रोडसाईड हॉटेले होती. मिसळ पाव अशी पाटी दिसली आणि राहवले नाही. रवीला म्हटले “खायची?” आता रविला माझा खवय्या स्वभाव माहिती, तेव्हा तो नाही काय म्हणणार? आणि नाहीतरी म्हणच आहे ना, आधी पोटोबा माग विठोबा. मिसळ खाल्ली आणि थोडे पुढे गेलो. पण भूक भागली नव्हती. दुपारचे बारा पण वाजून गेले होते. बरेच वारकरी त्यांची शिदोरी उघडून बसले होते. आम्ही पण मग एके ठिकाणी पेपर पसरून थेपले वगैरे खाऊन घेतले. थोडावेळ पाय पसरून बसलो. एव्हाना आमचा चालण्याचा वेग पण कमी झाला होता. दुपारचे उन तळपत होते आणि पावसाचा पत्ता नाही. थोडी विश्रांती झाल्यावर घाट चढायला घेतले. घाटाच्या सुरुवातीच्या वळणाला short cut  म्हणून शेतातून पायवाट होती ती पकडली. येथे एक गंमत दिसली. इकडून जाणारे वारकरी रस्त्यातील दगड गोळा करून एकावर एक रचून ठेवत होते. आम्हाला काही कळेना की असे का करत आहेत. तेव्हा एका आजीला विचारले कि बाई असे मनोरे का लावताय? आजी म्हणाल्या “जग करतंय म्हणून मी पण करतेय!” कोणीही आम्हाला सांगू शकलं नाही की असे मनोरे का करतात ते. जाऊदे. पुढल्या वारीला उत्तर शोधायचा प्रयत्न करू.

ह्या दिवेघाटाने मात्र माझा दम तोडला. रवी मात्र जीम ला वगैरे जाणारा. त्यामुळे तो सहज चालत होता. पण डोक्यावर सूर्य आणि चढ ह्यामुळे मी मात्र दमत होतो. शिवाय जवळचे पाणी पण संपत आले होते. तरी बरं घाटाच्या सुरुवातीला पाण्याच्या बाटल्या फुकट वाटत होते. आम्ही दोघांनी गर्दीत घुसून दोन बाटल्या हस्तगत केल्या होत्या. घाटात आम्ही ४-५ वेळा तरी थांबलो. श्वास घ्यायला. शेवटी कसा बसा घाट संपला. घाटमाथ्यावर मस्त थंड दूध कोल्ड्रिंक मिळालं. ते प्यायलो. पुढे एका हॉटेलात चहा प्यायलो आणि पाय ताणून बसलो. एव्हाना हवा पण बदलू लागली होती. ढगांनी गर्दी केली होती. आम्ही पुढच्या वाटेला लागलो. थोड्याच वेळात पाऊस सुरूच झाला. रवी कडे पांचो होता. पण मी मात्र भिजणे पसंत केले.

पाऊस सुरु झाला तशी वारकरी लोकांची इरकल बाहेर आली. पण आता वारकरी पण आधुनिक झाले आहेत बरंका.त्यांची इरकल म्हणजे frito lay च्या पिशव्या ज्या प्लास्टिक सदृश कागदाच्या असतात ना, तशी होती. आणि त्यावर वेग वेगळ्या अमेरिकन कंपन्यांचे लोगो! बहुतेक हे packing material  भारतातून निर्यात होत असावं. आणि जो माल नाकारला जातो, त्याचा असा अभिनव उपाय करत असावेत. जिकडे बघावं तिकडे नुसते अमेरिकन लोगो! आणि त्याच्या आत वारकरी! आगळं वेगळंच दृश्य होतं. बाकी रस्त्याच्या दोन्ही बाजूला फळांच्या बागा होत्या. डाळींब आणि सीताफळ. मस्त वाटत होतं.

जसे सासवड जवळ आले तसे शेतात तंबू दिसू लागले. दिंड्यांच्या मुक्कामाची सोय चालली होती. आम्ही ४ च्या दरम्यान सासवडला पोचलो. आमची वारी येथेच संपली होती. आता सोय पहायची होती परतीची. सासवड च्या बस स्थानकापाशी गेलो तर तेथून एकही बस जात नव्हती. त्यांनी सांगितले की थोडे पुढे जा, तिकडून कापूरहोळला जायची सोय होईल. आता हे शेवटचे फर्लांग अंतर काही मला काटवत नव्हते. शेवटी रवी रिक्षा बस ची सोय पाहायला पुढे गेला आणि मी मागून हळू हळू चालत येत होतो. एक जीप मिळाली. ६-७ माणसे होती. त्यात आम्ही पण शिरलो. रवी मागे आणि मी पुढे ड्रायव्हर शेजारी. आम्हाला वाटले की आमच्या भरतीनंतर जीप भरली, पण  ड्रायव्हरमहाराजांना तसे वाटत नव्हते. म्हणून अजून कोंबली. मला वाटतं आम्ही एकूण १२ जण त्या जीप मध्ये होतो. पुढच्याच आसनावर एकूण ४! मी दोन पेहेलवानांच्या मध्ये. एरवी मी वैतागलो असतो, पण फुकट शरीर चेपून मिळत होते. जीपवर बसल्याबरोब्बर लगेच घरी फोन करून घरची गाडी कापूरहोळला बोलावून घेतली. अर्ध्या तासात कापूरहोळला पोचलो. उतरलो आणि थोड्याच वेळात आमची गाडी आली. आणि आम्ही वारकरी अवतारातून बाहेर येऊन मध्यमवर्गीय जीवनशैलीत पुनःपदार्पण केले.

एका दिवसात २९ किलोमीटर चालण्याचा माझा तरी पहिलाच अनुभव होता. पण एकूण मजा आली. आता दरवर्षी जायची ईच्छ आहे. बघू कसं काय जमतंय ते!

नर्मदेऽऽहर आणि अध्यात्मिक गुरु

जानेवारी 29, 2010 15 comments

आजच पेपरात बातमी वाचली कि श्री जगन्नाथ कुंटे ह्यांच्या नर्मदेऽऽहर पुस्तकाची १०वी आवृत्ती प्रकाशित होत आहे. श्री कुंटे ह्यांनी अजून तीन पुस्तके लिहिली आहेत. त्यातील कालिंदी आणि साधनामस्त ही पुस्तके आणि अर्थात नर्मदेऽऽहर हे पुस्तक, अशी तिन्ही पुस्तके मी एका वर्षाच्या आत वाचली. आता मी कुंटे ह्यांचा चाहता झालो आहे. त्यांची अगदी सहज सुलभ लेखन शैली आणि प्रांजळपणा ह्या दोन गोष्टी खूप भावल्या. कुंटे स्वामी कुठेही आपण आध्यात्मिक गुरु असल्याचा आव आणीत नाहीत पण त्यांची ही पुस्तके वाचली की त्यांच्या आध्यात्मिक खोलीची कल्पना येते. परिक्रमेतसुद्धा त्यांच्या पुढे गुरुपद, महन्तपद वगैरे स्वीकारायची एवढी प्रलोभने आली, पण जेव्हा केव्हा “कम्फर्ट झोन” येतोय असे वाटले, तेव्हा तेव्हा स्वामी तिकडून पळून गेले. एखादा साधा शिष्य पण गुरु बनवून घ्यायला आला असे दिसले तर स्वामी त्याच्यापासून पळून जात. मोठेपणा पायाशी लोळायला येत असताना असे त्याला झिडकारून कफल्लक जीवन पत्करणे खरच किती कठीण आहे, पण ह्या गृहस्थाने (आता गृहस्थ हा शब्द चूक आहे, कारण स्वामींनी दीक्षा घेतली आहे, तेव्हा ह्या बैराग्याने), किती सहजगत्या सर्व मान मरातब धुडकावून, देहाला आत्यंतिक यातन होत असताना सुद्धा नर्मदेची खडतर परिक्रमा एकदा नाही, दोनदा नाही तर तीन वेळा पार पाडली. खरच धन्य आहे. प्रत्येक मराठी माणसाने वाचावे अशी ह्यांची पुस्तके आहेत. इतर वाचकांचे माहित नाही, पण कुंटे स्वामींची पुस्तके वाचल्यावर मला माझ्या वागण्यात सूक्ष्म का होईना पण फरक जाणवला.

तर आजची बातमी वाचल्यावर साहजिकच इतर अध्यात्मिक गुरुंबद्दल डोक्यात विचार आले. तसं पाहिलं तर मी काही खूप भाविक, देव देव करण्यातला मुळीच नाही. हे गुरु वगैरे तर दूरचीच गोष्ट. पण तरीही नातेवाईक, ओळखीतील लोक ह्यांच्या सांगण्यावरून अधून मधून वेगवेगळ्या गुरुंबाबतमाहिती झाली. लहान असताना श्री पांडुरंग शास्त्री आठवले ह्यांचे तत्त्वज्ञान हे पुस्तक घरी यायचे. अत्यंत साधेपणे लिहिलेले ते पुस्तक, पण त्या वेळी डोक्यावरून जायचे. पण नंतर मी अमेरिकेत असताना माझा एक मेहुल नावाचा भाडेकरू होता. तो ह्यांचा अनुयायी. तिकडे अमेरिकेत हा पठ्ठ्या नित्यनेमाने स्वाध्यायाचे पालन करायचा. मला श्री आठवले ह्यांच्याबद्दल किंवा स्वाध्यायाबद्दल पण विशेष माहित नव्हते. पण एक गोष्ट जाणवली की त्यांचा शिष्य परिवार एवढा मोठा होता, पण कोठेही जास्त गाजावाजा नाही. आणि त्यांच्या एकूणच आचार विचारात प्रचंड शिस्तबद्धता होती. पण खेदाची बाब ही की आठवले गुरुजींचे निवर्तन झाल्यावर त्यांच्या वारसाबद्दल काही वाद निर्माण झाला होता. आता सध्या हा स्वाध्याय कसा चालला आहे कोण जाणे.

मी पुण्याला माझ्या मावशीकडे शिकायला असताना एक स्वामी यायचे. रामदासस्वामींचे हे भक्त. इंजिनिअर होते, पण तरुणपणीच संन्यास घेतला होता आणि शिवथर घळीच्या जवळ राहयचे. माझी मावशी आणि तिचे पती हे दोघंही दान करण्यात आघाडीवर. तेव्हा त्या निमित्ताने स्वामीजींचे येणेजाणे होते. फार मोठ्या आवाजात बोलायचे. ह्यांना म्हणे समर्थ दिसायचे आणि समार्थांशी ह्यांचा म्हणे संवाद असायचा. माझा काही विश्वास बसत नसे. मी त्यांना खोदून खोदून विचारायचो की समर्थ दिसतात ते केव्हा, कुठे, आणि मला का नाही दिसत? ते खरं तर वैतागायचे पण तुझी अध्यात्मिक पातळी तेवढी नाही असं काहीबाही सांगून वेळ मारून न्यायचे. मला गम्मत एका गोष्टीची वाटायची की हा संन्यासी माणूस. म्हणजे ह्याला आसक्ती नसावी ही अपेक्षा. पण कधीही मावशीच्या घरी आले की जेवणाच्या पदार्थांची फर्माईश असायची! बहुतेक अधूनमधून संन्याशाश्रामातून गृहस्थाश्रमात प्रवेश करत असावेत!

अमेरिकेत असताना एकदा माझे आई वडील आले होते, त्याच दरम्यान एका प्रख्यात international गुरूंचे New Jersey मध्ये प्रवचन का काहीतरी होते. माझ्या आई वडिलांनी मुंबईत ह्या गुरूंच्या प्राणायाम पद्धतीचा क्लास घेतला होता. तेव्हा वडलांच्या ईच्छेवरून आम्ही सर्वजण New Jersey ला ह्यांच्या प्रवचन का मेळावा त्याला गेलो होतो. गम्मत म्हणजे आयोजकांनी जाहिरात करताना सांगितले होते की मेळावा फुकट आहे. पण तिकडे गेलो तर प्रवेशद्वारापाशीच आयोजकांचे प्रतिनिधी TICKET अशी पाटी लावून बसले होते. साहजिकच कोणालाही वाटेल की कार्यक्रमाला प्रवेश फी आहे. त्यामुळे सर्वांनी ही तथाकथित तिकिटे घेतली. (नंतर कळले की तिकीट घेणे बांधील नव्हते. मग का बरे असा चावटपणा? जाऊदे!) आत गेल्यावर पहिले तर व्यासपीठावर तबला पेटी वगैरे साहित्य होते आणि काही देशी आणि काही गोरे असा शिष्यसमुदाय होता. एका गोऱ्या स्त्री ने अत्यंत बेसूर अश्या आवाजात “रघुपती राघव” हे भजन सुरु केले आणि खरं सांगतो, मला पु. ल. देशपांड्यांचा “काय म्हणाले गुरुदेव?” हा लेख आठवला. त्या दिवशी मी मनापासून वंदन केले; गुरुदेवांना नाही, पुलंना! नंतरचे सर्व प्रसंग पुलंनी लिहिल्या प्रमाणेच घडले. तसेच गुरुदेवांचे आगमन, बेसूर गाण्यावर गुरुदेवांना तंद्री (की समाधी? कोण जाणे!) लागली, मग गुरुदेवांचे अगदी तस्सेच भाषण! मग एकत्रित डोळे मिटून ध्यान करणे. माझ्या आजूबाजूच्या सर्वांनी डोळे मिटले. मी मात्र हळूच डोळे उघडून आजू बाजूला बघत होतो. का कुणास ठावूक मला मात्र फार हसू येत होते. मला एक गोष्ट राहून राहून वाटत होती की हे स्वतःला गुरुदेव म्हणवून घेतात, कपडे मात्र आगदी साधे वापरतात, पण भारतात एवढी गरिबी, गांजलेपण असताना, ह्यांना परदेशातील लोकांच्या उद्धाराचा का बरं एवढा कळवळा? असे ऐकले की ह्यांचा स्वतःचा Lake Taho ला आश्रम आहे! जाऊदे माझी आध्यात्मिक पातळी खूपच खालची आहे. असो.

त्यातल्या त्यात मला आपले रामदेव बाबा मात्र खूप आवडतात. म्हणजे मी त्यांचा शिष्य वगैरे आजिबात नाही बरं? पण ह्या बाबांनी एकाच ध्यास घेतला आहे तो योग सामान्य जनतेपर्यंत पोचवायचा आणि ते काम मात्र छान करतायत. आणि कधीही घरात बोर होत असेल किंवा मूड खराब असेल तर चक्क मी आस्था चॅनल लावतो. अहो आत्मिक शांतीसाठी नाही, पण रामदेव बाबाचे प्रवचन बघायला. त्यांचे हावभाव, भक्तांना दटावणे खूप विनोदी वाटते मला. त्यांचे प्रवचन पहिले आणि हसत सुटलो नाही असे कधी झाले नाही!

नरेंद्र मोदी

जानेवारी 28, 2010 2 comments

परवाच वर्तमानपत्रात बातमी वाचली कि अहमदाबादच्या BRT प्रकल्पाला जागतिक स्तरावर sustainable transport award जाहीर झाले. हा बहुमान मिळवणारी बहुतेक भारतातील पहिलीच योजना. साहजिकच कुतूहल वाढले आणि एकूणच गुजरातच्या प्रगती बद्दल माहिती मिळवण्यास सुरुवात केली. एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली की गुजरात सरकारने अथक प्रयत्न करून आपल्या राज्याला प्रगतीच्या पथावर ठेवले आहे. आणि असेही नाही की गुजरातला निसर्गाचे काही वरदान आहे. उलट पावसाचे कमी प्रमाण, भूजचा हाहा:कार माजवणारा भूकंप, आणि जातीय दंगली अश्या पाठीच्या कणा मोडतील अशा घटना घडल्या. पण तरीही गुजरातची प्रगती काही खुंटली नाही. उलट एक आदर्श राज्य म्हणावे अशी परिस्थिती आहे. साहजिकच असे यश खंबीर नेतृत्व असल्याशिवाय मिळणे कठीण. मला वाटते की  श्री नरेंद्र मोदीच ह्या यशाचे खरे शिल्पकार आहेत.

आता नरेंद्र मोदी हे नाव घेतले की लगेच गुजरातची भीषण दंगल आणि त्यांची जहाल भाषणे ह्याच दोन गोष्टी डोळ्यासमोर येतात. पण ह्या वादग्रस्त गोष्टी तूर्तास आपण बाजूला ठेवू आणि मोदींच्या उर्वरित कारकिर्दीकडे जरा नजर टाकू. भूजच्या भूकम्पानंतर काही महिन्यात मोदींनी सत्तेची सूत्रे हातात घेतली. भूजच्या जनतेचे पुनर्वसन हा मोठ्ठा प्रश्न त्यावेळी उभा होता. हजारो लोक बेघर झालेले. मोदी सरकारने अवघ्या ५०० दिवसात पावणे नऊ लाख कुटुंबांचे पुनर्वसन केले. ह्याची दखल खुद्द UN ने घेतली आहे. सध्या भूज हे नवीन पर्यटन स्थळ म्हणून भारताच्या नकाशावर झळकू लागले आहे. गुजरातच्या खेडोपाडी २४ तास वीज पुरवण्यासाठी मोदींनी ज्योतिग्राम योजना राबवली. ही योजना इतकी यशस्वी झाली की गुजरात हे एकमेव राज्य आहे जे १००% गावात वीज पुरवते. नुसती भरवाश्याची वीज आली की राहणीमानात किती फरक पडतो हे खेड्यात राहिल्याशिवाय नाही उमगायचे.

मोदींनी दूरदृष्टी ठेवून गुजरातच्या उत्कर्षासाठी “पञ्चामृत” योजनाच्या नावाखाली कृषी महोत्सव, चिरंजीवी योजना (बाल मृत्यू आटोक्यात आणण्यासाठी), मातृ वंदना, बेटी बचाव (लहान मुलींची भ्रूणहत्त्या थोपवण्यासाठी), कर्मयोगी अभियान (सरकारी कर्मचाऱ्यांसाठी), कन्या कालावणी योजना (स्त्री शिक्षण) आणि बालभोग योजना (विद्यार्थ्यांना दुपारचे जेवण) अश्या ५ योजना नुसत्या जाहीरच केल्या नाही तर यशस्वी पणे राबविल्या. मोदींच्या  टीकाकारांना सुद्धा त्यांचे हे यश नाकारता येत नाही. साहजिकच मोदी हे गुजरातचे लाडके मुख्यमंत्री बनले आणी तीन वेळा विरोधकांच्या नाकावर टिच्चून बहुमताने निवडून आले. ह्या लोकप्रियतेचा आणि प्रसिद्धीचापण त्यांनी लोककल्याणासाठी उपयोग करून घेतला आहे. गेल्या पाच वर्षात नुसत्या Guest appearance साठी त्यांनी २५ कोटी रुपये गोळा केले आणि सर्वच्या सर्व मुख्यमंत्री निधीला अर्पण केले! कमाल आहे नाही?

मोदींचे यश पाहताना साहजिकच प्रश्न मनात येतो, की जे गुजरात मध्ये घडू शकते ते महाराष्ट्रात का नाही घडू शकत? आपल्या नेत्यांची स्वतःच्या  तुंबड्या  भरण्याची सवय मोडणार कधी? नुसत्या महाराष्ट्राच्या अभिमानानाच्या गोष्टी करायच्या ऐवजी महाराष्ट्राला खरच अभिमान वाटेल अशा लोकापरोपकारी गोष्टी ह्यांना कराव्याश्याच वाटत नाही का?

हा लेख लिहिताना wikipedia चा संदर्भ घेतला आहे.

संस्कृत सुभाषिताचे विडंबन

लहानपणी संस्कृत मध्ये आम्हाला एक सुभाषित होतं:

ज्ञानतृष्णा गुरौनिष्ठा सदाऽध्ययन दक्षता

एकाग्रता महत्त्वेच्छा विद्यार्थीगुणपञ्चकं

ह्याचा अर्थ : ज्ञान मिळवण्याची लालसा, गुरु वर निष्ठा, नेहेमी नवीन काही शिकण्याची ईच्छा, एकाग्रता आणि महत्त्वाकांक्षा हे विद्यार्थ्याचे पाच गुण होत.

किती समर्पक सुभाषित आहे नाही? पूर्वी अशी सुभाषिते वाचण्याचा आणि पाठ करण्याचा मला छंदच होता.  त्याच दरम्यान मी आचार्य आत्र्यांचे झेंडूची फुले हे विडंबन कवितांवर पुस्तक वाचले. माझा एक घट्ट मित्र आशुतोष ह्या पुस्तकातील कविता वर्गात वाचून दाखवत असे. तेव्हा सुभाषितांचा आणि विडंबन कवितेचा माझ्यावरइतका प्रभाव झाला की एक दिवस माझ्या डोक्यात संस्कृत सुभाषिताचे विडंबन करण्याची कल्पना आली. आता विडंबन तर करायचे, पण कोठेही पाणचटपणा येता कामा नये. बरेच दिवस डोके खाजवून झाल्यावर एक दिवस प्रतिभा माझ्यावर प्रसन्न झाली (असे आपले मला तेव्हा वाटले). आणि मला एक सुभाषित (की कुभाषित?) सुचले, ते असे:

सत्ता तृष्णा वित्तैनिष्ठा सदा प्रसिद्धी दक्षता
सदाऽग्रता आसनेच्छा राजकारणी दुर्गुणपञ्चकं

अर्थ: सत्तेची हाव, पैश्याशी निष्ठा, नेहेमी प्रसिद्धी मिळवण्याची धडपड, पुढे पुढे करण्याची खोड आणि खुर्चीची आसक्ती हे राजकारण्याचे पाच दुर्गुण होत.

भारतीय जनतेच्या रोजनिशीतील एक पान.

जानेवारी 27, 2010 4 comments
दिवस : २६ जानेवारी २०१०.

स्थानीय पुढारी
काल रात्री हुरडा पार्टीला जरा जास्तच झाली. पण काय करणार? सकाळी लवकर उठायलाच लागले. गणतंत्र दिवस ना? झेन्डावन्दनाचा एक तरी कार्यक्रम व्हायला हवा. नाहीतर प्रेस मध्ये छापून यायचे की नानासाहेब गणतंत्र दिवसाला गैरहजर! आधीच बरेच दिवस पेपरात आमच्याविषयी काही चांगले छापून येत नाही. पण वाईट प्रसिद्धी नको रे बाबा! नाहीतर परत मीडियाला गप्प करायला खर्च! आजकाल त्या भाईचा सारखा उदो उदो चालला आहे. आख्खी प्रेस विकत घेतली कि काय? बीआरटी च्या ठेक्या मध्ये चांगलीच मलाई खाल्लीन बोक्याने. आम्ही सत्तेवर नाही तर कोण कुत्रा विचारात नाही. बिल्डर आणि झोपडपट्टी दादांकडून किती दिवस पैसे उकळणार? मंदीने त्यांची पण कंबर मोडलीय. त्यात साहेबांनी भाववाढीची खेळी खेळवली. आख्खा महाराष्ट्र विकत घेतील एवढी माया आहे पण साली खा खा काही सुटत नाही. ५ वर्षांपूर्वी कसे लाळ घोटतआले होते मी पक्ष सोडावा म्हणून! म्हटलं तुमच्या पक्षात चांगली पोस्ट द्या,  तर नाही. त्यापेक्षा म्हणे ५० कोटी देतो आणि दुसरा पक्ष काढ! तेव्हा चांगली वाटली ऑफर. पण अजून सगळे पैसे दिले नाही. परत आता  ते अधून मधून स्विस बँकेचं लचांड! राहिलो असतो त्याच पक्षात तर बरं झालं असतं. सत्तेवर नक्कीच आलो असतो. श्रेष्ठी बरोबर केली असती मांडवली. जास्त फायदा  तर झाला असता? जाऊ दे! आता नवीन काहीतरी खेळी शोधली पायजे. तेलेन्गना सारखं आपण पण महाराष्ट्र पासून आपला भाग वेगळा काढायची मागणी करावी का बरं? एकदा चाचपणी करायला हवी. पण हे उपोषण वगैरे नाही जमायचं. त्यापेक्षा महाराष्ट्र पेटवून द्यायची भाषा करू. म्हणजे तरी सीएम येईल आणि काहीतरी ऑफर देईल. लई खास! चांगला मुहूर्त आहे आजच. संध्याकाळी ठाण्याच्या सभेत बार उडवून देतो.

मध्यमवर्गीय माणूस

च्यायला एवढी चांगली सुट्टी मिळून पण काही फायदा नाही. शाळेने मुलांची हजेरी compulsory केलीय. सुट्टीच्या दिवशी सकाळी सकाळी उठायला लावतात. काय वैताग आहे! एवढ्या फिया घेतात आणि वर आम्हालाच त्रास. पूर्ण सकाळ घालवली ह्या शाळेने. पटकन झेंडा फडकवायचा आणि राष्ट्रगीत म्हणून सोडून द्यायचा  तर नाही. फुकट सार्वजनिक जबाबदारी, लोकशाहीचं महत्त्व ह्यावर भाषणबाजी. आता सकाळपासून बाहेर म्हणून हिला पण घरी जावून स्वैपाकाचा कंटाळा म्हणजे खिश्याला चाट. इकडे महागाई  वाढलीय, नोकरीवर पगारवाढ तर सोडाच, ह्या वर्षी बोनस पण नाही झाला. खर्चाचे डोंगर उभे राहिलेत. गाडीचा EMI  घराचा EMI  मुलांच्या हजार शिकवण्या. त्यात वर ह्या काम वाल्या बाया पण पैसे वाढवून मागणार. माज आलाय ह्यांना नुसता. १० मिनिटात काम उरकणार आणि ५० रुपये वाढवून पाहिजेत. छे! नुसता उबग आला आहे. लवकर विसाचं काम झालं तर बरं. तेवढीच एक US  ट्रीप होईल. per diem  मध्ये थोडे पैसे तरी वाचतील. खरच जेव्हा L1  वर जायची संधी होती तेव्हा गेलो असतो तर किती बरं झालं असतं!

सामान्य पोलीस
रात्रभर नाकेबंदीवर बसून जाम कंटाळा आलाय. आता सकाळी घरी जावं,  तर स्टेशन वर बोलावलं आहे.  झेन्डावन्दन करायला. २० तास ड्युटी झाली पण आराम  नाही. हे गणतंत्र दिन, स्वातंत्र्य दिन , गणपती, नवरात्र असे दिवस आले की  पोट ढवळून निघतं. बाकीच्यांचा आनंद आणि आमची खरडपट्टी. लोकांना वाटतं पोलीस म्हणजे फक्त वरकमाई. ह्यांना आमची चिरीमिरी झोंबते. पण आमचे कष्ट कधी दिसत नाही. २-२ दिवस पोरांची तोंड बघायला मिळत नाही. मिळतो त्या पगारात कुठे घर चालवणार. परत घरात लक्ष नाही म्हणून हाताशी आलेली पोरं वाया जातायत. मी इकडे २६ नोव्हेंबरला  ताजला असताना मित्राचा फोन आला की  पोराला गर्द सकट उचलला. आता इकडे अतिरेक्यांशी लढू की पोराला सोडवायला जाऊ. खरतर  तेव्हाच मेलो असतो. पण  थोडक्यात वाचलो. तेव्हाच मेलो असतो तर घरच्यांना  थोडेफार पैसे तरी मिळाले असते. तरी बरं आता पोरगा मार्गी लागला आहे. पण पोराला नाही होऊ देणार पोलीस. बकवास काम आहे. त्यापेक्षा रिक्षा टॅक्सी चालवली तरी बरे!

शेतकरी
लै खराब दिवस चाल्लेत. आज शाळेच्या मैदानात आमदार आला व्हुता. झेंड्याला सलाम ठोकायला. शिन्च्यान शेतकऱ्याला प्याकेज का काय ते देतो असा सांगूत मतं घेवून जे त्वांड काळं केलं  तो आत्ता उगीवला. म्हनतो कसं, मंदी आलिया, सरकारची तिजोरी खाली हाय. कसलं प्याकेज मागताय. म्हने मंदी आलिया. तालुक्याला ह्या भाड्यानं मोठा बंगला उभारलाय, परत ह्याचीच माणसं आडती. पेरायला बी बियाण दिल्लं आणि तेवाच सस्त्या दामात पिक उचलायचा सौदा केलान. आता अवेळी पावसानं अर्ध पिक नासलं. जे काय उरलं सुरलं ते ह्यानं माती मोलानं उचललं . पुरं नुस्कान झालं. सावकाराकडून बोर खोदायला कर्ज घेतलं  ते फेडू की बायको पोरांना घालाय कापडं घेऊ? विदर्भात शेतकरी फास लावतोय  तर मंत्री म्हणतो नशाबाज शेतकरी होते. आता मला साधं तंबाकूचा बी व्यसन न्हाई तरी हातात पैका कुटं? मलाबी फास लावून घ्यावासा वाटू लागलाय. छी: अशा जिंदगीवर. परवा सरपंच म्हणत होता कि एशिजेड का कायसा हाय त्यात मोठी कंपनी समद्यांची जिमीन विकत घेऊ मागतेय. बक्कळ पैसा आहे म्हनं. पण ही जिमीन म्हणजे माझी माय. हिला विकून पैका  तो काय कामाचा? एक दिवस आला पैका पण निघून जायेल. नंतर परत ये रे माज्या मागल्या! काय समजत नाय. डोस्कं फुटायची वेळ आलीय. विठ्ठला, बाबा आता  तूच काय ते बघणार आमच्याकडे!

टीप – हा लेख सहज गम्मत म्हणून माझ्या कल्पनाशक्तीला शक्य तितका  ताण देऊन लिहिला आहे.  कोणत्याही समाजाला, लोकसमुदायाला दुखावणे हा उद्देश मुळीच नाही. तरीही कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील  तर क्षमस्व!

ग्लोबल वाँर्मिंगचे भूत

जानेवारी 25, 2010 3 comments

गेल्या २-३ महिन्यात ग्लोबल वार्मिंग बद्दल बऱ्याच संशयास्पद बातम्या वाचायला मिळाल्या. मागे एकदा कोणीतरी अशी बातमी मिळवली की ग्लोबल वार्मिंग सिद्ध करण्याचे जे पुरावे आहेत त्यात खुद्द शास्त्राद्यांनी फेरफार केले होते. आता परवा अशी बातमी आली की हिमालयातील जे झरे २०३० पर्यंत आटणार अशी बोंबाबोंब चालली होती, त्याला सबळ पुरावाच नाही. आत्ता आजच टाईम्स मध्ये वाचले की जी सध्या वादळे, पूर वगैरे होत आहेत त्या मागे ग्लोबल वार्मिंग कारणीभूत आहे ह्याला काही पुरावे नाहीत. आता हेच शास्त्रज्ञ काही महिन्यांपूर्वी छातीठोकपणे सांगत होते की ग्लोबल वार्मिंग मुळे पूर, वादळे ह्यांचे प्रमाण वाढले आहे. मग आता एकदम मतपरिवर्तन कसे बरे?

मला तरी वेगळाच संशय येतो आहे. ग्लोबल वार्मिंग झाले आहे ह्यात काही वादच नाही. पण आता  भारत आणि चीनच्या उत्कर्षामुळे नैसर्गिक साधन संपत्तीचे वाटेकरी वाढू लागले. मला वाटते की  खऱ्या ग्लोबल वार्मिंग पेक्षा ह्या गोष्टीची झळ विकसित देशांना जास्त पोहोचत असावी. म्हणून मग हे ग्लोबल वार्मिंग चे  भूत जरा अधिकच मोठे करून उदयोन्मुख देशांच्या मानगुटीवर बसवण्याचा हा  डाव  तर नसेल? कोपेन्हेगन मधला  तमाशा तर जगजाहीर आहेच. म्हणतात ना, लोका सांगे  ब्रह्मज्ञान, स्वतः आपले कोरडे पाषाण! त्यातलाच प्रकार दिसतो मला. आणि वाईट गोष्ट म्हणजे, ह्यांच्या राजकारणात शास्त्रज्ञांचा बकरा बनवला जातो आहे.

आता गम्मत बघा, आजचीच बातमी घ्या. आफ्रीकन देशांनी विकसित देशांवर खटला घालायचे ठरवले की त्यांनी केलेल्या उत्सार्जना मुळे ग्लोबल वार्मिंग झाले आणि त्यामुळे पूर वगैरेचा फटका आम्हाला बसला म्हणून आह्माला $१०० बिलिअन नुकसान भरपाई द्यावी. आता आपणच निर्माण केलेले  भूत आपल्याच मानगुटीवर बसणार हे पाहताच, सुतोवाच झाले की ग्लोबल वार्मिंग आणि वाढणारी वादळे ह्यात काही संबंध आहे असा सबळ पुरावा नाही! मुत्सद्दी पणाची कमालच म्हटली पाहिजे.

आता काही दिवसांनी अशीही बातमी येईल की ग्लोबल वार्मिंग ही निसर्गाचीच करामत आहे आणि मनुष्यनिर्मित उत्सार्जानाचा काडीचाही संबंध नाही! आणि तुम्ही आम्ही सर्वजण दैवावर भरवसा ठेवून उकाडा, अनियमित पावसाळा सहन करत आयुष्य जगातराहू.

अथ लेखनारम्भः

जानेवारी 23, 2010 4 comments

नमस्कार मंडळी! श्री गणेशाला स्मरून हा ब्लॉग प्रपंच थाटत आहे. रोज काहीतरी लिहावे हि इच्छा! बघूया कास काय जमतंय ते. खरं म्हणजे मराठी लिहिण्याची खाज माझी लहान पणापासून. पण नोकरी लागल्या पासून इंग्रजीच जास्ती जवळची झाली आणि संगणकामुळे लेखणी हातात धरायची सवयच मोडली. आश्चर्य वाटतं, पण सध्या सही करण्यापुरती काय ती लेखणी हातात धरली जाते. जरा चार ओळी हाताने लिहाव्या तर चक्कं हात दुखतो! पण ह्या गूगल ने मराठी सोप्या प्रकारे लिहिण्याची छान सोय केली. संगणकावर मराठी वाचायला कसंमस्त वाटतं !

आता थोडे ह्या ब्लॉगच्या नवा बद्दल. खरतरं योग्य नाव तसं काही सुचत नव्हत. तेव्हा पत्नीने सुचवले. सुकामेवा अशासाठी की ब्लॉगचा असा विशिष्ट विषय नाही. म्हणजे विषयाची सरमिसळ. पण सरमिसळ पेक्षा सुकामेवा हे शीर्षक आवडले कारण कि सध्या व्यायाम आणि वजन कमी करणे ह्याचे खूळ आमच्या डोक्यात! त्यामुळे, मिसळपेक्षा जास्ती आरोग्यकारक म्हणून सुकामेवा! बाकी पुलं म्हणतात त्याप्रमाणे नावात काय आहे म्हणा! त्यांच्याच  शब्दात, “नाव शिवाजी राजेभोसले आणि चालवणार पिठाची गिरणी!” असो. हा सुकामेवा खवट न निघो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

हा सुकामेवा जर आपणास पसंत पडला तर जरूर प्रतिक्रिया कळवा. सूचना असतील तरी कळवा. आता मी मुळचा मुंबईकर पुण्यात राहत असल्यामुळे सूचना ऐकण्याची चांगली सवय झाली आहे ! देणाऱ्याने सूचना द्याव्यात, घेणाऱ्याने स्वतःच्या सद्सद्विवेक बुद्धीप्रमाणे ठरवावे की सूचना स्वीकारायच्या कि नाही ते. काय, बरोबर ना?

चला लिहिण्यास सुरुवात तर झाली. कार्य सिद्धीस नेण्यास श्री समर्थ आहेतच.

Follow

Get every new post delivered to your Inbox.

Join 36 other followers